बुधवार, १२ मे, २०२१

धावपटू पक्वान्नं ©️

                     धावपटू पक्वान्नं©️


खर तर माझा जन्म खाऊन पिऊन सुखी असलेल्या घरातला.त्या काळातील सर्वच मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे अवांतर पैसा घरात कधीच  नसायचा पण एकच वेळचे जेवण मिळेल अशीही अवस्था  नसायची.दोन्ही वेळेला व्यवस्थित  जेवण आणि सणासुदीला  गोडधोड म्हणजेच खाऊन पिऊन सुखी. आर्थिक विवंचना कितीही असल्या तरी भरलेले ताट समोर यायचे. शिक्षणही चालू होते.

       तेव्हा पक्वान्न व्हायची ती सणासुदीला. सणांचा दिवस. नव्या कपड्यांचा, सुट्टीचा, प्रचंड आनंद ,त्यातच गोडाधोडाचे जेवण. मग हळू हळू लक्षात यायला लागले या पक्वानांची चव हेच मुख्य नाही तर ही सर्वच पक्वान्न उत्कृष्ट धावपटूही  आहेत.म्हणजे अस बघा पोटात गेल्यावर या पक्वान्नांनी गुपचूप अतड्यातून प्रवास करावा ना? पण हे धावपटू बाया आणि गडी पक्वान्न निघते पोटातून डोळ्याकडे आणि काही काही वेळा थेट मेंदूत.डोळ्यात शिरून डोळे गपगार मिटले की ही पक्वान्न जिंकलीच.

                लहानपणी   आजी घरी असली म्हणजे चैन असायची. आकाशीच्या चांदव्याशी बरोबरी करणारी, पिवळ्या मऊ पुराणाने तट्ट भरलेली तांबूस पिवळी खरपूस भाजलेली पण रेशीम मऊ, तुपात स्नान करून साजिरी दिसणारी पुरणपोळी  ताटात यायची. केशर जायफळाचा गोडसर वास उदबत्तीच्या वासात मिसळून थेट मेंदूला गुदगुल्या करायचा. मेंदू टवटवीत होऊन झिम्मा घालू लागायचा.अर्जुनाच्या लक्षवेधी पोपटासारखीच डोळाभर उतरायची ती फक्त पुरणपोळी. तुप नहाल्या पुरणपोळीसह वाटीत नारळाचे वेलचीच्या स्वादाचे दुध.अहाsssहा. स्वर्गस्थ देवांनी हेवा करावा असा बेत असे . पुरणपोळीच्या जेवणाची कथा इथेच संपत नसे. जेवणानंतर जरा हात धूऊन बसतोय न बसतो तोच पोटातल्या पुरणपोळीची धावाधाव सुरू व्हायची. चक्क पोटातून डोळ्यात जाऊन बसायची बया! मग काय डोळे गपगपा मिटू लागायचे.डोळ्यातून मेंदू पर्यंत जाऊन पुरणपोळी  आपल्या जादूई संमोहनाचे प्रयोग मेंदूवर सुरू! मग मात्र काळ ,वेळ, जागा, दबदबीत उन आणि नकोशी थंडी या कश्शाकशाचे भान उरायचे नाही. दोन तीन तास मेंदू आणि डोळ्यांवर एखाद्या सम्राज्ञी सारखा अंमल गाजवून पुरणपोळी पोटात परत यायची. डोळे किलकिले करताकरता बाहेरचा गुलबट राखाडी अंधार बघितल्यावर बराच वेळ लागायचा तो स्थळ काळाचे भान यायला. ही पहाट की तिन्हीसांजा या गुंत्यात अडकलेला मेंदू जाणीवेच्य राज्यात शिरे. मेंदूला एकदम धक्काच बसे , बापरे चार तास झोपले होते मी??? अशी ती पुरणपोळी,पोटातून मेंदू आणि डोळयात पि.टी.उषाच्या चपळाईने जाऊन तिथे साम्राज्य गाजवणारी. हे पक्वान्न धावपटूच.  

        कधीमधी बासुंदी पुरीचा बेत असायचा. हे पक्वान्नही मस्त धावपटू पण बासुंदीला कधीच पुरणपोळीला हरवणे शक्य नसायचे त्यामुळे बिचारी दुस-या तिस-या नंबरावरच समाधान मानायची. आटीव दाट बासुंदी दिसायची देखणी.रसरशीत गौरवर्णी तरूणीसारखी तांबूस गौर. वर चुकारपणे रेंगाळणा-या चारोळ्या आणि बदामाचे पातळ तुकडे.जवळच टमटमीत पुरी वाफा सोडत बसलेली. बासुंदीत पडलेल्या जायफळाच्या मात्रेवर बासुंदीचा डोळ्यापर्यंत प्रवास किती वेगाने हे ठरते नाहीतर तशी ती संथच. 

