शुक्रवार, १ जानेवारी, २०२१

कपाट ©️

 कपाट ©️


       अचानक कपाट आवरायची हुक्की आली की मग मी आधी अंदाज घेते,कपाट आवरताना मला आवरता आवरता किती वेळा उठायला लागेल याचा! समस्त स्त्रीवर्गा  सारखच माझेही मत  आहे की अस छानस एकाग्र होऊन मस्त सुर लागलेल्या गवयाच्या तल्लीनतेने कपाट आवरायला मिळणे म्हणजे साता जन्माची पुण्ये फळफळून आलीत असे समजावे. नेहमी कपाट उघडून बसलंकी अशी झकास समाधी लागते न!तोच कानावर हाक येतेच "इथे ठेवलेलं पुस्तक कुठे आहे ग?"आमच्या घराचे खास वैशिष्ट्य  आहे समोर हत्ती उभा असला तरी कुठे आहे हत्ती म्हणत सगळीकडे सैरावैरा शोधत बसतील. असो. तोच मुलाची आरोळी येईलच "आई रॅकेट कुठेय?" थोडक्यात शांतपणे कपाट आवरणे हे गुलबकावलीच फूल मिळवण्या सारखच आहे. 

     पण जर कधी हा चान्स मिळाला तर चपळाईने  मी तो पकडतेच. माझ्या कपाटातील एक कप्पा आहे 'दिवाने खास'. 'फक्त माझाच! .लोकशाही जशी लोकांची , लोकांसाठी लोकांनी निर्मिलेली तसाच हा कप्पा फक्त माझा, माझा आणि माझाच. माझा दिवाने खास!फक्त मलाच तो उचकायची परवानगी. बाकी कपाटात करू दे कोणीही कितीही उचकपाचक.पण याला हात लावायचा तो फक्त मीच!  या कप्प्यात असतात मस्त वाळ्याच्या सुगंधाच्या हळव्या तरल  मखमली, मुलायम आठवणी. अरेच्चा हा खास आईने आठवणीने दिलेला शालू.तिच्या शेवटच्या आजारात दिला तो मला. थोडा विरला आहे पण तो जन्मसिद्ध  अधिकाराने या कप्यात ऐसपैस बसला असतो. अगदी माझ्या मुलाच्या मुंजीतही हाच शालू नेसली होती आई. आणि तेच ते तिचे वाळ्याचे आवडते अत्तर. बराच वेळ त्या साडीवरून तंद्रीत  हात फिरायला लागतो.त्या साडीवर मागे ठेवलेला  पत्र्याचा चपटा चाॅकलेटचा एक डबा ! तो मी हळूच उघडते. माझे लग्न ठरल्या नंतर सहा महिन्यांनी झाले.त्या काळात एकमेकांना  लिहिलेली पत्रे.कधी काळी आपण एवढे भावूक, हळवे होतो हेच खरे वाटत नाही. त्या शेजारी असलेली जुन्या फोटोंची पिशवी. त्यातले ते माझं काजळ माखलं वेडविंद्र ध्यान मुलांनी एकदा पाहिले आणि आठवडाभर मेली खुदखुदत होती. 

           असेच एके दिवशी मी घरात कोणी नाही हे बघून कपाट आवरायला काढलं. उजवीकडे, डावीकडे-, वर खाली, मागे, पुढे सर्व दिशा पारखल्या.  हुश्शssss !!!कोणीच नाही . मस्तपैकी जुने फोटो काढले.तोच फिदी फिदी हसायचे आवाज आलेच. दोन्हीही चिरंजीव कधी आले होते हे समाधीस्त मला कळलेच नव्हते. मुलाच्या हातात होता झेंड्यासारखा उंच धरलेला पण तडफडणारा आमचा जत्रेतला फोटो.खरतर मेडिकल काॅलेजमधे असताना पहिल्यांदा जत्रेत आम्ही मैत्रीणी गेलो होतो. तेव्हाचे ते गाडीच्या कटआऊट मधले फोटो आज पाहिले तर अफाट आणि बेफाट विनोदी दिसतात हे मात्र सत्य.ओपन टपाचे ते कार्डबोर्डचे इंपालाशी थोडेसे साम्य दाखविणारे कटआऊट !त्यात ते खोटेच पुठ्ठ्याचे चालकांचे चक्र आणि ते हातात धरून मैत्रीणींबरोबर काढलेला फोटो. बापरे बाप! भरीस भर म्हणून सगळ्याजणी कोणाला तरी टाटा करतानाची पोझ.

      या सगळ्या गोंधळात व्यवस्थित रहायचा मक्ता घेतलाय तो फक्त या एका 'दिवाने खास' कप्प्यांनी! बाकी माझे कपाट माझ्या व्यक्तिमत्वाला साजेसं! अस्ताव्यस्त !

