शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२०

ये मोह मोहके धागे---------

 


 माझ्या घरी "प्राण्यांशी मैत्री"चा वारसा अगदी सहजपणे पुढच्या पिढीकडे गेला आहे. लहानपणी मी माझ्या आईच्या जिवावर घरात कुत्रा आणला . कुत्रा माझा. उस्तवार आईची. म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उधार!ही परंपरा माझ्या दोन्ही मुलांनी चालविली.शाळेत जाताना त्यांना एखादा जखमी पक्षी मिळाला की त्याची रवानगी थेट माझ्याकडे होई. कधी तो पक्षी सौ. कोकीळ असे तर कधी पोपट तर कधी घारबाई. मग सुरू आमच्या फे-या, पशू वैद्यकीय   दवाखान्यात!. दुर्दैवाने जर तो पक्षी मृत्यू पावला तर नंतर घर वाहून जाण्यासारखा अश्रूंचा पूर तय्यारच ! बर हे फक्त पक्षीप्रेमापर्यत सीमित  नव्हतं तर कुत्रा, मांजर अगदी गाय सुध्दा त्यांच्या भूतदयेत हिरिरीने  सामील  व्हायचे. हा मुलांचा प्राणीप्रेमाच्या आठवणींचा पसारा आवरणे या जन्मी तरी अ--श--क्य! जमेल तशी थोडीफार त्या पसा-याची उलथा पालथ करते.

              

          ये मोह मोहके  धागे-------


    "आई  मी मुंबई वरून येताना मांजरीचे पिल्लू आणणार आहे" धाकट्याने एका दमात  जाहीर केले. मला काहीही बोलण्याची संधी न देता त्याने फोन बंद केला. खरतर मी आणि माझ्या पतींने  पक्क ठरविले होते, नवीन जबाबदारी  नको. आणि आता घरात पाळीव प्राणीही नको. ते आपोआप होतात घरातले सदस्य  आणि त्यांचा मृत्यू मनाला असा चटका लावतो की बस!.आता त्या दुःखातून परत एकदा जायचीही दोघांची तयारी नव्हती. आता पर्यंत तीन कुत्री, दोन मांजरी घरात होती.पण सध्या कोणताच पाळीव प्राणी नव्हता.अर्थातच त्यातील दोन कुत्र्यांनी आणि दोन्ही मांजरींनी स्वतः होऊन स्वतःला पाळवून घेतले होते. असे  असले तरीही त्यांनी आम्हाला आनंद दिलाच पण त्यांच्या भावना, त्यांचे निस्वार्थ प्रेमही आम्ही अनुभवलं. मांजरी फार थोडा काळ होत्या पण मनाला अतिशय चुट्पुट लाऊन गेल्या.  त्यांचा  अंत बघणे अतिशय  दुःखदाई.पण आता मुलगाच मांजर घेऊन येतोय मग काय इलाजच नाही.त्यामुळे दोघेही  चरफडलो.  परत परत धाकट्याला फोन लावला. त्याने सांगितलेले कारण सयुक्तिक होते.

       ती मांजरीची पिल्ल  वाढत होती धाकट्याच्या हॉस्टेलवर. माझा धाकटा त्यांची देखभाल करीत होता. पण पिल्लं कुठेही घाण करायला लागल्यावर संघर्षाची पहिली ठिणगी उडाली. इतर मुलांनी विष घालण्याची धमकी देताच धाकट्याने पिल्लू घरी आणायचे पक्के केले. येताना वाटेतनच परत एक फोन,"आई पिल्लू एक नाही तर दोन आहेत." झाल! इथे एक मुद्दलच मला जड होते तिथे एकदम भरभक्कम , घसघशीत व्याजही नको असताना मला मिळत होते. शेवटी काय मुलाच्या बाबतीत "ये मोह मोहके धागे-"----.चिवट, मृदू आणि ओढून घेणारे". मी मनात पक्कं ठरवलं मुलगा परत हॉस्टेलवर गेला की ज्याला कुणाला पाळायला हवी असतील त्याला पिल्लं द्यायची.

         आखिर  वो लम्हा  आ गया. एक छानसा स्टीलचा पिंजरा आत मऊ चादर अन् दोन बारकुंडे वळवळणारे पांढरे ,काळे जीव. लक्षात राहिले ते त्यांचे गरगरीत वाटोळे हिरवे काळे डोळे,भेदरलेले.! खरच सांगते ह्रदयात बारीक कळ उठली. त्या अदृश्य कोळ्याने माझ्यात आणि त्या मार्जार कन्यकांत तेच ते "मोह मोहके धागे" विणायला कधीच सुरवात केली होती आणि मी  मात्र ते तोडायच्या प्रयत्नात ! मग दोन दिवस आपण त्या गावचेच नाही असा आव आणायचा यत्न केला खरा, पण नजर वारंवार त्या गोलमटोल डोळ्यांकडे जात होती. पांढरे शुभ्र, अंगावर कबरे नारंगी रंगाचे मोठे छप्पे.एकीचे नाक रसरशीत  गुलाबी तर दुसरीचे काळसर. त्यामुळे  नामकरण झालं होतं 'गुलाबो-सिताबो.' एका हातात सहज मावतील एवढाच आकार! दोन दिवस मुलाने त्यांची काळजी घेतली. मला सूचना दिल्या आणि तो गेला परत हॉस्टेलवर. आता माझी कसोटी सुरू.

         गंमत म्हणजे मुलाची पाठ वळल्या वळल्या त्या दोन्ही मार्जारपिल्लांनी मलाच आई म्हणून मान्यता दिली. मॅssव मॅsव करत माझ्या भोवती , अंगावर खेळू लागली. त्यांना दुसरीकडे पाळायला द्यायचा आमचा निश्चय एकदमच ज्वलंत ज्वालामुखीचा निद्रिस्त  ज्वालामुखी होतो तसा झाला. थोडक्यात परत तेच ते . त्या पिल्लांमधे नाही नाही म्हणत आम्ही गुंतलो होतो.

             आता गच्ची, घर , अंगण दोघींच्या धुडगुशीला लहान पडू लागली. गच्चीभर पळत सुटणे, एकमेकींशी लुटूपुटीची लढाई  करणे. पळत पळत अशोकाच्या झाडावर चढणे. भूक लागली की माझ्या भोवती भोवती घुटमळणे,  नुसत्या बाललीला बघताना वेळ कुठे पळत होता कोण जाणे.त्यांना दुसरीकडे द्यायचा विचारही आता मनात येईना .आता तर बाहेरून आल्यावर पहिला प्रश्न असे "गुलाबो-सिताबो कुठेत?" 

       दोघींच्या स्वभावातील फरक आता छानपैकी कळायला लागला होता. गुलाबो अती चलाख वर्चस्व गाजवणारी तर सिताबो शांत! फक्त गुलाबोला  फाॅलो करणारी! गुलाबो झाडावर वर पर्यंत चढली तरी सिताबो चार फुट कशीबशी चढलेली. सिताबोला इंजेक्शन देताना गुलाबोच जास्त कावरीबावरी व्हायची . सिताबो मला खाण्यापूरते मातृत्व देणारी तर गुलाबो हक्काने लाड पुरवून घेणारी. एक मात्र खर! त्या दोघींच्या मस्तीत, खेळात घराला एकदम जिवंतपणा आला होता. हा 'मोह' आम्हाला मनापासून आवडायला लागला.

