शुक्रवार, १३ मार्च, २०२०

गप्पा

              गप्पा©️


आमच्या छोट्याला घेऊन प्रवास म्हणजे आसू आणि हासू यांनी लदबदललेलं खास कौटुंबिक संगीत नाटुकले असतं .आम्ही बसस्थानकावर येताच या नाटकाची नांदी होते ."आई कधी येणार ग बस?" हे नमनाचे गीत वेगवेगळ्या पट्टीत आधी आळवले जातं .मग माझ्या मूड प्रमाणे पुढील संवाद सुरू होतात." येईलहं सोन्या आता". किंवा जर मी रागवले असले तर," काय रे सारखी घाई ,जरा म्हणून धीर नाही" "या दरम्यान बस येते .आत बसल्यावर लगेच दुसरा प्रवेश रंगात येतो. आता धृपद असते आई sssआई कधी येणार ग गाव ?एव्हांना माझ्या डोक्याचं चांगलंच भिरभिर झालेलं असतं ,स्वाभाविकच पुढचं नाटक छोट्याच्या अश्रूच्या पुरात वाहून जात.
         अखेर अशा अनेक प्रयोगानंतर मी आमच्या आसुंनी भरलेल्या नाटकाचे स्क्रिप्ट बदलायचं ठरवलं .यावेळी बस मध्ये बसताच छोट्याने नेहमीचे संवाद सुरू केले पण मी मात्र वेगळाच पवित्रा घेतला छोट्याला समोरच्या काचेतून दिसणाऱ्या झाडांच्या कमानी दाखवत म्हणाले" पाहिलंस रस्त्याच्या मध्यावर एकमेकांना पान मिठी घालून झाड कशी गप्पा ठोकत बसली आहेत . काय बोलत असतील ती पान एकमेकांच्यात?" भिवया ताणत छोट्याने काचेतून पाहिलं आणि एकदम टाळ्या वाजवत झाडाचे संवाद त्याने बडबडायला सुरुवात केली मग तो एका बाजूचा एक झाड झाला तर मी रस्त्याच्या दुस-या बाजूचे! आता आम्ही दोन झाडे बनून रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांची खूप चेष्टा केली,फांद्या तोडणाऱ्या मुलांना सज्जड दम भरला, पक्षांच्या लाडिक तक्रारी ऐकल्या. गावापर्यंत रस्ता केव्हाच पार झाला होता झाडांच्या गप्पानी आमचा प्रवास लडिवाळ आणि सोनेरी केला होता
                 गप्पांची जादू अशी दाट सावलीसारखी पसरली की आंबलेली थकलेली मनेही कशी एकदम ताजीतवानी आणि मोकळी होतात .काही काटेकोर माणसांना गप्पाच वावड असत ते सोडलं तर गप्पांना स्थळ ,काळाचं ,वयाचं कशाकशाचा बंधन नसतं. रात्री एकएक चांदणी येऊन आकाश सतेज होत जाते तसेच गप्पाच असतं .कधी खरकट्या हातांनी भान विसरून त्या जेवणाच्या टेबलवर रंगतात, तर कधी कोजागिरीचा गरगरीत चांदोबा आपले दूधाळ हास्य उधळत आकाशात मजेत फिरत असतानाही गप्पांचा सूर लागत नाही .अशावेळी हातातल्या आटीव दुधाचे प्याले निव्वळ उपचार होऊन राहतात.    
                  माझ्या लहानपणी आई आम्हा दोघी बहिणींना वाटीत लाडू देई तो घेऊन आम्ही थेट बाहेरच्या खोलीची खिडकी गाठायचो.खिडकीच्या कठड्यावर, त्या ऐसपैस सिंहासनावर बसून आमच्या गप्पा सुरू होत मग कणाकणाने लाडूचा गोडवा जिभेवर विरघळत असताना गप्पांची खुमारी अंगभर पसरायची . खूप खूप मस्त वाटायच.आम्ही काय एवढं बोलायचं कोण जाणे पण त्यावेळी अनुभवलेला तो राजवर्खी आनंद अजूनही आठवतो. आम्हा दोघींचे ते खास तरल विश्व होतं.
           गप्पांचा स्वभाव  व्यक्ती ,व्यक्ति गणिक बदलतो .घरात साजूक तुपातली माय मराठी बोलणारा माझा थोरला, त्याच्या  मित्रांच्यात मिसळतो ते गप्पांचा पोत बदलूनच या मुलांच्या गप्पा खऱ्या अर्थाने रंगतात रस्त्यावरच. एक पाय जमिनीवर  ,तर दुसरा आधांतरी दुचाकीवर तर अशा त्रिशंकू अवस्थेत सुरू झालेल्या या गप्पा मनमोकळ्या हास्य सरी केव्हा बरसू लागतात हेच मुळी कळत नाही,  आणि टपोरी भाषा कधी फवारू लागतात हेच लक्षात येत नाही
         या उलट्या आम्हा मैत्रिणींच्या गप्पा. अगदी काॅलेज जीवनापासून आम्ही एकत्र. एकमेकींच्या पक्क्या मैत्रीणी .प्रत्येकीच्या प्रेमाच्या गुलाबी कालखंडाच्या साक्षीदार, त्यामुळे आमच्या गप्पा म्हणजे रंगपंचमी असते थोडा कोपरखळ्या, थोडी चेष्टा ,खूप जिव्हाळा . अनेक विषयात रंगत रंगत आम्ही सून या आवडीच्या विषया पर्यंत येतो ,तेव्हा आमचे रंगचक्र किंवा गप्पा चक्र पूर्ण झालेलं असतं.
       काही जणांबद्दल उगाचच आपल्या मनात आढी असते . अशाच कोण तरी दूरच्या पाहुण्या आमच्या घरी आल्या होत्या त्यांचा चौकस स्वभाव ,प्रत्येक बाबतीत लक्ष घालण्याची सवय, सारखे उणे काढणे ,त्यामुळे मी त्यांच्या आसपास जाणेही  टाळत होते एके रात्री अचानक वीज गेली ,आणि मग घरातले आम्ही सारेजण बाहेर पायर्‍यांवर आलो मागोमाग या पाहुण्या आल्या .त्या रात्री त्यांनी त्यांच्या लहानपणीचे किस्से सांगून आम्हा सर्वांना अक्षरशः पोट दुखेपर्यंत हसवले. कधी नव्हे ते आईने आणि अज्जीनेही इतक्या गमती जमती नंतर सांगितल्या की वीज आज रात्री येऊच नये आणि गप्पा अशाच रात्रभर चालू राहाव्यात असं वाटू लागलं .आपली आई आजी इतकेच नव्हे तर या पाहुण्या बाईही एके काळी आपल्यासारख्याच लहान खोड्या करणाऱ्या मुली होत्या हा शोध मला तेव्हा लागला .
        कधी कधी वाटतं सुख सुख म्हणजे काय ?बाहेर आषाढ मनसोक्त कुंदत असावा.  हिरवट वास सर्वत्र भरून राहिला असावा. मऊ दुलईला लपेटून अंगभर निखळ ऊब   मुरवत जिवाच्या जिवलगा बरोबर आपल्या गप्पा रंगाव्यात. आपण भूतकाळातील मोरपीस फिरवाव त्यांनी वर्तमानातल्या गुलाब पाकळ्या पसरायच्या आणि दोघांनी मिळून भविष्यातल्या इंद्रधनूचा वेध घ्यायचा. या गप्पात चिमुकली कोपरखळी असावी,लाडीक रुसवा असावा, हुरहूर वाटत डोळ्याच्या कडा नकळत ओल्या व्हाव्यात.अर्थातच हे कधीतरीच सठी सहामाशीच व्हावे नाही तर या गोडमिट्ट सुखाची मीठ्ठी गप्पांना बसेल आणि त्याची नेहमीचे "तू तू मैमै" चा खमंगपणाच हरवून जाईल नाही का?