     तसे प्रत्येक कपाटाचे स्वतःचे व्यक्तिमत्व असते. खास कंपनीची लोखंडी भली भक्कम कपाट जराशी शिष्ठ वाटतात. आम्ही खास ब्रँडेड आहो असा उर्मट भाव चेह-यावर स्पष्ट  दिसतो त्यांच्या!.आव्हान देत जणू म्हणतात 'हात लावायचा नाद करायचा नाय'.कधी कधी तर वाटत डोळे वटारून कपाट ओरडेल" खामोष बघतोयस काय मुजरा कर".पण हीच कपाट सरकारी कार्यालयात बापूडवाणी वाटतात.    सागवानी किंवा शिसवी कपाट एकदम खानदानी.हळूच उघडतानाही दडपण येईल अस.' मोडणारही नाही  हलणार पण  नाही' हे ब्रीदवाक्य पुटपुटणारे.एका जागी बसले तर तिथून हलवणे महा कठीण.  अगदी दहा बारा जणांची फौज असली तरी!  काही भली मोठी सागवानी कपाट मात्र एकदम गुढ दिसतात. कुठलं तरी रहस्य जीवापाड संभाळत असल्यासारखी. तर काही काही थेट नारायण धारपांच्या गुढ कथेतून उचलून आणल्यासारखी.उघडल्यावर काही तरी धडपडत,लडखडत  बाहेर येईल असे. मात्र आजकालची नवी प्लायवूडची कपाट जरा नटवी.  दिसायला देखणी पण भक्कमपणा इल्ले!

        माझ्या माहेरी आम्हा सर्वांसाठी वापरायला एकच कपाट. तेही महा भलेभक्कम शिसवी! काळकरंद ,जरास कळकटलेल, एका दारावर दार भरून आरसा. तोही थोडा पारा उडालेला. आत मधे मोठे कप्पे , चोरकप्पे आणि काय काय. पिवळ्या पितळी कड्या. आई त्या कड्या मात्र एकदम चकचकीत ठेवत असे. कपाट एवढे मोठे की पाच सहा मुले आरामात लपू शकतील. कपाटात  बसायला मात्र आम्हाला पूर्ण बंदी! या बाबतीत आखलेली लक्ष्मणरेषा एकदम पाॅवरबाज.

           पिढीजात आलेले ते कपाट भरायचे कशाने हा खरतर सर्वात मोठा प्रश्न असे.आई नोकरी करणारी त्यामुळे  त्या कपाटात मनसोक्त पसारा मी करत असे आणि ते गच्चीम भरून टाकत असे. त्यासाठी बोलणीही खात असे.कोणी घरी येणार म्हणजे धुतलेले ,पलंगावर निद्रिस्त अवस्थेत लोळणारे कपडे आमचे कपाट लगेच स्वाहा करत असे . हाय काय अन् नाय काय. पण एकदा गंमत झाली असेच अचानक पाहूणे आले. मी तत्परतेने दोरीवरचे आणि इतस्थतः पसरललेले कपडे केले गोळा आणि कपाटाच्या वासलेल्या तोंडात भरवला हा घास. पण त्या दिवशी नेमके कपडे जास्त अन् कपाटात जागा कमी मग काय जोर लगाके  हैशा! कोंबले सगळे कपडे. कपाटाच्या दारांनी बंद व्हायला जाम नकार दिला मग परत पाठीने जोर लगाके  -------. नंतर आई शाळेतून आली.आलेल्या पाहुण्यांची ओटी भरायची म्हणून खण काढायला तिने कपाटाचे दार उघडले. हाय रे दैयाsss. कपड्यांचा धबधबा अचानक अंगावर कोसळला, कपड्यांच्या पुराने अचानक हाहाकार माजला, मुंग्यांनी मेरूपर्वत गिळला अशी भयानक अवस्था  झालेली. आईची अवस्था  " ये क्या हो रहा है अशी" मला खरतर हसायला येत होत पण कपड्यांच्या टेकडीमधे लपलेल्या आईचा चेहरा न बघताच भावी संकटाची चाहूल माझ्यासारख्या चाणाक्ष  मुलीला लागली आणि मी तिथून काढता पाय घेतला.

      माझ्या लहानपणी एकदा आम्ही गावाला गेलो होतो तेव्हा चोरांने घर फोडले. कपाटाला तर कुलूप नव्हतेच त्यामुळे चोरांने ते उघडले असणारच पण मुलांच्या खेळण्यापासून ते धुवट कपड्यापर्यंत आणि भरपेट पुस्तकाने संपृक्त आणि संतुष्ट दिसणारे कपाट म्हणजे चोराच्या दृष्टीने अती अनाकर्षक वस्तू!  असले कपाट बघितल्यावर चोराला"कहा फस गयो" असे नक्कीच वाटले असेल.बहुधा कपाटाला लावलेल्या आरशात बघत रागाने स्वतःचे केस उपसत तो पळाला असणार. अर्थात  कपाटावरच्या जरा फिकटलेल्या जरा काळे डाग पडलेला आरसा म्हणजे आमच्या प्रसाधनाचे एकमेव साधन! आमच्याच नाही तर घरभर चिवचिवाट करत बागडणा-या  चिमण्याही नटायला मुरडायला याच आरशापाशी यायच्या. बर गुपचूप नटतील मुरडतील तर  -- पण नाही आरशावर चोचीने भरपूर टोचा  मारत बसायच्या.वर व्याज दिल्यासारखे आमच्या मेंदीला रंगायला लागणारे आपले पोटही तिथेच रिकाम करायच्या.

