मंगळवार, २३ मार्च, २०२१

टेकडी,डोंगर, पर्वत

 

टेकडी, डोंगर ,पर्वत

मुलांना वाढवताना खर तर मीच नवनवीन गोष्टी  शिकत होते.कित्येक संदर्भाचे खरोखरचे अर्थ लक्षात येत होते.बालकथेतील वाक्यांमधे दडलेले अर्थ मुलांकडून निरागसपणे आले की क्षणभर मला साक्षात्कार  झाल्यासारखं वाटायच. आणि हेच ते युरेका म्हणण्या योग्य आहे असे वाटून जायचे.एकदा माझ्या थोरल्याने जेवणाच्या टेबलावर पाणी सांडले. मी आरडाओरडा करणार इतक्यात त्या पसरट थेंबाकडे बघत तो म्हणाला "आई हा बघ मुंग्यांचा समुद्र" . पाण्याचा तो थेंब मुंगीचा समुद्रच! परत तोच महान साक्षात्कार!परत युरेका युरेका युरेका झाल

  मुलाला नुकतेच थेंब, डबकं, डोह, तळे , सरोवर आणि समुद्र यातील फरक  समजावला होता.त्यानंतर  मुलाला टेकाड ,टेकडी  डोंगर, पर्वत यातील फरक सांगितला आणि ते ओळखणे हा मग आमचा खेळच झाला होता. पण यातून गम्मत  अशी झाली प्रत्येक डोंगर , पर्वत आमचा दोस्त बनून गेला.

      तशी डोंगरांशी नाळ जुळली कोल्हापूरच्या घरात. शाळेत असताना.शेतात असलेलं घर, घरामागे ॠतुंप्रमाणे नटणारा सजणारा नटवा माळ-रान त्या पल्याड पट्टीने आलेल्या रेषेसारखी   हिरवी पोपटी  शेताची रेष त्याही पलीकडे ते दोन डोंगर .खंबीरपणे उभे. नुसते खंबीरराव नाही तर त्याबरोबरच महा नटवे. काय त्यांचा तो नव्या सद-याचा सोस बाई ग बाई! पण कपड्यांच्या रंगाची आवड झकास! अगदी मोरपिसाची जातकुळी सांगणारी. हिरवे, कधी काळे, तर कधी निळसर जांभळे दिसणारे. एका डोंगराचे डोके गायब .कारण त्याच्या रूंद खांद्यावर काहीच नाही एकदम सपाटी . वरचा मजला रिकामा जणू कोणी वर डोक घडवलेच नव्हते.शेजारचा डोंगर मात्र एकदम तगडा आणि मस्तपैकी निमुळती टोकदार टोपी घालून बसलेला.या दोन डोंगराच्या मधून वर येणारे सूर्यबिंब. तेही बिच्चार झोप मोडली म्हणून रागाऊन लाले लाल झालेले.काळपटलेल्या त्या डोंगरांनाही आपल्या संतापात सामील  करून घेत त्यांनाही काही काळ लाल पिवळ्या रंगात बुडवत ते सूर्य बिंब वर चढत असे. दक्षिणायन आणि उत्तरायणात सूर्याची जागा बदलायच्या पण सूर्याचा संताप तोच आणि उकळत्या लाव्हामधे न्हालेले डोंगर तसेच.अनेक वर्षांनी परत कोल्हापूरला गेल्यावर ते दोन डोंगर पहाणे माझ्यासाठी आनंदोत्सव  होता.त्या डोंगरांना पहाताच आजोळी आल्यासारखं मोकळं वाटल.गंमत म्हणजे चिर तारूण्याचा आशिर्वाद मिळाल्यासारखे डोंगर आपले तसेच टवटवीत आणि नटवेपणाही तोच! मी आपली प्रौढत्वाच्या वरच्या पायरीवर उभी आणि हा माझा दोस्त एकदम टकाटक!

  मनात घुसलेला अजून एक सुळका म्हणजे कारवार गावातील सुस्तावलेला डोंगर.भर गावात, हिरवाकंच गुबगुबीत कोट घालून बसलेला ,भरगच्च जेवणानंतर पाय पसरून डुलक्या काढत बसलेल्या पाहुण्यासारखा , मासळी भाताच जेवण तब्येतीन झाल्यासारखा! .आता थोड कलंडायला जागा बघतोय असाच वाटतो तो!. त्याला बघितल्या बघितल्या "झोपा आता थोडावेळ "असे आपसूक ओठावर येते.

               डोंगर निरखता निरखता सहजतेने मनातल्या मनात त्याचं  बारसे होतेच.उतरणीवर भरघोस दाढीसारखी झाडी कुरवाळणारा होतो 'खान चाचा'तर डोक्यावर मस्तपैकी तुळतुळीत चांदोबा मिरवणारा होतो चंद्रवदन!निस्संग झाडीहीन, वस्त्रहीन अर्थातच नागा! 

