शुक्रवार, ११ डिसेंबर, २०२०

निरोप©️

 




2020 ,अगदी तप्त लोखंडाचा डाग -डागल्यासारखा हे वर्ष!. कित्येकांचे आधारवड कोसळले ते याच वर्षात.मृत्यु सर्वसमभाव या भावनेने प्रेरित होऊन त्याची दांडगट आणि दणकट पावले टाकत येतो.त्या खाली कोण चिरडतय याचे सोयर सुतक न ठेवता! सर्वात जास्त वाईट वाटत ते कित्येंकांना आपल्या जिवलगांचा निरोपही घेता आला नाही.आयुष्यभरासाठी सहजीवनाचे दिलेले वचन हवेतच विरून गेले. अंतीम संस्कारही किंवा दर्शनही त्यांच्या नशिबी  नव्हते.विचार केला तरी मनावर मळभ येते.खोलवर ओरखडे उठतात.


             निरोप


वडिलांची बदलीची नोकरी त्यामुळे जरा कुठे रूजून फुलतोय तोच तिथून हलावे लागायचे. अगदी लहानपणी म्हणजे अगदी प्राथमीक शाळेपर्यंत त्याचे विशेष वाटत नसे कारण आई बाबा जिथं आहेत तिथेच आनंदाचा ठेवा असायचा. पुढे शाळा , मैत्रीणींना सोडून जायचं म्हणजे नकोस वाटू लागल.मग परत परत शाळेतल्या आवडत्या जागी जाऊन बसणे तो परिसर नजरेत साठवणे असले त्या वयाला साजेसे प्रकार केले जायचे.पण एक मात्र खरे मैत्रिणीचा हात घट्ट पकडून अश्रू पात झाला की निरोप घेणं झाल. शब्दांची गरजच नसायची. तरीही  हा निरोप घेणं पुढच्या मुक्कामापर्यत छानपैकी पुरायचा.

    शालेय अंतीम वर्षातही निरोप देणे घेणे म्हणजे मोठ्ठा सोहळाच. माझ्यावेळी अकरावी होती. सेंड ऑफच्या दिवशी आईची साडी तिचाच ब्लाऊज टाचून  चढवला,मनगटावर आईचे किंवा मोठ्या बहिणीचे घड्याळ लावले  की मग एकदम मोठ्ठं झाल्याची जाणीव व्हायची. पोटात घट्टघट्ट आवळल्यासारख काहीतरी व्हायचं. मग शाळेत सर आणि बाई छानस भाषण करीत. आशिर्वाद देत मग रडायलाच यायचं तेव्हा पण काॅलेजमधे जाईपर्यंत  शाळेचे उबदार वातावरण भोवती आहे असेच वाटायच ते केवळ असा छानसा निरोप घेतल्यामुळे.  

         लग्नात व्याकुळलेल्या आईबाबांनी   जेव्हा पाठीवर हात ठेऊन निरोप घेतला तेव्हा झपकन् जाणीव झाली एका मोठ्या स्थित्यंतराची. पण तो डोळ्यांनी घेतलेला निरोप , डोक्यावरून हात फिरवून घेतलेला निरोप सासरी रूळेपर्यंत छानपैकी आजूबाजूला होता.

       माझा थोरला शाळेत जायला तेव्हा लागला तेव्हा मजाच झाली . त्याचा निरोप घ्यायचा राहीला आणि स्वारीचे रडण थांबेना. लक्षात येताच त्याला सांगितल की तू वर्गातून बाहेर येशील तेव्हा या झाडाखाली मी नक्की असेन गंमत म्हणजे रडू गायब!

       रोज तो आदित्यनारायणही आपला निरोप घेतो. डौलदारपणे केसरीया खेळत दूर क्षितीजावर नीळ्यासागरात किंवा डोंगराच्या मागे हळूच जातो.जाताना सांगतो सकाळी भेटू या .नक्की! शब्दांचा एकदम पक्का बर!पहाटेच स्वारी हजर!

