सोमवार, ११ जुलै, २०२२

माझे आजोबा काका©️

 माझे आजोबा 'काका'


    अरेबियन नाईट्सच्या भूलभुलैया मधे एकदा का मी अडकले की अगदी मधात अडकलेल्या माशीगत अवस्था व्हायची. ते लाल रंगाचे बाईंडिंग केलेले गबदुल पुस्तक,एक पान उलटल्यावर उर्दूतील अक्षरांसारखे लिहीलेले अरेबियन नाईटस त्या अक्षरांच्या मागे असलेल्या चित्रातला हातातील चषकातून सुरईतील पेय पिणारा सुलतान तेही छान पैकी तक्याला रेलून ! शेजारी खालमानेन सुरईतील पेय चषकात ओतणारी चुणचुणीत दिसणारी शहेजादी. मग पानापासून पाने उलटताना तुम्ही सिंदबादच्या जहाजात बसता वादळीवा-यात सापडता. बोट बुडता बुडता नाकातोंडात गेलेले खारेपाणी तुम्हाला जाणवते, पण आपला चतूर आणि चाणाक्ष मित्र सिंदबाद या सर्वातून आपल्याला सहीसलामत बाहेर काढतो. अरेबियन नाईट्स मधिल मला सर्वात हवा हवासा वाटणारा होता अल्लाउद्दीनचा उडता गालीचा. लहानपणी कल्पनेत या उडत्या गालीचावर बसून गणिताच्या पेपरला सूssबाल्या केला आहे. गल्लीतले कुत्रे मागे लागल्यावर गालीचा वरून धूsम ठोकली आहे.  

           या उडत्या गालीचाचा जुळा भाऊ देखिल मी अनुभवला आहे.गालीचाचा हा भावड्या  होता मस्त पलंगाच्या रूपात. काळ्याभोर तुकतुकत्या कांतीचा, चमचमत्या पितळी कड्यांचे आणि मण्यांनी पायाकडे आणि डोक्याकडच्या बाजूला झकास नक्षी केलेली.पलंगावर स्वच्छ बिछायत त्यावर आम्ही आठ दहा नातवंडे बसलोय आणि मस्त पाढ-याधोप उशा पाठीला आधारासाठी घेऊन बसलेले आजोबा. त्यांनी गोष्ट सुरू केली की मग तो पलंग हळू हळू रूप बदलू लागे. आजोबा शिकारीची गोष्ट सांगत तेव्हा तो अजस्त्र पलंग व्हायचा झाडावरचे मचाण. रानाचा ओला  वास,आजूबाजूला भरून राही.मचाणाखाली बांधलेली बकरी सतत तारस्वरात ओरडते आहे हे  जाणवायच. आवाज करू नकारे! खुणेनेच आजोबा सांगायचे. बिचुकली भावंडे डोळे घट्ट मिटून घेत.आम्ही जरा मोठी भावंडे एकमेकांचे हात घट्ट धरत असू. वाघाची डरकाळी, खsसफsस . कडामकडाम असे सगळे आवाज  येत. त्या मचाणावर बसल्याबसल्या घशाला कोरड पडलेली असे इतक्यात आज्जीचा चिरपरिचित आवाज खोलीत घुमे.मचाण परत पलंग रूपात जाई. मग तो पलंग सभ्य तुकतुकीत चेह-याने हळूच घाम पुसे."झाल्या का तुमच्या गोष्टी सांगणे सुरु?" अहो या मुलांची जेवायची वेळ झालीय. काय बै नादिष्ट पणा! जरा सुट्टीला आजोळी आली नै पोर, तोच पकडलत त्यांना?" आता कुठलेच अपिल नसे. आमची जेवण झाली आणि घरातल्या समस्त बाया जेवायला बसल्या की खात्री असायची आता एक तास निश्चितपणे आपलाच. माहेरवाशीण, सासुरवाशीण या सर्वांचा तो गोतावळा आपापली सुख दुःख जेवणातील पदार्थांबरोबर एकमेकांना वाटत ही जेवण करत. आम्हा मुलांना मात्र तेथे थारा नसे. जरा आम्ही रेंगाळतेय अस वाटताच आज्जी ओरडायची, " झाली न जेवण आता इथ फिरकायच नाही" मग आमचा मोर्चा परत आजोबांच्या भल्या मोठ्या पलंगावर गोष्ट ऐकायला जाई.

