शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

दिल हैं छोटासा©️

 

आज खेळात  तल्लीन झालेली मुले पाहिली. आश्चर्य  म्हणजे  मोबाईल  वा संगणकावर तो खेळ  नव्हता. खेळ  रंगला होता रस्त्यावर. इतकं छान वाटलं  न ते बघून. अर्थातच आमच्या लहानपणीच्या खेळांची आठवण प्रकर्षाने  झाली.लहानपणाच्या आठवणींचे किंवा आमच्यावेळी  असे होते ,हे स्मरणरंजन,भ्रमणरंजन सुरू  झाले, म्हणजे म्हातारपण चांगलच मुरलय! असो.

       चलो आज लहानपणीच्या आठवणी आवरायला हव्या.मला त्या रम्य वगैरे वाटल्या तरी आत्ताच्या पिढीला कदाचित हास्यास्पद  वाटतील.


             ©️  दिल है छोटासा----   


         खर तर 'कंटाळा आला' हे वाक्य त्यावेळेस  म्हणजेच माझ्या लहानपणी जवळजवळ  सर्वच मुलांच्या शब्दकोशात नव्हते.बरं, खेळासाठी काही खास वस्तूच हव्या असा पण अट्टाहास नव्हता. मी आणि बहिण गच्चीत  बसून आकाशातील ढग बघत असू मग त्याचा आकार कशाचा आहे हे सांगायचे हा खेळ मोठ्या आवडीने खेळत असू.पण गम्मत  अशी व्हायची ती ढगाला हत्तीचा आकार आहे असे म्हणेपर्यंत  तो लब्बाड ढग  सोंड आणि सुपासारखे कान गायब करायचा मग हत्ती व्हायचा पेटारा. मग आमचा हास्याचा धबधबा. कधीकधी दोघीही हटून बसायचो की मी सांगतेय तोच आकार बरोबर आहे. मग कट्टी. रेडिओवरच्या जाहीराती हावभाव करून म्हणायच्या , त्यात त्या प्राॅडक्टचे नाव ओळखायला लावायचे.गेला बाजार सुट्टीत पत्ते, कॅरम , ल्यूडो, सापशिडी इत्यादी खेळ असतंच. चांदोबा मासिक आल्यावर आधी कोणी वाचायचे यावर भांडण जुंपायचेच.ते जायचे आईच्या सुप्रीम कोर्टात.  तेच शेवटच अपिल. मुकाट्याने ऐकायला लागायचे. सर्कस आल्यावर तिच्याकडून स्फूर्ती  घेऊन " ढण्टssढॅण ग्रेट बाॅम्बे सर्कस "अशी आरोळी  ठोकून , दोन्ही हात सोडून सायकलवर  सर्कस सुंदरी बनायच्या नादात अनेक वेळा ढोपर अन् कोपरे फोडून घेतली आहेत मी.

              रात्रीची जेवण नेहमीच एकत्र ! ती झाल्यावर रेडीओवर सुरु असलेले नभोनाट्य ऐकताऐकता डोळे जड होऊ लागायचे. इतके साधे, सरळ, सोप्प आयुष्य होत ते.

         त्यावेळी ब-याचदा वीज महावितरणाची खपा मर्जी व्हायची  म्हणजे कधी वा-याची झुळूक  जरा जोरात येई किंवा गुलाबपाणी शिपडल्यासारखे चार थेंब ढगातून आले रे आले की वीज गुल.पण आम्हाला ती पर्वणीच असे कारण नंतर रंगायच मेणबत्ती पुराण.होय. पुराणच . कथा किंवा कादंबरी नाही कारण नेहमीच्या साचेबंद आयुष्यापेक्षा इतके सुरस आणि चमत्कारिक  असायचनं ते!

                      रात्री गप्पाष्टक रंगात आलेली असायची. आई बाबांचे लहानपणाचे किस्से ऐकताना मस्त रिमझीम पावसात नाचल्या सारखी झिम्माड मज्जा येत असायची.अशावेळी फटकन वीज जायची अणि मग सुरवात व्हायची मेणबत्ती पुराणाला. 

     "अग्गोबाई गेली कां वीज" या वाक्यापाठोपाठ सुरु व्हायचे धुमशान. पटकन आईची आज्ञा कानी यायची,ऊठ पटकन, लाकडी कपाटात वरच्या खणात उजवीकडे पुढेच मेणबत्ती ठेवली आहे ती घेऊन ये बघू पटकन. त्या बरोबरच, आपटू नकोस वेंधळ्यासारखी असा स्वभावगुणांचा उध्दारही असायचाच. एवढा सविस्तर मेणबत्तीबाईंचा पत्ता मिळाल्यावर काय बिशाद आहे त्या न मिळण्याची.तोवर आईचा आवाज कानावर आदळायचाच. नुसती मेणबत्ती नको आणू, तेथेच डावीकडे काडेपेटी ठेवलेली आहे ती पण घेऊन ये. सगळ्याच आया तुफान हुश्शार असतात त्यातुन आमची आई म्हणजे हुश्शार आयांची मुगुटमणीच. मी काडेपेटी न घेताच निघाले आहे हे तिला एव़ढ्या अंधारातही बरोब्बर समजलेले असे.आता मात्र त्या दाटलेल्या कुट्ट काळ्या अंधाराची जबरी भीती वाटायला लागायची.समस्त भूते, वेताळ, हडळी भोवतालच्या अंधारात लपून आता माझा कोणता पदार्थ बनवायचा यावर खल करत आहेत हे मला स्पष्टच जाणवायचे. मग मात्र भीमरुपी महारुद्रा, रामरक्षा, आठवतील त्या देवांची नावे जीभेवरुन घरंगळत. अखेर अंधारात कोणालाच माझी विजयी मुद्रा दिसत नसली तरीही मेणबत्ती नाचवत मी आईजवळ येई. इतक्या वेळ धडधडणारे छातीतले इंजीन आता स्टेशनात शिरल्यासारखे हळुहळू चालू लागे. मग पुढच्या दहा मिनीटात मेणबत्ती लावायचा कार्यक्रम रंगत असे.मेणबत्ती पेटली की काही थेंब खाली वाटीत टाकल्यावर मेणबत्तीबाई एकदम ताठपणे वाटीत उभ्या रहात. तिच्या ज्योतीचे मात्र नाचकाम सुरु होई. एकदा डावीकडे एकदा उजवीकडे तर एकदा उजवीकडून डावीकडे अशी सारखी लवलव,लवलव.

