शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

स्फुट -अस्फुट ©️

     

  दोन छोटेसेच प्रसंग.पहिला संगीतमय ,चल चित्रपटच जणू!  दुसरा  नजरेला बांधून टाकणारा. दृष्टीवर जादूई मंतरमोहिनी टाकणारा,पण काही काळ तरी मी त्यात गुंतून गेले होते. सुदैवाने दोन्ही घटनांचे फोटो पण होते. अशाच छोट्या,छोट्या घटना मनात रुतून बसतात. पण गंमत म्हणजे  त्यांची अडगळ होत नाही तर होतो 'पसारा'. हा पसारा कधीतरी आवरायलाच हवा.आज ह्या दोन्ही छोट्या घटनांचा पसारा आवरून ठेवते आहे.                       
                     स्फुट -अस्फुट©️
नुकतीच कॅनडास्थित सुनेने गुड न्यूज दिली होती.नुसती त्या बातमीने घरात दिवाळी साजरी झाली. घरात नातवंड ही कल्पनाच  फक्त आम्हालाच नाही तर घरातल्या झाडांना,पाना फुलांना खुदुखुदू हसवित होती. त्याच सुमारास------  
                  ******
               एक दिवस   गच्चीतल्या एका वेलीच्या लवचिक फांदीवर बारीक सालींच भेंडोळे पाहिले. ते काय आहे याचा विचार करते आहे तोच एक इटुकला , लांबचलांब चोचीचा आणि पिवळ्या पोटाचा सन बर्ड तेथे येऊन बसला. वाँssssव काय ती त्याच्या   चमचमत्या काळ्याभोर पंखावर पहुडलेली  कलाबतू सारखी चमक !!!!  तोपर्यत त्यांच्या श्रीमतीजीपण हजर. रंगारूपाने श्रीयुतां पेक्षा डाव्या पण एकदम चुणचुणीत आणि कामसू. मग घरटे बांधायची जी काही धांदल सुरु झाली. कुठून कुठून लांबलचक धागे घेऊन दोघेही येत होते. अधुनमधून कागदाचे कपटे, कापूस यांचीही आवक होत होती.  घरटे हळूहळू  आकार घेत होत. आता ते डुलत्या फांदीवर मजेत लंबकासारखे हालूडुलू लागले की क्षणभर आमचेही श्वास कोंडायचे. एकेदिनी लक्षात आले की छानपैकी लंबवर्तुळाकार घरटे तय्यार आहे. आत शिरायला मस्तपैकी गोलाकार जागा अगदी कंपासने आखल्या सारखी., आणि पाऊस जाऊ नये म्हणून एक छानसे छप्पर. अगदी फेल्ट हॅटसारखे दिसणारे
.        मग एकेदिवशी पहातो तर काय, श्रीमतीजी घरट्यात जाऊन बसल्या आहेत आपली लांब चोच दरवाजातून बाहेर काढून.   लक्षात आले बर आमच्या, बाळांच्या आगमना आधीची तयारी होती ती. परत श्रीमतींनी आपली घरट्यातली जागा सोडली अन् झाल्या सुरु दोघांच्या फे-या!
        चोच बाकदार, सावध नजर
              शामल पंख, सोनेरी ऊदर
       चोचीत घास, वा-यावर स्वार
            नाजुक गिरकी,  बसे अलवार.
                        यथाअवकाश नाजुकसा किणकिणाट घरट्यातून येऊ लागला.चक्क  तीन तीन बाळे.पंख हीन.डोळे मिटलेले.तोंड आतून लालबुंद. 
                सुबक घरटे झुलते छान
                      वासून चोच ताणत मान
                मुख लालट बंदही डोळे.
                        जणू कापसाचे हलती गोळे
श्रीयुत आणि श्रीमतीजीच्या एकापाठोपाठ फे-या वाढल्या. लांब चोचीत काहीबाही आणून घरट्याच्या दारातून आत आत डोके खुपसले न खुपसले की स्वारी पसार. ही दोन्ही पाखरे अशी रानोमाळ जाऊ लागली की भलतेसलते विचार आमच्या मनांत फणा काढत. त्यांना शिकारी पक्ष्याने पकडले तर नसेल?एखाद्या दगडाने तर त्यांचा वेध घेतला नसेल? त्यांना परतीच्या वाटा कळतील ऩा?    आमच्या जिवाची कोण घालमेल व्हायची.
           पंखवाटा  कोणी  आकाशी रेखिल्या
               पाखराने इवल्या  कशा जाणिल्या?      
           दूरदेशी  त्याचे असे घरटे
                परतीच्या वाटा कसे जाणते?
एके दिनी त्या पाखराची पिल्ले एकामागोमाग घरट्यातून बाहेर आली. टुणटुण उड्या मारल्या अगदी आईबाबांच्या जागरूक नजरेसमोर. त्यानंतर थोडेसे उडून गच्चीचा कठडा. त्यावर थोडं रेंगाळल्यासारखे करून अजून एक उड्डाण जवळच्या झाडावर. मग पिल्ले तीन दिशांना आणि पक्षी,पक्षीण चौथ्या दिशेला उडून गेले.
                       ********
            तिकडे कॅनडात मला नात झाली.एवढा प्रचंड आनंद! आजाराने झोपून असलेल्या आईला सांगितले.तीही खूष. पणजी होण्याचा पुरेपुर आनंद कसा व्यक्त करावा हेच कळत नव्हत. दोन दिवसांनी आई समाधानाने माझ्या मांडीवर डोकं ठेवून गेली. बाहेर झाडांची जुनी पाने गळून पडली होती. नवीन तांबूस किरमिजी  पानं फांदीवर शोभत होती.
----      ---   - -------------- -       --------------   ------ --- ---  --------------- -  --------------    -------------- --- -      
               
                       एका तळ्यात होती---   

तिला सगळे हसायचे.तिला कोठेतरी सोडून द्या असे काही हितचिंतक(?) सांगायचे.. दिसायला यथातथाच. तिची उंची होती फक्त साडेतीन फूट. वर्गातल्या सुंदर  मुलीच्यामधे अगदीच ठिगळ लावल्यासारखी. मनात खंतावलेली.  आई वडिलांच्या प्रोत्साहनामुळे शिकणारी पण तरीही  ती कोमेजलेलीच!!
                              ********


              
 कधीकधी आयुष्यात उलथापालथ होते अचानक अलिबाबाची गुहा तुमच्यासमोर दरवाजा उघडून उभी असते. खरंतर तुम्हाला परवलीचा शब्दही माहीत नसतो. पण कोणीतरी हळूच तो कुजबुजतो आणि आपण त्या गुहेत डोकावतो अगदी तस्सच झालं 
             आमच्या घरासमोरच एक शंभर मीटरवर एक झाडाचा सांगाडा उभा  आहे.आजूबाजूला  हिरवाई आणि त्यात न शोभणार वेड्यावाकड्या फांद्या असलेल ते झाड. कायम अनेक वटवाघुळबुवा  खाली डोकं वर पाय करून तिथं लोंबकळत  बसलेली असतात. म्हणजे एखाद्या चेटकिणीचे झाड असावं तसं ते दिसते. संध्याकाळी,तिन्ही सांजेला सगळी वटवाघुळे एकदम उडायला लागतात. थोड भीतीदायकच वाटत ते. अगदी हिचकाॅकच्या 'दी बर्ड्स' सिनेमाची आठवण यावी इतके असतात ते पक्षी ! दिवसा त्या फांद्याचे फराटे जणू आकाशावर काढलेत अस वाटते. बेरंग ,कुरूप आणि त्याला लटकत आहेत मोठी मोठी वटवाघळे! कधीमधी वसंत ऋतूत गुलाबी फुले येतात त्या झाडाला पण तरीही त्या गुलाबी गर्दीत ती काळी बेंगरूळ शिर्षासन केलेली वटवाघुळे म्हणजे त्याला दृष्ट लागू नये म्हणून लावलेले काजळाचै अनेक बटबटीत  तीट वाटतात. तर असे हे झाड. 
             पहाटेच्या झुंजू मुंजू वेळेस गच्चीवर फेऱ्या मारत होते.  त्या झाडाकडे नेहमीच्या सवयीने एक नजर टाकली आणि  सताड  उघडलेल्या अलीबाबाच्या गुहेतले सर्वात मौल्यवान रत्न माझ्यासमोर  चमकत होते .विश्वास बसणार नाही असा बदल त्या झाडात होत होता .सूर्य उगवत होता पण त्याच्यावर ढग असल्यामुळे सर्वत्र विझू विझू उजेड होता.  काही सोनकिरणे त्या ढगाला न जुमानता ढगांच्या कोप-यातून बाहेर पडली होती् अगदी महाउत्सुकतेने. किरणांना ते झाड दिसले आणि त्या उपेक्षिताला त्यांनी हळूवारपणे  कुरवाळायला सुरवात केली.. हे करताना त्या सूर्यकिरणांनी  निवडले होते फक्त तेच झाड. बाकी झाडे अजून अंधार उजेडाच्या सीमारेषेवरच.   त्या सूर्यकिरणांनी  केलेला परिस स्पर्श  आणि ते दुर्लक्षित  वाळकुंडे झाड हळूहळू खुलू लागले. तो जादूचे स्पर्श  आणि काय सांगू दुसऱ्या क्षणी ते झाड लखलखीत  सोन्याच्या रसाने आंघोळ करत होते . रसरशीत ,चमकदार, पिवळा ! सुवर्णभस्म लावून फक्त राजे -राण्या आपली हौस भागवतात असे ऐकले होते. आज ते झाड जणू महाराजांचं महाराज झाले होते. कुठल्याही सौदर्यवती पेक्षाही  अधिक सुंदर.नवचैतन्याने रसरसलेले वाटत होते.
          परिसस्पर्शाने जिवंत माणसे सूवर्ण मूर्ती सारखी होतात सुंदर पण निर्जीव! इथं झाड  आज शब्दशः सोन्याचे झाले होते पण रसरशीत जीवनाने भरलेले आणि भारलेले! काही सेकंद हे शाही स्नान चालले होते. डोळ्यांनी ते पूर्णपणे टिपून घेतले  कारण त्या क्षणी हातात कॅमेरा नव्हता पण मोबाईल  फोन होता .कॅमेरा आणायला जायची इच्छाही झाली नाही इतके छान होतं, डोळ्यातून मनात रुतून बसले होते.
                           *******
           आज शाळेत तिचा सत्कार होता.  आज ती राजस्थानातील जोधपूर येथे कर्तबगार जिल्हाधिकारी  म्हणून नियुक्त झाली होती. आत्मविश्वासाने तिचा चेहरा चमकत होता.स्वतः च्या गुणांची जाणिव  तिला झाली होती.ती खूप खूप उंच दिसत होती.अगदी सर्व उपस्थित मान्यवरांपेक्षाही उंच. आज सर्वात सुंदर तिच दिसत होती.
    