शुक्रवार, ६ मार्च, २०२०

आला वसंत

आला वसंत
                                                                 
आला  वसंत©️

आपल्याकडेया  सहा ऋतुंच्या भल्या मोठ्ठ्या कुटूंबामधे दादागिरी करणारे खरेतर तिघेच. ऊन्हाळा,हिवाळा आणि  पावसाळा, म्हणजेच ग्रीष्म, शिशीर आणि वर्षा. बिच्चारे शरद, हेमंत आणि वसंत ऋतू!!कायमच धाकल्यांची भुमीका  जगतात.पण तसे ते बिच्चारे पण नाहीत .अगदी थेट या दादामंडळींच्या वेढ्यात घुसून आपला खास झेंडा ते फडकवतातच.अर्थातच शरद हेमंतचा आणि वसंत ऋतुंचे डेरे जरा लहानखुरेच. म्हणजे समजा उन्हाळा, पावसाळा , हिवाळा हे तीनही ऋतू जर ऋतुदरबारातील खास लाखांचे मानकरी असतील तर आपल्याकडे आणि खाली दक्षीणेकडे शरद, हेमंत आणि वसंत म्हणजे पाचहजारीचे मानकरी.जसजसे उत्तरेकडे आपण जातो तसे हे तिनही पाच हजारांचे मानकरी मात्र लाखाचेच मानकरी ठरतात.सर्वच ऋतू अधिकाधीकच समृद्ध आणि ठसठशीत होतात.