          खोली त्या उजेडात एकदमच अनोळखी वाटू लागे. भिंतीवर आमच्या मोठ्याच्या मोठ्या सावल्या दिसू लागत आणि मग सुरु होई खेळ सावल्यांचा.बाबांच्या हातातून  जादूई सावल्या भिंतीवर एकामागे एक हजेरी लावू लागत. मेणबत्तीसमोर बाबांची बोटे हळूच हालचाल करीत आणि बघताबघता नवनवीन प्राणीजगत भिंतीवर परेड करायला लागायचे.गरुड ते उंदीर आणि साप ते कुत्रा ,अगदी कट्टर वैरीदेखील भिंतीवर मात्र तुझ्या गळा माझ्या गळा म्हणत आहेत हे पक्कंच जाणवायच. कालिया फणा काढून फुतकारतो आहे तोच कुत्रा शेपटी हलवीत भुंकू लागायचा.एकामागे एक समस्त प्राणीसंग्रहालय आपली हजेरी लावून क्षणात नवे रुप धारण  करीत असे. एखादी फुलदाणी डोक्यात फुले घालून सजली की पाठोपाठ यायचे छत्रचामरे ढाळत छत्रपती. त्यांचे आगमन म्हणजे जणू सावल्यांच्या खेळाची 'समाप्त' ही पाटी असायची. मग खास आमच्या आग्रहाखातर एखादा चुकार प्राणी भिंतीवर साकारला जायचा.खेळ असा रंगतोय तोच मोठ्या बहीणीला आठवण यायची भुतांच्या गोष्टींची. आमच  सगळ लटांबर बाहेर पाय-यांवर एकमेकांना खेटून बसायचे. तोवर आईचा आवाज यायचाच, ताई घाबरवू नकोस ग छोट्यांना. आईचे सांगणे कानाआड केले जायचे हे वेगळे सांगणे नलगे.अमावस्येची अंधारी रात्र होती या वाक्याने सुरु झालेली गोष्ट शपथेवर भूत बघितल्याची ग्वाही देऊनच संपत असे. अर्थात हे भुताचे अनुभव नेहमीच कुठल्यातरी मैत्रीणीला किंवा तिच्या घरच्यांना आलेले असत.स्वत: कोणीच अनुभवलेले नसत. सगळ्याच गोष्टी इतक्या नाट्यमय ,रंगवून सांगितल्या जात की समस्त भुतेही भितीने थरथर कापत असावीत. मग आम्हा छोट्यांची पळापळ उडे. रामराम म्हणत आईला चिकटून बसले की जरा कुठे उतारा पडे.

      कधी कधी चांदण्या बघायला गच्चीत  एकमेकांचा हात धरून जायचो. तोवर बाबाही तेथे यायचेच. छान हवा असायची. सगळीकडे अंधारगुडूप.डोईवर आकाशभर लाह्या देवाने सांडल्या असायच्या. वेंधळा कुठला! जोडीला अर्धवट खाल्लेला बत्तासा असेच. बाबा मग सांगत हा मृग, ही अरुंधती, हा व्याध. असलं भारी वाटायचे ते ऐकताना!

         रात्रीच्या जेवणाची वेळ आता झालेली असायची. मग रंगायचे मेणबत्तीच्या उजेडांत जेवण. तो मंद पिवळा उजेड, त्या भिंतीवर नाचणा-या आमच्याच मोठ्याच्या मोठ्या सावल्या, ते मेणबत्तीवर झेप घेणारे पतंग,मधेच पंख जळाल्यावर चुर्रकन होणारा आवाज, आमच्या चेह-यावर रंगलेला खुमासदार उजेड-सावल्यांचा मुक्त खेळ, मधुनच हसताहसता चमचमणारे डोळे ,कुत्र्याचे ओरडणे, लसणीच्या फोडणीचा खमंग खास वास या सा-या, सा-या गोष्टी सर्व पंचेद्रियांना सुखावुन जात. द्रौपदीच्या थाळीसारखे मनही आनंदाने आकंठ भरुन वहात असे.भुते ,चेटकीणी, वेताळ मंडळींची भिती सातासमुद्रा पलीकडे अंधारात पळून जात असे.जेवणाचा शेवटचा घास घेईपर्यत चाललेले हे पुराण जणू फारच लांबले असे वाटल्यामुळे की काय वीजमंडळ वीज चालू करत असे. लख्कन दिवा प्रकाशमान होई.इतके विचित्र वाटायच तेव्हा.प्रत्यक्षाहूनी सावली मोठी केव्हाच गायब झालेली असे. भिंतीवरची नेहमीची पाल चुकचुकता दिसे आणि आम्ही भावंडे भानावर येत असू.आता सुरू होई मेणबत्तीवर फुंकर घालण्यासाठी भांडाभांडी. परत मेणबत्तीबाई काडेपेटी समवेत जाऊन बसे लाकडी कपाटात वरच्या खणात उजव्या आणि डाव्या बाजुला.

             ते सावल्यांचा खेळ, त्या मनात रामरक्षा म्हणत ऐकलेल्या भूताच्या गप्पा, ते आकाशदर्शन, मेणबत्ती भोवती अंधार उजेडातले जेवण, त्या उजेडात लखलखणारे डोळे आणि ती मेणबत्तीची नृत्य निपुण ज्योत सारेच मनात त्या ज्योतीसारखेच लवलवत राहिले आहे.

           अशा   छोट्या छोट्या आनंदाची झुडपे बालपणीच्या वाटेवर होती. अतिशय तजेलदार आणि सुगंधी झुडपे होती ती. खेळाच्या  साहित्याची चणचण, साधे कपडे,साध्या पध्दतीचा वाढदिवस या कशाचेच वैषम्य नव्हते.  कारण आनंद देणा-या झुडुपांनी वाट रंगीत झाली होती. छोट्या छोट्या गोष्टीत परातभर आनंद सहज मिळायचा कारण एकच. दिल है छोटासा ------ - 

          

 माझे आधीचे 'पसारा' मधील लेख वाचायचे असल्यास खालील लिंक क्लिक  करावी.

   https://drkiranshrikant.pasaara.com 


 

 

 

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

रंगबिरंगी ,भटकभवानी भाग 3©️

 बघता बघता' पसारा'तील आठवणींचा पसारा आवरताना सहा महिने उलटले.  पण गंमत अशी झालीय एक आठवण आवरते तोवर त्यातून शंभर आठवणी निर्माण होत होत्या अगदी रक्तबीज राक्षसा प्रमाणेच.  या राक्षसाच्या रक्ताच्या एका थेंबातून असंख्य रक्तबीज राक्षस तयार होत .अगदी तस्सेच. अर्थात त्या राक्षसांचा निःपात कालीरूपात दुर्गादेवीने केला पण माझी एक एक आठवण आवरताना तयार होणा-या अनेक आठवणींना कोण आवरणार? 


