शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

जुळ्या बहिणी ©️

  


लहानपणी आई आम्हाला खूप गोष्टी सांगायची. रंगवून रंगवून गोष्ट सांगण हा आईचा हातखंडा!  कित्येक वेळा तोंडात घास तसाच आणि "तू  पुढे सांग ना गोष्टीत काय झालं ते ?"असे म्हणत आम्ही जेवत असू. तिच्या त्या गोष्टी म्हणजे माझ्या आठवणींच्या पसाऱ्यातील अतिशय मौल्यवान ठेवा. आई पण तिच्या आठवणींचा पसाराच  आमच्या समोर  नेटकेपणाने आवरायची. तिच्या लहानपणीच्या गोष्टी सांगायची. म्हणजे आठवणींचा पसारा आवरणे ही" मेरी  खानदानी बिमारी है" आईची  एक आवडती गोष्ट होती जुळ्या बहिणींची! त्यातील एक बहिण सुंदर,आनंदी तर दुसरी कुरूप, दुःखी. आता मी आजी झाले.नातवंडांना गोष्ट सांगायची वेळ आली आहे, आईच्या गोष्टीतील ह्या   जुळ्या बहिणीं  सतत आठवतात. एकीचं नाव होतं 'पहाट' तर दुसरीचे 'सांज'!


                        जुळ्या बहिणी ©️


खरं तर तिची अनेक नावं आहेत. कोणी तिला उषा म्हणतात कोणी प्रफुल्लता म्हणतात कोणी प्रातःकाल म्हणतात .  ती येते ती वेळ म्हणजे उत्तर रात्री आणि सकाळ  यांच्या मधे असलेली सुगंधी कालकुपी .सूर्योदयाच्या आधीची वेळ .येते तिच मुठभर अंधारात अन् चिमुटभर उजेडात.पारिजातकाच्या सड्यावरून, फुलांच्या सुगंधावर स्वार होऊन, पक्षांच्या तुता-यांच्या तालावर! अशी ती 'पहाट'! सर्वांना आनंदित करण्याचं काम कित्येक  लाखो  वर्ष इमानेइतबारे करते आहे. अगदी आदिमानवाच्या काळापासून. आंधळ्या अंधारात पूर्वेकडे दिसणारा तो लालसर ,केशरी रंग ,किंचित  फिकुटलेले आकाश.  नवीन आयुष्याची, नवीन दिवसाची  सुरुवात. काळोख जाणार,  नव प्रकाश आता येणार हाच त्या आदिमानवाचा आनंद! अजून पर्यंत पहाटेचे महत्वाचे स्थान तसेच कायम राहिलेय. ती प्रसन्नवदना. आदिमानवच नाही तर अनेक प्राण्यांना, झाडाझुडपांना  ती संजीवन देते. तिचा हा प्रवास अजूनही तसाच चालू आहे कित्येक वर्षे, प्रत्येक ऋतुत.

         जेव्हा उन्हाळा सणाणून रागावला असतो.कारण एकच पृथ्वी सूर्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली असते. त्यामुळे सहाजिकच तिचा आस  सूर्याकडे झुकलेला, अगदी कशाचीही पर्वा न करता! पृथ्वीचा उत्तर गोलार्ध उन्हाच्या तल्लखीने कासाविस!अशा अवघड वेळी दिवसाचा सर्वात सुंदर,रमणीय काळ असतो पहाटेचा. रात्र गरमागरम, या कुशीवरून त्या कुशीवर वळायला  लावणारी.कासाविस  करणारी. मग नजाकतीने  पहाट येते. क्षणात दूरवरून कोकीळेची आर्त पंचमातील आवर्तने  सुरू होतात. एक सुखद झुळूक घामेजलेल्या शरीरावर फुंकर मारते.बाहेर दाटलेला अंधार थोडासा सैलावल्यासारखा आणि कोमट होतो. तुम्ही नशीबवान  असाल तर येणारी प्रत्येक झुळूक वाळ्याच्या आणि मोग-याच्या सुवासात डुबकी मारून येते.रात्रभरच्या जागरणाने तळावलेले डोळे निद्रेला सपशेल शरण जातात. जागलेल्या संपूर्ण रात्रीनंतर पहाटे मिळालेली ओंजळभर  सुखद झोप!व्वा sss.

        याउलट थंडीची लांबलचक रात्र.गारठवणारी.पृथ्वीबाईंचा उत्तर गोलार्ध आता सूर्याला टाळून त्यापासून दूर झुकलेला! पृथ्वी आणि सूर्य  या दोघातील दुरावा म्हणजे शीतयुध्दच! थंडीतली पहाट नुसती उबदार दुलईत अनुभवावी .