       चंबळच्या खो-याला तर काय नाव द्याव हेच कळत नाही. अफाट घड्या घालून बसलेले विन्ध्य आरवली.त्या बेलाग, आव्हान देणा-या   घळ्या.या घळ्या कश्या तर एकेका घळीत लपलेल्या हत्तींचाही पलीकडच्या घळीत पत्ताच नाही.डाकूंना या घळ्या का प्रिय हे सहज लक्षात येते.या घळीच्या मोहात आणि जाळ्यात संमोहनाची जादू ठासून भरली आहे.त्याना बघितलं  की चेटूक झालच म्हणून समजा!त्या भुलभलैयामधे तुम्ही गुंतलाच. अक्षरशः वेड करून सोडतात त्या घळ्या अन् ते खोर! पांढरट पिवळ्या धुळकटलेल्या कुठल्याशा क्षीण पोक्त झाडाला कशातरी धरून ठेवलेल्या त्या वळ्या. टपोरे पाऊस थेंब झेलत त्या चेटूकातून फिरावे त्या चिखलात मनसोक्त हुंदडावे अस वाटायला लावणारे ते चंबळच खोर!

         हिमालयाची निळी भूल अशीच! सर्व विचारशक्ती,अहंकार आपसूक त्याच्या पायाशी गळून पडतो. हिमालय एकदम धिरोदात्त बहिरूपी.कधी देवभूमीची निळी शाल पांघरून खळाळत्या नदीतून वेदमंत्र म्हणणारा तर कधी पांढ-या वस्त्रात महा सात्त्विक दिसणारा. सुर्यकिरणात नहाताना सभ्यपणे सोनेरी शाल ओढून घेणारा. कधी कधी तर पूर्ण नित्संग! एकदम सर्व परीत्याग केलेला. उघडा , वस्त्राची चिंधीही नाही पण तरीही डोळे दिपवणारा.ब-याचदा डोक्यावर भली मोठी बर्फाची शिळा ठेऊन  आकाशात घूसुन ढगांबरोबर खेळ मांडलेल्या देवदार वृक्षांना अंगावर मिरवणारा हिमालय. हे गिरीराज , किती वर्णावे तुम्हा? त्याला म्हणावं वाटतं  हे पर्वतराज तुमचे कनेक्शन  एकदम स्वर्गातल्या बाप्पाशी. त्यामुळेच पर्वतराज तुम्ही वाटता दूरस्थ,अप्राप्य पण खूप खूप आदरणीय!

          सातपूडा फार उंच धिप्पाड नाही पण साग, मोह ,बांबू, लिंब यांनी नटलेला. हिवाळ्यात पानगळीनंतर नुसते झाडाचे खराटे घेऊन उभारलेले डोंगर रांगा बघवत नाही पण त्याच वसंत ॠतूमधे बालपल्लवीने शृंगारलेल्या  झाडांवरून नजर हटता हटत नाही.त्यातला साग म्हणजे हत्तीच्या कानासारख्या भल्यामोठ्या पण खरबरीत पानांनी सजलेले. पाढ-या नाजूक फुलांनी डवरणारे तर मोहाचा पुष्प सुगंध भल्या मजल्यांना नादावणारा.उगाच नही ते धिप्पाड गज त्या वासाने धुंद होतात.

        सह्याद्री मात्र लहानपणापासूनच सवंगडी.महा अवखळ पण प्रसंगी धिरोदात्त. वृक्षसंपदा डोंगरभर!त्यात प्रचंड वैविध्य.एक झाड दुस-यासारखे असेल तर शप्पथ! काळ्याभोर कातळाचे सरळसोट कडे थेट ता-यांशी सलगी करणारे.कधी  ढगांचा मफलर मस्तपैकी गुंडाळून बसलेले सुळके. अंबोली सारख्या ठिकाणी डोंगरावर रहाताना  तर धटींगण ढग आपल्या आसपास फिरत हळूच ढुशा मारत पळून जातात. चावट मेले. काही तर दाराच्या खिडकीच्या फटीतून आत शिरून पांघरूण सर्दावतात वर खुदखुदतात.काही डोंगरावरची जंगल पानगळीची तर काही डोंगर सतत हिरव्या पोपटी गर्भ रेशमी कुंचीत लपेटून टाकलेले. सह्याद्रि  म्हणजे अलीबाबाची गुहाच . प्रत्येक डोंगर आगळा वेगळा. डोंगरावरची काही पठार तर मोठ्ठे जादूगारच! उन्हाळ्यात महा आळसटलेले पठार ना त्याला कपड्यांची शुध्द ना बोडकेपणाची.हेच पठार एकदोन पावसात पूर्णतः बदलते.अप्रतिम रंगित फुलांचे कपडे त्यांनी चढवले की एकदम नवरदेवाचे तेज येते पठ्याला. 