                  भटकभवानी भाग 3, रंगबिरंगी©️


          आता परदेश प्रवासाचे कौतुक कोणालाच उरलेले नाही. माझ्या  लहानपणी परदेशी जाणारा माणूस म्हणजे जादुई नगरीत जाऊन तिथल्या अप्राप्य, अतर्क्य जादूच्या गोष्टी घेऊन येणारा!. झगझगीत  झिग लावल्याप्रमाणे चमकणारा.  वेगळाच माणूस वाटायचा. त्याचं बोलणं वागणं वेगळच.  पण आता सोलापूर ते पुणे जितका प्रवास करत नाही त्याच्याहून जास्त परदेशी प्रवास करणारी मंडळी आपल्याकडे आहेत. पण एक मात्र खरे प्रत्येकाची परदेश प्रवासातील बघण्याची नजर वेगळी. कुणाला निसर्ग भावतो .कोणाला लोक ,कोणाला कारखाने तर कोणाला वास्तुशिल्प.

              कॅनडा माझ्या मुलाची आणि आणि सुनेची कर्मभूमी!  तेथिल आमची चिमुकली नात म्हणजे आमच्यासाठी मोठ्ठ लोहचुंबक.सतत तिकडे खेचत असते  पण---- असो. जवळ जवळ अडीच वर्षांनी भेटणारी नात जेव्हा विमानतळाच्या बाहेरून आपल्या आई बाबांचा हात सोडून धावत येऊन झेप घेते आणि कोवळ्या हातांनी मिठी मारते तेव्हा सोळा तासाच्या प्रवासाचं पूर्णतः सार्थक तिथेच होते.

                 कॅनडाची हवा तशी  महाविक्षिप्त आणि विचित्र महालहरी. सहा महिने नुसती थंडी! थंडी पण अशी की जगात हिमयुग सुरू झालय आणि पृथ्वीचा हाच अंत आहे असच वाटावे. हिम पडताना श्वेत धवल! पण नंतर कळकटलेला. सर्वत्र पसरलेल्या गढूळ हिम राशी, शरीरातील पेशी पेशी गोठवणारी थंडी, झाडांचे खराटे ,पाय घसरून पडण्याची सतत भीती, गाडीही घसरण्याची धास्ती आणि ट्रॅफिक जॅम. या सगळ्या नकोशा वाटणाऱ्या गोष्टीला उतारा म्हणजे तिथला वसंत ऋतु, उन्हाळा आणि मला सर्वात आवडलेला फॉल किंवा ज्याला ऑटम असं म्हणतात. म्हणजे आपल्या 'शरदहेमंत' ॠतुचा 'कॅनडास्थित' भाऊच. कॅनडात आपल्यासारखे भरगच्च सहाॠतूंचे कुटूंब नाही तर हम दो हमारे दो असे आटोपशीर!.उन्हाळा, ऑटम -,हिवाळा आणि वसंत.सरता उन्हाळा आणि जवळ येणारा हिवाळा यांच्या चिमटीत सापडलाय ऑटम.


                 हिवाळा अजून दूर कोपऱ्यावरच्या वळणावर असतो अजून घरात त्यानी प्रवेश केलेला नसतो आणि उन्हाळाही चार पाय-या वरच असतो. घर आता एका वेगळ्याच मोडमध्ये आणि मूडमध्ये असते.हे घर तुमचे माझे नाही तर निसर्गाचे घर. साधारण ऑक्टोबरमध्ये ही निसर्गाच्या घरात मोठी लगीन घाई उडालेली असते आणि हे घडत असतं कॅनडात! तिथल्या झाडांत, तिथल्या मैलोनमैल पसरलेल्या जंगलात. पण तेथे होत असलं, तरी ते श्वेत-धवल नसते.याउलट 'बिग कलरफूल इंडियन वेडिंग 'म्हणण्या इतक ते 'रंगबिरंगी' असते. आता एवढं मोठं  लग्न निसर्गात  आहे म्हणजे त्यासाठी झाडांची व-हाड नटून थटून तयार होणारच. आता लग्नं म्हंटले की पहिली खरेदी कपडे साड्यांची. करवली बनलेली काही झाडे कुणालाच न जुमानता आधिच आपले मनभावन लालेलाल गाऊन घालतात. आजूबाजूला पसरलेला हिरव्या झाडांचा दर्या आणि ही करवल्या झालेली वेडी उत्साही झाडे आधीच  सजलीत आपल्या खास लाल पोशाखात!. मग मात्र इतर पोक्त झाडे डोळे  वटारून रागवत असतात . "आत्ता पासूनच खास कपडे घातलेत मग ऐन विवाहाच्या वेळी खराब नाही का होणार? पंधरा दिवस आहेत अजून लग्नाला." पण या करवल्या कुठल्या दाद देतात?पंधरा दिवसांनी फक्त पंधरवडाभर  चालणारा लग्नाचा सोहळा!. दिवस सरतात. अजूनही हिरवीगार असलेली झाडं  हळू हळू आपल्या प्रसाधनाची सुरवात करतात. आपले खास पोशाख तय्यार करू लागतातआणि मग उसळतो अनेकविध रंगांचा  कल्लोळ. चटकदार नारंगी, मंद पिवळा, ,मला जांभळाच आवडतो असे सळसळत्या पाना पानात बोलत गर्द जांभळा कद घालून एखाद झाड देखरेख करत असते. जरा वेगळाच रंग बरा वाटतो.असे संवाद झाडाझाडातून पानापानातून उमटायला लागतात. काही झाडे एकदम रसरशीत तजेलदार पिवळी, कुणी मंद तपकीरी पिवळी.काही आदिम, रौद्र,गूढ जळजळीत लाल रंगाला  पसंती देतात.  काही लालट पिवळी, नारींगीच्या विविध छटा कुणी पसंत करतात. घरात   एखाद्या वृद्ध  स्त्रीने  जाऊंदे माझी साडी आहे तिच ठीक आहे म्हणून गप्प बसावं आणि आपली जुनी साडीच नेटकी करून वापरावी तशी आपली हिरवीच पानं अधिक तजेलदार करून काही झाडे उपस्थित रहातात. व-हाड तर मस्त सजलंय. काही मेपलची झाडे दर चार दिवसांनी  नवनवीन रंगांचे पेहराव बदलतात. हिरवी पिवळी , तपकीरी, लालेलाल. नटवी मेली! रंगांची झिम्माड!आसमंताला एक आगळीवेगळी शीतल पण झळझळीत आग लागली आहे असे वाटू लागते. सारेच विरोधाभास. 

