शुक्रवार, ४ जून, २०२१

कापूसकोंड्याची गोष्ट------©️

 कापूस कोंड्याची गोष्ट--  ©️


दोन तीन बिट्टी पोर आणि जराशी मोठी पण महा खट्याळ  त्यांची ताई, पत्ते खेळत बसली आहेत. पत्त्यांचा डाव आहे भिकारसावकार अगदी रंगात आलाय. जो पर्यंत  ताई सावकार होते आहे तोवर सगळाच आनंदी आनंद! अचानक एखाद नाक सुससुरणार धाकल, त्याची  डाव जिंकायला  सुरवात होते. नाक फराफर वर ओढत आणि मधनच बाहीला पुसत तो खुदखूदायला लागतो. ताईचे साठलेले पत्त्यांचे हात आता रोडाऊ लागतात मग ताईची थोडी चिडचिड ! ती मोठी अन् मुळातच चलाख.मग ती हुडकून काढते नवी  शक्कल. गोष्ट सांगायची.पत्ते बंद गोष्ट सुरू! आणि मग सुरू होते  गोष्ट! ! मोठ्या मोठठ्या ताणलेल्या उत्सुक  डोळ्यातून कुतूहल सांडू लागत.हळूच ताईला चिकटून सारे बसतात. ताईची खट्याळ नजर सगळ्या चिल्लर पार्टी वरून फिरते. ताई सुरवात करते " ए तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू?" मग एक कोवळा आवाज येतो " होsss सांग न!" ताईच्या चेह-यावर हास्य,  गंमत , फजिती केल्याचा आनंद स्पष्ट दिसतो. लगेच ती म्हणते " होssसांग ना काय म्हणतोस? कापूस कोंड्याची गोष्ट सांगू? धाकटा चिरडीला येतो.तो रागावून काही बोलला की तेच वाक्य आणि कापूस कोंड्याची गोष्ट सांगू हे पालूपद जळवेसारखा त्याला चिकटून बसते. सर्वच धाकटे आता वैतागलेले आणि  बैचेन! हा राग ही बैचेनी डोळ्यातून टपटप गळू लागते. 

          जवळजवळ सर्वच या कापूसकोंड्याच्या तावडीत एकदा सापडले की पूर्ण डोक पिंजून काढेपर्यंत हा कापूसकोंड्या सोडत नसे. राजा विक्रमादित्याच्या मानगुटिवर बसलेला वेताळ एकवेळ परवडला. त्या वेताळाच्या प्रश्नाचे उत्तर दिल्यावर ते विकट का कसले हास्य करीत शिर्षासन करायला ,झाडावर उलटे लोंबकाळत झोके घ्यायला तो मोकळा.उत्तर माहीत असून विक्रमादित्याने दिलेच नाही उत्तर तर  हा वेताळ ,राजाच्या  डोक्याचे  तुकडे तुकडे, सॉरी, साॅरी शकले आणि तीही हजारो करायला तत्पर! दर्यावर्दी  सिंदबादच्या मानेवरचा म्हाताराही असाच बसतो पण चतूर सिंदबाद त्यापासून बरोब्बर सुटका करून घेतो. पण कापूसकोंड्या पासून सूटका? छे छे शक्यच नाही.एकदा चिकटला की चिकटला.

             लहानपणी वाटायच हा कापूसकोंड्या नक्कीच फिकुटल्या बदामी रंगाचा खरबरत्या अंगाचा,पांढ-याधोप लांबचलांब कापूस केसाचा दुष्ट आजोबा असणार. मला याबद्दल खात्रीच असायची.मुलांना छळणे हाच एकमेव उद्योग असणार त्याचा. त्याची गोष्ट म्हणजे आपल्याच सावलीने ताडकन उठून आपल्यावर वार करणेच जणू ! अगदी आपल्या जवळच्या आवडत्या लोकांना  फितवायचा तो. मोठ्या बहीणीने कापूस कोंड्याची गोष्ट सुरू केली की मी शांतपणे आईच्या पदरात स्वतःला गुरफटुन घेई.कामात गुंतलेली आई धपाटा घालत असे पण कापूसकोंड्या पुढे तो धपाटा म्हणजे एखादे बक्षीस वाटे ! लहानपणी वाटायच भेटू दे हा कापूसकोंड्या एकदा, त्याला शाप देऊन त्याचा दगडच करून टाकिन. अर्थात  त्या त्या वयात वाचलेल्या परीकथांप्रमाणे त्याला मी मनातल्या मनात शिक्षा द्यायची.

          वय वाढले. मी डाॅक्टर झाले तरी अधूनमधून कापूसकोंड्या भेटतच होता आता नवनवीन वेषांतरात. पण मुळ दुष्टावा तसाच. आपल्या उत्तरालाच प्रश्न  बनवून हा आपली पाठ सोडायला काही तयार नाही.

        हळू हळू लक्षात यायला लागले अगदी अनंत काळापासून हा खवट कापूसकोंडा महाराज छळतोच आहे. अफ्रिके मधली आपली आदी स्त्री आपली पूर्वज माता आणि पृथ्वीतलवार फक्त उरलेले दहा हजार होमोसॅपिअन्स ! अतीशय अवघड अवस्था! अफ्रिका खंड ओलांडून  लाल समुद्र ओलांडून पलीकडे जायचं. तेही प्रतिकूल परिस्थितीत . समोर शंकेखोर कापूसकोंड्या कुत्सित हसत उभा आहे, पण त्यावर मात केली त्या आदीमानवाच्या चिकाटीने, आत्मविश्वासांने ! नंतर माणसाने शिकार सोडून शेतीचे काम सुरू केले परत कापूसकोंड्याने खो घातलाच.तरीही मानव रूजलाच शेतीत ! नंतरची यांत्रिक  क्रांती तेव्हा तर असंख्य वेडे वाकडे प्रश्न या कापूसकोंड्याने मानेला झटका देत फेकले .माणूस या सर्वांवर मात करून पुढे जातच राहिला. कापसकोंड्याने मायावी रूप घेतले महायुद्ध केली.अणू बाॅम्ब टाकले. क्षणभर वाटले जिंकला कापूसकोंड्या .त्याने  माणसाला नामोहरम करण्याचा डाव मांडला. तो जिंकलोय असे वाटे पर्यंत माणसाने बाजी उलटवली.