शुक्रवार, २४ जुलै, २०२०

आखोमें क्या जी---©️ - -

रात्रीच्या प्रवासात समोरून येणा-या बैलांच्या डोळ्यावर उजेड पडल्यावर त्यांचे लखलखते डोळे एकदम भारी दिसतात.जणू दोन विजे-याच. सतत पेटलेल्या. ते बघण्यासाठी रात्रीचा प्रवास करावा इतके छान.पसारा आवरताना इतर ज्ञानेंद्रिये आवरून ठेवायचा प्रयत्न केला पण डोळे ,एक महत्वाचे ज्ञानेंद्रिय  राहूनच गेले.स्पर्श जितका बोलका असतो तितकेच किंबहुना जास्तच बोलके असतात डोळे. काळे, निळे, हिरवे, घारे तपकीरी कुठल्याही रंगाचे असो, डोळे  मनाचा आरसा बनतात. मुखाने काहीही शब्द फुटत नसले तरी डोळे चुगली करतात. नकारातला होकार उमटतो डोळ्यांमधून .  सुंदर विश्व पाहण्या पलिकडेचे म्हणजे मनाचं प्रतिबिंब दाखवणारे हे डोळे.  पसारा आवरताना असे अनेक डोळे आठवताहेत. चलो ये भी सही है! हा डोळ्यांच्या आठवणीचा पसाराही कधीतरी आवरायलाच  हवा.