             शेतात मक्याची कणसे अंगोपांगी गच्चीम भरली असतात. सफरचंदांचा भार झाडांना सोसवेना झाला असतो. छोटा छोटा होणारा दिवस, सुखद हवा, गडद शाईसारखा आकाशाचा मंडप. लग्नाची तयारी तर फक्कड झाली असते.लग्न असते  ------ वर असतो सरता उन्हाळा  आणि वधू  अर्थातच येऊ घातलेली श्वेतधवल थंडी. अशा या दैवी लग्नाला आम्ही उपस्थित होतो. आमची तक्रार एकच की आम्हाला हे सारे भव्य दिव्य, रंगबिरंगी दृष्य पहायला सहस्त्र नेत्र का नाहीत. ते बघताना त्या उबदार विलोभनीय रंगीत निसर्गाचे थोडेसे दडपणच आले होते. असे म्हणतात  मरणापूर्वी  दिव्याची वात नेहमीच मोठी होते.उन्हाळाही आपली सर्व संपत्ती सारे सौदर्य सारे जीवन  नववधू हिवाळ्याला अर्पण करून,प्रदर्शन करून तिच्यात विलीन होतो म्हणूनच का हा निसर्ग  सर्वांगाने रंगतो?


            त्यातच हॅलोविनच्या कार्यक्रमातील भुतं, चेटकीणींची मांदियाळी उठलेली असते.थॅक्स गिव्हींगची गडबडही घरोघरी असतेच. असा हा भारलेले आणि मंतरलेला फाॅल सिझन.माझा प्रिय प्रिय ऑटम. 

एखाद दुसरी करवली बघा आत्ता पासूनच मखडतेय.

व-हाण सजलंय बर! तयारीत रहा. 


         याच सुमारास मला भेटला ॲन्टॅरीओ.अगदी प्रथम दर्शनी प्रेमात पडावा असा. मैलोन मैल पसरलेला तरी आपलासा आणि आटोक्यातला वाटणारा हा तलाव. याला तलाव ,सरोवर म्हणणे म्हणजे कद्रूपणाची कमाल. या ऑन्टॅरीओत मोठ्या लाटा येतात, गलबत चालतात कधी मधी जहाज सुध्दा!. हिवाळ्यात तो होतो बर्फ आणि त्याच्या पाठीवर  मस्तपैकी स्केटींग करू देतो.जगातले दोन नंबरचे मोठे सरोवर म्हणून स्वतःचे कौतूकही करून घेतो.अशा या मिनी गोड पाण्याच्या समुद्राबरोबर माझी छानशी मैत्री झाली होती.रोज त्याला भेटायला गेले की तासभर तरी शांतपणे गप्पा व्हायच्याच.तो लपापत्या लाटांनी बोलायचा. मधेच सीगल्स पण यायचे .तो अंगावर खेळणा-या बोटी , जहाजे दाखवायचा,सूर्यकिरणांनी त्याला भेट म्हणून दिलेले सोनं चांदीही लाटांवर लादून समोर पसरायचा.कधीकधी उगाचच खोटंखोटं रागावून मोठ्या लाटांचे तांडव करून हसायचा. त्याच्या मूड प्रमाणे बदलते रंग खरतर सरड्यालाही लाजवायचे.कधी कन्हैयाचा नीळा, कधी सावळ्या विठूची काळी घोंगडी तो पांघरायचा.झाडाचे हिरवेपण ल्यायचा.चमकदार सूर्यकिरणांनी दिलेले , कधी चांदीचे कधी सोन्याचे असे विविध चमकदार कपडेही घालून गोल्ड लेक, सिल्व्हर लेक अशी उपाधीही स्वतःला लावायचा..खर तर पूर्ण  टोरांटोची तहान भागवणा-या ,तिथल्या शेतीचा, कारखान्यांना पाणी देणारा, द्रौपदीच्या अक्षय पात्राप्रमाणे अखंड  भरलेला हा ॲन्टॅरीओ तो असली उपाधी लावायला अगदी योग्य. टेचदार,डौलदार राजहंस,बदकांचे लटांबर आमच्या आजुबाजुलाच बागडत असे. मित्र म्हणून ऑन्टॅरीओने मला काय शिकवले याची यादी फार मोठी आहे. सत्य शिव  सुंदर याची प्रचिती होती ती.कधी कॅनडाला गेलात तर जरूर त्याला भेटाच आणि माझा नमस्कार सांगा.

        

माझा प्रिय मित्र चंदेरी झोकात. 

   

      बदक आणि राजहंस गप्पात सामिल. मैफिल मस्त रंगली आहे.


       सून मुलाकडून भरपूर लाड करवून कॅनडाला आम्ही टाटा करतो. नातीने आमच्याबरोबर यायचे म्हणून इटुकली बॅग केव्हाच भरून ठेवली असते.परतीच्या वेळी  तिला चुकवून निघावे लागते.अजून एक अग्निपरीक्षा!लेकाला सुनेला टाटा करताना माझ्या मित्रालाही मनात टाटा करते. परत यायचा वायदा करते. विमानातून खिडकीतून वाकवाकून तो निसर्गाचा लग्न सोहळा अनुभवते.मग मात्र वेध लागतात माझ्या सोलापूरचे. माझ्या घराचे.