       धाकटा परीक्षेच्या आधी अभ्यासाठी आला होता तेव्हा त्याच्या स्टडी टेबलाचा ताबा दोघींनी घेतला आणि त्या झाल्या त्याच्या स्टडी  पार्टनर्स . 

           एके दिवशी सिताबोच्या काय मनात आले कोण जाणे मी बसले होते.रात्रीची वेळ! सिताबो आपणहून जवळ आली. मांडीवर डोके ठेवले. माझा हात चाटू लागली.सारे शरीर पर्र करत थरारत होते. कृतज्ञता, प्रेम दाखवायची ही मांजरींची पध्दत. पण तिच्याकडून एवढा प्रेमवर्षाव अनपेक्षित! नंतर उठून ती गेली समोर अंगणात. अर्थात बाहेरच दार बंद असल्याने मी होते निर्धास्त. इतक्यात मांजराच्या ओरडण्याचा आवाज आला म्हणून बाहेर गेले तर रस्त्यावरच्या एका कुत्र्याने बांधावरून  यशस्वीपणे उडी मारली होती आणि त्याच्या तोंडात लोंबत होती सिताबो.हे दृश्य मेंदूवर अखेरपर्यंत  तसेच सुस्पष्ट कोरलेले रहाणार आहे. बाहेर चार पाच कुत्री शिकारीची वाट पहात होते. सिताबोचा मृत्यू एखाद्या निखा-यासारखा मनाला चरचरीत डाग देऊन गेला. परत परत "मोह मोहके धागे" आपले काम करत होते.मन या प्रेमाच्या, वात्सल्याच्या धाग्यातून मुक्त होत नव्हते.

       गुलाबोलाही तिच्या बहिणीच्या,मैत्रीणीच्या मृत्यूचा भयंकर धक्का बसला. एक मिनिटही ती आम्हाला सोडून रहायला तयार नव्हती. पूर्वपदावर यायला जवळजवळ  महिना जावा लागला. त्या काळात  ती सतत घाबरटपणे वागत होती.

     साधारण महिन्याभराने गुलाबोचे नाचकाम पूर्ववत सुरू झाले, परत तेच त झूsssम करत गच्चीभर पळणे. भूक लागल्यावर लाडीगोडी करणे. जवळ बसून हात चाटणे इत्यादी प्रेमसंकेत ती सतत देत असते.आत्ता पर्यंत इमानदारी ही कुत्र्यांची मिरासदारी होती आणि आता गुलाबो म्हणजे मांजराच्या वेषातील  कुत्र्याचा आत्मा वाटते. मला सांगा नाहीतर प्रत्येक ठिकाणी  माझ्याबरोबरच रहायचा अट्टाहास कसा कायअसतो तिचा?. माझे पेशंट संपेपर्यंत बाहेर दाराला चिकटून बसलेली असते ती !  आता ती असणं हेच आमच्यासाठी  आनंददायी  आहे.   ती मोठी झालीय .एका बोक्याबरोबर तिची मैत्रीही झाली आहे. पण अजून तरी घराची सीमा ओलांडून  कुठेच गेली नाही. पुढे काय याचा विचार आम्ही  सोडून दिलाय कारण आजच्या क्षणाला तिच्याकडून मिळणारा आनंदच खरा.

          असे हे मोहाचे, प्रेमाचे चिवट,अती मजबूत धागे एकदा हातात घेतले की फरफट होणारच पण म्हणून ते टाळायचे आणि 

सरळसोप्प आयुष्य  जगायचे यात काय मजा? .गुलाबो प्रत्येक  दिवसाचं, क्षणाच महत्व नकळत शिकवते आहे. आणि कोणाचे आयुष्य किती आहे अशी वेडगळ  गणितं न मांडता आम्हीही तिच्या सहवासाचा पुरेपुर आनंद घेतो आहोत.      

    

माझ्या इतर लेखांची लिंक 

https://drkiranshrikant.pasaara.com 

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

त्या दोघी©️

 


           


               मध्यंतरी टर्की देशात तेथिल एका कुटुंबा बरोबर राहण्याचा योग आला. पती पत्नी आणि त्यांची दोन मुले. एक मुलगा आणि एक मुलगी. चौकोनी आदर्श कुटुंब!. पती पत्नी साधारण तीशीचे! उंचेपुरे. देखणे.दोन्ही मुलेही अती लाघवी आणि हुशार .आता एवढे सगळे  छान छान अगदी तोंडाला मिठ्ठी  बसण्यासारखे गोड गोड तरी पण ------  हा 'पण' फार वाईट! ह्या कुटुंबातील मुख्य  स्त्रीला सासूबद्दल प्रचंड राग!   टर्कीशमधे सासू म्हणजे 'खाईनाना'. तर या 'खाईनाना' प्रकाराबद्दल अत्यंत कडवटपणे ती बोलत होती. बर स्वतः सासूजवळ रहात होती असेही नाही. उलट अडचणीला किंवा मुलांना संभाळायला सासूलाच बोलवत होती. पण नवरा आपल्या "ममाज बाॅय" असल्यासारखा वागतो या बद्दल  असूया! कमी जास्त प्रमाणात हीच भावना परदेशातही अनेक ठिकाणी  दिसली. कातडीचा रंग भलेही गोरा, काळा, तपकीरी, पिवळा असो सासूसुन या नात्याचा पीळ तस्साच!  अर्थात या नियमांना अपवाद असणारच! आज या अपवादाचा पसाराच आवरणार आहे.



                त्या दोघी©️



       साधारण पंधरा  वीस वर्षांपूर्वी  वृत्तपत्र उघडले की  'सुनेला राॅकेल ओतून जाळले. नणंद आणि सासूला अटक' अशी एक तरी बातमी असायची. आता सुदैवाने  या बातम्या कमी झाल्या आहेत आणि दुर्दैवाने सुनेने वृध्द सासूला घराबाहेर  काढले अशा बातम्या वाढल्या आहेत. चक्र आता एकशे ऐंशी अंश कोनातून फिरले आहे. असो. जेव्हा जेव्हा सासू सुनेच्या संघर्षाच्या बातम्या ऐकते तेव्हा तेव्हा नजरेसमोर उभ्या रहातात 'त्या दोघी'. दोघींचे स्वभाव पूर्णतः भिन्न! विचारसरणी वेगळी, पार्श्वभूमी वेगळी पण तरीही  दोघीजणींना एकमेकींबद्दल विलक्षण आत्मीयता!  यातील एक होती माझी आई आणि दुसरी वडिलांकडची माझी आजी म्हणजे दोघी नात्याने सासू सुना. होय तेच ते कायम बदनाम असलेलं नातं. फक्त आपल्या भारतातच नाही तर जगभर तिरस्कारलेल! मग तो भारत असो वा परदेश! अर्थात या नियमांना  सुदैवाने तसे अपवादही खूप आहेत पण तरीही  ते अपवादच!

          असाच एक अपवाद  माझ्या लहानपणापासून डोळ्यासमोर होता पण त्याचे महत्व कळण्याएवढी प्रगल्भता माझ्याकडे नव्हती पाचपोचही नव्हता.  आज मात्र त्या नात्याचा रेशमीपोत आणि त्यातील उब जाणवते आहे.