       शिशिर ॠतुंच्या थंड वा-यांच्या भडीमाराने चाफ्याचे एक एक पान गा-या गा-या भिंगो-या खेळत मातीला मिळते पण झाडाचा हळूवार निरोप घेऊनच !. झाड बिचारे एकदम भुंडे भुंडे दिसत असतानाच वसंतॠतूची तजेलदार , उबदार झुळूक येते आणि निरोप घेऊन पडलेली पाने चमकदार पांढ-या पिवळ्या काळ्यांच्या रूपाने चाफ्याचे रूप खुलवतात.

       प्रिय प्रिय रसिकजनहो आज मी निरोपाचे आख्यान लावलंय त्यामुळे  तुम्ही ओळखले असेलच हा पसारा आवरायचा शेवटचा शुक्रवार! गेले नऊ महिने हा आठवणींचा पसारा आवरते आहे.तुमच्या कडून कौतुकाची थाप घेतल्यावर नेहमीच जीव कसा पाणीदार मोती बनायचा मग तो आठवणीच्या मखमली पेटीत बंद व्हायचा.. तुमच्या मुळे असे अनेक सुंदर मोती जमा झालेत माझ्याकडे. ती एक झिंग होती. आठवणी ज्या इतस्थतः पसरल्या आहेत त्या अधिक विस्कटू न देता आवरायच्या, तुमच्यासह परत अनुभवायच्या. दुःखद आठवणी तुम्हाबरोबर चिमणीच्या दाताने तोडलेल्या घासासारख्या वाटून घेताना झाल्या गोड गोड खाऊ!   आणि सुखद आठवणीं तुमच्यासमवेत आवरताना तर मनमोर मचाये शोर अशी अवस्था झाली.पण आता थांबवते पसारा आवरणे.आपल्यासारख्या रसिकांना परत एक छानसा नमस्कार. 

      जर कधी जाताना 'मी जाते' अस म्हंटले तर आज्जी खूप रागवायची. जाताना 'येते' म्हणावं ही तिची शिकवण! येते म्हण म्हणजे आपोआप वास्तू बोलवून घेते ही तिची पक्की समजूत.त्यामुळे आज तुमचा निरोप घेताना मीही 'येते' असेच म्हणणार आहे.

       या आठवणींच्या पसा-यात  अजून थोड्या आठवणी मिसळून पुस्तक रुपाने आपल्याला भेटायला येईनच तोवर नमस्कार, धन्यवाद, फिर मिलेंगे!

.



       माझे इतर ब्लॉग्स वाचण्यासाठी खालील लिंक वापरावी

https://drkiranshrikant.pasaara.com

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०

सर्कस ©️

 



           कधी कधी छान सुरळीत चालणा-या आयुष्यात सहज कोणी तरी येत, आणि अचानक मानबिंदू  डिवचून जातो.अशा वेळी डिवचली गेलेली व्यक्ती हातपाय तरी गाळते किंवा विजेच्या चपळाईने नागासारखा फणा काढून फुत्कारते.गंमत म्हणजे या अरे ला कारे म्हणताना ब-याचदा नकळत नवा इतिहास लिहिला जात असतो.

       आमच्या पिढीच्या आणि नंतरही अनेक वर्षे मुलांच्या भावविश्वाचा एक महत्वाचाचा भाग असलेल्या 'सर्कस'चा जन्म साधारण असाच आहे. दीडशे वर्षांपुर्वी  कुरूंदवाड नामक संस्थानातील  घोड्यांना ट्रेनिंग देणारे विष्णूपंत छत्रे त्यांच्या महाराजां सह इटालियन सर्कस बघायला  जातात काय आणि तिथल्या इटालियन सर्कस व्यवस्थापकाचे ,"भारतीय लोक हे कसरतीचे प्रकार कधीच शिकू शकणार नाही" ही दर्पोक्ती   ऐकतात काय आणि मग अक्षरशः तीन महिन्यात प्रयत्न  करून परिपूर्ण ग्रेट इंडियन सर्कसचा जन्म होतो काय!सगळेच अतर्क्य! सर्कशीच्या भारतातील जन्माची ही चित्तरकथा .आज एकेकाळी अतिप्रिय असलेल्या सर्कसच्या आठवणींचा पसारा आवरणार आहे.