माझे आधीचे 'पसारा' मधील लेख वाचायचे असल्यास खालील लिंक क्लिक  करावी.

   https://drkiranshrikant.pasaara.com 

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०

ॲनिमल किंगडम©️

 आज  अनुभवांचा पसारा आवरताना थोडीशी खिन्न, थोडीशी सुन्न होते. आज एक घटना ज्याला  मी साक्षीदार होते ती सतत आठवत होती. एकीकडं अत्यंत आनंददायी तर एकीकडं तितकीच दुःखदायी अशी घटना.पूर्णतः विरोधाभासाच्या घटना. हे असच असते. पण तरीही आज थोड्या मळभ मनाने ही घटना तुमच्यासारख्या सुह्रदां समोर मांडणार  आहे. हाही पसारा आवरून ठेवणार आहे. आणि मनावर पडलेल्या सावटांतून बाहेर यायचा प्रयत्न करणार आहे. गोष्टीतली नावं अर्थातच बदललेली आहे

               

                           ॲनिमल किंगडम©️


डॉक्टर देशमुख यांच्या रुग्णालयात संध्याकाळच्या धुसर सावल्या मुक्कामाला आलेल्या 'पाहुण्या' सारख्याच आडव्यातिडव्या पसरल्या होत्या. तिन्हीसांजेची वेळ त्यामुळे अधिकच कातर, उदास वाटत होती. दबक्या आवाजात  निरोपांची देवाणघेवाण  चालली होती. वातावरणातील ताण जाणवत होता. खालच्या मानेने आणि दबक्या पावलांनी ये-जा करणाऱ्या परिचारिकेच्या बुटांचा चटपट आवाजच काय तो गहिऱ्या संध्याकाळवर ओरखडे काढत होता. रुग्णालयाच्या बागेतली झाडं, रोप आज मान खाली टाकून उभी होती. रुग्णालयाची नेहमीच  धीरगंभीर दिसणारी इमारत आज हुंदका दाबून ठेवल्यासारखी वाटत होती.  डॉक्टर देशमुख यांच्या पत्नीच्या तर बंगला ते रुग्णालय अशा तिस फे-या सहज झाल्या असतील. त्यांच्या पायाला जणू उसंत नव्हती. लापशी, फळांचे रस असे विविध पदार्थ रुग्णालयात जात होते. आणि  हिरमुसलेल्या भांड्यातून परत येत होते.डॉक्टर देशमुख अतिशय खिन्नपणे अतिदक्षता विभागात बसले होते. तेथे मृत्यूशी झुंज देत होती त्यांची जीवनदात्री, आधारवड ,प्रेममूर्ती आई -आई साहेब.

            --------    -----   ----  00000---    ------- ------ 

    

               जडावलेले पोट सांभाळत पांढरीशुभ्र मनी आडोसा शोधत होती. दोन कुंड्यांच्या मागे असलेली बंदिस्त पण हवेशीर जागा मनीने आधीच हेरली होती. तिकडे तिचा मोर्चा वळताच गुराख्याने काठीने ढोसून  तिला हरकाटले. म्याsssव करत आपल्या गरगरीत घारोळ्या डोळ्यातील  उभट भावल्या रोखत  मनीने निषेध नोंदवला. ती सर्वत्र जागा शोधत होती. आपले भारावलेले पोट घेऊन! तिला घाई झालेली होती. ती पहिलटकरीण नव्हती तरी प्रत्येक खेपेस हिच उत्कंठा, हिच  भीती तिला वाटायची. अर्धवट उघडी खिडकी दिसताच त्या खिडकीतून अलगदपणे तिने आत उडी मारली. आणि मनीचे डोळे लकाकले. टेबला खालची जागा मनीने हेरली. शांत,अंधारलेली  अगदी तिला हवी तशी! खुडबुडत टेबलातीलतील खालच्या खणातील कागदपत्रांवर ती विराजमान झाली.


               **********00000000*********


               डॉक्टर देशमुख स्वतः नामांकित डॉक्टर. मित्र परिवार ही प्रचंड. त्यांच्या शब्दाखातर अनेक तज्ञ डॉक्टरांची फौज आई साहेबांवर उपचार करत होती. पण आईसाहेबांची क्षीण कुडी कशालाच दाद  देत नव्हती. अनेक डॉक्टर भेटायला येत होते. डॉक्टर देशमुख आईसाहेबांना क्षणभर सोडून जायला तयार नव्हते. जणू घुटमळणार्‍या मृत्यूला ते आव्हान देत होते. काही दिवसांसाठी रुग्णालयातील कामकाजही त्यांनी बंद ठेवले होते.


----    --     ------- -      ----0------------------    


      

         मनाजोगती जागा मिळताच काही काळ मनी सुस्तावली. डोळे किलकिले करत तिने मिशा फेंदारल्या. अंधारातच आजूबाजूची जागा मनीने न्याहाळली. मोकळ व्हायला आता फार वेळ लागणार नाही हे तिच्या लक्षात आले. पोटात मधूनच उठणाऱ्या कळेबरोबर मॅssssव असा हाकारा आपसूकच उमटत होता. काही क्षण असेच गेले आणि वेदनेच्या अग्रावर बसून इवलाली पिल्ले जगात आली. लडखडत आंधळ्या सारखी ती मनीला लुचत होती. तृप्त मनाने मनी त्या टेनिस बॉल पेक्षाही लहानश्या करड्या पांढ-या गोळ्यांना चाटत होती. आता पिल्लांना ठेवायला नवीन जागा मनीला हुडकायची होती. आणि मनीला अचानक   भुकेची प्रथमच  प्रचंड  जाणीव झाली. पाठीची कमान करत मनी  सावकाश  उठली आणि झपाट्याने निघाली.

  

                ************00000***************


आजचा दिवस डॉक्टर देशमुख यांच्या आयुष्यातला खास दिवस! आज रुग्णालयही नेहमीचा गंभीर भाव सोडून,  जणू  गालातल्या गालात खुदखुदतय.दबकी कुजबुज थोडी मोकळी झाली आहे. हा दैवी प्रसाद समजा किंवा डॉक्टरांच्या इच्छाशक्तीची कमाल! आईसाहेबांनी आज डोळे उघडले आहेत.  'बाळ' त्यांनी हाक मारली. बाळासाहेब डॉक्टरांचे डोळे वाहू लागले. देशमुख मॅडमनेही   रुमालाने डोळे टिपले. आता तिला डॉक्टरांच्या तब्येतीबद्दल जास्त काळजी वाटू लागली.


********0****0*******0********0********0******0

        प्रचंड भुकेलेल्या मनीचा आज भाग्य दिन आहे. जास्त लांब न जाता समोरच बीळात शिरणारा  उंदीर तीने हेरला. पिल्लांकडे परत जायच्या ओढीने मनीने त्या उंदराशी नेहमीचा जीवघेणा खेळ  केलाच नाही. उंदराला मटकावून   मनी झपाट्याने बाळांकडे परत निघाली.