      आजोळच्या आठवणीतले असे अनेक सुखद क्षण! आजोबा त्यांना आम्ही म्हणत असू काका! इंदोरमधील प्रसिद्ध वकील! राजवाडा वाटावा असा प्रशस्त महाल. मोठ्या खोल्या. बैठकीच्या खोलीत तर चारी भिंतीवर लावलेले बिलोरी आरसे आणि त्यात दिसणारी आमची असंख्य प्रतिबिंब! सारेच अद्भुत.  काकांची खोली तर अलिबाबाची गुहाच वाटायची. मोठा पलंग त्यावर दुधपांढरी चादर, तक्के लोड.कडेला दोन मोठ्ठीच्या मोठ्ठी आरसा दारावर मिरवणारी कुट्ट काळी कपाटे.ती उघडली की जणू बालकृष्णाने आssकरून दिलेल्या विश्वरूप दर्शनाहून वेगळे नसायचेच.अनेक बंदुका आणि तलवारी दाराच्या आतल्या बाजूला अडकवल्या असत. काकांना शिकारीची आवड होती. आपली पाच सहा मुले आणि घरात असलेल्या पाहुण्यांची मुले अस भलतच मोठ्ठ लटांबर घेऊन आजोबा शिकारीला जात. माझी आई त्या कथा वर्णन करून सांगायची. कसली शिकार अन कसले काय! खरतर सर्व बच्चे कंपनीची ती पिकनिक असायची. झाडावर चढण, नदीत पोहणे, खेळ या सगळ्याला पूर्ण मुभा असायची.बरोबर नेलेल्या शिध्याचे झकास जेवण बनायचे आणि शिकार न करताच जंगलातील वातावरणाची चुणूक मुलांना दाखवून आजोबा परत येत. हात हलवत आलेल्या आजोबाना बघून आज्जी कसबस हसू आवरत असे.काकांच्या खोलीत त्यांच्या कारकूनास बसण्यासाठी एक बसके मेज असे. ते ठेवल असे जमीनीवर हंथरलेल्या सतरंजी समोर.जवळच पक्षकारांना बसायला खुर्च्या.त्याही चकचकीत लाकडी. पक्षकार या शब्दाच  आम्हा पोरांना भारी अप्रूप वाटायच. खोलीला महिरपीने  सजलेल्या खिडक्या आणि कोप-यात रेडिओ. 

     सावळे, थोड टक्कल पडलेले मध्यम उंचीचे आणि मध्यम चणीचे काका! डोळ्यावरचा चष्मा पुसत हस-या डोळ्यांनी आमच्याकडे बघत.त्यांच्या किंचित तपकीरी बुबूळांना पडलेले नीळसर रिंगण स्पष्ट दिसे. त्यावेळेस ते आजोबा वाटायचेच नाही. वाटायचे पक्के दोस्त आहेत आपले.काळ्या फ्रेमचा चष्मा लावल्यावर मात्र ते एकदम आजोबा रुपात जात. कट्टी केलेल्या मित्रासारखे वाटत,मग समोर सतरंजीवर बसलेल्या दिवाणजींना अगम्य भाषेत काहीतरी सांगू लागत मग माझी चुळबूळ सुरू होई .ते कोणीतरी वेगळेच वाटू लागायचे. परत चष्मा काढून आजोबा आमच्याकडे बघत आहेत असे आम्हाला  वाटे पण त्यांचे आमच्याकडे लक्षच नसे. आमच्यातून आरपार ते कुठेतरी दूरवर बघत दिवाणजींना पुढील सुचना देत. इतर वेळी त्यांच्या पलंगावर धुडगूस घालणारी आमची पिलावळ मात्र एखाद्या खेळण्याची दिलेली चावी संपल्यावर जशी अवस्था होते तसे शांतपणे बसून त्यांच्याकडे बघत बसलेले असू.

         सकाळी काका कधी उठत कोण जाणे? पण झोपलेली नातवंडे बघून ते बेचैन होत आणि त्यांच्या फे-या सुरू होत.त्यानंतर ते म्हणत " लब्बाडांनो उठा.  तो बुलबुल सुध्दा झाडावर आला. तो सूर्य देवही खिडकीतून डोकावतो आहे .चला उठा बर लब्बाडांनो" ही सगळी वाक्य आजीने ऐकू नाही म्हणून पुरेपूर काळजी त्यांनी घेतलेली असे.