बलदंड भंंजाळणाारा हिवाळा आणि संतप्त पिडणा-या उन्हाळ्याच्या चिमटीत हा वसंत ऋतू सापडलेला. पण तरीही  वसंत येतो. सुगंधी फुलांनी,कोवळ्या लालपोपटी पानांनी सजवलेला आपला डेरा उभारतो, याच्या अंगावर तोच तो रंगिबेरंगी पानाफुलांनी लदबदलेला सुखी डगला कायमचाच अडकवलेला. स्वारी येते तीच मुळी कोकीळेच्या आवाजात तार- स्वरांत शिट्ट्या वाजवत.या सहाऋतू सोहळ्यात जर कुटुंबप्रमुख उन्हाळा आहे आणि कुटूंबस्वामीनी वर्षा ऋतू आहे असे समजले तर यांचा धाकला,लाडोबा, छाकटा, गुलछबू पुत्र म्हणजे वसंत ऋतू. तरीही ऋतूराज म्हणून गौरवलेला.
            तो असा रसिक आहे म्हणूनच तो बिनदिक्कत पांगा-याची लालेलाल फुले मुगूटात खोचतो.सोनचाफा,जुई, मधुमालतीचे भरघोस गजरे मनगटावर बांधतो.एवढे करुन स्वारीला धीर कुठे आहे थांबायला? समस्त प्रेमी जगताला आपल्या जादुई मदन बाणांनी घायाळ करायचे कामही करायला हा तय्यार.
 वसंताची स्वारी येते त्याआधी शिशीराने धुमाकुळ घातला असतो, गुलबट रंगात सजली धजलेली  हवीहवीशी वाटणारी ही गुलाबी थंडी कधी राखाडी करडी होते आणि आपले थंडगार,  खरबरीत हात चराचरावरुन फिरवू लागते हे मुळी कळतच नाही. सर्वत्र नुसते झाडांचे खराटे!पेटवलेली शेकोटीही आता ऊब देईनाशी होते. गरमागरम सूपही बेचव लागायला लागते. जागोजागी प़डलेल्या वाळलेल्या पानांचा ढिग काढताकाढता कंबरडे मेडू लागते आणि मग कुठूनशी जादूई फुंकर कुणीतरी घालतो. कोणीतरी लाल पोपटी मूठ झाडांवर मारते .मग वयोवृद्ध पिंपळही सुस्कारासोडतो मनात तो नक्कीच म्हणत असेल चला संपली एकदाची थंडी. मग पिंपळ मरगळ झटकतो त्याची फांदी नी फांदी सलज्ज तांबूस पोपटी पालवीने फुलून येते.आजूबाजूंच्या झाडांवरही हाच हासरा नजारा. कधी कधी मला असे वाटते की एखादी फांदी हळूच दुस-या झाडांच्या पालवीकडे बघून म्हणत असावी त्याची पाने माझ्या पानांपेक्षा अधिक राजवर्खी कां बर”??खरतर झाडांना अंगोपांगी फुलवण्याचे काम वर्षा ऋतुचे पण कोणाचेही ऐकेल तो कसला’‘वसंत.? हा तर स्वच्छंद प्रेममौला. वर्षा ऋतूची मक्तेदारी हा सहजच मोडीत काढतो.मग’‘वसंत त्याला लाभलेल्या अल्पायुष्याला  अधिकाधीक सप्तरंगी बनवितो.
गंमत म्हणजे प्रत्येक ऋतूचे स्वत:चे खास गारुड आहे, उन्हाळा कितीही तप्त डोक्याचा, भांडकूदळ असला तरी त्याच्यातही एक हिरवा नाजूक कोपरा आहेच.उन्हाळा येतो तेच घमघम मोग-याबरोबर. लालेलाल कलिंगडे आणि राजाधिराज आंबे यांचे ढिग जीभेला कृतकृत्य करतात. केवढा मोठ्ठा दिलासा असतो तो. पावसाळा -वर्षा ऋतू येतो तोच मुळी जाईजुईचा गजरा आणि केवडा माळून, पारिजातकाचा सडा शिंपडत हिरवाकंच लफ्फेदार शालू नेसून!. शरदहेमंत या जोडगोळीचा झेंडा गोलमटोल केशरी-पिवळ्या ,गुबगुबीत देखण्या झेंडूच्या फुलांनी सजला असतो .कोजागिरीचा नितांत सुंदर पोर्णिमा याच ऋतूतील. नंतर येणा-या शिशिर- थंडीचेही गुलाबी थंडी म्हणून मनसोक्त कौतूक होते. हुरडा, धुंधूरमास,उत्साहाने काठोकाठ भरलेले आणि भारलेले वातावरण. हळूहळू थंडीचा गुलाबी प्रसाधन होत गायब आणि मग तिचे बोचरे , रखरखते रुप समोर येते.