      --------    -----------0----  0---        -----------   

    

       डॉक्टर देशमुखांना आता त्यांच्या रुग्णांची आठवण झाली. इतरांना आई साहेबांची काळजी घेण्यास सांगून ते बाह्यरुग्ण विभागाकडे वळले. डॉक्टरांना बघताच हातातील जळती बीडी कशीबशी लपवून रामसिंग पळतच तिकडे गेला.सर्व बंद होते.  खोलीचे कुलुप काढले गेले. आतून उबट वासाचा भपकारा आला. डॉक्टरांच्या कपाळावर नापसंतीची रेषा उमटली. रामसिंगने खोलीचा दिवा लावला. खिडकी उघडली. डॉक्टर खुर्चीत बसले. इतक्यात टेबलाखाली असलेल्या चार पिल्लांनी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. त्या चुळबुळणा-या,  वळवळणाऱ्या गोळ्यांना बघून आधीच थकलेले डॉक्टर भयानक संतापले. या गलथानपणा त्यांच्यालेखी क्षमा नव्हती. भेदरलेला रामसिंह पुढे आला. तो घाबरला होता. पटकन त्याने ती पिल्ले उचलली, पिशवीत कोंबली आणि तडक तिथून निघाला.


**************************00**********************


पिल्लांना सोडून गेलेली मनी पोट भरताच लगबगीने पिल्लांकडे निघाली. खिडकीतून खोलीत उडी मारताच मनी चपापली. भांबावलेल्या नजरेने तिने टेबलाकडे पहिले. आपण कुठे आलो हेच तिला कळेना. तिने धाव घेतली. जिवाच्या आकांताने टेबलावर उडी मारली. तिथल्या भकास पणे पसरलेल्या रिकाम्या जागेकडे  बघताच  मनीच्या तोडून टाहो फुटला मॅssssव. पण आवाज उमटेपर्यंत मनीच्या पाठीवर सटकन फटका बसला. म्याsssऊ म्याssssव  असा आक्रोश करीत आपले दुधाचे तटतटलेले स्तन आणि दुखरे मन घेऊन मनी सैरावैरा पळत सुटली .बाहेर जाऊन घुटमळू लागली.


--------------0 --     --  0   -------0------ ------   0-      ---- 

     

      चांदीच्या वाटीतून घोटघोट ज्यूस आईसाहेब घेत होत्या. मुलाने आणि सुनेने केलेली सेवा बघून त्यांना कृतार्थ वाटत होते. आईसाहेबांच्या जिवावरचे संकट टळले म्हणून जंगी मेजवानी आयोजित केली होती .गाड्यांची रांग लागली होती.डॉक्टर सारख्या कर्तबगार माणसाची पार्टीही खास! ड्रिंक्स ते पुडींग  सगळे पदार्थ अति देखणे, अति चविष्ट आणि नेटके.  हास्यविनोद चालू होता. केविलवाण्या आवाजात म्याssssव म्यsssव करणाऱ्या मांजरीकडे कोणाचेही लक्ष नव्हते.


*************0********0********0**********0


           आर्तपणे मनी ओरडत होती. आता तिला दुधाचे पातेलेही दिसत नव्हते  किंवा तूरतूरत पळणारा उंदीर तिला आकृष्ट करत नव्हता .नेहमीच्या कावेबाज दिसणाऱ्या डोळ्यात आभाळ दाटले होते . फिरत, घुटमळत पिल्लांना शोधत होती ती. आक्रंदत होती.


---------0--    0 -------------0------------   0- -    0 -------- -

     

  यावेळी मनीची तीन  पिल्ले छिन्न- विछीन्न होऊन झाडा खाली पडली होती. सायंकाळच्या समयी घरट्यातील  पिल्लांना दाणापाणी भरवयला  निघालेल्या घारीने आपल्या तीक्ष्ण नजरेने झाडाखाली पडलेले चौथे पिल्लू बरोबर टिपले. ते हेरून  क्षणाचाही विलंब न करता तिने झेप घेतली.ते आपल्या तीक्ष्ण नखांच्या पकडीत उचलले आणि झपाट्याने ती भरारत निघाली. घरट्यातील घारीच्या करड्या काळ्या पिल्लांनी जल्लोष केला. अहमहमिकेने चोच वासून भक्षाचे लचके आई कडून खायला ती सज्ज झाली.

*******0*******0********0********0********0

   या आधीच्या लेखांसाठी लिंक :    

  https://drkiranshrikant.pasaara.com


शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

कोर्टाची पायरी ©️


            जर आठवणींच्या पसाऱ्यातल्या  खास विनोदी  आठवणी  आवरायच्या ठरविले  तर नक्कीच त्यातल्या काही काही आठवणी असतील न्यायालयातील!. तिथल्या अनुभवांचे स्मरण झाले म्हणजे अगदी खदाखदा नसले तरी गालातल्या गालात हसू येतेच. तेथील अशिलाचे आणि आणि फिर्यादीचे सवाल-जबाब म्हणजे पु ल देशपांडे ,चि. वि. जोशी अशा तमाम विनोदी लेखकांना कोळून प्यायलेले असतात. आत्तापर्यंत अशा विनोदांचा थोडा अनुभव  घेण्याची संधी मला दोनदा मिळाली. एकदा तर ती संधी मी अंगावर ओढवून घेतली. तर दुसऱ्यांदा बालरोग विषयातील तज्ञ म्हणून माझी साक्ष झाली. आज त्यातील एका आठवणीचा पसारा आवरणार आहे.




                          कोर्टाची पायरी©️


                "शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये "हे एक घासघासून बुळूक झालेल्या बोल्टमधल्या स्क्रू सारखे वाक्य! हे वाक्य सुध्दा, निबंधातून  लिहून,एकमेकांना  सतत सांगून ,ऐकून  निसरडे झाले आहे .अशा या वाक्याचा 'स्क्रू' कधीतरी माझ्या डोक्यातील बोल्टमधून  सुssळ्ळकन निसटून कुठेतरी घरंगळलेला असावा.    मी कोर्टाची  पायरी त्यामुळेच चढले. दुसरे सर्वात महत्वाचे म्हणजे हे वाक्य शहाण्या लोकांसाठी आहे. म्हणजेच मज साठी नाही. या वाक्यातील शहाणी? छे छे "ती मी नव्हेच!" लहानपणापासून ते आज्जी होईपर्यत शहाणपणा म्हणजे नक्की  काय हेच मुळी मला  कळलेले नाही. लहानपणी आई प्रेमाने 'माझी वेडू.' असे म्हणायची तर नवरोबाच्याही खुषीची पावती म्हणजे 'वेडाबाई '  अशी हाक हिच आहे! त्यामुळेच की काय ही अनेकांना मनस्ताप देणारी, उगाच चढलो वाटायला लावणारी  कोर्टाची पायरी मी  स्वहस्ते बांधली आणि त्यावर आरोहण केले.  त्यामुळे तक्रारीला वाव नाही. अर्थात कोर्टातील  प्रसंगाने माझी एवढी करमणूक झाली की आता मी या अनुभवाने नक्कीच म्हणेन, एकदा तरी आयुष्यात कोर्टाची पायरी चढायलाच हवी.