                  ©️आखोमें क्या जी------

            खर तर सुंदर डोळ्यांवर कवींनी सतत  कवितांचा रतीब घातला आहे आणि घालत रहातील.टपोरे डोळे, बदामी डोळे,मीनाक्षी,हरीणाक्षी अशा अनेक सुंदर उपमांनी डोळ्यांचे वर्णन केले आहे.विविध रंगांची मुक्त खैरात झालेले हे डोळे! कुणाचे चमचम नीलमणी तर कुणाचे पानांसारखे हिरवे ,जीव घाबरवणारे घारे,जीव ओवाळून  टाकावे असे तपकीरी आणि आपल्याकडे असतात तसे शांत संयत काळे .त्यांना नटविण्याच्या अनेक त-हा. काजळ ,सुरमा ही तर डोळ्यांभोवती देखणी महिरपच. या महिरपीत  सजून, अजून अधिकच साजिरे दिसणारे आपले डोळे!  खर तर डोळे आपल्या मनाचा आरसा आहेत. रागावलेले, लालभडक,तिरसट,आत्मप्रौढ व्यक्तीचे डोळे मनावर एक ओरखडा उमटवतातच. मग ते कितीही छान टप्पोरे असले तरी उसमे वो बात नही, वो जान भी नही !
       अगदी चिमुकल्यांचे डोळे कधी पाहिले तर, ते डोळे नसतात, असते ती असते एक सुंदर चित्रफित. कडेवर,खांद्यावर  बसून उंचावरून जग पहाणारे हे डोळे! कायमच उत्सुक, विस्फारलेले, हसरे , रडवेले किंवा पेंगुळलेले तरी असतात. गंमत म्हणजे ते हसता-हसता रडवेले  होतात, तर रडता-रडता त्यांची सोनपाखरे होतात. हे डोळे कसेही असो, काजळाने बरबटलेले हे डोळे कोणाकडेही बिनधास्तपणे एकटक बघायला लागतात. आणि तेव्हा जी एकाग्रता,उत्सुकता उतरते डोळ्यांमध्ये, ती  डोळ्यांना एखाद्या देखण्या शिल्पासारखे बनवते. कपाळावर भुवयांच्या धनुकल्या कायम ताणलेल्या, डोळे विस्फारलेले. काय बघू आणि किती बघू अशी मनाची अवस्था. फार फार सुंदर दिसतात बाळं तेव्हा. अगदी तशीच मांजराची पिल्ले. खेळताना त्यांच्या डोळ्यांमध्ये अगदी असाच भाव असतो. पिवळ्या गरगरीत डोळ्यांमध्ये मोठ्या मोठ्या झालेल्या काळ्याभोर बाहुल्यांमुळे ते अधिकच निरागस दिसतात.डोळेही अगदी विस्फारलेले जणू सारे जग त्याक्षणीच बघायचं आहे.पिऊन टाकायचे आहे.निरागस शब्दच जणू डोळ्यांचे रूप घेऊन येतो.
         केरळमध्ये हत्तीची पिल्ले मनसोक्त  हुंदडताना पाहिली. गोंडस आणि अती खेळकर.शरीराच्या मानाने डोळे खूप लहान पण त्यातले खेळकर, मिस्कील आणि बिलंदर भाव भन्नाट.त्यांना बघितल्यावर आठवतात आईस्क्रीम पार्लर मधे आलेली तीन चार वर्षांची मुले.  या वयात मुलांचा थोडा थोडा राग लोभ , 'हे आमचंय' असे 'आमचे तुमचेही' सुरू होते. ह्या मुलांचे डोळे  बघावेत ते आईस्क्रीमच्या  दुकानात. चवड्यावर उभे राहून टाचा उंचावून  काऊंटरच्या आतील डब्यातील आईस्क्रीम  बघताना त्यांच्या डोळ्यातले भाव विलक्षण असतात.समाधीच लागली असते त्यांची.  डोळे बोलत असतात. सगळीच आईस्क्रीम्स घ्यायची त्या डोळ्यात तीव्र इच्छा असते .  प्रत्येक  आईस्क्रीम बघता-बघता त्यात ती पूर्णपणे हरवून जातात. आता कसलेच भान नसते. अर्जुनाच्या  लक्षवेधासारखेच आता लक्ष केंद्रित  होते आईस्क्रीमवर ! हे हरवलेपण त्यांच्या डोळ्यांमध्ये वाचता येते. अखेर आईस्क्रीमची निवड होते. डोळ्यात शंभर वॅटचे बल्ब पेटतात. नुसता आनंद ! हातात आईस्क्रीम आल्यानंतरचा आनंद असतो जगज्जेत्याचा.   डोळ्यात जणू जगज्जेता सिकंदर  अवतरतो. आईस्क्रीम हातात आल्यावर आधी दादाच्या हातातल्या आईस्क्रीम कडे बघितले जाते मग परत आपल्या आइस्क्रीम कडे बघून कोणाच छान आहे हे ठरवलं जातं पण ते मनातल्यामनात.अगदी एकाग्रतेने मग आईस्क्रीमचा चमचा ओठाजवळ येतो. आता तोंड बरबटलेल्या या चिमुरड्यांचे डोळे दिसतात एखाद्या योग्यासारखे. डोळे आता होतात ओठ. आता शब्द  असतो तृप्त,पण अजून!!हे बोलणारे डोळे आणि त्यातिल  सर्वभाव बघायला कुठलेही  आईस्क्रीमचे पार्लर गाठावे.
        बालपण संपते आणि डोळे अधिक सजग आणि सावध होतात अर्थात बालपणाची कोवळी झाक अजूनही लपता लपत नाही. थोडासा निर्ढावले पणा आला तरीही बालपण अजून डोळ्यात दिसत असतं .त्यामुळेच मनाविरूध्द काही घडले की सर्वप्रथम जखम दिसते ती डोळ्यातच . एखादी चूक घडली तर नजर चुकवणे, टाळणे बघावे ते याच वयात.क्षणात ते पाझरू लागतात. हळूहळू कोवळीक कमी होऊन संयम, निर्धार,तर  क्वचित खोटेपणा यांची भाषा दिसू लागते. कुत्र्याचे धड पिल्लू नाही आणि पूर्ण वाढलेला कुत्रा नाहीये अशा अवस्थेतल्या  पाळलेल्या कुत्र्याचेही तंतोतंत असेच. बघावे तर अगदी ह्याच भावना त्याच्याही डोळ्यात असतात .थोडासा बालपणाचा गोडवा, नियम मोडण्याची वृत्ती, थोडीशी भीती, थोडासा बेदरकारपणा त्याच्या डोळ्यांमधून डोकावत असतो.
         तरुणपणी मात्र डोळे बोलतात ती भाषा तोपर्यंत पूर्णतः अनोळखी असते. डोळ्यांची ही पूर्णतः नवीन भाषा अबोलपणे बरंच काही  बोलत असते. सुखद, उबदार, सुवासिक, सुंदर गुलाबी रंगाची प्रेमाची भाषा. डोळे भिरभिरतात. तो माझ्याकडे बघतोय किंवा ती माझ्याकडे बघते हे त्याच्याकडे न बघताच कळायला लागतं. लपंडाव छान रंगतो. शब्दांची गरजच नसते. डोळे सर्वांच्या नजरे पलीकडे जाऊन चुगली  करतात. दोन नजरेचे गुफ्तंगू सुरू होते. रुसवा, लटका राग ,लाज यांचा गोफ विणला जातो.  कधीकधी दुर्दैवाने या नजरेतील गुलाबांची जागा घेतो वैशाखातील लाल भडक गुलमोहर !मग संताप, वैर,  मानहानी, तिरस्कार ही सैतानी पावलं नजरेचा ताबा घेतात.असे डोळे पाहिले की आठवते चेन्नईच्या मगरींच्या फार्मला दिलेली भेट.  चेन्नईला आम्ही गेलो होतो तेव्हा तिथल्या मगरींचा मोठा फार्म बघायला गेलो. मी आणि माझे पती. आत शिरताच एक विचित्र उग्र वास सर्वत्र भरलेला. काळ्याभोर मगरी तेथे पहुडलेल्या.पाच फुटापासून ते तीस फुटांपर्यंत. गंमत म्हणजे कोणाचीच हालचाल नाही.  डोळे बंद.  त्यामुळे क्षणभर वाटलं की येथे जिवंत मगरी  नाहीत तर फक्त मगरींचे पुतळे  आहेत.  चांगलेच फसलो की आपण. आणि असा विचार करेपर्यंत समोरच असलेल्या दोन मगरीनी अचानक आपले डोळे खाडकन उघडले. कधीच विसरणे शक्य नाही ते हिरवट पिवळे अपारदर्शक बटबटीत डोळे.   हृदयाचा ठोका चुकला. त्या मगरी सरकल्या. आमच्या दिशेने आल्या. आणि त्यानंतर छूमंतर झाल्यासारखं प्रत्येक मगर डोळे उघडून हालचाल करू लागली.ते डोळे निर्विकार, दगडी तरीही क्रूर.कधी कधी वाटत जर कडक उन्हाळा मानवी स्वरूपात समोर आला  तर  तो पांढराफटक,उंच आणि त्याचेही डोळे असेच असतील.कावेबाज, पिवळेकरडे! भक्षाचा  घास घेण्यास उत्सुक.