            आई स्वतः नोकरी करणारी त्यामुळे  बहुतेक सणाला ठरलेले पक्वान्न म्हणजे श्रीखंड! घरात चक्का बांधून आम्हा बहिणींना तो फेसायला बसवायची आई!. घट्टमुट्ट चक्का, साखर मटकावत मऊ मऊ व्हायचा मग तो निगुतीने स्टीलच्या पातेल्यात विराजमान झाला की आई त्याचा ताबा घ्यायची. आधी चिरून ठेवलेली फळे ती त्यात मिळायची आणि थेंबभर व्हॅनिला इसेन्स किंवा आईस्क्रीम इसेन्स.आईचे श्रीखंड नेहमी हटके असायचे. लुसलुस गोड श्रीखंड, त्यात घासागणिक दाताखाली येणारे सुगंधी स्वादमय फळे आणि पुसटसा येणारा इसेन्सचा वास.ब्रम्हानंदी टाळी लागायची.श्रीखंडाचे जेवण त्यातील फळांमुळे अती जड कधीच व्हायचे नाही.पोट ते डोळे हा श्रीखंडाचा प्रवास दमदार!. पुरणपोळीसारखा वेगवान नाहीच.

श्रीखंड सावकाश डोळ्यांना गोंजारी. मग छानशी झापड येई डोळ्यावर साधारण तास, अर्ध्या तासाची!.पोटातून डोळ्यात सावकाश स्थिरावणा-या श्रीखंडाचे आईने नामकरण केले होते तुरुतुरू श्रीखंड!

          खिर, मोदक, लाडू,चिरोटे अगदी गेला बाजार जिलेबी सुद्धा ही खरतर धावपटू नव्हेच. पोटातून वाकडी वाट काढत ते कधीच डोळ्यात घुसखोरी करत नाहीत तर शहाण्यासारखे शांतपणे पोटात थोडी विश्रांती घेऊन आपल्या मार्गाने जातात.त्यामुळे तसे ते निरुपद्रवी. डोळ्याकडे पळण्यापेक्षा ओठातून पोटांत एवढंच ते आनंदाने करतात. गुलाबजाम त्यातला जरा द्वाड! तळतमळत तूप पिऊन छानपैकी साखरेत डुंबून हा पठ्ठ्या अगदी 'नायकीचे 'बूट घालून पळायला तय्यार! पण जास्त दिखाऊपणाच. डोळ्याकडे तो सरकतोय पण हे आपल काम नोहे म्हणून लगेच  गुपचूप परत.

       बंगाली मिठायाही एकदम रसदार. चवदार पण डोळ्याकडे जायचा रस्ता त्या विचारत सुध्दा  नाहीत. कारण त्या मुळातच 'भद्र मिठाया' आहेत .एकदम सभ्य! त्यांचा गोड मिट्ट गोडवा जीभेतून सर्वांगात भिनवतात पण अगोचरपणा करून डोळ्याकडे पळायचे नाव काढत नाही हो!

          आता पुरणपोळीला सब्बल  प्रतिस्पर्धी म्हणून काम करतो आपला आमरस.वर्षातून फक्त तीन महिने मिळणा-या राजाधिराज आंब्याचा रस. रूपही असे राजस! केशरी, सुगंधी दाट. मग तो पुरी , पोळी किंवा नुसता कसाही खा अप्रतिमच लागणार. किती वाट्या आपण रिचवतो त्या प्रमाणात याचा डोळ्याकडे जायचा वेग ठरणार. एक वाटी म्हणजे अर्धा तास झोप निश्चित.  नंतर प्रत्येक वाटीबरोबर चक्रवाढ व्याजाप्रमाणात झोप वाढत जाते.

         परदेशी हिंडतानाही पुरणपोळीला  तुल्यबल रथी महारथी स्पर्धक मी सतत शोधत होते. टर्कीतील बखलाव आणि अनेक गोड पाकात मुरलेले पदार्थ. मन तृप्त करून सोडतात पण नंतर ती गुंगी, धुंदी अजिबात नाही. इटली देशातील तिरामसू माझा अती लाडका पण पुरणपोळी समोर तो बिगरीतच. जपानचे तर साखरेशी किंवा गोडाशीच साता जन्माचे  शत्रुत्व! त्यामुळे तिथे पुरणपोळी  स्पर्धेत  पुढे चाल (बाय) मिळाल्यासारखा विजयी वाटते.

          जगन्नाथ पुरीच्या त्या जग्गन रक्षकाला  बहात्तर गोड व्यंजनांचा  नैवेद्य  दाखवतात असे ऐकले आहे. अर्थात  या नंतर बाप्पा नक्कीच छानशी वामकुक्षी घेत असणार हे नक्कीच.   

        सुखाची माझी व्याख्या  सोप्पी आहे. फोन बंद असावा, सुट्टीचा  दिवस असावा. ताटात तुपात लडबडलेली गोड मिट्ट  पुरणपोळी  असावी. डायेटींगला अंगठे धरून फाटकाबाहेर उभे करून त्याचा विचारही न करता मी त्या पुरणपोळ्या रिचवाव्या.पुढचे काम पुरणपोळी आपणहून करते. डोळ्याकडे वेगाने धावत जाते आणि.      --- -    --------घsssर  घूssर 

अहाहा चार तासांची निश्चिंती!