                त्याचं असं झालं साधारण ऐशीच्या दशकात  गाडी चालवायला नवीन नवीन शिकले होते. गाडीचे स्टेरिंग व्हिल हातात आल्यावर फारच भारी वाटायचं. हवी तिथे गाडी फिरवायला 'मौज वाटे भारी'. त्या कालखंडात  रस्त्यांवर गर्दीही कमी, आणि आत्ता सारखे दुभाजकही नव्हते. सगळे नियम काटेकोरपणे पाळत गाडी चालवणे खूप आवडायचं.

        नंतर काही वर्षांनी एकदा घरातून निघून एका चौकातून कार घेऊन  जात असताना  चौकातून गाडी उजवीकडे वळवली. नेहमीसारखा लांबलचक हात बाहेर काढून वळत असल्याचे सूचित केलं. तोच समोरूनच फोडणीला टाकलेल्या मोहरी सारखी  तडतडत येणा-या एका रिक्षाने, आता वेग कमी करेल असं वाटेपर्यंत काटकोनात वळलेल्या  गाडीला एकदम धडाssssमकन  धडक दिली .कोणालाच काहीही लागलं नव्हतं पण गाडीला छोटासा कळत नकळत  डेन्ट मात्र आला होता. रिक्षाला तेवढाही नाही.आता मात्र माझा पारा सहारा वाळवंटातील ऊन्हासारखा चढू लागला. कायद्याचे पुस्तक डोक्यात थैमान घालू लागले. एवढी सूचना देऊनही याने वेग का कमी केला नाही म्हणून रागावून  खाली उतरले. अपराध्याला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे.(हे मनातल्या मनात!). नेहमीप्रमाणे रिकामटेकड्यांची गर्दी जमली. मग काय! प्रत्येक जण जणू महातज्ञ! मग या तज्ञ लोकांच्या शंभर सूचना सुरू झाल्या.बहुतेकांचे म्हणणे म्हणजे" जाऊन द्या गरिब आहे रिक्षावाला".एकाने तर सांगितले" मॅडम तुम्हीच द्या त्याला थोडे पैसे. "गोबेल्सच्या प्रयोगासारखे सतत तेच तेच ऐकून.,शेवटी शेवटी तर गाडी चालवणे हेच कसे चूक आहे., आणि गरीब बिचारा रिक्षावालाच कसा बरोबर आहे हाच विचार माझ्याही मनांत येऊ  लागला.अरेरे बिच्चारा चुकीच्या बाजूनी येत असला तरी काय झाल? कशीही  वेडीवाकडी  रिक्षा हाकायचा त्याला जन्मसिद्ध  अधिकार  आहे. मीच गाडी रेटायला नको होती, असेही पटायला लागले. ज्या तावातावाने गाडीतून उतरले होते तो डोक्याचा ज्वलंत ज्वालामुखी आता अगदी हिमालय नसला तरी सूप्त  ज्वालामुखी होऊ लागला.राग थंड व्हायला लागला  . अखेरीस  तर रिक्षावाल्याने फक्त चूक कबूल करावी एवढीच माझी माफक इच्छा उरली.पण रिक्षावालाही मी ज्या गावचे पाणी पिते तेथलेच पाणी पिणारा. रस्त्यावर एवढा जबरदस्त फॅन क्लब त्याला मिळाल्यावर तो कुठला माघार घेतोय! मग मात्र मी  ठरवलंच की आपण केस करायचीच.

           मग आमची वरात गेली जवळच्या पोलिस स्टेशनात. रीतसर तक्रार झाली .पंचनामा झाल्यावर घरी आले. नव-याला सर्व सांगितले.  तो फक्त हसला. तेव्हा लक्षात आले ज्यावर चढू नये अशा  कोर्टाच्या पायरीची विटा आणि वाळूसिमेंट लावून आपण बांधणी सुरू केली आहे. चलो काही हरकत नाही. आता माघार नाही. एक नवा अनुभव!

           सहा महिने गेले. विसरूनही गेले होते  अपघात. आणि एक दिवस ओपीडी मध्ये भर गर्दीत मला कोर्टाचे समन्स आले. दोन दिवसांनंतर दुपारी बारा वाजता त्यांनी त्या केस साठी कोर्टात बोलवले होते म्हणजे ऐन कामाच्या वेळात. पण मन एकदम सह्याद्री सारखे कणखर झाले होते.आता मागे फिरणे नाही. अंगात वीरश्री संचारली होती. आता डोळ्यासमोर  आपल्या हिंदी सिनेमातले अनेक प्रसंग उभे राहिले.' तारीख पे तारीख पे तारीख' ओरडणारा सनी देवल,वक्त मधिल सुनिल दत्त! वकीलांचे काळे कोट. त्यांचे ते' माय लॉर्ड' ,न्यायाधिशांचे 'ऑर्डर ऑर्डर'  हे घुमू  लागले. ऍलिस इन वंडरलैंड सारखे पूर्णतः  वेगळ्या जगाची सैर. मजा वाटत होती. 

       अखेर तो दिवस  उजाडला.  आमच्या केसचा पुकारा केला गेला. न्यायाधीश स्थानापन्न झाले. माझी केस!  कोर्टात गर्दी होईल असं वाटलं होतं (??)पण माझा नवरा सुद्धा आलेला नव्हता .चार टाळकीही नव्हती. बहुधा रिक्षावाला आणि त्याचे दोन  मित्र तेवढे उपस्थित होते. न्यायाधीश यादेखील श्रीमती न्यायाधीश असल्यामुळे एक औरतही औरतके मनका दर्द जानती है असले खुळचट वाक्य मनात घुमायला लागले . सत्त्यासाठी लढणारी ' मी' मलाच एवढी महान वाटू लागले की माझ्या डोक्यामागे छानसे तेजोवलय आहे असाही भास मला होऊ लागला.