    तारुण्य मागे पडते डोळ्यातील गुलाब कधीच गायब होतात. संसार मुलंबाळ यांच्यात  डोळे अधिकच  सजग होतात. एखाद्या घुबडासारखे.  सर्व  दिशांना नजर भिरभिरते कारण कुटुंबाची जबाबदारी असते न! कुठेही गेले तरी घारीसारखेच लक्ष असते आपल्या घरकुलावर. वर्षे जातात आणि साक्षात्कार होतो, अरेच्या, पुस्तक दोन हातावर धरलं तरी अक्षर अगदीच अंधुक दिसताहेत!  तात्काळ डोळ्याच्या डाॅक्टरांची भेट. अन् आपल्या डोळ्यांना मिळते एक मैत्रीण.चाळिशी .पुढच्या आयुष्यभरचा सहप्रवासी म्हणून! ही जणू जिवाशिवाची भेट. पुढच्या आयुष्यात एक वेळ आपण आपल्या सावली शिवाय राहू पण चष्म्याशिवाय छे! शक्यच नाही. डोळ्यांचा नवा दागिना.नवी महिरप.
         मूर्तीमंत कारुण्य म्हणजे काय तर गायीचे डोळे. अगदी ती मारकुटी असली तरी. कारण तिचे अंतकरण असते लोण्याचेच! तिचे फक्त डोळे बघायचे. त्यात थोडासा अविश्वास असला तरी ठळकपणे जाणवते ते फक्त कारूण्य. सा-या विश्वाची कणव तेथे एकवटली असते.  मला आठवतंय  इंदोरला खाटीक गाईला ओढत नेत होता तेव्हाचे ते तिचे डोळे विसरणं शक्य नाही. हतबल, भिती,अनिष्टाची चाहूल आणि तरीही ओतप्रत भरलेले कारूण्य. ते डोळे पाहिल्यावर चार रात्री नीट झोपू शकले नाही. स्वतःच्या नगण्यतेची जाणीव तीव्रपणे होत होती. ते डोळे बघितले तेव्हा आजूबाजूच्या  कित्येक आजी-आजोबांची आठवण झाली.  वृद्धत्वाच्या सावल्या पसरू लागतात आयुष्यातील चुकलेली गणित, ठोकताळे डोळ्यासमोर अंधुकशी येतात .आता ना नजरेत भावनेचे तांडव ,  ना कुठली इच्छा.   फक्त अपार माया, शांत ,तृप्त किंवा विद्ध पूर्ण हरवलेली नजर असते. आधी कोणाच्याही नजरेचा ठाव घेणारी नजर ह्रदयात उतरणारी , भेदक नजर आता मात्र आधार शोधत असते. मांडलेला डाव उधळून जोडीदार ,प्रियजन पुढे गेलेले असतात.   थकलेल्या नजरेला आता त्यांची आस लागलेली असते .पहाटे हळूहळू मावळलेल्या तारकां सारखेच आयुष्यातील एकएक भावना,लालसा नजरेतून नष्ट होत असतात. सर्वात त्रासदायक असतात मृत्यूनंतरचे ते पूर्णतः थिजलेले भावहीन  डोळे.
               या उलट दांडेलीच्या अरण्यात अक्षरशः पाच फुटावरून पक्षीराज गरूडाने आमच्याबरोबर जमवलेली मैफल अशीच अविस्मरणीय.पायात पकडलेला  जिवंत सळसळणारा नाग.पक्षीराजाची ती भेदक नजर.त्या तीक्ष्ण  नजरेत भय नव्हते. होता तो बेदरकार भाव. आम्ही तर त्या देखण्या रूबाबदार सम्राटाच्या खिजगणतीतही नव्हतो. अशी ही नजर विसरणे तरी शक्य आहे?  औरंगाबादचे अजंठ्याच्या गुहेतील बुध्द मूर्ती त्या शीतल दयार्द्र अर्धोन्मिलित नजरेनने सतत तुमचा पाठलाग करत असते. सगळ्यात गंमत झाली इटलीच्या प्रवासात. तिथला समर पॅलेस  बघताना भिंतींवरचा सरदार आपल्या ऐयाशी नजरेने आमच्याकडे बघत होता.चक्क न्याहाळत  होता तो. आम्ही उभे होतो त्याच्या उजवीकडे.  हात मेल्या! थोड सरकून समोर आलो तर नजर तशीच आमच्यावर रोखलेली  पण आता त्यात होती विलक्षण जरब.जणू आगीचे लोळच!अजून कडेला जाऊन डावीकडून त्याच्याकडे पाहिले तर महाशय आमच्याकडेच  बघत आहेत पण नजर ,महाकनवाळू,प्रेमळ  जणू माझे आजोबाच.  ज्यानी ते चित्र काढले त्या अनामिक कलाकाराला  शतशः वंदन.या उलट जिवंत जनावरांना जेव्हा प्राणी संग्रहालयात ठेवतात तेंव्हा कंटाळलेले, परिस्थितीला विटलेले त्यांचे डोळे बघताना आपल्याच पोटात कालवते.
             असे हे आपले डोळे.जगाची ओळख करुन देणा-या, हे सुंदर जग दाखविणा-या दोन खिडक्याच. पण गंमत अशी की डोळ्यांच्या खिडकीत उभे असते आपले मन. त्यामुळेच समोरच्या व्यक्तीला डोळ्याचे सौदर्य दिसतेच पण जास्त भावते डोळ्यातून दिसणारे मन. घडाघड वाचता येते ते. समस्त स्त्रीवर्ग यात एकदम तरबेज. मग ती थकली भागली आज्जी असो वा आई, पत्नी! कधी कधी वाटतं  या दोन डोळ्यांतील भावनांचे तांडव लपवायला एवढा आटापिटा  करावा लागतो मग त्या सहस्र नेत्र देवांचा राजा इंद्राचे  काय?? महाशय आधीच रसरंगिले, महालंपट ! त्यात हजार डोळे. इंद्राणी समोर जायचीही चोरीच की! मात्र एक खरे, जितके जास्त निर्ढावलेले मन  तितके हे मन लपून बसते .वाचायला अवघड होते..
           . दृष्टीहिन व्यक्तीचे स्पर्शज्ञानच त्यांचे डोळे बनतात.अंधशाळेत काम करताना सतत जाणवायचे स्पर्श,वास,आवाज  सारेसारे होतात  हे डोळे.
        असंख्य प्राणी ,असंख्य डोळे, पण डोळ्यांची भाषा जवळजवळ सारखीच.मग तो उत्तर ध्रुवावरचे एस्किमो असो वा आफ्रिकेतील पिग्मी असो .त्यांची मातृभाषा वेगळी असते पण त्याची डोळ्याची भाषा एकच!प्रेमाची , लालसेची,रागाची कारूण्याची.कधी डोळे वटारून , कधी मिचकवून, कधी बारीक करून  हा संवाद सुरूच असतो. फक्त माणसांची नाही तर सर्व  प्राणीमात्रांचीही डोळ्यांची भाषा.आणि खरंच या डोळ्याच्या भाषेला समजून योग्य वेळी सबुरीने  वागलो  तर   वाद आटोक्यात  येतील.  नाही कां?