           पहाटेची लाल केशरी पिवळी वस्त्रे पूर्वेदिशेकडे पडलेली असतात.आपल्या जुळ्या बहिणीला संध्येला ती  कशी द्यावी   या काळजीत पहाट! मग कधी ती धुक्याचा पडदा तयार करून त्या आड ते रंगित वस्त्र लपविते.

             या थंडीच्या वेळी अभ्यासा साठी पहाटे उठणे म्हणजे काळ्यापाण्याच्या शिक्षेहून अवघड शिक्षा.लख्ख  सकाळ  होईपर्यंत उबदार दुलईत ती सुखद उब अंगभर मुरवत, पुरवत पडून रहाणे म्हणजे सप्त स्वर्ग मिळाल्याचा आनंद. अर्थात दिवाळीची पहाट सगळ्या गोष्टींना अपवाद.

      पावसाळ्यात तर पहाट स्वतःचे अस्तित्वच हरवून बसते. एकसुरात टपटपणारा पाऊस आणि काळ्या ढगांचा धुमाकुळ  यात पहाट जाते बावरून आणि पटकन 'सकाळ' मधे विलीन होते. धबाधबा पाऊस पडत असताना अंधार दाटून आल्यावर शेवटी कोणती वेळ आहे हे  कळण्यासाठी घड्याळालाच  शरण जावे लागते. काहीच कळत नाही कुठली पहाट आणि कुठली दुपार ते!

      अशा या पहाटेच्या विविध त-हा. अल्पजीवी पण नितांत सुंदर दवबिंदूंचा खजिना, पक्षांचा किलबिलाट, अंधाराच्या कुपीतून उधळले गेलेले केशरी  पिवळे लाल रंग,दिमाखात प्रवेश करणारा सूर्यदेव हे खास पहाटेचे दागिने. शेवटी जुळ्या बहिणीतली सुंदर,लाडकी, उत्साही बहिण नं ती!!

       अन्  पहाटेची जुळी बहिण? जर गावाबाहेर अथवा शेतात आपण रहात असलो तर आपल्याला पूर्णपणे भेटते 'सांज'. कोणी तिला 'कातरवेळ'  म्हणतात तर कोणी 'दिवे-लागणीची वेळ'.अतिशय  योग्य नावं मिळाली आहेत तिला. ही पहाटेची सहोदर! जुळी बहिण! दुर्मुखलेली, कोमेजलेली! कल्पना करा संध्याकाळ  निघाली आहे रात्री कडे . सूर्यास्त होतोय पण अजून गुडूप रात्र सुरू व्हायच्या आधी तिची वाट अडविते 'सांज'.धुळीचे वातावरण, मुठी मुठीतून निसटून जाणारा उजेड आणि ओंजळी ओंजळीभर दाटणारा काळोख. एखादी वाट चुकलेली चांदणी आकाशात ! करsकssरकsर रातकिड्यांचा आवाज कानात, मनावर ओराखडे  काढतो आहे, घुबडाचा मधनच घुत्कार, वटवाघळांच्या   सावल्या आता उडताना दिसताहेत, दूरवरून ऐकू येणारी कोल्हेकुई ह्रदयाचे ठोके वाढवतेय. पक्षी कधीचेच घरट्यात परतलेत.कधी कधी दूरवरून कानावर येते फक्त विराणी! . दूर गेलेल्या प्रियजनांच्या आठवणीने आपल्या जिवाची नुसती घालमेल उडाली आहे. देवघरातील निरंजनाकडे क्षणाक्षणाला  नजर वळते आहे. अशुभाच्या आशंकेने डोळे ओलावताहेत. करकरे सांज अशी वेळ ही.

        संध्याकाळ आणि रात्र यांच्या सीमेवर रेंगाळत असते सांज. पण गम्मत म्हणजे तिच्याकडेही रंगीत वस्त्रे  असतातच अगदी संध्याकाळ जवळ असतात एवढी नसली तरी थोडी कमी का असेना  असतातच.   सांज ही आपल्याला काळोखाकडे नेणारी. अनादी अनंतकाळापासून घाबरवणारी. तान्हया बाळांना तळतळून रडविणारी.संध्यासमयीची उदासी हा वैद्यकीय  शास्त्रातील कुतुहलाचा विषय.म्हणूनच  या उदास मनावर उतारा म्हणूनच बहूधा पूर्वी घराघरात कोवळ्या आवाजातील शुभंकरोती समईच्या उजेडात घर  उजळवून टाकत असे. सांज  घनघोर अंधारात विरून जाते. विरता विरता आपली वस्त्रे पूर्वदिशेला आपल्या बहिणीसाठी ठेवून जाते.