                लाल बासनातील श्रीमद् भगवत गीतेवर हात ठेवून माझा शपथविधी झाला. न्यायालयातील पहिल्या विनोदाची चुणूक  होती ती!   नुसत्या पवित्र पुस्तकांवर हात ठेवून  माणूस एकदम खरंखरं बोलायला लागेल हे समजणे म्हणजेच महा विनोद! ,"मीच तो चोर हो!" किंवा "मीच तो खूनी" अस सांगायला लागला तर वकीलांच्या पोटावर पायच येईल की हो! अजूनही हा शपथ प्रकार का चालू आहे हेच मुळी कळत नाही.  कोर्टात पवित्र थर्मग्रथांवर हात ठेवून जितकं खोटं बोललं जातं तितकं कुठेच खोटं बोललं जात नाही. 

            सुरुवातीला माझं नाव ,पत्ता,व्यवसाय हे सगळं विचारून झालं. तोपर्यंत कंटाळवाणा चेहरा केलेल्या वकिलाच्या चेहऱ्यावर जरा जान आली .अचानक माझ्यासमोर येऊन त्यांनी विचारलं" या समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का? "मी समोर पिंज-यातल्या व्यक्तींकडे पाहिले अगदी  नीटच..पण माझा मेंदू सहकार्य करायला तयारच नाही!! हा कोण ?साक्षीदार?की साध्या कपड्यातील पोलिस  की दस्तुरखुद्द  रिक्षावालाच?आता आली का पंचाईत.सकाळी मी पाहिलेला माणूस दुपारी परत आल्यावर त्याला ओळखणे अवघड!तिथं तो समोरचा पूर्णतः अनोळखी माणूस कसा काय ओळखणार मी! एक निश्चित, ती समोरची व्यक्तीच जर रिक्षावाला असेल तर वाssss अपघात भलताच मानवलाय की त्याला. सहा महिन्यांपूर्वी शेवग्याच्या शेंगेसारखा दिसणारा आता सुरणाच्या गड्डयासारखा  दिसत होता.  मी मान नकारार्थी हलवली. मॅडम तोंडाने सांगा "मी ओळखत नाही" तसे बोलल्यावर परत वकील साहेब उवाच" मॅडम हाच माणूस  रिक्षा चालवत होता ना?" , आता रिक्षा  चालवणारा माणूस  पुरुष जातीचा  होता एवढं नक्कीच!अगदी तो माणूसच होता एवढ नक्की सांगू शकते. आणि हे पण नक्की ती रिक्षा  घरातील कोणीही बोका, मोत्या , ढवळ्या पवळ्या हे पुरूष जातीचे पाळीव प्राणी  पिटाळत  नव्हते. पण हा  माणूस  सहा महिन्यापूर्वीचा रिक्षावालाच होता हे सांगणं अवघडच. काही तरी विनोद करायचा म्हणून मी बोलून गेले  "अहो तो काही शाहरुख खान होता का मी लक्षात ठेवायला?" अर्थात  शाहरूख खानलाही न ओळखण्याची किमया मी सहज करू शकते असा मला आत्मविश्वास  आहेच. पण हे सिक्रेट  तुमच्या माझ्यातले. इतक्यात न्यायाधीश बाईंनी समजुतीच्या स्वरात सांगितले  "जाऊ द्या हो मॅडम तुम्ही फक्त उत्तर द्या. उगाच मनावर घेऊ नका."

                पुढचा प्रश्न आला" मॅडम तुम्ही कुठल्या दिशेने येत होता आणि कुठल्या दिशेकडे जात होता"? थांब रे बाबा! या वकीलाचा  पेपर फारच अवघड वाटायला लागला. आता पटकन दिशा सांगणे कौशल्याचेच काम नाही कां? दरवेळी दिशा ओळखताना शाळेतील भूगोलाचे सर आठवतात .पूर्वेकडे तोंड केल्यावर डावीकडे उत्तर आणि उजवीकडची दक्षिण लक्षात ठेवूनच पुढच्या दिशा शोधल्या जातात.म्हणजे आधी पूर्व कुठे ते शोधा रे शोधा. त्यातल्या त्यात ईशान्य आणि वायव्य जरा तरी बऱ्या.थोडाच घोळ घालतात.  ईशान्यपूर्वेची राज्ये आणि वायव्येला खैबरखिंड यामुळे या दोन्ही थोड्याफार कळतात तरी; पण आग्नेय आणि नैॠत्य या दोन दिशांनी कायम माझ्याशी शत्रुत्व पत्करलय. त्यांनी डोक्यात नेहमीच खळबळ माजवली असते. नैऋत्य मोसमी वारे येतात म्हणजे  नक्की कुठून? , केरळ कडून का  चेन्नई  कडून हा नेहमीच गोंधळ होतो.  वकीलसाहेबांना कचकून अष्ट दिशा नव्हे दश दिशांची नावे फडाफड म्हणून दाखविण्याचा मोह झाला पण जान दे! छोडो.   रस्त्यावर इतक्या सगळ्या ओळखीच्या खुणा होत्या आणि वकील साहेब दिशांना सोडायला तयार नव्हते. मी पूर्व म्हटल्यावर त्यांनी म्हणावे मॅडम ती दक्षिण आहे हो .आणि मी उत्तर दिशा म्हणताच वकिल साहेब  पूर्वेवर ठाम होते. सा-या सरळसोट दिशा बिचा-या इतक्या एकमेकांत गुंतून गेल्या की तो गुंताडा कसा सोडवावा काही क्षण आम्हालाच काही कळेना.हळूहळू  गुंता सोडवताना मात्र मी खरोखरच थकून गेले.अखेर आमची सर्वांचीच भरपूर करमणूक होऊन त्या दिशांच्या गुंत्यातून आम्ही बाहेर पडलो. 

                 अशा रीतीने अजून काही प्रश्नोंत्तरांच्या फैरी झडल्या.  वर्षभराची करमणूक एका तासातच फस्त झाली होती.  चेहराही लक्षात नसलेल्या रिक्षावाल्यालाही मी पूर्णपणे माफ करून टाकले होते. त्यामुळे आचके देत देत माझी कोर्टातील केस मृत पावली.

          ही कोर्टाची पायरी माझी मी स्वतः बांधली आणि मी चढले अर्थात माझ्या मते यातील खलनायिका  होती ती रिक्षा! तरीही त्याच्यातून माझी स्वतःची भरपूर करमणूक करून घेतली. मस्त रिलॅक्स झाले. त्यानंतर परत एकदा मला  तज्ञ म्हणून व्यावसायिक दृष्ट्या मत  देण्यासाठी बोलवलं होतं.तेही मी अगदी मनापासून केले.त्यानंतर मात्र मनातल्या रामशास्त्री प्रभुणे यांना  आजतागायत मी विश्रांती दिली आहे. 


drkiranshrikant.pasaara.com