https://drkiranshrikant.pasaara.com





       

शुक्रवार, १७ जुलै, २०२०

चांदोबा©️

काही काही गोष्टी आपण  गृहीत  धरतो. यात कधी बदलच होणार नाही याची जणू खात्रीच असते आपल्याला. पण  अव्याहत फिरणारे निसर्गचक्र आपल्याला हळूच  सांगत असतं बाबा रे हा क्षण महत्वाचा.पुढच्या क्षणात काय होईल कुणास ठाऊक. एवढच कशाला आपला रोजचा चंद्रही  त्याच्या  बदलत्या कलांमधून आपल्यासमोर  जीवनाचे हेच तत्वज्ञान मांडत असतो. लहानपणापासूनच या मंतरलेल्या चंद्र चांदण्याच्या जगाला आपण पहात पहात मोठे होत असतो, शिकत असतो पण अखेर अतिपरिचयात अवज्ञा. आज पसारा आवरताना या आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग असलेल्या चंद्राबद्दल, चांदोबा बद्दल आठवणी आवरून ठेवाव्यात असे वाटले. अर्थात यातील काही आठवणी आहेत मोबाईल फोनपूर्व काळातील.


                            चांदोबा©️


        एखाद्या कॅलिडोस्कोप मधून सतत बदलते आकृतीबंध दिसावेत तसेच या चांदोबाचे आहे. लहानपणी काऊ, चिऊ, हम्मा यांच्याबरोबरच  लहानग्यांना भेटतो  चांदोबा ! भेटतो तोच मुळी सवंगड्या पेक्षाही  जवळच्या रूपात! तो असतो  सर्व बच्चे कंपनीचा मामा. अर्थात हा मामा   खरोखरच प्रेमळ आणि लपाछपी खेळणारा. हा चांदोबा ,खऱ्या मामांना हेवा वाटेल इतका  लाडका. मला आठवतंय माझा थोरला खूप लहान असतानाच पोहायला शिकला. त्याला पोहणे आवडायला चंद्राचा फार मोठा सहभाग होता. संध्याकाळी  तो पोहताना चंद्राचे त्यांच्याबरोबर  पोहणारे प्रतिबिंब हा त्यातला एक आनंदाचा आणि स्फूर्तीदायक भाग असायचा.कारण प्रत्यक्ष  चांदोमामा त्याला पाण्यात सोबत करत असे, त्यामुळे स्वारी खुष. 
        त्यावेळी बालगीतातही  दमल्या भागल्या चांदोबाला लपाछपी खेळताना आपसूकच लिंबोणीचे करवंदी झाड दिले जायचे. त्या झाडाच्या त्या करवती कात्रीदार पानामागे त्या गोलमटोल चांदोबाला लपणे  शक्य तरी आहे का? मग या गमतीच्या खेळात चांदोबा व्हायचा आऊट !आणि बाळही  खुष! बाळ सकाळच्या जेवणाला काऊ ,चिऊ ,आत्या, मावशी यांच्या नावाचे खास घास घ्यायचा ,पण रात्री मात्र एकमेव चांदोबामामा त्याला पुरेसा व्हायचा. मग कोणाचीच आठवण यायची नाही त्याला. बाळ छानपैकी जेवायचा . आज मात्र ब-याचदा हातात मोबाईल फोन घेऊनच बाळाचे जेवण संपते.
                    आपल्या   पौगंडावस्थेने दमदार पावलांनी जेव्हा आपला ताबा घेतला असतो तेव्हा मात्र हा आकाशस्थ चांदोबा आणि आपले नाते  बदलते. आता तो मामाबिमा कोणीच नसतो . त्याला मामा म्हणणेही हास्यास्पद  वाटते. तारूण्याच्या उंबरठ्यावर हा बालपणातील सखा, आपला चांदोबा थोडासा दुरावलाच असतो म्हणा आपल्याला.आता आपल्या दृष्टीने तो असतो एक साधा उपग्रह तेही आपल्या पृथ्वीचाच. आता तो भेटतो शास्त्राच्या पुस्तकातून.कधी त्याला ग्रहणबिहण लागलेच तर लक्ष जाते त्याच्याकडे, नाही असे नाही. पण तेवढ्यापुरतेच . आकाशातील चंद्रापेक्षा आजूबाजूच्या चंद्रमुखीच अधिक  आवडू लागतात.       
            नंतर तारुण्यकाळात  आपसूक मनात विचार असतो आपला जोडीदार कसा हवा? 'सुंदर.' अर्थात ह्या सुंदरतेचे मापदंड  प्रत्येकाचे  वेगवेगळे.पण एक निश्चित की ती चंद्रासारखी असावी. चांदोबा मदतीला एका पायावर तय्यार, अगदी कुठलाही राग मनात न ठेवता. मुलगा, मामा ,भाऊ या भूमिकेत लिलया वावरणारा चंद्र अचानक कौटुंबिक भूमिका सोडून रसिला रंगीला होतो. आता तो चंदेरी सोनेरी किरणातून असे काही  सटासट मदनबाण  मारतो की बस. आपल्या तारूण्यात आता हा चांदोबा असतो आपला मार्गदर्शक.     मग एकदाचा   हवा तो जोडीदार मिळाल्यावर मात्र चांदोबापेक्षा 'ती' जास्तच सुंदर वाटते.ती पण तितकीच कृतघ्न! चक्क त्याला चांदोबाचा फुल तोडून आणायला सांगते. बिच्चारा चांदोबा ! तो ही मग प्रेमिकांच्या संकेतस्थळी चावटपणे कधीही मुक्तपणे घुसतो.
          आज एकविसाव्या शतकातही मुखचंद्र म्हणावे का चंद्रमुख या संभ्रमात प्रेमीजन पुरेपूर गोंधळले असतात. कदाचित  चंद्राची आणि प्रेयसीची तुलना अपरिहार्य  असावी.
        वृद्धापकाळात  किंवा कधीकधी तरूणसुध्दा चांदोबाला शब्दशः चक्क डोईवर घेतात. नतद्रष्ट त्याला टक्कल म्हणून हिणवतात हे वेगळेच!
               या आकाशस्थ  भावावर स्त्रीवर्गाचे मनापासून  प्रेम!.भाऊबीजेचा हक्काचा भाऊ.  संकष्टीच्या दिवशी तर चंद्र साहेबांना भलताच भाव येतो. चंद्रोदय कधी आहे हा  धोशा   सगळ्यांच्याच. संकष्टी काय किंवा मुबारक ईदीच्या दिवशी  हे महान चांदोबा एकदमच डिमान्ड मधे.त्याच्या दर्शनाशिवाय तोंडात पाण्याचा घोट जाईल तर शपथ. करवाचौथ म्हणजे चंद्राचा पोळाच! चाळणीतून शतचंद्राचे  दर्शन घेतले की उपवासाची सांगता. पियाचा,मियाचा नंबर त्या दिवशी दुसरा. पहिला अर्थात चांदोबाचा.
           अमावस्येच्या रात्री अनेक तारकांची झुंबरे उजळणारे आकाश असो वा पौर्णिमेचे एकच टवटवीत फुल आणि आजूबाजूला फिकुटलेले चांदणे असो, दिलासा द्यावा तो चंद्राने. अवसेची 'काळी कासाविशी ' संपून बीजेची महादेखणी चंद्रकोर येते अगदी  नजाकतीने ! वाटत जणू  अमावस्या कधी नव्हतीच. मग प्रत्येक रात्री चंद्राचे  वेगळेच रूपडे.  तो चांदोबा कधी नखरेल टेचात येणारी चवथीची कोर तर कधी प्रौढत्वाकडे झुकलेली स्थूलकायेची अष्टमीची , कधी चक्क  लिमलेटच्या गोळीचा आकार होऊन याची भ्रमंती सुरूच.
           पौर्णिमा येते. चंद्राच्या सर्व रूपातील सर्वात सुंदर रुपडे. आपल्याकडे प्रत्येक पौर्णिमा  सुंदर, पवित्र आणि  धार्मिक दृष्ट्या महत्त्वाची असते. गंमत म्हणजे प्रत्येक पौर्णिमेच्या चंद्राची नजाकत आगळीवेगळी! हनुमान जयंतीला पौर्णिमेचा वाटोळा पण फिकुटलेला चंद्र कायम भेदरलेला दिसतो जणू बाल हनुमान  सूर्याला सोडून त्यालाच आता ग्रासणार आहे. वटपौर्णिमेचा सात्विक ,बुद्ध पौर्णिमेचा अध्यात्मिक , होळी पौर्णिमेचा लखलखित आणि ह्यावर बाजी मारतो कोजागिरीचा चंद्र. सारी कायनात एक तरफ और  जोरूका भाई दुसरी तरफ याच तालावर म्हणता येईल ,अकरा पौर्णिमा एकीकडे आणि शरद पौर्णिमा दुसरीकडे. इतकी सुंदर असते नं ती. आकाशातील चुकार ढगांशी आट्यापाट्या खेळत चांदोबा मार्गक्रमण करीत असतो. . पौर्णिमेचा उजेडही असा की पहिलीचे मोठ्या,ठळक, अक्षरांचे पुस्तक त्या उजेडात  सहज वाचावे.
            याउलट जपान, युरोप आणि अमेरिकेत भुते मात्र हमखास पौर्णिमेच्या रात्रीच बाहेर येतात. कल्पना करा तिकडे सर्वत्र पसरलेले पांढुरके राखाडी बर्फ. पर्णहीन झाडांचे सांगाडे त्यांचे ते विलक्षण आकार. हाडांचा खुळखुळा करत हृदयापर्यंत पोहोचणारी नकोनकोशी वाटणारी थंडी. अशावेळी मनातील भयगंडाने  पिशाच्च रूप घेतले नाही तरच नवल! एखादी हलणारी सावली किंवा करकरता  आवाजही अंगाला कापरे भरवतो .चांदोबानेही आपले सोज्वळ रूप सोडले असते.  पांढरा फटक आणि गुढ!. परदेशातील पौर्णिमा ही  भूतखेत आणि त्यांच्या मित्रमंडळींची  खास लाडकी. मग धिंगाणा घालायला ते मोकळे.
               जगभरातल्या भूतांखेतांनी  त्यांच्या त्यांच्या सोईने आपापल्या दिवसांची वाटणी करून घेतलेली दिसते. भारतात समस्त जनतेला घाबरवायला अमावस्येला त्यांना अधिक सोपे,आनंददायी वाटत  असावे.  भारत  देशात आणि त्याच्या उपखंडात अमावस्या ही भुताखेतांना बहाल केली आहे .  भूतांखेतांच्या  गोष्टींची सुरवातच होते मुळी " अवसेची रात्र होती." त्यामुळे  आपली भुतंखेतं ,वेताळ ,मुंजे  मौजमजा करतात,चेव येऊन खेळतात, माणसांना भीतीबीती दाखवत हिंडतात ते मुख्यत्वे अमावस्येला. चांदोबाच्या सुट्टीच्या दिवशी.   
       कधीकधी आपल्या चांदोबाला तत्वज्ञ व्हायची लहर येते आणि मग कृष्ण पक्षात होणारा क्षय आणि शुक्ल पक्षात वाढणाऱ्या कला एवढ्या भांडवलावरच तो अधिकारवाणीने बोलू लागतो आणि त्याच अधिकाराने समुद्राला तो कसा नाचवतो हे देखिल सांगु शकतो.
                     कधी कधी वाटतं कशाला चंद्राचे वर्णन करायचं? उपग्रहा सारखा उपग्रह. पृथ्वी पेक्षा थोडा वेगळा. माणसाने त्याच्यावरही आपले भक्कम पाय रोवले आहेत.खरं आहे सगळ. पण म्हणून चंद्राचा देखणेपणा थोडा तरी कमी होतो कां ? मुळीच नाही.आणि माणसाने  जसे बुध्दीच्या बळावर चंद्रावर पाऊल टाकले आहे तसेच सौंदर्यपान करण्याची रसिकताही त्याजवळ आहेच नं?. त्यामुळे चांदोबाचे हे कौतूक असेच   रहाणार.
         एखादा छानसा जलाशय असावा. नुकतीच तिन्हीसांजेने हळूवार माघार घेतली असावी. पक्षीही स्वगृही शांतपणे बसलेले. पुसटसा घंटानाद. शाल लपेटण्याएवढाच हवाहवासा गारवा. आकाशात एखादी चुकार चांदणी बावरून आपल्या सख्यांची वाट पहात"अग बाई लवकरच आले की मी " असे पुटपुटत असावी आणि या सुरेख नेपथ्यावर चांदोबाचा दिमाखदार प्रवेश.जलाशया पलीकडे  क्षितीजावर भला मोठ्ठा, गोलमगोल, लालट पिवळा, तांब्या पितळीच्या अगडबंब पराती सारखा चांदोबा आपल्याकडेच बघत असतो.  तो गोलमटोल चांदोबा हळूहळू  आपला केसरीया उतरवून सात्विक श्वेतवस्त्रांकीत होतो. आणि आकाशात वरवर चढताना, परातीएवढा चांदोबा आता  रुपेरी ताटली एवढा चिमुकला होतो.  पण दिमाख तोच.  चालही तशीच डौलदार .धरती आणि आकाशात रंगणारे हे नाटय जीवाच्या जीवलगाबरोबर भान विसरून पहावे आणि आपल्याच भाग्याचा हेवा करावा.
             https://drkiranshrikant.pasaara.com 

गुरुवार, ९ जुलै, २०२०

सुखी माणसांचा देश, भटकभवानी भाग 2©️

आपणही कधी कधी सुखी माणसाचा सदरा घालतो.मग सगळ्या गोष्टी कशा अगदी मनासारख्या होतात. प्रसन्न आणि तृप्त वाटत असते. आयुष्याच्या जीग साॅच्या कोड्यातले सगळे तुकडे योग्य जागी बसतात. आता आपण असतो एकदम' सातवे आसमानमें.' परत उतरूच नये इथून  असे वाटत असतानाच  धाडकन जमिनीवर  आदळतो.मात्र काही नशीबवान हा 'सुखी माणसाचा डगला 'कायमचा अंगात घालून बसतात.आणि अशी माणसं भेटली की असूया वाटतच नाही.  वाटते निखळ कौतुक, आनंद, समाधान.
आणि अशा सुखी माणसांचा  समुह ,देश बघण्याचा,अनुभवण्याची संधी मिळाली तर समजावे सध्या आपली ग्रहदशा उच्चकोटीची आहे.