         माझ्या वडिलांची आई म्हणजे तिला आम्ही काकी म्हणत असू, आमच्याकडे रहायला आली ते आजोबांच्या मृत्यूनंतर!.काही काळ काकाजवळ रहायचे तर काही आमच्याजवळ असच ठरवून आली होती ती. त्याआधीही ती येत असे आणि ती परत जायची तेव्हा माझी अफाट रडारडी व्हायची.ती कधीच जाऊच नये असे वाटायचे. ती होतीच प्रचंड प्रेमळ!

           सावळी, छोटीशी,तोंडाचे मस्त बोळक, डोळ्यावर गोल चष्मा आणि त्या चष्माच्या जाड काचेमागे मोठ्ठे दिसणारे डोळे , हातात सतत जपाची माळ!  आणि ओठात खडीसाखरेसारखे विठ्ठलाचे नाव.आजोबा गेल्यावर गुलाबी, हिरवे असे रंग तिने वर्ज  केले होते त्यामुळे तपकिरी किंवा राखाडी नऊवारी साडी!. थोडक्यात आजी या नावात जे जे मटेरीयल आपण म्हणजे माझ्या पिढीतील  कल्पतात ते ते तिच्यात ठासून भरले होते. 

          आल्या आल्या आजीने जाहिर केले आजपासून जर घरात कुठलाही वाद झाला तर तिचा पाठींबा फक्त सुनेला असणार आहे कारण सून गृहलक्ष्मी आहे. झालं ! पहिली लढाई तर आजीच्या पारड्यात पडली !.

काकी बोलयची कमी. सतत हातात जपमाळ. आणि मुखात नामस्मरण! काही काळाने लाडालाडात भोचकपणे मी आजीला विचारले "आजी सारखी कां ग विठोबाचे नाव घेतेस? आजीचे उत्तर फारच छान होते "अग माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या संसारात लुडबुड करण्यापेक्षा हे नामस्मरणच बरे "

बर हे तिने मनापासून स्विकारले होते. पण हीच आजी,माझी आई बी.एड करताना पूर्ण घराची जबाबदारी सहज पेलत होती.वडील नोकरीनिमित्त फिरतीवर आणि आई काॅलेजमधे आणि आम्ही दोघी लहान. अशावेळी जेवण करण्यापासून ते आमचे डबे भरण्यापर्यंत कामे आजी आनंदाने करत असे आणि नंतर तिच्याजवळच्या गोष्टींच्या समुद्रात आम्ही मनसोक्त पोहत असू.

          आजीच्या लहानपणीच्या, आणि माझ्या आजोंबासोबत तिने अनेक प्रांतात केलेल्या प्रवासाचे अनुभव अरेबियन नाईट्सपेक्षा सुरस आणि चमत्कारिक होते. आजोबा इंजीनियर! त्या काळात क्वेट्याला(आज जे पाकिस्तानात आहे)झालेल्या भूकंपानंतर सिव्हील इंजिनिअर म्हणून बराच काळ दोघांचे वास्तव्य तेथे होते. तिथे कडाक्याच्या थंडीत नळ चालू केल्यावर पडणारी पाण्याची धार लगेच बर्फ बनायची आणि आजी जेवताना ताट स्टोव्ह वर ठेऊन कशी जेवायची या आमच्या आवडत्या गोष्टी. त्यात आजी कोकणातील ! भुतांच्या गोष्टी ऐकाव्यात तर तिच्याकडून.त्यात तिच्या वडिलांच्या कथा सांगताना तिचा आवाज अधिकच कापरा व्हायचा.

         हे झाल आजी म्हणून! पण तिच्या दोन्ही सुनांचा आजीला विलक्षण अभिमान.माझी आई कुठल्याही धार्मिक कर्मकांडाच्या विरोधातली. शिकलेली आणि पुरोगामी विचारांची. धाडसी, उत्कृष्ट बॅडमिंटन खेळणारी. या सर्व गुणांना काकीचा भरगच्च पाठींबा. काही काळ तर नोकरी करताना आईला शाळेत रहावे लागले कारण शाळा होती गुरुकुल धर्तीवर आधारलेली. शाळेतील नोकरी स्विकारताना आईलाच नको नको होत होते कारण घराची जबाबदारी पडणार होती काकींवर ! काकींनी ती जबाबदारी स्विकारली आणि वर्षभर पारही पाडली.त्या काळात ती माझ्या काकाकडे पण गेली नाही.

         आईला   काकीच्या या सर्व कष्टांची जाणीव होती त्यामुळे आई घरी असताना तिने कधीच त्यांना कुठलेच काम करू दिले नाही.त्यांच्याशिवाय ती एक घासही खात नसे. कधीं कधीं  काकीचे नामस्मरणच इतके लांबायचे पण आई तशीच थांबे आणि त्यांच्या आवडीप्रमाणे गरम जेवण त्यांच्या पानात वाढे मगच दोघी जेवत .असे म्हणातात दोन स्त्रिया एकत्र आल्या की भांड्याला भांडे वाजणारच, पण ही दोन भांडी कुठल्या मटेरीयलची होती त्याच जाणे. बहुधा दवभिजल्या गुलाबपाकळ्यांना लोण्यात चुरून एकमेकींचा एकमेकांसाठी तो खास कोपरा बनला होता.  पण  हीच आई आमच्यासाठी कधिकधी  महारणचंडी असे .

         काकीला वाचनाचे वेड ! पण मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर वाचन अवघड होऊ लागले . काकीला   जेव्हा डोळ्याच्या अगदी जवळ पुस्तक धरुन वाचताना आईने पाहिले तेव्हा तिने आम्हा दोघी बहिणींना कामाला लावले.काकीला रोज आळीपाळीने पुस्तक वाचून दाखवायचे.मग लहानपणीच ह.ना. आपटे, ना.ह.आपटे ,विरधवल, कालीकामूर्ती इत्यादी पुस्तके आम्ही वाळवीसारखी फस्त केली. आम्ही खूष आणि काकी डब्बल खूष.

       खरतर आई आणि मुलींचेही मतभेद होतात. कधीं कधीं पराकोटीला जातात पण सासूसुनेचे नात असूनही या दोघींच्या  आवाजाची पट्टी कधीच चढली  नाही. काकी अत्यंत धार्मिक पण आपली कर्मकांडे तिने 'घरच्या परंपरा' या गोंडस नावाने आईवर लादण्याचा प्रयत्नही केला नाही. काकीला कथाकिर्तनाला नेण्याची जबाबदारी आईने आमच्यावर सोपवली होती. हयगयीला क्षमा नव्हती. मला आठवते काकीसाठी म्हणून आईने सत्यनारायणाची पूजा देखिल केली होती. एकत्र राहूनही एकमेकांना  पुरेशी 'स्पेस'  त्या देत होत्या.

     एखाद्याला वाटेल हे कसलं सगळ गोड गोड. या नात्याचा आत्मा म्हणजे त्यातील 'तू तू मै मै 'चा खमंगपणा. तोच या नात्यात नाही.पण ब-याचदा या खमंगपणात  तोंड होरपळून निघते.मग फक्त पश्चात्ताप!

         माझ्या   त्या वयात त्या नात्याची खोली, महत्व मला कळलेच नाही. हे असच असत,पुढेही असणार आहे असेच वाटायच.'पण लक्षात कोण घेतो?'वाचताना सासूरवासाच्या कथा तेव्हा दूस-या ग्रहावरच्या वाटायच्या. पण आता लक्षात येतंय एकमेकींबद्दल आदर, त्यांच्या विचार स्वातंत्र्याची आस्था, एकमेकींच्या कष्टांची जाणीव या पायावर त्यांचे नाजूक नाते कणखर उभे होते. अर्थात हे माझ्या अल्पमतीला दिसलेले! पण या पलिकडे या नाजूक नातेसंबंधात रेशीमधाग्यांचा गुंताडा न करण्याची जबाबदारी दोघींनी पुरेपूर  निभावली.नुसती निभावली नाही तर पुढच्या पिढ्यांना हा वारसा त्यांच्या नकळत सोपवला.

आज दुर्गेचा नवरात्रीचा , नवरुपांचा , स्त्रीशक्तीचा उद् घोष  चालला आहे. घरात शांती आणि समाधान नांदण्यासाठी झटणा-या या दोघी मला दुर्गेचीच विविध रूपे वाटतात.



        माझ्या इतर लेखांची लिंक 

https://drkiranshrikant.pasaara.com 



शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०

आई©️

 



आई या जादूई शब्दात खर तर गंमत आहे ,कितीही भावंड असोत प्रत्येक मुलाला ती फक्त आपली स्वतःचीच आपल्यापूरती आई आहे असेच वाटते.या नात्यात हीच तर जादू आहे. लहानपणी तर शाळेतून आल्यावर पहिले झूट आई पाहिजेच.मग फक्त आपलंच टुमणे सुरू. आता वाटत आईला कधीही तुझा दिवस कसा गेला एवढ सुध्दा  विचारावं वाटल नाही मला!मी मोठी झाले.आईने सुध्दा तिचा रोल बदलला. ती मैत्रीण कम आई या रोलमधे फिट्ट  बसली. तरी माझा स्वार्थीपणा सुरूच. 

        यथावकाश मी आई झाले. पहिला त्याग मी केला झोपेचा. आधी माझ्या आईच्या जीवावर घनघोर झोपणारी मी बाळाच्या नुसत्या अ sअंsअsअं ने टक्क जागी होऊ लागले.कुणीही न उठवता. बहुधा हेच ते महान मातृत्व का?. त्यानंतर आई या नात्याबद्दल निर्माण झाले विलक्षण कुतूहल.  मग मला छंदच लागला 'आई' वाचायचा.बालरोगतज्ञ असल्याने या आई आणि मूल यांच्यात निसर्गाने निर्माण केलेल्या अनोख्या बंधाला भरपूर प्रमाणात बघता आले. शिकता आले.एकीकडे त्यागमूर्ती , धैर्यवान तर दुसरीकडे आपल्या हटवादीपणाने मुलाचे वाटोळ करणारी आई. मुलीचा दुस्वास करणारी अन् अती काळजीने मुलांना पांगळ करणारी. अती लाडाने कान चावणारा मुलगा घडविणारी ही पण आईची अनेक प्रिय अप्रिय रुपे बघायला मिळाली. मग जाणविले  अरेच्चा आई एक माणूसच!! त्यामुळे  अशा विविध करड्या काळ्या  छटा तिच्यातही असणारच! ती चुकाही करणारच. लोलकातून दिसणा-या सप्तरंगासारखी आई! जाऊ दे! शब्दात न पकडता येणारी म्हणजे आई. 



    आई©️



साधारण साठ वर्षांपूर्वीचा काळ.एक  मध्यमवर्गीय घर. घरात अक्षरशः चार महिने बिछान्याला आजाराने खिळलेली पाच सहा वर्षांची मुलगी आणि सतत  तिची शुश्रुषा करणारी तिची आई. मुलीला  मुदतीचा ताप म्हणजे टायफाॅईड झालेला, तोही उलटणारा.सतत तापाने फणफणलेली ती मुलगी! रोज डाॅक्टरांच्या भेटी सुरू.त्या काळात टायफाॅईड वर उपयुक्त औषंधांचे प्रमाण नगण्य. क्लोरोमायसेटिन हे औषध भारतीय बाजारात  नुकतेच आलेले.त्याची उपलब्धता अपुरी. त्यात त्या मुलीची तब्येत अति गंभीर झालेली.यमराज जणू शोधताहेत "चला कुठे गेली ती मुलगी?वेळ झालीय तिची. पण त्यांच्या दिव्य नजरेला जणू ती मुलगी दिसतच नाही. कारण ती मुलगी आणि यमराज यांच्यामध्ये खंबीरपणे, निश्चयाने उभी आहे एक किरकोळ तरूण स्त्री!त्या मुलीची 'आई' जणू यमराजाला ती आव्हान देते आहे "अरे असेल हिंमत तर माझ्यापलीकडे नजर टाक तिच्यावर." ती तरूण स्त्री  जागरणाने, काळजीने खंगलेली आहे.सतत मुली जवळ बसून डोक्यावर बर्फाची पिशवी ठेव, पथ्याचे खायला दे, ताप बघ, औषध दे यातच गुंतली आहे. जणू तिच्या त्या अशक्त कुडीने ती कालचक्र थांबवायचा प्रयत्न करत  आहे.

    सतत गुंगीत असलेल्या त्या मुलीला एकच आठवते. आईचा तो कपाळावरचा थंड मृदू स्पर्श. कधी ग्लानीतून डोळे उघडले की दिसणारा आईचा चेहरा , तिच्या धुवट सुती साडीचा किंचित ओशट वास आणि त्याबरोबर  खोली पुसल्यावर येणारा फिनेलचा उग्र वास. मृत्युने आ वासलाच होता. डाॅक्टरांनीही आशा सोडली होती. पण मृत्यूच्या तोंडातून नव्हे तर घशातून त्या आईने डाॅक्टरांच्या मदतीने मुलीला ओढून काढले. त्यावेळेस तरी त्या मुलीची जीवनरेखा होती तिची आई!   ही कथा माझी स्वतःची म्हणूनच मला खूप जवळची. जिव्हाळ्याची.


--   ------    ------ ------------------------   ----    --- 


ब-याच वर्षांपूर्वीची गोष्ट. रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली होती.  त्या गर्दीत फतकल मारून ती बसली होती. जवळच साधारण वर्षंभराचा मुलगा.कडेला उभी, मधुनच तिला ओठंगणारी,मधुनच खेळणारी तिची छोटी मुलगी.'तिच्या' अंगावर किंचित भडक कपडे. डोक्यावरून पुढेपर्यंत घेतलेला पदर. उभट चेहरा. डोळ्यात भकासपणा. मुलगा तेथेच बिस्किट चघळत बसलेला. आजूबाजूला  आपल्याच तंद्रीत खेळणारी साधारण चार वर्षांची तिची ती मुलगी!. खेळाच्या झिंगेत कुठलं तरी गाण म्हणणारी. मधनच बारक्या भावाशी लाडेलाडे बोलणारी.लहर आली की 'तिच्या' गळ्यात पडणारी. त्या घामट , पळणा-या गर्दीमधली एकमेव, झुलणा-या कळीसारखीच इकडेतिकडे डोलणारी!  .त्या गर्दीपासून दूर जणू स्वतःच्या छानशा बागेत खेळत असल्यासारखी ती मुलगी आपल्याच विश्वात रंगलेली. विलक्षण बोलका निरागस चेहरा.केसांच्या झिप-या. हसरे टपोरे डोळे.मुलीच्या आणि 'तिच्या' चेह-यात खूप साम्य. इतक्यात एक उंच माणूस तेथे आला. थोडया अधिकारवाणीने तो त्या बाईशी बोलू लागला. ती अजीजीने बोलत होती.परत परत मुलीकडे बघत होती. डोळे पुसत होती. मला भाषा कळत नव्हती. इकडे मुलगी खेळात मग्न. त्या स्त्रीने स्टाॅलवरून जाऊन कागदात वडे आणले आणि मुलीच्या हातात कोंबले. मुलीने खाली फतकल मारली. छोट्याच्या समोर एक घास धरला.तो अजूनही बिस्किटात मग्न आहे हे बघितल्यानंतर चवीने ती वडा खाऊ लागली. इतक्यात गाडीची शिट्टी वाजली. त्यांची गाडी बहूधा हीच होती.गर्दी अधिकच दाटली. मुलगी पटकन उठली .उरलेला वडा एका हातात धरून पटकन 'तिचा' पदर पकडला.तिने बाळाला काखोटीला मारले .एका हाताने मुलीला पकडले गर्दीने वहाणा-या डब्याजवळ ती गेली .ती बाई मुलासहीत आत शिरली. शिरता शिरता तिने मुलीचा हात सोडून दिला. क्षणभर काय होते हे मला रजिस्टर झालेच नाही. उसळलेल्या गर्दीत ती मुलगी क्षणभर दिसली तोच गाडी सुटली.इतक्यात तो उंच माणूस  कुठूनसा परत आला. रडणा-या मुलीचा हात धरून चालू लागला.मुलगी हमसून हमसून रडत होती.

               ------   -----  ---   ------ ------- --------


आठ दहा मुलांचा घोळका ओरडत चालला होता. आवाज टिपेला पोहोचलेला.मुलांची वयही साधारण पाच ते बारा. बारकी पोर मोठ्या पोरांकडे बघून डिट्टो काॅपी करणारे. ए वेडाsss वेडाsss तारस्वरात  मुले ओरडत होती. त्यांच्या पुढे एक कळकट   कपड्यातील पुरुष चालत होता. साधारण तिशीतला तो. आजूबाजूचं कसलाच भान नाही. मुले ओरडायला लागल्यावर वळून त्यांच्या अंगावर धाऊन आल्यासारखे करत तो पुढे जात होता. काही मुलांनी तर मारण्यासाठी  हातात दगड घेतले. देवाघरची फुले म्हणून ज्यांना कायम गौरविले जाते तीच ही मुलं. त्यांचे  निरागस बाल्य जणू आता विरून गेले होते. खिडक्या गॅलरीतून काही जण हा फुकटचा तमाशा बघत बघत हसत होते.इतक्यात विजेच्या वेगाने ती बाहेर आली. मुलांच्या घोळक्यांतील एका आठ वर्षाच्या मुलाला बकोटीला घट्ट धरले. इतर मुलांना जरबेच्या आवाजात तिथेच थांबवले. तिच्या आवाजात एवढा अधिकार होता की सर्व मुले तिथेच उभी राहिली. गम्मत हुकल्याचा राग काहींच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता. तिने  मुलांना डोळे बंद करून त्या कळकट कपड्यातील पुरूषांच्या   जागी स्वतःला किंवा आपली  प्रिय व्यक्ती आहे अशी कल्पना करायला सांगितली. तिचा बकोट धरलेला मुलगा तर आता रडकुंडीला आला होता. "आता तुमच्यातील एकजण पुढे चालेल आणि बाकी सर्व त्याच्या मागे ओरडत जातील. दगडही मारतिल" तिने जोरदार आवाजात सांगितलं. मुले आता चुळबुळू लागली. कोणीच पुढे येईना. "आता यापुढे कोणाचीही चेष्टा करताना प्रथम आपल्यालाच तिथं कल्पनेत उभ करायच" मुले कुजबुजत तेथून गेली. तिने हात पकडलेला मुलगा मात्र हुंदके देऊन रडत होता. आईची माफी मागण्यासाठी शब्द शोधत होता.

 --------    -------- -    ------- ----- -- ---------


माझे इतर लेख वाचायचे असल्यास खालील लिंक वापरावी 
https://drkiranshrikant.pasaara.com 



शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२०

दृष्य -अदृष्य ©️

  



कामाचा कल्लोळ  उसळला असतो आता कसं होणार असा विचार करता करता हळू हळू सर्व कामं मार्गी लागत जातात. कधी कधी अस वाटत  त्या अष्टभुजे सारखेच आपल्यालाही अनेक बाहू आहेत. एकमेकांच्या मदतीने हे सारे हात फटाफट सर्व कामे करताहेत. माझी काळजी घेताहेत.खर तर सर्वच हात अती महत्वाचे. कधी ते 'दृष्य' हात असतात तर कधी एखाद्या  कठपुतलींच्या खेळासारखे पडद्याआडचे 'अदृष्य'. 

       कधी हे हात' "ए आई",किंवा' अहो आईंच्या" रूपात मदतीला यायचे कधी मैत्रिणीच्या! ब-याचदा घरात काम करणा-या बाईच्या!.  घरातल्या या कामवाल्या बायकांचे योगदान मोजणे अशक्यच.  भले त्या मोबदला घेत असोत पण त्यांच्या जीवावर मी अनेक छंद जोपासले आहेत .गावाला जाऊन घराची काळजी न करता मौज मजा केली आहे. यामुळेच त्यांनी माझ्या आठवणीतील पसा-यात फार मोठी जागा व्यापली आहे. आज तोच आठवणींचा  पसारा आवरायचे ठरविले आहे.


                       दृष्य  - अदृष्य ©️


 माझे लग्न  झाल्यावर मी रूग्णालय सुरू केले तेव्हाच तीही घरात आली. ती आली होती काम आहे का हे विचारायला. कशीबशी चार फूट उंची. शिडशिडीत, गोरटेली. चेह-यावर प्रचंड आत्मविश्वास आणि कपाळावर आधेली एवढे भळभळीत लालभडक कुंकू. गळ्यात काळी पोत. वयाने साधारण माझ्याएवढीच. मला दवाखान्यात आणि घरात दोन्हीकडे मदतनीस हवी होती आणि ही एकदम तय्यार. रात्री दवाखान्यात आणि दिवसा घरात अशी कामाची वाटणी सुध्दा तिने करून टाकली. अगदी मी काही बोलायच्या आतच. मीच मनांत साशंक होते एवढे काम हिला झेपेल कां म्हणून! तिने तेथेच जाहीर  केले तिच्या घरी झोपण्यापूरतीही जागा नाही.त्यामुळेच रात्रीची दवाखान्यातील ड्युटी हवी. हे सगळ बोलताना कुठेही  लाचारी अजिबात नव्हती.  होती फक्त परिस्थितीची जाणीव! पगार ठरवतानाही लाजणं नाही ,आढेवेढे नाहीत की तुम्हीच सांगा किती देणार म्हणून गुगली नाही. सर्व एकदम स्पष्ट. त्या काळात माझीही नवी नवी प्रक्टीस सुरू होती. पेशंटकडे पैसे मागताना मला प्रचंड संकोच वाटायचा कारण धट्टी कट्टी गरिबी आणि लुळी पांगळी श्रीमंती असल्या  विचाराचा पगडा माझ्यावर  होता. तिचा तो स्पष्टवक्तेपणा,मोकळेपणाच मला फार आवडला . अशा त-हेने तिचा घरात प्रवेश झाला.

          रात्री रुग्णालयातील  काम संपवून सकाळी आठच्या सुमारास  ती घरी गेली की सकाळी दहावाजेपर्यंत आंघोळ  करून  हजर!  अनेक भारतीय स्त्रीयांप्रमाणेच तिची कथा होती. वयाच्या चौदाव्या वर्षी लग्न. कारणही  नेहमीचेच. घरात पाच सहा मुले! वडिलांना कामधंदा काही नाही. आई आजारी. लग्न होईपर्यंत  आईबरोबर चार घरं तीही धुणीभांडी करायची. लग्नानंतरही ही परवड थांबली नाही. पहिल्याच दिवशी नव-याने तिला हाकलून दिले. कोवळं वय, अपमानित, मनावर आणि शरीरावर अनेक जखमा घेऊन ती माहेरच्या वळचणीला आली. पेटलेल्या गरीबीच्या वणव्यात अजून एका झाडाची आहुती. त्या दिवसापासून ती तिच्या भावांची माय झाली. सगळ्यात धाकट्या भावावर तर हिचा विशेष जीव!

          हळूहळू  तिचा चांगलाच परिचय होऊ लागला. तिचा आवाज गोड होता. लहान बाळांना छान खेळवायची. त्यांच्यासाठी बडबडगीते  तालात म्हणायची .त्यामुळे पेशंट खूष! पेशंटबाबतीत कधीच  कंटाळा नाही. लहानवयात हलाखीच्या परिस्थितीतून तावून सुलाखून निघाल्यावरही तिची विनोदबुध्दी शाबूत होती. नकलाही फार छान करायची. आवर्जून  वृत्तपत्र वाचायची.घरातही सणवार तिच्या लक्षात असायचे आणि त्याप्रमाणे गोडाचा पदार्थ ताटात  हजर व्हायचा. साठवणीचे डबे वेळेवर स्वच्छ करणे ही कामही ती आपणहून करे. ओवा,गवती चहा, कढीलिंबाची रोप कुठुनकुठुन आणून तिने लावली. मी काही सांगायचा अवकाश ती ते काम करून टाकायची. कामही असं नेटकं की बस देखते रह जाओगे.हे सगळ अशक्य वाटतय नं? पण सुदैवाने हे खर होते.  अरेबियन नाईट्स मधल्या अल्लाउद्दीनचा जिनी माझ्याकडे आलाय याची मला खात्रीच होऊ लागली. 

मला एका गोष्टीचे कायम आश्चर्य वाटायचे ते तिची तिच्या नव-याबद्दलची  प्रेमभावना बघून.एक दिवसाचाही सहवास नाही पण वटसावित्रीची पूजा म्हणजे तिच्या दृष्टीने सर्वात मोठा सण! हळू हळू लक्षात येऊ लागलं की ती ज्या समाजातून येते आहे तिथे 'सवाष्ण'या शब्दाला फार मोठ्ठे वलय आहे. हळदीकुंकु,सवाष्ण भोजन याची आमंत्रणे म्हणजे तिच्यासाठी आनंदाची परमावधी! सत्य परिस्थिती सांगून किंवा त्याची जाणीव देऊन या आभासी आनंदाला टाचणी लावायचे धाडस आणि इच्छा  मला कधीच झाली  नाही.

या आमच्या बाईची एक आवड खास होती. सिनेनट जितेंद्र खास लाडका. त्याची एकदम फॅन. एकदा शनिवारी सगळ पटापट आवरून ती निघाली. "बाई तोफा बघायला जाते"मी बुचकळ्यात!नंतर लक्षात आले तिच्या लाडक्या जितुचा तोहफा हा चित्रपट दूरदर्शन वर होता.

            माझ्या धाकट्याची  तर जन्मानंतर पूर्ण जबाबदारी तिने घेतली.तो बोलायला लागल्यावर जेव्हा त्याने तिला प्रथम हाक मारली तेव्हा तर हजार सवाष्ण  भोजनाचा आनंद तिला झाला. त्याच काळात मला काही कालावधीसाठी हाॅस्पिटल मधे दाखल व्हावे लागले. सासूबाईंनाही त्यावेळी तिची खूपच मदत झाली.  

       दवाखान्याचा व्याप वाढू लागलेला.मदतनीस म्हणून अजून दोघी तिघांना घेतले. सुरवात तर छान खेळीमेळीच्या  वातावरणात झाली. सर्व कामं  समजवून  द्यायला ती होतीच. मग हळूच थोडी धुसफुस कानावर येऊ लागली. आलेल्या दोघीजणींमुळे तिच्या सार्वभौमत्वाला धक्का बसू लागल्यावर ती वैतागायला लागली. अजून तक्रारी आमच्याकडे येत नव्हत्या पण गटबाजी  लक्षात येऊ लागली. एक दोन वेळा सर्वांचेच बौध्दिक  घेतले. त्यानंतर काही काळ शांतता की परत जैसे थे! 

       अर्थात  सर्वच राजश्री प्राॅडक्शनसारखे गोड गोड होते असे नाही.मधूनच तिच्या अंगात काय संचारायचे कोण जाणे घरातल्या इतरांवर शिरजोरी करायला जायची मग मात्र तिला थोड रागवावं लागायचंच. मधुनच तिच्या डोक्यात  तिच्याशिवाय आमच घरच चालणार  नाही हा किडा वळवळायला लागायचा.  मग मात्र मी तिला तिच्या घरी पाठवून द्यायची. तिच्या अपरोक्षही माझे घर व्यवस्थित  चालते हे लक्षात आल्यावर गुपचूप परत कामाला यायची. पण एवढ्या तेवढ्याच  मानापमानाच्या गोष्टी.मीही फार खास चिडून किंवा तटून बसत नसे आणि ती पण काय समजायचे ते समजत असे.

      दुर्दैवाने  त्याकाळातच  तिच्या नव-याच्या मृत्यूची बातमी आली. इतक्या वर्षात न पाहिलेल्या  नव-यासाठी आणि त्याच्याबरोबरच चितेवर राख झालेल्या सवाष्णपणासाठी ती रड रड रडली. त्याच्या गावालापण जाऊन आली.अर्थात त्याच्या दुस-या बायकोने तेथे तिला थांबूनही दिले नाही. 

        तिला मधूमेह झाला. स्वतःची काळजी, औषधे घेणे ती व्यवस्थित  करायची.व्यवस्थितपणा हा तिचा स्थाईभाव होता.आता तर तिला झेपतील एवढीच कामे  तिच्यासाठी  ठेवली. फक्त घरात देखरेख. या नव्या भूमिकेत ती छान स्थिरावली. माझ्या आजारी सास-यांची आणि माझ्या आईचीही छान प्रेमाने काळजी आपणहून घ्यायची. घरातील मस्तवाल कुत्राही जेवण घ्यायचा ते तिच्या किंवा माझ्याच हातून. ते देखिल ती प्रेमाने करायची. 

          माझा धाकटा शिक्षणासाठी दूर गेला पण आमच्याबरोबरच तिची चौकशी नेहमीच असे. मधून मधुन तिलाही फोन तो करत असे. तिच्या धाकट्या भावाने भांडून सवतासुभा उभारला. तिच्या ते फार जिव्हारी लागलेले आम्हाला जाणवत होते.

        तिला कुठल्याही परिस्थितीत कामावरून जा असे सांगायचे नाही हे आम्ही पक्कं ठरवलं  होत. तू हवी तेव्हा ये घरात बस आणि जा असेच तिला सांगितले  होते. पण इतके दिवस घर संभाळल्या मुळे,सतत काम केल्यानंतर तिलाच फुकट पगार घेणे योग्य वाटेना.  अखेर तिने काम बंद करायचे ठरविले. पस्तीस वर्ष ज्या घरात ओतली ते घर ती सोडणार होती.

         तिच्यासाठी एक छानसा कार्यक्रम आम्ही सर्व कर्मचा-यांसहित  आयोजीत केला. जेवण साडी आणि पुढील आयुष्यासाठी पुंजी. आम्हा दोघींनाही अश्रू  आवरत नव्हते. 

         ती कोण होती?. ती नुसती घरकामाची मोलांवर काम करणारी नक्कीच नव्हती.भले मी मालक होते पण माझ्या अडीअचणींना रक्ताच्या नात्याइतकीच खंबीरपणे तिची साथ असायची. ती माझे दृष्य अदृष्य  हात होती . माझी कित्येक कामे त्या हातांनी प्रेमाने केली होती.आज कित्येक कर्मचा-यांचे काम चुकवणे बघितले की हे फारच जाणवते. तिने वेळप्रसंगी माझं घर संभाळल होत. माझ्या घरातील आजा-यांची सेवा त्याच हातांनी केली होती. तिच्या जीवावर मी नवनवीन क्षेत्रात मुसाफिरी करू शकले.

         अजूनही नियमित ती भेटायला येते. खूप थकली आहे ती.एकटीच रहाते.आल्यावर गार ताक  पिते. माझ्या डाॅक्टर मुलासाठी कॅडबरी आणते. अगदी काबुलीवाल्यासारखीच. फरक एवढाच माझा धाकटा तितक्याच आनंदाने, आत्मीयतेने कॅडबरी घेतो. आज  तिच्या या सदैव मदत करणा-या हातांच्या आठवणी मला तशाच नीट ठेवायच्या आहेत . त्यातून उतराई वगैरे होण्याचे  माझ्या मनातही येत नाही कारण काही काही ओझी आनंददाई असतात. ती नीट संभाळून ठेवण्यातच खरा आनंद असतो.

 

माझ्या इतर लेखांची लिंक

https://drkiranshrikant.pasaara.com 






         

        

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२०

वाटा आणि रस्ते ©️

 



जंगलात माणसं रस्ते चुकतात. परत परत गोल फिरून ते त्याच जागी येतात. चकव्यात सापडतात. खरतर वाट असते तिथेच असते तरीही फक्त  एक वळण, एक आडवी पायवाट आपल्याला ठगविते आणि परत जैसे थे! त्याच त्या चुकीच्या जागी आपण परत परत येत रहातो.

          रस्ते असे महामिष्किल असतात. स्वतः मस्तपैकी झोपून रहातात आणि चालणा-यांना चकवतात.मग सगळ्यांना,येणा-या जाणा-यांना  बाबापुता करत निश्चित ध्येयाकडे कसे जायचे हे विचारावेच लागते.रस्ता फक्त गालातल्या गालात हसतो.

     मला रस्ते अगदी त्यांच्या व्यक्तिमत्वासहित बघायला खूप आवडतात.रस्त्यांशी दोस्ती करायला मला खूप आवडते.


                              वाटा आणि रस्ते©️


            पायवाट म्हणताच मला आठवते कोल्हापूरच्या घरासमोर पहुडलेली  लाल  मातीची  पायवाट.त्या  काळातील माझी  फ्रेंड नंबर  एक! घर अगदी शेतात! घरासमोरच द्राक्षाचा मळा .घर आणि मळ्याच्या मधे सुस्तावलेल्या  पायवाटताई वाकड्या तिकड्या झोपलेल्या!! एकावेळी  दोन माणसे जातील एवढीच रूंदी. समोरून शेतावरची म्हैस आली की आमची नुसती पळापळ! पायवाटेच्या मऊ लाल रंगाचे भारी कौतूक वाटायचे. पाऊस पडल्यावर तिच्या ओल्या लाल मातीत मधनच निळे काळे फर्राटे उमटायचे आणि वाट अधिकच देखणी व्हायची.ते निळे काळे पट्टे म्हणजे मातीत लोह आहे हे वडिलांनी सांगितल्यावर ती मला एकदम लोहयुगातील शापित सुंदरीच वाटायला लागली. वाटेच्या एका बाजूने  कडेला द्राक्षमळ्यापर्यंत  गवताचा मस्त पट्टा होता. थेट मुख्य रस्त्यापर्यंत!पावसात गवत एकदम हिरवं गार. एक ओला हिरवा वास पावसाळ्यात तेथून चालताना नेहमी यायचा.छाती भरून तो वास घेतला तरी ये दिल  मांगे मोअर अशी अवस्था व्हायची. त्या गवतात साप किरडे पण निघायची पण अज्ञानामुळे म्हणा किंवा आणि काही त्यांची भीती कधीच वाटली नाही. एकदातर पिवळी धम्म धामण पायवाटेवर आडवी पसरलेली. लाल पायवाट , कडेचे हिरवे पोपटी गवत,ढगाळलेले आभाळ  आणि ती जर्द पिवळी धामण.त्यावेळी पळून जावेसे वाटलेच नाही जणू नजरबंदी झाली होती. रानभूल पडली होती. हिवाळ्यात धुक्यात लपून पायवाट गम्मत करायची. उन्ह जरा वर आली की कडेच्या तुर्रेबाज गवतावरचे दवबिंदू  वाटेकडे बघून फिदीफिदी हसायचे पण तोवर सूर्यकिरणांनी क्षणभर त्यांना थोडावेळ चमकावून नष्ट केले तरी वाट आपली निर्विकारच आणि सुस्तावलेली. उन्हाळ्यात सोनेरी गवताचा पदर सांभाळणारी वाट  राजकन्याच वाटायची.त्यावरून चालत मुख्य रस्त्याला लागल्यावर वाटेला हळूच टाटा करून मी जायची. शाळेतून आल्यावर मुख्य रस्त्यावरून पायवाटेवर आल्यावर एकदम घरातच आले आहे असे वाटायचे.एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी गेले होते. महिन्यानंतर परत आले .रात्र झाली होती.काहीतरी वेगळ आहे चुकतंय असे वाटत होते सकाळी दार उघडून बाहेर बघतेय तो माझी मैत्रीण  तिथे नव्हतीच.चकचकीत काळपट रस्ता तिथे होता.गवत आणि लोहयुगातील शापित सुंदरी आता रस्ता बनून जीप आणि ट्रॅक्टर अंगावर घेऊन उभी होती. ना ती हसरी मुद्रा ना ती गवताची किनार.त्या दिवशी मी फार रडले आणि अशाश्वततेचा पहिला धडा त्या हळव्या वयात  शिकले.

           मैत्रीण, बहिणीसारख्या  पायवाटा खूप जवळच्या वाटतात.अचानक त्या तुम्हाला एखाद्या खजिन्यापाशी  बोटाला धरून नेतात.महाबळेश्वरला  असेच झाले.पावसाळी दिवस. ढग देखिल मजा करायला हिल स्टेशनवर आलेले. गर्दीं  टाळून आम्ही दोघांनी सक्काळी सक्काळी  एक सावळी पायवाट पकडली. मस्त हवा. आजूबाजूला हिरव्याच्या असंख्य छटा अगदी पाऊलवाटेवर झुकलेल्या, पावसाचे रेशीम धागे गुदगुल्या करताहेत,वर चढून एका सपाटीवर आलो . समोर चारी बाजूला कंच हिरवे डोंगर आणि बदाबदा कोसळणारे धबधबे. सर्वत्र भरलेला गुढ ओंकार स्वर. हे अद्भूत दृश्य  दिसले,ऐकले फक्त त्या सावळ्या वाटेमुळे.