                          सर्कस ©️


        मी प्राथमिक शाळेत असताना घरी कामासाठी आलेल्या पद्माबाईंनी आल्या आल्या माझ मन जिंकलं. सर्व  काम आटोपल्यावर हळूच माझ्याजवळ  येऊन म्हणाल्या "ताई गंमत दावू काय?" माझ्या प्रश्नार्थक  चेह-याकडे बघून म्हणाल्या. "जावा पटकन चार कांदे आणा मग दावते." मी टोपलीतले कांदे तिच्या  हातात ठेवले. एक दोन क्षण तिने अजमास घेतला आणि मस्तपैकी जगलींग सुरू केले. एकामागे एकेक कांदा पटापट वर जात होता आणि हातात येत होता. "अग सर्कस मधे बघितल ग मी" मग पद्माबाई सहजतेने म्हणाली "ताई इतके दिवस सर्कस मधेच होतो मी". ज्या सर्कस मधल्या त्या कलाकारांचे त्या काळी मला प्रचंड वेड होते, त्यातली एक आमच्याकडे काम करतेय?. व्वा ! आजघडीला  अमिताभ बच्चन घरी आल्यावर जेवढा आनंद होईल तेवढाच आनंद त्या वयात मला झाला. 

         लहानपणी सर्कस  बघून आल्यावर नेहमीच मला 'सर्कसबाधा' व्हायची. मग कुठे कसरत करत कमान घालायचा यत्न करा किंवा सायकल दोन्ही हात सोडून चालव हे प्रकार या वेडापोटी मी करायची आणि  कोपर आणि ढोपर सणसणीत फोडून घ्यायची. वर रागवण्याची झणझणीत फोडणी असायचीच.पण हे वेड काही कमी होईना.शाळेत बाईंना जेव्हा मोठेपणी मी सर्कशीत जाणार म्हणून सांगितले तेव्हा आमच्या बाई पण खुसखुस  हसल्या होत्या.

           त्या काळात सर्कशीची ऐटच एकदम भारी होती.आधी शहरभर लागायची पोस्टर्स. त्यावर लाल नाकाचा जोकर आणि रबरासारखी लवचिक मुलगी असायचीच. कधी भल्या मोठ्या जबड्याचा हिप्पो आsss वासून उभा असायचा . अधाशासारखे परत परत ते पोस्टर पाहिले जायचे. नंतर नदीवर पाणी प्यायला जाणारे हत्ती दिसायचे. त्यांना दूरून डोळाभर पाहिल्यावर घरी आईबाबांजवळ सर्कशीला नेण्यासाठी भुणभुण सुरू व्हायची. तोवर वर्गातल्या सर्कस बघून आलेल्या मुली करायच्या रंगभरीत आणि रसभरित  वर्णन. आता कधी एकदा सर्कसला जातोय असे व्हायचे.

           अखेर तो दिवस यायचा.मग तो सोहळा सुरू होई. हो सर्कस  बघायची म्हणजे एक सोहळा असे. बहुधा रविवारच असे.सकाळ पासून वेध लागायचे सर्कशीचे! छान कपडे घालून आम्ही त्या मोठ्याच्या मोठ्या सर्कसच्या तंबूपर्यत गेल्यावर आपसूक नजर जायची तेथे जाडजूड साखळ्यांनी बांधलेल्या सतत डुलत असलेल्या आणि सोंडेने समोरच्या गवतात उगाचच उचकापाचक करणा-या गजराजांवर.एवढूशी साखळी अन भला मोठा हत्ती एकदम चूकीची जोडी जुळल्यासारख वाटायच्या. पलीकडेच तरतरीत घोडे असत. मस्त, तगडे , काळे, पांढरे ,तपकीरी! एक विशिष्ट नकोसा वास तिथे असे. वाघोबाच्या पिंज-याजवळ तर तो अधिकच येई. तोवर तिकीट काढलेली असत. मग त्या जादूई नगरीत प्रवेश!