        दोन हजार विसावे साल नेहमीप्रमाणेच आले. आता सरणा-या वर्षांबरोबर आपल्या पृथ्वीवरील  मुक्कामातले एक वर्ष  कमी झाले ही जाणीवच जास्त होते. असो. दूर चीनमध्ये एका प्रांतात विषाणूची साथ  पसरल्याच्या बातम्या येत होत्या पण ते खूssप दूs र चीनमधे होत. त्याचवेळी ठरलेली आमची दुबई ची ट्रिप पण मस्त झाली.तेथे इटली आणि फ्रान्स मधले त्या विषाणूंचे  तांडव  टिव्ही वर बघताना मात्र घशात काहीतरी अडकल्यासारखे होऊ लागले. या दोन्ही देशांत  आमचा मित्र परिवार  विखुरलेला. वर्षांपूर्वीच फ्रान्समधिल थाॅमस घरी राहून गेलेला.त्या सर्वांचीच काळजी वाटू लागली. तरीही अजून दिल्ली बहोत दूर है याच थाटात आम्ही. थोडी धाकधूक, थोडी भीती या मनस्थितीत परत   मायदेशी आलो.

     कापूसकोंड्या इथे दबा धरून बसलाच होता. यावेळी तो अधिकच वृध्द आणि हेकट  झालेला, कमरेत वाकलेला, तो पांढरा फेक कापूसकोंड्या! त्याने वेष बदलला होताच पण नवीन  नावही होत एन् कोव्हिड 19. मग सुरू झाला धुमाकूळ! मग हत्ती आणि चार आंधळ्याच्या गोष्टीसारखच होऊ लागल माणसांच. अनभिज्ञ शत्रू ! कसा आहे ? त्याची कमजोरी काय? काहीच मुळी कळत नव्हत. मानव हरणार?  हत्तीचा पाय चाचपडणा-या आंधळ्यासारखच एखाद्या औषधाला उत्तर म्हणून   या कापूसकोंड्या कडे पाठविले की हा कापूसकोंड्या फिदीफिदी हसायचा'महाभारतातील भीष्म अर्जुन युध्दात जसा शिखंडी मधेच उभा राहून रडीचा डाव खेळत होता तस्साच !हा 'करोना '  माणसाच्या उत्तरापेक्षा  डबल वेगाने आपलेच उत्तर मोडून तोडून आपल्या अंगावर भिरकवू लागला. त्यासाठी वापरलेले प्रत्येक औषध निष्प्रभ होऊन माघारी येऊ लागले.हा कापूसकोंड्या इतका जब-या की लहानपणासारखा आईचा पदरही लपायला मिळेना. शेवटी कापूसकोड्याच जरा कंटाळला. भसाभस येणारे त्याचे ते भेदक प्रश्न कमी होऊ लागले. व्वा आनंदी आनंद. कधी नव्हे तो कापूसकोंड्या  आपणहून गेला. पण कापूसकोंड्याच तो! तो कशाला हार मानेल ?तो कशाला जाईल? विश्रांती  घेऊन, नवीन अधिकच अवघड धारदार   जीवघेण्या प्रश्नासोबत कापूसकोंड्या परत हजर! यावेळचा मूडही वेगळाच.जणू प्रत्येक प्रश्नाला एक तरी माणसाचा बळी हवाच.मुले, तरूण, प्रौढ , म्हातारे सारेच या रणगाड्याखाली चिरडले जाऊ लागले. सारे एकदम त्रस्त.आता कधी एकदाचा  तो जाईल? का  थोडी विश्रांती घेईल आणि परत अनेक पटीने  प्रश्नसमृध्द होऊन येईल छळायला? जणू सा-या मानवजातीला भक्षण करायचा मूड आहे त्याचा.

        अशावेळी  आठवतो महा प्रलयात ही धरा पूर्ण नष्ट होत असताना त्या जीवघेण्या तुफानात उसळत्या अक्राळविक्राळ लाटेंवर स्वार एका पिंपळपानावर पहुडलेला  तोच तो सावळा. बाल कृष्ण!    आपल्या डाव्या पायाचा अंगठा चोखत निवांतपणे त्या लाटांवर हेलकावे खाणारा , गालात  खुदखुदणारा.आपला तारणकर्ता.तेथूनच नवी सुरवात.नवे विश्व , नव्या कल्पना!

     कलियुगात हाच कृष्ण आलाय वेगळ्याच वैज्ञानिक रूपात.कापूसकोंड्या हार मानायला तयार नाही तर कृष्ण आपली शस्त्रे अधिकच पारजतोय.बघू या आपण या  प्रलयातील एक लव्हाळे बनून आपले पाय जमिनीत घट्ट रूतवून! कृष्णाचा जय निश्चित आहे, पण कापूसकोंड्याला लेचापेचा समजायची चूक आता पुन्हा होणे नाही. कापूसकोंड्याच्या गोष्टीला लवकरच विज्ञान बाळकृष्णाच्या मदतीने आपण समाप्त करूया. इती कापूसकोंड्या पुराणं समाप्तम्!