       लग्नानंतर पहिले झूट सूताराकडून मी बनवून घेतले छानसे लाकडी कपाट. त्यात कपडे ठेवायला ड्रावर्स.कपडे टांगायला मोठा कप्पा आणि हॅगर्स. अगदी वर माझा दिवाने खास!

ड्राॅवर केले खरे मात्र कोंबा करायची सवय लहानपणापासून हातवळणी पडलेली त्यामुळे  थोडे जरी जास्त भरले तर ड्रावर्स पूर्णपणे असहकार पुकारतात. अडेलतट्टू पणे उघडेच्या उघडे.  त्यात कोंबलेले कपडे काढेपर्यंत  तस्साच आ करून बसणार. ड्राॅवर अडकून बसला तर सुतारदादाशिवाय पर्यायच नाही.

        आमच्या घरातील मनीमाऊलाही या कपाटाचे विलक्षण आकर्षण! कपाट उघडले की चोरपावलांनी आत जाऊन बसणार म्हणजे बसणारच. एकदा गावाला जायच्या गडबडीत माऊ आत जाऊन बसलीय हे लक्षातच आले नाही.मी रेल्वेत बसले खरी पण जाताना मनी न दिसल्यामुळे बैचेनी होतीच.घरी बाईला दोनदा फोन केला पण मनीचा पत्ता कुठेच नाही. नंतर फोन आला बारीक आवाजात मनीचे ओरडणे ऐकू येतय पण दिसत नाही.क्षणात लक्षात आले बाईसाहेब नक्कीच कपाटात अडकल्यात. माझी खोली कुलूपबंद.  आतल्या कपाटालाही कुलूप लावलेले. पण शेवटी सुताराकडंन सगळी कुलुपे तोडल्यावर या चित्तथरारक नाट्याचा  शेवट झाला आणि मनीची रोमहर्षक सुटका.

      कपाटं म्हणजे नव्या जुन्याचा मस्त कुंभमेळा आहे .अनेक रहस्यांचे आणि पिढीजात मानबिंदूचे रहायचे हक्काचे ठिकाण आहे. कपाटाबरोबरच गृहलक्ष्मी  हे सर्व अटीतटीने संभाळत असते. कपाटाचे तोंड बंद करून स्वतः चावी एखाद्या तळघरातील भूजंगासारखी रक्षत  असते.                                                                 माझे कपाट खास माझ्यासारखच, माझ्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब!  सर्ववस्त्रे थोड्या  दाटीवाटीने इथे जमली आहेत.साड्यामधे पण खूप चांगल्या, जरा चांगल्या आणि ब-या सांड्या या क्रमाने त्या त्यांच्या वर्णव्यवस्थेत बसल्या आहेत. दोन तीन ड्राॅवर मधे वेगवेगळे ड्रेसेस चिकटून हाश हुश्श करत बसले आहेत. आता आम्हालाही सूर्यप्रकाश बघू दे असा पूकारा करत आहेत. सगळ्यात मस्त चैन करतोय 'दिवाने खास'. कपाटात सगळ्यांच्या डोईवर बसून तो मजा बघत असतो.आता लक्ष्मीबाई  पण चोरकप्प्यात निवांत असतात. सुफळ समाधानी आजी सारखेच आता माझे कपाट दिसते.एवढ्या साड्या एवढे ड्रेसेस बघून आता पाच वर्षे तरी स्वतःसाठी कपड्यांची खरेदी नाही नाही नाही मी  ठरविते.

     कपाट आवरताना मनोमन या सा-या वस्त्रांना मी डोळाभर बघते. प्रत्येकाची कथा वेगळी. आठवणी वेगळ्या.अनेक क्षण ते आठवत मी तल्लीन होते.मग दिवाने खासमधेही थोडी खुडबुड  करते .त्या आठवणींच्या रेशीम गुंत्यात पुरेशी अडकते .छान तंद्री लागते. मोगॅम्बो खूष हुवा!

    आता कपाट आवरताना पुरेसे आठवणींचे आलाप घेऊन झालेले असतात आता भैरवी सुरू होते.गच्च ओथंबलेले कपाट डोळाभर बघत असतानाच  अचानक मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाला जायचंय हे आठवते आणि खरोखर पोटात खड्डा पडतो. माझ्याकडे साड्याच नाहीत हा साक्षात्कार परत होतो.कोणीच न बघितलेली साडी नाहीच  की माझ्याकडे! उद्याच्या उद्या नवी साडी घ्यायलाच हवी मग कस एकदम शांत शांत वाटू लागते.मी समेवर येते.  कपाटही जरा स्वतःला हलवून जरा डोलून नव्या वस्त्रासाठी जागा तयार करण्याच्या मागे लागते. आनंदी आनंद गडे .ओम शांती शांती शांती!


माझे इतर ब्लॉग्स वाचायचे असल्यास खालील लिंक वापरावी

https://drkiranshrikant.pasaara.com