          आत असलेले मोठे वर्तुळ,त्याच्या कडेला अर्धवर्तुळाकर खुर्च्या,त्यामागे लाकडांच्या फळ्यांची ल.सा.वि काढल्यासारखी उतरत जाणारी बैठक.आम्ही बहुधा त्या लाकडी फळ्यांवर असायचो.माझ्या वयाच्याच  मुलामुलींनी बैठक भरून जायची. तिथ असायचा असीम आनंद ,उत्साह  आणि उत्सुकता! अखेर बँडचे सुर घुमू लागायचे आणि मग एकामागोमाग एक अद्भुत दुनिया की सफर सुरू व्हायची.चमकदार कपडे, लयबद्ध  हालचाली आणि बॅन्डची झकास सुरावट! प्राण्यांच्या कसरती. काय काय बघाव अस व्हायच. इतक छान वाटायच न तेव्हा.जोकर तर सगळ्यांचा लाडका.त्याची ती पिचलेली लाकडी बॅट आणि निसटणारा पायजमा बघून हसून हसून खाली पडायची वेळ यायची. तो भला मोठ्ठा लदडा हिप्पो आणि त्याबरोबर डौलात येणारी सुंदरी, तिन त्याला नुसतं डिवचलकी अनंत ब्रम्हांडाचे दर्शन तो आsss वासून देत असे आणि हे थोडके समजून ती सुंदरी त्या तोंडात डोके खुपसून त्या परमात्म्याचे दर्शन घेत असे. बापरे sssबाप! शेवटी झुल्यावरचे कसरतीचे प्रकार.ते मात्र मला आवडायचे नाहीत. खाली जाळी लावुन मी पण करेन कि हे सगळ! अशा अवास्तव कल्पनाच जास्त असत मनात. मग चालत्या घोड्यावर चढून आपण घोड्यावर उभे आहोत किंवा ती एक चाकी सायकल मी चालविते आहे ही दिवास्वप्न बघायला मी मोकळी.

      प्राथमिक शाळा संपली.हायस्कूल सुरू झाले. आवडी बदलल्या.ती निरागसता ,भाबडेपण इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून जमिन दिसावी तसे आता दूरवर दिसत होते. सर्कसपेक्षा इतर व्यवधान वाढले होते. सर्कस  आता सोहळा  न रहाता एक साधा कार्यक्रम झाला होता.आता मैत्रींणींबरोबर मजा म्हणून सर्कसला जातही होते पर उसमे'वो' बात नही थी! आता जोकरच्या विनोदाला गडबडला लोळण्यासारख हसणं नव्हत तर फक्त खुदुखुदू हसू येत होत.तरीही तो माहौल अजूनही खूप जवळचा, खूप ओळखीचा आणि आपलासा वाटत असे. सर्कस पाहिल्यावर होणारी सर्कसबाधा  या वाढत्या वयाच्या उता-याने आटोक्यात आली होती.

       काॅलेजमधे तर सर्कस  कधी आली आणि गेली हेच मुळी  कळायचं नाही.मेडिकलला गेल्यावर अकाॅनड्रोप्लेजीया या जन्मजात आजाराबद्दल शिकले आणि बहूतेक जोकर या आजाराने ग्रस्त असतात हे कळल्यावर तर खरोखर माझे ते हास्य आठवून अपराधी वाटू लागले. स्वाभिमानाने व्यंगावर मात करून सर्वांची करमणूक करणा-या जोकरबद्दल कौतूक,आदर वाटायला लागला.