         आजोबांनाही मित्र असतात हे सहा सात वर्षाच्या मला कळले आणि काका अधिकच आवडू लागले.कारण हे सर्व घरी येणारे मित्रआजोबा एकदमच भारी असत. दंगा काय करायचे जोरजोरात हसायचे काय.आज वाटते हा प्रत्येक मित्र शोधनिबंधाचा स्वतंत्र विषय सहज होईल.काळा कोट घालणारे शिर्के आजोबा, विचित्र शिंका देणारे फडणीस आजोबा. आणि अजून कितीतरी. साध्या भुईमुगाच्या ओल्या शेंगा उकडल्या तरी ह्या सर्व मित्रांना काका बोलवत. सर्वांचे बंगले आसपासच ! सारे लगेच हजर.! कोंडाळ करून सारे बसले की आतवर मिठ मुरलेल्या छान पैकी उकडलेल्या शेंगा परातीत भरभरून येत. कधी कधी बाहेर पडणारा पाऊसही या कोंडाळ्यात सामिल होण्यासाठी हजेरी लावी. खोखो हसणे आणि गप्पा रंगत असतानाच कडेच्या कागदावर टरफलांचा ढिग हिमालयाशी स्पर्धा करण्या इतका उंच होई. शिर्के काका मग उठत आणि त्या  टरफलांवर शब्दशः नाचत.  आणि हे नाचकाम कशासाठी तर एखादी शेंग चुकून टरफलात गेली आहे का ते बघायला. त्या मधे अनवधानाने गेलेली शेंग मिळाली की गुलबकावलीचे फुल मिळाल्यासारखे ते खुश होत. ती शेंग फडकवत ओरडत. "वकीला मिळाली रे शेंग."मग परत हास्याचे मजले वर वर चढायचे. खरतर हावरटपणा आमची आखत्यारी पण यांच्यापुढे आम्ही एकदम बिगरीतच. खाऊ घालणे हा काकांचा आवडता छंद. साक्षात अन्नपूर्णा असलेली आज्जी हा उपाताप आवडीने करी. काकांचे मित्र आले तरी आम्हाला कोणताही मज्जाव नसे.नकळत छोट्या गोष्टीतही केवढा आनंद असतो हे आम्ही शिकत होतो.

      आयुष्यात   एकदाच आजीला न विचारता पहिल्यांदाच आणि शेवटची मोठी खरेदी काकांनी केली ती म्हणजे सेकंड हॅन्ड कार त्यांनी घेतली.त्याकाळी इंदोरमधे एका हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्याही मोटरी नव्हत्या. आपली आठ मुले आणि घरी असलेल्या पाहुण्यांची मुले या गाडीत कसे बसवायचे ते काकाच जाणे. ती गाडी वारंवार बंद पडू लागली मग सर्व टुल्लर गाडीतून उतरून  ती गाडी ढकलत बसायची.शेवटी ती गाडी विकली तेव्हा कुठे आजीच खुदूखुदू हसण थांबल.

        आजोबा काळा कोट घालून कोर्टात जात. जाता जाता स्वयंपाकघराच्या दिशेने हात जोडत हा नमस्कार अगदी मनोमन असे. तो त्यांच्या गृहलक्ष्मीसाठी असे की देवघरातील देवांना हे कोड कधीच उलगडले नाही. कारण इतर वेळी आजोबांना देवाधर्माचे स्तोम माजवताना कधीच कोणी बघितले नाही. पण कोणालाही मदत करायला आजोबा कायम पुढे. नोकरी नसलेले, कामाच्या शोधात आलेल्या कित्येकांनी सहासहा महीने आजोबांचा पाहूणचार घेतला आहे. कदाचित महादारीद्र्यातून स्वकर्तृत्वावर मिळवलेल्या लक्ष्मीने त्यांचे पाय जमीनीवर ठेवले.कुणीही गरजू, नोकरीच्या शोधात आलेला महीनेन महीने आपल्या कुटुंबकबिल्या सहीत रहात असे. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही इंदोरला गेल्यावर एखाद तरी असे कुटूंब आजोबांच्या घरी असेच.त्यांची मुले आजोबांना म्हणत काका! मग काय आमचेही ते काकाच झाले. कोण कुठल्या ना नात्याच्या ना गोत्याच्या  मुलांशी आमची एवढी गट्टी होई की आम्ही परत सुट्टी संपल्यावर आमच्या घरी निघालो की आमच्या बरोबर तेही रडू लागत.

     आज्जीच्या हुशारीचे आजोबांना भारी कौतूक. तिसरी पास आज्जीला त्यांनी इंग्रजी शिकवले आणि आजीने ते आत्मसातही केले. आज्जी इंग्रजी कादंब-याही वाचू लागली. आज्जीच्या हुशारी इतकीच अर्थात काकांची चिकाटी आणि ईच्छाशक्ती दांडगी होती. 

       उत्कृष्ट वकील म्हणून त्यांचा झालेला सत्कारही मला अजून आठवतोय. त्यांची सर्व  मुले, सुना, मुली जावई जातीनं सा-यांची देखभाल करत होते.जणू सर्व समभावाचा काकांनी घालून दिलेला धडा ते तंतोतंत गिरवत होते.