                     सुखी माणसांचा देश©️
                          भटकभवानी  भाग 2

              "वेल कम टू भुतान सर .मॅडम हम भूतीनी लोग इंडियन लोगोंका बहोतही रिस्पेक्ट करते है!" आमचा गाईड तोंडातले चिंइगम आणि त्यातून निघालेला मुखरस तोंडातून बाहेर पडू नये म्हणून  दात ओठ आवळून बोलत होता. मला फक्त ऐकू आला   'भूतीनी' हा शब्द. खरंच सांगते विमानतळावर उतरल्या उतरल्या  एकदम भूतनी, डाकिनी, हडळी, चेटकिणी इत्यादी इकारांत भयावह मंडळी डोळ्यासमोर आली . प्रश्नार्थक मुद्रेने मी त्याच्याकडे बघतच राहिले. खर तर या सर्वच भयानक  मंडळींनी आखल्यासारखाच विमानाच्या लॅडींगचा मार्ग होता.अती दुर्गम. 
       म्हणजे त्याचं असं झालं होतं दिल्लीच्या प्रदूषणांतून निघून भुतानच्या पारो  विमानतळावर आम्ही उतरलो होतो. चारीही बाजूला गच्चीम डोंगर आणि मध्ये पारोचा  लिल्लीपुटीयन  विमानतळ. उतरताना एकच शंका ,पायलटला विमान सुखरूप  उतरवणे  जमेल नं? विमानतळावर उभे राहून घटोत्कचाने  आळस देता देता आपले दोन हात पसरले तर दोन्ही बाजूच्या डोंगरावरील एक दोन झाडे तो सहज उपटेल इतके त्या विमानतळाच्या अगदी जवळ डोंगर.अगदी चारी बाजूंनी वेढून  त्यांच्या  मधे बेचकीत  तो इटूकला,मिटूकला  विमानतळ. विमान उतरताना तळ्यात की मळ्यात सारखेच डोंगर का जमिन एवढेच मनात येत होते.  पण तो विमानतळ इतका नीटस, इतका  देखणा की जणू सौदर्य सम्राटच.  मनातले भय गायब! आता नजर हलत नव्हती. पिवळ्या भिंती, तपकिरी उतरते छप्पर, अप्रतिम सुंदर सजावटीच्या एकसारख्या खिडक्या, मधनच ड्रॅगनची,फुलांची रंगीत चित्रे.खांबावर कोरीवकाम यांची रेलचेल .त्यामुळे आमचा गाईड काय बोलतोय ते नीट कळतच नव्हतं .फक्त  मन  गोंथळलेल अन् डोळे सौंदर्यपान करत होते.
              आमच्या वेडावले पणाला बघून आमच्या गाईडच्या डोळ्यात  मिश्किल भाव उमटले." अभी बहुत देखना है" असं म्हणून त्याने आमचा ताबा घेतला. हॉटेलच्या दिशेने आमची गाडी निघाली. बाहेर निळा निळा रंगोत्सव चालू होता. आकाशाने आज स्वच्छ नीलमण्याचा  रंग निवडला होता.   विविध निळ्या छटांच्या  शाईच्या दौती आजूबाजूच्या डोंगरावर जणू उपड्या केल्या होत्या, त्यामुळे डोंगरावर त्यांचे काही ओघळ गडद तर काही फिकुटलेले दिसत होते. खाली दरीमधे धुके देखिल निळसरच.  त्याचा पोत, छटा आगळ्या वेगळ्या. पलीकडे निसर्ग सुंदरीने आपला तलम निळा हिरवा पदर स्वैरपणे पसरला होता. लहरी लहरी जाणारी  हिरवट निळ्या रंगाची स्वच्छंद वाहणारी नदी. कॉलेजमध्ये  मोरचूद म्हणजेच कॉपर सल्फेट शिकता शिकता त्या निळ्याने  मोहवले होतं. आज तोच रंग मनावर चेटूक करत होता. 
                नास्तिकालाही  आस्तिक करणारी ही निळाई! हिमालयाचे देवभूमी हे नाव सार्थ झाले होते.आपले समस्त निळे सावळे देव  जणू या देवभूमीत एकवटले होते. बहुधा त्यांच्या दिव्यकांतीचे प्रतिबिंब म्हणजेच इथला निसर्ग. त्या समोरच्या टेकडीमागे लपला होता  निळासावळा इवलासा  बालश्रीराम, टेकड्या पर्वतरांगांमधून   रांगत होता तो!. तर तेथे ते बर्फाच्छादीत शिखर नव्हतेच. तो होता घननिळ कान्हा !  लोण्याचा गोळा तोंडाला फासून यशोदामातेला चकवून दोन डोंगराच्या मागे लपला होता बाल कन्हय्या.दैदिप्यमान  निलकांतीचा. या दोन बालकांच्या लिला  'निळकंठ 'शंकर गौर पार्वतीला कवेत घेऊन कौतुकाने बघत होते एका उंच शिखरावरून! शेषशाही विष्णूही आपलं समुद्रातील आसन सोडून या  निळाईला अधिकच गहिरे करत होते. या साऱ्यांना आपल्या मायेच्या नजरेने बघत होता लेकुरवाळा ,संतवेडा सावळा विठोबा! जणू तिथेच उभा होता, दगडात, झाडात, डोंगरात.निळ्यात काळा मिसळला होता.परत वेगळीच निळी छटा. या निळ्याचे गारूड मनाला वेडेपिसे करत होते. त्या क्षणी वाटलं या देवतांवर त्यांच्या निळ्या सावळ्या रंगावर प्रेम करणारी बालकृष्णाची यशोदा, गोडुल्या श्रीरामाची माताकौसल्या, निळकंठाची पार्वती, विष्णूची लक्ष्मी किंवा विठोबाची रखुमाई सारेच विरून जाताहेत,एकरूप होताहेत या निळाईत .   भन्नाट अनुभव! ह्या निळ्यात विरघळून जावेसे वाटू लागले . या निळ्या सावळ्याच्या गारूडातून बाहेर पडायला खरंतर एक दिवस लागला. झिंगाट म्हणजे काय हे डोळ्यात आणि डोक्यात भिरभिरणाऱ्या निळ्या रंगातून जाणवत होतं.
        निळ्याची नशा आता कमी झाली होती आता आजूबाजूच्या  माणसांकडे ही लक्ष जायला लागले. किरा आणि घो हा राष्ट्रीय ड्रेस घातलेल्या मुली आणि मुलं नजरेत भरू लागली. सगळ्या मुली एकजात शिडशिडीत , मध्यम उंचीच्या आणि आणि टूथपेस्ट ची जाहिरात करत असल्या  सारख्या सतत हसऱ्या !हॉटेलमध्ये जेव्हा आम्ही पोहोचलो तिथल्या स्त्रीवर्गाने लगेच आमच्या बॅग्जचा ताबा घेतला. भल्यामोठ्या दोन बॅग्ज. त्यामुळे स्त्रीदाक्षिण्य दाखवत माझ्या मुलाने आणि नवऱ्याने त्यांना बॅग्ज उचलण्यास ठाम विरोध केला. पण त्या मुली त्यांच्याहून जास्त हट्टी ! हे आमचे काम आहे आम्ही करणारच असं म्हणून दोन मजले चढून पटपट पटपट त्या बॅग्ज त्यांनी आमच्या  खोलीत नेल्या सुद्धा.! आणि परत बक्षिसाची अपेक्षा अजिबात नाही. तेथे रेंगाळणेही नाही. कसल्या काटक आणि कष्टाळू मुली होत्या त्या. सगळ्या मुली होत्या स्वच्छ नजरेच्या आणि मोकळ्याढाकळ्या.
                  भूतानमध्ये बुद्धाला  पूजले जाते. अनेक बौध्द संतांचेही तेथे मोठे मठ आहेत त्यांचीही पूजा होते. आपल्यासारखेच ,अनेक प्रतिकांची पुजा. संतती प्राप्तीसाठी  प्रतिकात्मक म्हणून पुरुष लिंगाच्या मूर्तीची पूजाही एका मठात होते. बाहेर अनेक दुकानातून त्याच्या प्रतीकात्मक छोट्या मूर्ती  ठेवल्या होत्या.  हे सारे विकणाऱ्या होत्या तरूण भूतानी  मुली. या मुली न बिचकता  हे काम करत होत्या.अगदी सहजतेने.  भूतानमधला हा लख्ख मोकळा विचारप्रवाह खूपच सकस वाटला. 
     भूतानी लोकांशी बोलताना, त्यांच्याबरोबर फिरताना लक्षात आले या लोकांची दोन मर्मस्थाने आहेत. पहिलं म्हणजे देश. देशावर अत्यंतीक प्रेम. तिथल्या पौराणिक, धार्मिक, चमत्कारांनी परिपूर्ण अशा कथांवर ज्याला अंधश्रद्धा म्हणून आपण हसू अशा कथांवरही  विलक्षण विश्वास. काही बुद्ध भिक्क्षू  योगसामर्थ्याने  उडू शकतात  याचीही  त्यांना जाम खात्री अगदी या काळातसुध्दा. तुम्ही विरोध केलात तर अशा नजरेने पाहतील की बस . दुसरा  अत्यंत  हळवा कोपरा  म्हणजे  त्यांचे राजा,  राणी  आणि आणि  छोटासा राजकुमार. .कुठेही जा हे देखणे जोडपं आणि बालक राजकुमार फोटोमध्ये आपल्या सोबत असतातच. आणि त्यांच्या मंद स्मिताने आपल्याला दिलासा देत असतात .
       भिक्षूंचे मठ त्याला झाँग असे म्हणतात .तेथे अन्नकोट चालू होता. असंख्य प्रकारची फळे नैवेद्य म्हणून तिथे एकावर एक रचली होती त्याची  मोठीच्या मोठी लादी तयार केली होती म्हणाना! पण त्यावर बाजी मारली होती आपल्या पार्ले जी बिस्कीटांनी! तिथे विराजमान होऊन! पार्ले जीची चवडच्या चवड   होती .ब-याचदा  नैवेद्य दाखवताना तो असाच हवा  आणि तसाच हवा याचे नियम आपण देवांवर आणि आपल्यावर लादतो तसे भूतानला  नाही.  त्यामुळेच कॅडबरी चाॅकलेटचीही  वर्णी लागली होती नैवेद्य  म्हणून. देव खुष. कारण त्याच त्याच नैवेद्याची त्याच्यावर सक्ती नाही उलट हवे ते नवनवे  पदार्थ  हजर!आणि भक्तही  खुष.  आपल्या आवडीचा पदार्थ देवाला अर्पण केला म्हणून.
 भूतानी  मंडळी स्वच्छताप्रिय आणि शिस्तप्रिय.कचरा करणे, वहाने बेफाट चालवणे, छे!चुकूनही नाही. त्यामुळे निसर्गाने वारेमाप दिलेले सौंदर्य अधिकच देखणे होते.आठवड्यातील पाच दिवस  आपल्या राष्ट्रीय  पोशाखात वावरणा-या मुली आणि मुले शनिवार रविवारी वेगवेगळ्या विविध पोशाखात फुलपाखरांशी स्पर्धा  करतात. अनेक दुर्गम भाग असल्याने कष्टाला पर्यायच नाही. पण खर कौतुक आहे आनंदाने, हसत हसत त्यातून मार्ग  काढणे. या जीवनाविषयीच्या तत्वज्ञानाची जणू रोजची उजळणी चालू असते.
             आता भुतानला आलोय तर तिथले पदार्थ खाना तो मंगता है बाॅस. पण आम्ही भारतीय म्हणून  बिचारे हाॅटेलवाले आवर्जून भारतीय पदार्थ करत होते.अखेर त्यांना सांगितलं की बाबा रे आम्हाला तुमच्या देशातले पदार्थ खायचे आहेत आणि मग त्यांचा आनंद काय वर्णावा. सेव्हन कोर्सचे जेवण तय्यार. सामिष ते निरामिष !आणि ते फक्त आमच्यासाठी खास ! आणि मोबदल्याचे पैसेही नाकारले. कारण आम्ही त्यांच्या देशाचे खास जेवण आवडीने जेवत होतो. आता आमच्या चवीला ते जेवण आवडलं म्हणा . लाल मिरच्या भरपूर त्यात थोडीशी भाजी आणि भरपूर चिज तेही याकचे . थोडं उग्र असले तरी हे सारे मिश्रण  आणि हिमालयीन लाल  तांदळाचा भात  असा झकास बेत असायचा. लाल मिरच्या म्हणजे फार तिखट नाहीत पण बचकभर लाल मिरच्या  बघून घाम फुटला होता हे मात्र खर!   पण गंमत म्हणजे आम्ही ज्या सीझनमध्ये गेलो होतो तेव्हा   अत्र तत्र सर्वत्र त्या लाल मिरच्या दिसायच्याच दिसायच्या. कुठल्याही घराच्या सुंदर खिडकीकडे पहावं तर त्याचे पडदे या लाल मिरच्यांचे.  खिडकीच्या वरचा बंधाऱ्यावरही लाल मिरच्या पसरल्यातच. उतरते सुंदर छप्परही परत मिरच्यांचा गालिचा  मिरवतेच आहे. म्हणजे देव जसा सर्व दिशांना भरून दशांगुळे वर उरतो तशाच ह्या मिरच्या सर्वत्र दिसत होत्या .पण पिवळ्या घराच्या चॉकलेटी खिडक्यांच्या रंगसंगतीत या लालभडक  मिरच्या देखील भर घालत होत्या हे मात्र खरे.
           मला वाटतं त्या निळ्या हिरव्या.,लाल लाल पिवळ्या रंगछटा मधे  राहणाऱ्या या माणसांचे मनही असेच रंगीबेरंगी ! या विविध  छटांनी अधिकच मधुर केलेल त्यांचे व्यक्तिमत्व. 
त्यामुळे गुन्हेगारी ही अतिशय कमी. धर्मभोळे पापभीरू, देशावर आणि राजावर आत्यंतिक प्रेम करणारे,अती कष्टाळू या माणसांना जणू जन्मजात सुखी माणसाचा सदरा घालूनच देवानी  पाठवलं आहे. आणि हा सदरा ना कधी विटत ना मळत आणि फाटायचे नावच नाही. जन्माला आल्या आल्याच अंगात घातलेला हा सुखी माणसांचा सदरा मृत्यूनंतरही तसाच. पुढची पिढी ज्या पध्दतीने,प्रेमाने उंच पर्वतांवर आपल्या मृत पुर्वजांच्या  नावाने आठवणींच्या  पताका फडकवतात आणि अती आदराने पुर्वजांच्या  आठवणीत रममाण होतात तर मग मृत देखिल मृत्यूनंतर कशाला काढतील हा सुखी माणसाचा सदरा?उलट सरणा-या प्रत्येक दिवसांबरोबर तो सदरा अधिक अधिक चमकदार आणि सतेज दिसतो.  
              परत निघालो तेव्हा आम्हाला  सोडायला आलेला आमचा गाईडही गहिवरला होता. भारताबद्दल फार छान बोलत होता. तुमच्या मदतीमुळेच आमच्या इथं दिवे लागतात. नोकऱ्या मिळतात आणि त्यामुळे भारतीय लोक आम्हाला फार आवडतात पण आमचच मन जडशीळ झाले होते.
            मनापासून आवडलेला निळ्या निळ्या रंगात बुडालेला हा देश.  असाच सुखी माणसाचा सदरा घालून राहू दे .या सगळ्याला वरदान मिळू दे की हा सदरा कधीच फाटू नये, विरून जाऊ नये आणि त्याची चमकही कधीच कमी होऊ नये.
        