        दक्षिणेचा निलगिरीही आगळाच.तेथे सतत हवेत दरवळणारा निलगिरीच्या पानांचा सूक्ष्म  वास  म्हणजे तिथले डोंगर कायम सर्दी  झाल्यासारखे वाटतात.कुठलातरी पर्वत आsss क् छू म्हणून भलीss मोठ्ठी शिंक देईल अस सतत वाटत रहाते. 

        डोंगर दूरूनच साजरे नाही तर जवळ गेल्यावरती गप्पा मारायला उत्सुक असतात. फक्त आपले डोळे आणि कान सजग हवे. हे पर्वत इतिहासाचे साक्षीदार असतात. ते आपले वयोवृद्ध मित्रही होतात.भूतानमधे प्रत्येक हाॅटेलची खासियत म्हणजे खिडकी उघडली की काही फुटांवर हिमालयाची  एक शाखा हजर. अगदी हिमालयाच्या कुशित विसावले पणाचा आनंद! या पर्वत राशींच्या लाडक्या लेकी नद्या बाळलेणी हळूच उतरवून परकरातल्या पोरी होतात. तोच तो अनवट अवखळपणा! नुसत्या पळत असतात वेड्या! त्यांचा तो अफाट जोश बघूनच थकायला होते. तो पर्वत राजही ह्या लेकींना टोकेरी दगड टोचू नये म्हणून अक्षरशः मऊ वाळू आणि गुळगुळीत गोटे या कन्यकांच्या मार्गावर पसरतो. बापाचेच ह्रदय ते!

      जपानचा फुजी तसा ओझरता पाहिला तुफान हिम वर्षाव झालेला त्यामुळे दूरूनच त्याला केला टाटा. परत यायचा वायदा करून . करणार काय? , युरोपमधिल आल्प्स पर्वतांच्या रांगा पण तितक्याच मोहक. सुंदर पाचूची कुरणे त्यातच हिरकणी सारखा लकाकता हिम.अंगाला गोंजरता गोंजरता मधेच बोचकरणारी थंडी आणि ते सौदर्य पान करताना तल्लीन झालेले आपण. हिमालयाचा गंभीरपणा नाही आल्प्सकडे पण विलक्षण टवटवीत, तारूण्याने मुसमुसणारा आहे तो. अझरबैझानच्या आग ओक्या डोंगराची गम्मत वेगळीच. जमीनीखाली अजस्र खनिज तेलाचे साठे त्यामुळे मस्तवाल होऊन तो सतत आगिचे फुत्कार सोडत धगधगतोय. एखाद्या दैत्यासारखा. सतत पेटलेला हा डोंगर खरोखरच एखाद्या पुराणकथेतील दैत्य वाटतो.या उलट अर्मेनायातील अगारटस खर तर सतत आग ओक्या जिवंत ज्वालामुखी.  पण बर्फात लपेटलेला तो आपलासा वाटतो. त्याच दर्शनही प्रसन्न आणि रमणीय.

       असे अनेक पर्वत मनात रूतून बसलेत. तो आपला एतद्देशीय असो वा दूस-या देशीचा! तो आपलाच वाटतो. उगाचच वाटते हा आपलाच तर आहे तो कशाला आपल्याला त्रास देईल?यातील बालीशपणा हास्यास्पद आहे अगदी कबूल पण ------ आपली काळजी त्याला देखिल आहेच की हिच खात्री! तुर्कस्तान देशात आंताकीयात आम्ही उतरलेलो गावाला चिकटून डोंगर !त्यापलीकडून आयसिसने फेकलेले तोफ गोळे, त्यांचा धडामधूड आवाज. सिरीयातून येणा-या बेघरांचे लोंढे. आमच्या घरचे सर्व आम्ही तेथे गेल्याबद्दल वेड्यात काढत होते पण मला मनोमन खात्री होती हा मधे पसरलेलाआडमाप डोंगर आपल्या केसालाही धक्का लावू देणार नाही.आपला दोस्त आहे न तो ! तो दगा देणारेच नाही मुळी. तसेच झाले.आम्ही सुखरूप परत !

            असे टेकाड टेकडी, डोंगर पर्वत मनात रूतलेत अगदी त्यांना चिकटलेल्या घोरपडी सारखेच.या धरेची आन बान शान असलेल्या प्रत्येक पर्वतास त्रिवार वंदन.


.

 

 माझे इतर लेख वाचायचे असल्यास खालील लिंक वापरावी. 

      https://drkiranshrikant.pasaara.com