      काका विचारांनीही काळाच्या पन्नासवर्षे तरी पुढे होते.म्हणूनच त्या स्वातंत्र्यपूर्व काळात त्यानी मावशीला वैद्यकीय शिक्षणासाठी दिल्लीला पाठवले आणि आपल्या या मुलीसाठी परजातीतील हुशार पंजाबी वर शोधला.सर्व मुले उच्चशिक्षित झाली.

    आजोबांच्या तब्येतीच्या कुरबुरी सुरू झाल्या . त्याच वेळी   घरटे सोडून एकेक जण हळूहळू दूर जाऊ लागले. एकामागे एक मित्रही पैलतीरी जाऊ लागले. त्यांच ते घरभर घुमणारे हास्य विनोद आता भूतकाळात गेले.वकीली बंद केल्याने पक्षकाराची वर्दळ मंदावली. त्या प्रचंड मोठ्या घरात आता उरले फक्त आजी आजोबा. सुट्टीत सर्व मुले जमायची तेवढीच जाग त्या घरात असे. इतरवेळी घरात मिणमिण करणारा पिवळा दिवा त्या घरालाही अधिकच वार्धक्य  प्रदान करी.रसरसलेली ती जीवंत  वास्तुही आजारी थकली भागलेली वाटू लागली. इंदोरला रहाणारी डाॅक्टर मावशी आणि मावसोबा मात्र सतत काळजी घेत.

       आमच्या शाळा,अभ्यास,या सर्वात आजोळी जाणे दर वर्षाच्या ऐवजी दोन वर्षांनी होऊ लागले.दोन वर्षांनी आम्ही गेलो तेव्हा हार्ट अ‍ॅटॅक येऊन गेल्यामुळे काका जीना उतरून खाली आलेच नाहीत. तो भला थोरला जादूई पलंग तसाच होता पण आकसल्या सारखा वाटला. त्याच्यातील सर्व जादू कुणी दुष्ट जादूगाराने जणू शोषून घेतली होती. पांढरी शुभ्र चादर आता पिवळ्या रंगाकडे झुकली होती पूर्वी सफई असलेली चादर आता  काकांच्या चेह-यावरील सुरकुत्यांशी स्पर्धा करत होती.माझे हुश्शार  काका आता खरोखरच थकले होते पण अशा अवस्थेत ते आम्रपालीच्या जीवनावर कादंबरी लिहीत  होते. हौसेने आमच्यासाठी खास इंदोरी मिठाया मागवत होते.एवढी खाण्याची आवड पण कसाबसा एखादा फुलका ते खात होते .त्यांचा लाडका भात वर्ज! हातावर , पोटावर आता मऊमऊ साईची कातडी होती. शिकारीच्या गोष्टी मात्र तितक्याच उत्साहाने सांगत होते . यावेळी आजी काहीच बोलत नव्हती उलट ती देखिल ऐकत बसत होती.

       इंदोरहून निघताना पाऊल उचलत नव्हते. मनावर जणू कुट्ट काळी सावली पडली होती.खाली फाटका पर्यंत जाऊन मागे वळून  पाहिले खिडकीच्या महिरपी मधे काका उभे होते.एकटक आमच्याकडे पहात! अशक्त, पांढ-या केसांचे.खरच सांगते त्यावेळी असे वाटले नको ती शाळा बिळा. काकांना सोडून कुठेच जाऊ नये.वहात्या डोळ्यांना काका अधिकच अंधूक दिसत होते. इंदोर ते सांगली हा सर्व प्रवास मी रडतच केला.एवढ रडू का येतय हेच कळत नव्हते. दोन महिन्यांत काका गेले. घरी आलेली तार आणि त्यानंतर आईचे हमसाहमशी रडणे कायम मनावर उमटले आहे.

       काका गेले ते आजीला छानसे मृत्यूपत्र लिहूनच. त्यात आजीबद्दल नुसती आत्मियता नव्हती तर ओथंबलेली कृतद्यता होती.

       काका गेले असे कसे म्हणू? त्यांनी दिलेला सर्व समभावाचा प्राणवायू आमच्या धमन्यांतून वहात आहे त्यामुळेच बहुधा धर्म,  जात यापलीकडे माणूस बघायला आम्ही शिकत आहोत.ही प्रक्रिया चालूच आहे आणि आमच योग्य वागण म्हणजेच काकांचे इथे राहणे.त्यामुळे ते नुसते आजोबा नाही तर पथदर्शक गुरू आहेत.

      डाॅ. किरण पाटणकर