गुरुवार, २ जुलै, २०२०

पॅची©️

.
आमच्या घरातल्या गच्चीने अनेक कामांपैकी केलेले महत्त्वाचे काम म्हणजे प्रसुतीगृहाचे! खारी, बुलबुल, सनबर्ड ,कुठून कुठून आलेल्या मांजरी, आणि आमची कुत्री सुद्धा या सर्वांची प्रसुति या गच्चीतल्या प्रसुतीगृहात झालीये .अजूनही गच्चीतील वेलीत, झाडात जुनी घरटी आढळतात. गच्चीतील या न पाळलेल्या पक्षी प्राण्यां बरोबर अनेक पाळीव प्राणी घरात होते .मांजरी, कुत्री प्रामुख्याने. जवळ जवळ तीस वर्ष कोणी ना कोणी कुत्रा होताच! आमच्या आणि मुलांच्या आयुष्याच्या एका कालखंडात  या प्राण्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यांच्या आठवणी शिवाय 'पसारा' आवरणे अशक्य! यातील एक आठवण 'पॅचीची'.


                            पॅची©️

              खरंच सांगते, रस्त्याने तो निघाला की रस्ताही टिकटिक नजरेने डोळे मोठे मोठे करून त्याच्याकडे बघत असे.अगदी नजर न हलवता! झाडे वाकून वाकून त्याला न्याहाळायची. पाने लाजत कुजबुज करायची.  येणारे जाणारे पादचारी थांबून त्याला बघत रहायचे आणि  आम्हाला विचारायचे ' "तुमचा आहे ना?मग याचे पिल्लू झालं तर आम्हाला द्या. फोन नंबर आणि पत्ता देऊ का?" पण तो साखळी ओढत खोडसाळपणे आपल्याच  मस्तीत चालत असे. पांढराधोप  रंग, भरपूर  केसाळ,  विविध रंगाचे म्हणजे तपकीरी ते कबरा आणि पिवळ्या पासून  काळ्या अशा विविध रंगाचे अंगावर मोठे मोठे छप्पे,काळेकरंद नाक, पडलेले छोटेसे पांढ-या पिसांच्या गुच्छासारखे दिसणारे कान आणि काळोख काळे डोळे.डोळ्यात तोच जगाबद्दल महा तुच्छतेचा भाव. 