         या अशा दोघी जुळ्या.तस पाहिलं तर दोघींच्यात साम्यही खूप. लाल पिवळ्या केशरी रंगाची कमी जास्त आतिशबाजी आकाशात दोघीही करतात.  आपल्या पूर्व किनारपट्टीवर समुद्रकिनारी काढलेला सूर्योदयाचा फोटो आणि गोव्याला काढलेल्या सूर्यास्ताच्या फोटो  यातला फरक कोणीही ओळखून दाखवावा. तसाच समुद्र, तीच माडांची गर्दी, पांढरी सोनेरी वाळू आणि अमर्याद  पसरलेल्या समुद्राच्या क्षितीजावर तो समुद्रातून हळूच डोकावणारा कोरभर सूर्य! यातला सूर्यास्त कुठला आणि सूर्योदय कुठला हे पैजेवार सांगाव.इतकं दोघींच्या मधे  साम्य! किंवा कुठल्याही डोंगरमाथ्यावर सूर्यास्त  किंवा सूर्योदय पहावा. एकदम सेम टू सेम.तिच डोंगरांची महिरप, अंधार-उजेडाचे झकास काॅकटेल,लाल,नारिंगी,पिवळ्या निळ्या रंगांची लयलूट. दोन डोंगरांमधे किंचित दिसणारा सूर्य मस्त लालकेशरी! आता ओळखा बघू पहाट का सांज?

       पहाट कमलिनींना उमलवत असेल पण रात्री उमलणा-या कुमुदीनीवर तिची जादू चालतच नाही . सांज येईपर्यंन्त कुमुदीनी पाकळ्या घट्ट मिटून फुरंगटून बसलेली. सांज येताच लागली खुदखुदायला! निशीगंध, रातराणी,गुलबक्षी घमघमतात, खुलतात फक्त सांजेलाच .प्रातःकाली  नाही. वाघासारखा डौलदार प्राणीही सांजेला टक्क जागा होतो आणि तेव्हा ख-या अर्थाने त्याच्या दिवसाची सुरवात होते.जंगल आळस झटकते.पाणवठ्यावर जमते .आता खरोखरच  जंगल जागे होते.बाकी आपले निशाचर पक्षीही जोरदार धडक मारतात, उंदरांसारख्या उपद्रवी प्राण्यांना उचलायला. तेही सांजेलाच! तेथून अगदी रात्र संपेपर्यंत त्यांचा अनिर्बंध संचार सुरूच. 

           सांजही अशा  कित्येक जीवांना उत्साह देते अगदी' पहाट' 'जीवन देते नं  तसेच . एवढेच नाही तर जसे नवजीवनाची सुरवात पहाटेपासून असते तशीच हवाहवाश्या पुरेशा विश्रांतीचा पाया रचते सांज. 'जरा थांबा'. हा तिचा मंत्र! मग ही सांज वाईट कशी?ही सांज कुरूप कशी? तिला दुर्मुखलेली तरी कसे म्हणायचे? फक्त अंधाराकडे नेते म्हणून? नेते अंधाराकडे पण  सकल जनांना शांत झोप देऊन अधिकच ताजेतवाने करायलाच ना?.

         माझ्या उत्फुल्ल नातीच्या जीवनाचा उषःकाल सुरू आहे .   आणि मी तिची आज्जी सांजेच्या कठड्याला धरुन उभी आहे. 

माझ्या नातीला जेव्हा ' मी'   जुळ्या बहिणींची गोष्ट सांगेन तेव्हा नक्कीच  सांगेन सांज कधीच  दुःखी, दुर्मुखलेली नसते. ती वाईट तर मुळीच नसते, फक्त ती पहाटेपेक्षा  वेगळी असते. पहाट जशी नव चैतन्याने रसरसली असते, तशीच सांज विश्रांतीसाठी आसुसली असते. पहाटेसारखीच सांजही शितल,सुंदर असते. अशा या सुंदर आनंदी पण आगळ्या वेगळ्या जुळ्या बहिणींची ही गोष्ट सुफळ संपूर्ण. 



माझे इतर लेख वाचायचे असल्यास खालील लिंक वापरावी. 

      https://drkiranshrikant.pasaara.com 


            

         




४ टिप्पण्या: