गुरुवार, ५ मे, २०२२

आला पावसाळा©️

 वर्षा ऋतु©️


सहा ऋतूंच कुटुंब म्हणजे आजच्या हम दो हमारा एक या जमान्यात भलतच मोठ्ठच्या मोठ्ठ! या अघळपघळ कुटूंबातील कुटुंबप्रमुख अर्थातच उन्हाळा. हडकुळा लांबलचक पायाचा. फिकुटल्या पांढ-या भगभगीत रंगाचा, लाल घारोळ्यां डोळ्यांचा,लांब वाढलेल्या नखांचा!जेथे त्याची नजर तेथे वणवा.त्याची धास्तीच अशी की तो आला की नदी तलाव स्वतःला मिटवून टाकतात. जाडसर दोरखंडा सारखी नदी होते एका बारीकशा सुताएवढी.अखेरची घरघर लागल्यासारखी!यातून पळवाट काढायची म्हणून ती खालच्या वाळूत स्वतःला गाडून घेते.नदीची अशी अवस्था तर ओहोळ,ओढे,डबकी यांवर असलेल्या उन्हाळ्याच्या दहशतीचा विचारच करायला नको. नुसती  धुळ ,घाम, तगमग, काहिली!  आपल्या लाडक्या 'वसंताला' पूर्णपणे संपवूनच उन्हाळ्याने आपला साम्राज्य विस्तार केला असतो.जणू वसंताचे सर्वांनी केलेले कौतूक त्याला सहनच होत नाही.    आता अशा कुटूंबप्रमुखाला चुचकारायचे,त्याची समजूत काढायची हे काम गृहलक्ष्मी वाचून कोण करणार? 

  आणि हे काम घाईगडबडीत केल तर कस चालेल? गृहलक्ष्मी 'वर्षां' अचानक एक दिवशी आपली काळ्या ढगांची फौज पाठवते. मदतीला वारा असतोच. उन्हाळ्याच्या नाकावर टिच्चून अचानकच ही फौज आकाशात धुमाकुळ घालू लागते.मधनच वीज ढगातून आपले लखलखत  रूपड दाखवून पार्श्व संगीत आणि योग्य प्रकाशयोजना करते.पुरेशी वातावरण निर्मिती तर झाली असते.खाली जमीनीवर झाडे बिनदिक्कत डोलायला लागतात. कमरेपर्यंत वाकून आपला कुर्निसात वर्षा राणीला करतात.मोडतात, तुटतात पण डोलणे सोडतात? छेss!उलट ते म्हणताहेत, मोडेन पण वर्षादेवीच्या स्वागतासाठी डोलेन डोलेन! माती आपले लपवून ठेवलेल्या अत्तराचे बुधले उघडायच्या तयारीला लागते.मृद्गंधाचे ते अनमोल अत्तर वर्षभर जपून ठेवलेले असते मातीने! अगदी निगुतीने!रागावलेला उन्हाळा मात्र सर्वत्र शब्दशः धूळफेक करतच असतो. आकाशातून पहिला टपोरा थेंब सणसणत येतो. येतो तोच मुळी मातीसाठी परवलीचा शब्द घेऊन! खडाखड अत्तराचे मातीत लपलेले बुधले  उघडतात.मातीतून मृद्गंध फवारे उडू लागतात ते थेट वर त्या कृष्णवर्णीय सजल मेघांपर्यंत.मनोमनीची खूण पटते आणि अधिकच वेगाने थेंब मातीकडे झेपावू लागतात.एका थेंबाचा हात दुसरा थेंब धरतो. दुसरा तिस-या थेंबाला आधार देतो आता त्यांना स्वतःचे वेगळे अस्तित्व  नसतेच मुळी! एकमेकांत मिसळून ते होतात धारा! धवल कांतीच्या,वेगवान,हवाहवासा थंडावा प्रत्येक थेंबात आतपर्यंत मुरलेला! या धारा पहले झूट मातीशी हितगूज करतात. उन्हाळ्याने रागारागाने वर उडवलेल्या धुळीला कधी चुचकारून तर कधी रागावून मातीकडे परत पाठवतात.  काय करणार गृहलक्ष्मीच्याच सख्या आहे न त्या! वर्षादेवी आता या धारांना लावते कामाला.पाहिले कां ती बिच्चारी झाड किती मलीन झालीत  ते. पदर कमरेला खोचून मग धारा सर्व झाडांना खसखसून आईच्या मायेने बुडूश्याss करू लागतात.धुळ माखल्या पानांवर इतके दिवस अधिराज्य होत पांढरट पिवळ्या उन्हाचे. तापलेल्या,चटके देणा-या करपवून टकण्या-या उन्हाचे! धारांचा तो वेगवान पण शीतल स्पर्श अंगागात पाने मुरवून घेतात. जून पानेही न्हाऊ माखून आलेल्या तान्ह्या सारखी दिसतात.सजल,स्वच्छ, उत्फुल्ल, देखणी.! पाण्याचे थेंब ऐटीत पानावरून घसरत खुदखुदतात. पानाच्या टोकावर आल्यावर पाण्याचा मोती सुळूकन खालच्या पानावर घसरगुंडी खेळायला सज्ज!अनेक टप्पोरी मोतीबाळे  पानापानातून माला गुंफतात. काही इटुकले तर काही टप्पोरे थेंब तारेवरील झुकझुक गाडी खेळू लागतात. मधनच एखादा टपटपीत थेंब तारेवरून खाली उडी मारतो अन मग सगळेच थेंब एकामागून एक उड्या मारालला सज्ज!

. तापलेली जमीन अजून पूर्ण शांत झाली नसतेच कारण उन्हाळ्याने दिलेले घाव खोलवर गेले असतात.ती  दीर्घ उसासे सोडते.गरम धगधगीत उसासे.शिवबाच्या मावळ्यांसारखे गनिमी काव्यानेआलेल्या काळ्या ढगांची पांगापांग होते.आता फक्त भुरभुर तलम रेशमी धारा. सूर्य परत टेचात येतो पण आता उसमे वो बात नही.  हवेत एक सुखद सुगंधी गारवा पसरला असतो. धावतपळत येणारा एखादा चुकार पांढरा फेक सूर्यकिरण पावसाच्या टपो-या थेंबात ऐटीत शिरतो आणि दुस-या बाजूने बाहेर पडतो ते आपल्यात दडलेले सप्तरंगाचे भांडार उलगडतच. अहमहमिकेने मग ढगातून घुसखरी करून किरणं या सरीतून आरपार जातात आणि आभाळात पडलेल्या आपल्या कमानदार सप्तरंगी रुपावर भाळून जातात. जमिनीखाली मातीत अर्ध मृतावस्थेत पडलेल्या गवताच्या बीया आता गोंधळतात,बावरतात. आता भूमीवर जाऊन डोकावून बघायचाय की नाही यावर त्यांची सूक्ष्म खलबत सुरू होतात.एखाद उन्हाळ्यातही  तगलेल मोठ्ठ काटेरी झुडूप या गवतांच्या बीजाला हळूच दटावत म्हणतो "अरे हा नुसता वळवाचा पाऊस होता अजून वर्षाराणी यायची आहे.उगाच गडबड करू नका.उन्हाळा अजून संपला नाही.थोडी कळ काढाल की नाही?

        उन्हाळा अजून संपला नसला तरी उन्हाळ्याची गुर्मी कापरासारखी उडायला लागते. बाजारात असलेल्या कलिंगडाच्या ढिगाकडेही  आता नजर वळत नाही. उलट नकोनकोस वाटत ते पाणीदार फळ! हापूसची जागा आता तोतापुरी, आणि  दशहरा, लंगडा,सफेदा घ्यायला लागतात. बहावा, गुलमोहर आपल्या फुलांचे गालीचे वर्षांॠतूच्या स्वागतासाठी पसरतात.शिरीष,  बहावा गुलमोहर आपल्या कोवळ्या शेंगा झुंबरा  सारख्यां सर्वांगावर मिरवायला लागतात. हवेत एक ताण जाणवतो. तापमान उतरलय पण तरीही ही कसली असह्य तगमग? रोहिणी तीन चार वेळा पावसाचा शिडकावा करून जातात आणि वर्षादेवीच्या नऊ रत्नावली तील पहिले नक्षत्र हळूच पुढे सरकते. पांढुरक्या ढगांनी भरलेल्या निळ्या आभाळात दृष्ट लागू नये म्हणून लावलेल्या तीट्टीमिट्टी सारखा एकुलता एक काळा एकोळा ढग अंग चोरून उभा असतो. त्या जांभुळ काळ्या ढगाला सोबती म्हणून आलेले काजळकाळे ढग दूर क्षितिजावर उभे असतात.दुंदुभीच्या आवाजात विजेच्या प्रकाशात  छोट्या काळ्या ढगाला वेढलेल्या पांढ-या पिल्लावळीला ते पळवून लावतात. वेदमंत्राइतक्याच अतीपवित्र धीरगंभीर आवाजात ते मातीशी, झाडांशी, नदीशी संवाद साधू लागतात. मातीचे उष्ण उसासे,पेंगुळलेल्या मलूल झाडांचे निश्वास ढगांपर्यंत पोहचतात . परत त्याच त्या सृजनशील जीवनधारा जमीनीवर झेपावतात.आला मृग! आता बिनदिक्कत गवताचे बीज अंकुरू लागते. नांगरलेल्या शिवारातील ढेकळांना आता ओढ लागते चिंब चिंब भिजायची आणि परत लोणी मऊ बनून हळूवारपणे मातीत मिसळण्याची.  वर्षांऋतूच्या या मदमस्त विभ्रमांना भुललेला उन्हाळा आता पाणी पाणी होऊ लागतो. मत्त, ओलसर हवा. वा-याची शीतल, लडीवाळ पळापळ, आकाशातील सावळ्याचे गारूड,डोळ्यांना निववीणा-या  हिरव्याच्या अनेक छटा.आणि मग वर्षाराणी एकाहून एक मान्यवर  नक्षत्र पाठविते. आर्द्रा, मघा, पुष्य अशी देखणी नक्षत्र एकामागून एक हजेरी लावू लागतात.या नक्षत्रांची ऐटी भारीच! कोणाच वाहन उंदीर तर कोणाच बेडूक. कोणी कोल्ह्याला निवडते तर कुणाला मेंढा प्रिय! सरीवर सरी येत रहातात.कधी वीजगर्जनेसह तर कधी बाळाच्या जावळासारख्या मुलायम! कधी प्रपातासारख्या वेगवान तर कधी कर्णार्जुन युध्दातील बाणाच्या वर्षावा इतक्या तीक्ष्ण! घरधन्याची समजूत घालता घालता आपला रागीट  पती केव्हाच निघून गेलाय हे सुध्दा भान वर्षांऋतूला उरत नाही.आपल्या दो हातांनी ती उधळतच रहाते.पृथ्वीही हे दान घेताघेता थकून जाते. सृजनाचे हुंकार पृथ्वीच्या अंगागावर खुलून दिसतात.पोपटी ते गडद हिरवा या छटा सर्वत्र पसरलेल्या.जेथे माती तेथे गवतापासून ते रानभाज्या पर्यत कोणीही हजेरी लावते. सार कस तृप्त तृप्त! नद्यांनी आपली मर्यादा सोडलेली असते.जणू उन्हाळा वाळूखाली लपूनछपून काढल्याने आता आजूबाजूचा परिसर पाण्याखाली घालायची त्यांची ईच्छा त्या पूर्ण करत असतात. कधी बेभान होऊन तर कधी शांतपणे मर्यादेत राहून! बेडूक पर्जन्यसुक्त आळवू लागतात. साधी कौलारू पडीक घरेही कौलावर मदमस्त हिरवट पोपटी शेवाळाची मखमल अंथरतात.ती पडीक उदास घरेही नवचैतन्याने रसरसलेली  दिसतात. पावसाला सुरवात होऊन दोन मास झाले असतात. वर्षाराणीही थोडी उसंत घेऊ म्हणते. मग होतो श्रावणातला कनकपिवळ्या उन्हाचा आणि भुरभुरणारा सरींचा लपंडाव! यादोन्हीतील अधिक देखणे कोण हे ठेवणेही अवघड इतके सर्व हवेहवेसे! पूर्वा, उत्तरा, हस्त अशी दिग्गज मंडळी हजेरी लावून जातात. हस्त महालहरी.कोसळला तर हत्तीच्या सोंडेचा पाऊस नाहीतर निघाले रावसाहेब पाठ फिरवून! वर्षाराणीला ओढ लागते आता परत आपल्या कुटुंबात जायची.चार महीने  झाले बाई कामाची सुरवात करून.जाई जुई बरोबर आता फुलणारा पिवळाकेशरी झेंडू बघताच वर्षांऋतूला येणा-या शरद ऋतूची चाहूल लागते .अरेच्चा आता आभाळभर पसरलेला ढगांचा पसारा आवरायला हवा. पण अजून राहील आहे एक काम. मोती नको का घडवायला? स्वाती नक्षत्रावर पडणारा परतीचा पाऊस वर्षाराणीची ही ईच्छा पूर्ण करतो. आकाश आता कृष्ण कांती सारखे चमकदार  नीळे दिसू लागते.वर्षांऋतू  त्या तृप्त नद्या, ती कणसावर  आलेली पिके, अंगोपांगी रसरसलेली झाडे, शिंपल्यातील मोती सार सार बघते आणि शरद ऋतूला आभाळाच  पटांगण मोकळे करून देते.आदीशक्तीचा, सृजनाचा उत्सव ह्याच शरद ॠतूतील!

वर्षादेवी अशी सुतासारखी , शहाण्या गृहस्वामिनीच्या रूपात येते तेव्हा महिलाही या सृजनाने तितक्याच प्रफुल्ल होतात.मग सणांची झिम्मड उडते ती जेष्ठ पौर्णिमेपासून. लफ्फेदार साड्या, मोजके ठसठशीत दागिने, प्रसाधन करून जेव्हा ललना वटपूजनास निघतात तेव्हा पावसाच्या कोवळ्या सरी देखील ब-याचदा हजेरी लावतात. श्रावण महीना तर सत्यनारायणाच्या शि-यासारखा साजूक तुपातला सोनेरी आणि घमघमता! सोनटक्का ते पारिजात यात भर घालतच असतात. नागपंचमी,काय ते खिदळत घेतलेले झोके, मंगळागौर पुजन काय, जीवतीची पुजा काय सत्यनारायण काय काही विचारू नका. भोलेबाबाचा खास सोमवारही श्रावणी सोमवार बनताच झळाळून उठतो. श्रावणांतली अष्टमी तर गूढ सावळी. त्या मनमोहनाच्या वेणूनादाइतकीच गारूड घालणारी. त्या शामल बाळाचा जन्मदिन कृष्णजन्माष्टमी, आणि मग दहीहंडीची धांदल उडते ,गोविंदा-गोपाळाच्या आरोळ्या कोसळणा-या सरींना अधिकच खेळकर बनवतात. श्रावणी पोर्णिमा वेगळ्याच रुबाबात येते. साधा रेशमी धागा पण प्रेमाचे प्रतिक म्हणून बहिणबाई आपल्या भावाला बांधते.भारताचा स्वतंत्रदिनही श्रावणातलाच. भाद्रपद येतो तोच गणपती बाप्पा मोर्या अशा आरोळ्या ठोकत. हरतालका पुजनाने सुरू होणारा हा उत्सव दिवसागणिक अधिकाधिक मंगलमय होतो. गौरी पुजा आणि गौरींचे जेवण हा त्यातील मानबिंदु. भरल्या डोळ्यांनी बाप्पाला त्याच्या घरी पाठवले जाते. सणांना थोडीशी उसंत मिळते

 कधी कधी ही सर्वजनांची लाडकी वर्षाराणी बसते रुसुन. आपल्या संतप्त पतीची समजूत काढण सोडाच  पण त्याच्या हो मधे आपला हो मिसळते तेव्हा समस्त पृथ्वी वासियांना पळताभुई थोडी होते. नुसता हाहाकार! तर कधीकधी आपल्या स्त्री स्वभावाला अनुसरून वर्षा ऋतू लहरीपणाची कमाल आणि धमाल करते.अनेक वृक्ष,घरे क्षणात उध्वस्त करत जाते. वर्षांऋतूची ही अशी रूपे.जशी आदी शक्ती,' दुर्गा ते काली' अशा  विविध रूपात येते तशीच आपली वर्षाराणी! अव्याहत फिरणा-या ऋतूचक्राचा एक भाग!

डाॅ.किरण पाटणकर

फोन 9850550188