              मी उतणार, मी मातणार , मी घेतला वसा टाकणारच टाकणार! असा एक उर्मट भाव त्याच्या चेहऱ्यावर सतत! आणि सर्व जगावर मी उपकार करतो आहे असा श्वान जातीला न शोभणारा भावही त्याच्या चेहऱ्यावर मुक्कामी असे . आपल्याच मस्तीत  त्याचे डौलदार चालणे.
             त्याचे आमच्या घरी येणे हा एक योगायोगच! तो आला ते पिल्लू म्हणून नाही ,तर जवळजवळ एक वर्षाचा असताना. आला तेव्हा त्याच्या सगळ्या सवयी जवळ जवळ पक्कया झाल्या होत्या. त्यामुळे कुठल्याही  संस्कार वर्गात घालूनही तो अजिबात बदलणं शक्य नव्हतं.
           पाचगणीत जन्मलेल्या आणि त्यानंतर दुर्दैवाने एखाद्या खलचित्रपटालाही लाजवेल अशा हाल-अपेष्टातून, छळछावणीतून  तो पोहोचला सोलापूर मधील आमच्या मित्राकडे. तो मित्रही  आमच्या सारखाच श्वान प्रेमी! त्याच्या घरात आधीच दोन कुत्री असल्यामुळे त्याने आम्हाला विचारले. आमच्या घरीही 'चिंच' ही कुत्री आधीच होती.(गाभुळ्या चिंचेच्या  रंगाची म्हणून चिंच) पण मुलांच्या हट्टाखातर 'पॅची' आला तोच मुळी त्याचे पूर्वसंचित आणि मनावर पडलेले ओरखडे घेऊनच.
        दिवस पहिला 'चिंच' आणि 'पॅची'   एकमेकांसमोर उभे!सुरवातीला  गुर्ssssचे नमन त्यानंतर  भ भा भो भो ची बाराखडी!  अखेर दोघेही दमले. .दोघांनाही इथेच राहायचे आहे या  निष्कर्षापर्यंत पोहोचल्यावर दोघांनीही नाईलाजाने एकमेकांना स्वीकारले. त्यातील चिंच वयाने मोठी त्यामुळे थोडाही ताईगिरी ,रॅगिंग  करण्याचा मोका तिने मुळीच सोडला नाही. 'पॅचीही' विश्वनाथन् आनंद पेक्षा चलाख. तिची प्रत्येक खेळी ओळखून त्याची प्रतिखेळी तयार असे. जेव्हा त्यांचे भांडण, कुरघोडी ते एकमेकांना स्वीकारणे या पातळीपर्यंत आले तेव्हा आम्ही आनंदाने हुश्श केले.
      'पॅची' खरंतर अस्सल जातिवंत कुत्रा. पाचगणी सारख्या थंड हवेत राहणारा. तो सोलापूरच्या भट्टीत येऊन पडला, पण तितकाच चलाख. ए.सी. तून थंड हवा येते हा शोध त्याला लागताच तो ए.सी सुरू करण्यासाठी  जबरदस्ती करू लागला. खोलीत घुसून ए.सी.कडे तोंड करून बसायचा आणि  ए.सी. सुरू होईपर्यंत पिच्छा सोडायचा नाही. बादलीतले किंवा त्याला दिलेले पाणीही सर्वत्र उडवून सर्व ओलेचिंब करून त्यात तो धपकन बसत असे.
      त्याच्यात आम्ही रुळले होतो अगदी त्याच्या चक्रमपणा सहीत. आमच्याच घरचा सदस्य म्हणून त्याला मान्य केलं होतं. पण तो मात्र मनापासून कधीच जोडला गेला नाही. माणूस जातीचे काय कडवट अनुभव त्याने घेतले होते की त्याचा कधीही माणसांवर पटकन विश्वास बसायचाच नाही.कायम तिरस्कार!.  बऱ्याच रात्री पेशंटचा कॉल आल्यावर मी खालच्या मजल्यावर पेशन्ट बघायला जायची. जिन्यापर्यंत गुणी कुत्र्यासारखं इमाने इतबारे  मला सोबत करणारा 'पॅची' मी दवाखान्यातून परत घरच्या पाय-या चढायला लागताच आपला पक्ष बदलून शत्रुपक्षात जायचा. मला एकही पायरी चढू देत नसे .जणू जेकिल अॅन्ड हाईड!! पण नंतर लक्षात आले या बागुलबुवामागे एक घाबरट आणि असुरक्षितत बाळ दडले होते.तो कधीच  कुणालाही चावला नाही. पण भीती  दाखवणेही कधीच सोडले नाही.
            फिरायला जाताना फक्त माझा थोरलाअसला तरच तो जायचा. इतर कोणी न्यायचा प्रयत्न जरी केला तर मायावी राक्षसासारखे लगेच रूप बदलवून घाबरवायचा. त्याला जेवण चालायचे फक्त  माझ्या किंवा घरातील रतनबाईच्याच हातचे.नाहीतर हा बसणार उपाशी. चिंचेला पिल्लं  झाली तेव्हा हा त्यांची आई बनला. दूध प्यायला फक्त चिंचेजवळ जाणारी पिल्ले दिवसभर पॅचीच्याच अंगावर झोपत  असत. तोही अती कौतुकाने सर्व करी.
            माझ्या आई वडिलांवर मात्र मनापासून त्याचे प्रेम. वडिलांचाही तो फार लाडका. लाडाने टाडू म्हणायचे त्याला. नातवंडांच्या बरोबरीने वडील त्याच्यासाठीही खाऊ घेऊन येत. माझी आई जेव्हा वडिलांच्या मृत्यूनंतर आमच्याकडे राहायला लागली तेव्हा त्याने आईची काळजी घ्यायची जबाबदारी स्वीकारली. चोवीस  तास तिच्या खोलीत  बसू लागला. तिला बाहेर जाऊ देईना आणि आम्हाला आत!  जणू अलिखित 'डू नॉट डिस्टर्ब'चा बोर्ड लावला होता. या त्याच्या कायद्याला खरंतर आईपण कंटाळली होती.
            एका रात्री गच्चीतील पलंगावर गाद्या पसरून आम्ही बाहेर गेलो तर गच्चीत शांतपणे बसलेल्या 'पॅचीने' काय करावे? आम्ही परत आलो तो गच्ची हिम वर्षाव झाल्यासारखी!.चुकून  सोलापूरचे स्विझर्लंड झाले की काय? तोवर लक्षात आले , हा हिम नसून   कापूस आहे तोही आपल्याच गादीतील.  झाडावर कापूस, वेलींवर कापूस ,जमिनीवर कापूस आणि पॅची? नाकाला, डोळ्याला, तोंडाला  कापूसच कापूस. आता हसावं का रडावं?  आपण त्या गावचेच नाही असा शिष्ट चेहरा करून पॅची बसलेला.
           यथावकाश ही दोन्ही कुत्री वयाने मोठी होत होती. आम्हाला भरपूर प्रेम देऊन चिंच न परतीच्या प्रवासाला गेली. पॅची आता एकटाच उरला. त्याची आजारपणही वाढली होती. व्हेट डॉक्टरला वारंवार बोलवावे लागत होते. त्याला फिरवणारा माझा मोठा मुलगा  शिक्षणासाठी आता दूर गेला होता. पण फिरण्याच्या वेळेला  रोज सकाळी त्याच्या दारावर पॅची धडका मारायचा. इतर कोणाच्याही  बरोबर मात्र तो फिरायला जात नसे. त्याचे वयही आता पंधरा वर्ष म्हणजे माणसांच्या वयाप्रमाणे नव्वदीच्या पुढचं झालं होतं .चक्रम तसाच होता. पण या सगळ्यांचीच आम्हाला सवय झाली होती. दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू. कानही काम करत नव्हते.डौलदार चाल मंदावली होती. गुर्मी ताठा मात्र तस्साच.
            पॅचीच्या सोबतीसाठी  धाकट्या मुलाच्या आवडीप्रमाणे  कुत्र्याचे नवे पिल्लू घरी आणले. पण पॅचीने त्याच्याशी सुरूवातीपासूनच उभा दावा मांडला. डोळे गेलेले, बहिरा झालेला पॅची पण त्याने पूर्वी भोगलेल्या छळातून तो मनाने बाहेरच आला नाही.
      तो सतरा वर्षाचा झाला त्याची आणि अचानक एके दिवशी त्याच्या मागच्या पायांतील ताकद गेली.पॅराप्लेजीया.  डॉक्टर ने सल्ला दिला दया दाखवून त्याला मारण्याचा. पहिला धक्का बसला. पण लक्षात आलं अशा अवस्थेत न हलता त्याला ठेवणं म्हणजे त्याच्यावर  आपण अन्याय करतो आहोत. सेवा करून घ्यायच्याही पलीकडे तो गेला होता. भरल्या डोळ्यांनी त्याला अखेरचे त्याचे आवडते सुप दिले. पुढे काही बघणे शक्य नव्हते. मनातला धागा धागा उचकला होता. त्याचा रुबाब, त्याचे सौंदर्य, त्याची मग्रूरी,  त्याचा चक्रमपणा, त्याची स्वार्थी वृत्ती,पण कसा का असेना सतरा वर्ष आमच्या घरातीलच एक सदस्य होता. आईचा रक्षक होता. वडिलांचा लाडका टाडू होता.माझ्या पुतणीचा मित्र पॅचू.  माझ्या मुलांना प्राणीप्रेम करायला त्यांने शिकवलं होतं.प्राण्यांनाही उत्कट भावना असतात हे दाखविले होते. त्याच्या मनावर झालेल्या जखमा भरण्यात  कदाचित  आम्हीच तोकडे पडलो. पण तो आमचा होता. त्यामुळे तो सदैव आठवणीत राहील 'आमचा पॅची.'

https://drkiranshrikant.pasaara.com