                  थंडीचे बोट धरून अलेला वसंत सर्वांचेलक्ष वेधून घेतो. पिवळ्या रंगात वसंतपंचमी नाचत येते. आपल्याकडे नसली तरी उत्तरेकडे मात्र पिवळ्या रंगातली नटलेली वसंतपंचमी हळदमाखल्या नवरी सारखी साजिरी गोजीरी दिसते.पांढ-या पिवळ्या शेवंतीचा मंद वास आता जुई , चाफा यांच्या समवेत अत्तराचा शिडकावा करतात.थंडीमधे झडलेल्या पानांच्या थोट्या चाफ्याकडे बघवत नाही पण वसंत येताचतेरा जादू चल गया----अशी अवस्था होते. डोक्यावर मदमस्त मुकुट घालून चाफा वसंताला ऋतुराज ही पदवी बहाल करतो. इकडे रानांत पांगाराही लाजेने लालेलाल होऊन वसंताचे स्वागत करायला एकदम तय्यार असतो.बेभान राधेसारखी सर्वांचीच आवस्था. या सर्वांच्यात भाव खाऊन जातो पिंपळ वृक्ष. इतका राजस आणि लावण्यवान दिसतो न तो!. खाली पडलेल्या पिवळ्या धम्म पानांचा सडा., त्यातच काही जाळीदार पाने,फांदीवर चमचमणारी बालपालवी आणि टाळ्या वाजवणारी जुनी हिरवट पाने. आयुष्य ओवाळून टाकावे असे देखणेपण!.
            नुसता निसर्गच याच्या येण्याने सुखावत नाही तर गुढीपाडव्याला गोडमिट्ट साखरेच्या गाठींचा हार गळ्यात घालून तो लहानग्यांना भुलवीतो.होळी येते वसंताचे बोट हळूच सेडून स्वत अग्निप्रवेश करते जाताना ऊरली- सुरली थंडीही अग्नी स्वहा करतो. ऊन तापू लागते त्यातच रामनवमीचा सुंठवडा जीभेला चटका देतो. दक्षीणेकडे जरी वसंताचे डोके तापायला लागले असले तरी उत्तरेकडे वसंता आजुनही शांतच असतो. त्यामुळे शरयू नदीवरुन येणा-या शीतल लहरी श्रीराम जन्म अधिकच मनोहर करतात. श्रीराम जन्मापाठोपाठ अंजनीसुत हनुमानाचा जन्म.तेव्हा दिसणारा चंद्र खास असतो. नेहमीसारखा गुबगुबीत चांदोबा टवटवीत दिसत नाही तर फिकुटलेला, कोमेजलेला वाटतो. बहुधा बालहनुमानाने सूर्याला ग्रासण्या ऐवजी चंद्र ग्रास केला तर काय ही काळजी त्याला सतावत असावी.
              वासंतीक समारंभही गारेगार पन्हे, कैरीची डाळ या पदार्थांनी अधिकच चमचमीत होतात. थंडीची करांगुली धरून आलेल्या वसंताला आता ओढ लागते ग्रीष्माची. या ऋतुराजांचा राग आता अनावर ङोऊ लागला असतो. मनाविरुद्ध काहीही झाले तर आता माझी सटकली हा संवादही तो म्हणत असावा. वसंताला जाणवते आता वेळ आली आहे निरोप घ्यायची. वसंत आपला बाडबीस्तरा आवरु लागतो, दूरवरुन ग्रीष्म वेगाने जवळ येत आसतो.उंच, काटकुळा, घारोळा आणि पांढराफट्ट उन्हाळा लांब ढांगा टाकत येतो. रसरसलेली पाने कोमेजू लागतात,फुले माना टाकतात, कोकीळही कावराबावरा होतो आणि पानांमधे आळीमिळी गुपचिळी करुन लपून बसतो. भक्क उजेड, गरम हवा, घामेजलेले, कासावीस प्राणीजगत, क्षीण नद्या, या सर्वांवर ग्रीष्माचा अंमल केव्हाच सुरु झालेला असतो. त्याच्या सारखाच मोठाच्या मोठा मरगळलेला दिवस सुरु होतो.
       वसंताने आता पूर्णपणे माघार घेतलेली असते. आपल्या डोळ्यासमोर तो आपले अद्भूत, सुवासिक, सप्तरंगी साम्राज्य जळून जाताना पहातो. कधीकधी वळीवाच्या पावसाच्या निमत्ताने दोन अश्रुबिंदूही ढाळतो.
          वसंत जातो ग्रीष्म येतो आणि ऋतूचक्राचे चाक थोडेसे पुढे जाते.अव्यहतपणे हे चक्र चालू आहे. चालू रहाणार आहे.