        मध्यम छोटेखानी रस्तेही मला आवडतात. अशा रस्त्याच्या मधेच किंवा कडेला  एखाद खास झाड असतं, देऊळ, इटूकले संगित विद्यालय अशी त्या रस्त्याची ओळख असते. "अग चिंचेचं मोठ्ठा झाड आहे बघ" हा पत्ता असलेला रस्ता किंवा दत्ताची देवळी आहे बघ असा पत्ता असलेला  रस्ता मनमोकळा आणि आपलासा वाटतो.तिथे गाड्या फारशा नसतात. सायकली किंवा दुचाकी त्याही धिम्या गतीत! उगाच छातीफोड वेग नाही. एक दोन मोत्या, वाघ्या नावाची कुलूंगी कुत्री रस्त्यावर ऊन खात बसली आहेत, मुले बाहेर खेळताहेत . बिट्टी पोरं आजी आजोबा बरोबर कट्ट्यावर बसलेत.असे दृश्य नेहमीचे! या रस्त्याला जड वाहनांचे वावडे.एकदम कुटूंबवत्सल.

         सोसायटीतील रस्ते मात्र थोडे शिष्ठ वाटतात. थोड काही वेगळे घडलं तर डोळे वटारून नियमांच भेंडोळं अंगावर टाकतील आणि काढून टाकायची किंवा दंड भरण्यासाठी  धमकी देतील असे वाटतात. नियमावलींनी भरलेली पाटी म्हणजे  अमूक करू नका वगैरे त्या रस्त्यांचे अलंकार!

          काही रस्ते कायम आठवणीत रहातात. त्या रस्त्यात काही खास असते  अस नाही पण प्रियजनांच्या आठवणी तिथे रेंगाळत असतात.लग्नानंतर लगेच लोणावळ्याला आम्ही गेलो.  भल्या सकाळी दूरवर फिरायला आम्ही गेलो होतो. अनवट वाट.सकाळची वेळ आणि टपरीवर चहा घेत असताना आलेला पाऊस.तिथून खिदळत  हाॅटेलकडे पळताना आमच्याबरोबर पळणारा काळसर ओला रस्ता! खूप प्रिय वाटला तो. 

       परदेशांत ते सिक्स लेन च्या पुढेच असलेले आखीव रेखीव  रस्ते बघताना खूप छान वाटतात. त्यांचे संगोपन,प्रसाधनही एकदम झक्कास. सतत वाहनांच्या अरेरावीला तोंड देणारे हे रस्ते कुटुंब प्रमुखासारखे वाटतात . मला तेही आवडतात याची मुख्य मेंख आहे की ते मला नातीकडे नेतात. मुलाच्या घरासमोरचा  चालण्याचा  नेटका रस्ता. सायकलीं पळायला वेगळा रस्ता मस्त मज्जाच की. हे रस्ते अगदी ' गुड मॅनर्स 'असलेले. नितळ, क्रिम सारखे !कडेला हिरव्यागार हिरवळीची किनार मिरवणारे.  त्यांच्याशी आधी मैत्री करताना बिचकायला झाल पण नंतर आमचे सुर छान जुळले.

         हम रस्त्यात सध्या मला खूप आवडलेला  रस्ता आहे भूतान देशातील पारो या छोट्या गावातला. अतिशय रूंद आणि स्वच्छ .दोन्ही  तोंडांना  डोंगर . एका डोंगरावर धर्मस्थळ.रस्त्याच्या कडेला दुकाने. त्याच त्या रेखिव खिडक्या. पिवळ्या तपकीरी  रंगांची लयलूट.उतरते पॅगोडासारखे छप्पर! रंगबिरंगी भेटवस्तूंनी नटलेली दुकाने. मधनच एखाद्या हाॅटेलमधून येणारा चीझचा उग्र वास!

      खाण्यावरून आठवले कोल्हापूरला शाळेतून येतानाच्या रस्त्यावर  सोळंकीच्या दुकानातला दुध कोल्ड्रींगचा  गोड गोड वास आणि बेकरी समोरचा ताज्या पावाचा भाजताना आलेला खमंग खरपूस वास.  त्यामुळे तो रस्ता एकदम लाडका.

              मी स्वतः भक्तीमार्गी  नाही पण हजारो लाखो भक्त विठूराया साठी ती लांबलचक वाट ज्या भक्ती भावाने चालतात की तो रस्ताही लोण्याहून मऊ होत असेल.आपसुकच असंख्य माऊलींना चरणस्पर्श करताना कृतार्थ  होत असेल. येवढ्या कृतज्ञतेला आपला प्रतिसाद मात्र एकदम कृतघ्न! खाल्लेली अन्नाची पाकिटे,  त्या रस्त्यावरच!. त्या रस्त्याने केलेल्या निषेधाकडेही आपले लक्ष नसते.

         कॅनडात मी आणि माझी सुन मक्याच्या शेतातील भुलभलैयामधे  शिरलो.आमच्या शिवाय कोणीही नाही. सांज वेळ! प्रकाश धुसर! सूर्य टाटा करायच्या मूडमधे. सर्वत्र पसरलेले घनदाट मक्याचे शेत. अनेक बारीक पाऊलवाटा. त्यात दोघींची चुकामुक झालेली.कुठल्याही वाटेवर वळले तरी बाहेर उघडणारे दार मिळेना आणि कितीही फिरलो तरी शेत संपेचना. वाट आपली हसतेच आहे. अंधार पडायला  लागला आणि सुदैवाने घामेघुम झालेल्या का होईना अखेर  आम्ही दोघी भेटलो. मग नेटाने बाहेरचा रस्ता शोधला.

       अशा अनेक आठवणीतील रस्ते  आणि वाटा. कधीकाळची चिमुकली पायवाट कालांतराने राजरस्ता होते. तिला पायवाट म्हणून घडविणारा धाडसी एखादाच किंवा एखादीच असते. दगडधोंडे, काटेकुटे कशाचीच पर्वा न करता ते जंगलातून चालू लागतात. पाय , अंग रक्तबंबाळ  होत असते. त्यावेळी बाकी सर्व राजमार्गाचा आनंद घेत असतात आणि त्या तयार होणा-या पायवाटेची यथेच्छ  निर्भत्सना करीत असतात. पायवाटेला तुच्छतेने हसत  असतात. पायवाट आपल्याच मस्तीत घडत  असते ,हळूहळू आकार घेत असते. काही काळाने उत्सुकतेपोटी इतरेजन दबकत त्या पायवाटेवरून निघतात अगदी सावधपणे.बिचकत .अंतिम सौदर्य त्यांना मोहवून टाकते. मग मात्र निघतात झुंडीच्या झुंडी. मग त्या पायवाटेचा कधी राजमार्ग  होतो कोणालाच कळत नाही. तोवर कोणी नवा वेडा नव्या पायवाटेच्या शोधात निघतो.परत नवा राजमार्ग  तयार करायला.

                    

माझ्या इतर लेखांची लिंक

https://drkiranshrikant.pasaara.com