         सर्कसशी फारकत झाली होती.  दिवस इतके चपळ झाले होते की सर्कस प्रेम मी विसरलेच होते. आई ही पदवी मिळाल्यावर मात्र माझ्या चार वर्षाच्या मुलाने जेव्हा  सर्कसचा तंबू बघून जायचा हट्ट सुरू केला तेव्हा जाणवले वर्तुळ आता पूर्ण झालय. परत माझ्या लहानपणीची झलक अनुभवायला मिळणार! मुलाबरोबर सर्कसला जायचा दिवस ठरला पण ठरल्याप्रमाणे आम्ही गेलोच नाही.म्हणजे त्याच अस झाल. सर्कसचा तंबू होता माझ्या घराच्या अगदी जवळ.!सर्कसमधे कसरतीचे काम करणा-या तीन मुली आजारी पडल्या आणि जवळचा बालरोगतज्ञ म्हणून माझ्याकडे तपासणीसाठी आणल्या.मग हळूहळू रोज एक दोन येतच राहिल्या.  हा ओघ चालूच राहिला.

         त्या मुलींबरोपर गप्पा पण होत आणि एक छानसा बंध पण तयार झाला. त्या गप्पात त्या मुलींच्या कष्टांची खरोखरच जाणीव झाली.सर्वजणी आर्थिकदृष्ट्या निम्नस्तरीय. ब-याचशा दाक्षिणात्य! त्या सर्वांची काळजीही खूप छान घेतली जायची. अगदी सर्कस मधे या छोट्या मुली पडू नये म्हणून घेतली जाते नं तशीच!. मुलींनीही सर्कसलाच आपले घर मानलेले.

      मग आम्हा सर्वांना खास आमंत्रण आले सर्कस बघायचे! तिथे पहिल्या रांगेत आमच्या खुर्च्या राखीव.खास सरबराई!आतापर्यंत सर्कसने मला जो भरभरुन आनंद दिला होता त्याची उतराई म्हणून त्यांना तिकीटांचे पैसे घ्यायलाच लावले. कार्यक्रम सुरू झाला पण माझे लक्ष होत आजूबाजूच्या नटून आलेल्या बालगोपांलाकडे. त्यांच्या हसण्यात परत एकदा आम्हीही आमच्या बालपणात मनसोक्त भ्रमण केल.मुले लहान होती तोवर नियमित त्यांना सर्कसला नेतच होतो आणि परत एकदा त्यांच्या नजरेतून सर्कस बघताना सानुकले होत होतो

          पुढेपुढे सरकारी नियम बदलू लागले. सर्कशीत प्राणी ठेवण्यावरच नियंत्रण आले. सर्कसचे एक महत्वाचे अंग जणू लूळे झाले होते. सर्कशीत सिनेमाच्या गाण्यावर नृत्य सुरू झाले.त्या कसरती योग्य कपड्यांना बघून कोणी छछोर शिट्टी मारू लागले. ती शिट्टी माझ्यासाठी शेवटची काडी होती. मुलांनाही सर्कस पेक्षा व्हिडिओ गेम अधिक आवडू लागले. सर्कसची कबर जवळजवळ पूर्ण होत आली होती. शेवटची माती पडली ती करोनाची. कलाकार देशोधडीला  लागले.

          युरोपमधे रोमन साम्राज्यात सर्कसचा उल्लेख आहे. नंतर अठराव्या शतकात ब्रिटनमधे सुरु झालेली सर्कस  एकोणीसाव्या  शतकात छत्रेंच्या अथक प्रयत्नांनी भारतात आली. एक सकस करमणूकीचे माध्यम म्हणून!. अनेक वर्षे तिने निर्भेळ आनंद दिला. त्यातील शिस्त, कसदार शरिरचापल्य या सर्वांचे खूप कौतूकही झाले पण नवनवीन करमणूकीची साधने येतच होती त्या रेट्यात सर्कस  मागे ढकलली जाऊ लागली.आज आपल्याकडे तरी ती नामषेश झाल्यात जमा आहे. सर्कसचे ते झळाळलेले दिवस आणि आजचे झाकोळलेले दिवस----विचार केला तरी घशात अडकल्यासारखे होते आणि डोळे चुरचुरतात.

     


माझे इतर लेख वाचायचे असल्यास खालील लिंक वापरावी 

https://drkiranshrikant.pasaara.com