शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२०

वाटा आणि रस्ते ©️

 



जंगलात माणसं रस्ते चुकतात. परत परत गोल फिरून ते त्याच जागी येतात. चकव्यात सापडतात. खरतर वाट असते तिथेच असते तरीही फक्त  एक वळण, एक आडवी पायवाट आपल्याला ठगविते आणि परत जैसे थे! त्याच त्या चुकीच्या जागी आपण परत परत येत रहातो.

          रस्ते असे महामिष्किल असतात. स्वतः मस्तपैकी झोपून रहातात आणि चालणा-यांना चकवतात.मग सगळ्यांना,येणा-या जाणा-यांना  बाबापुता करत निश्चित ध्येयाकडे कसे जायचे हे विचारावेच लागते.रस्ता फक्त गालातल्या गालात हसतो.

     मला रस्ते अगदी त्यांच्या व्यक्तिमत्वासहित बघायला खूप आवडतात.रस्त्यांशी दोस्ती करायला मला खूप आवडते.


                              वाटा आणि रस्ते©️


            पायवाट म्हणताच मला आठवते कोल्हापूरच्या घरासमोर पहुडलेली  लाल  मातीची  पायवाट.त्या  काळातील माझी  फ्रेंड नंबर  एक! घर अगदी शेतात! घरासमोरच द्राक्षाचा मळा .घर आणि मळ्याच्या मधे सुस्तावलेल्या  पायवाटताई वाकड्या तिकड्या झोपलेल्या!! एकावेळी  दोन माणसे जातील एवढीच रूंदी. समोरून शेतावरची म्हैस आली की आमची नुसती पळापळ! पायवाटेच्या मऊ लाल रंगाचे भारी कौतूक वाटायचे. पाऊस पडल्यावर तिच्या ओल्या लाल मातीत मधनच निळे काळे फर्राटे उमटायचे आणि वाट अधिकच देखणी व्हायची.ते निळे काळे पट्टे म्हणजे मातीत लोह आहे हे वडिलांनी सांगितल्यावर ती मला एकदम लोहयुगातील शापित सुंदरीच वाटायला लागली. वाटेच्या एका बाजूने  कडेला द्राक्षमळ्यापर्यंत  गवताचा मस्त पट्टा होता. थेट मुख्य रस्त्यापर्यंत!पावसात गवत एकदम हिरवं गार. एक ओला हिरवा वास पावसाळ्यात तेथून चालताना नेहमी यायचा.छाती भरून तो वास घेतला तरी ये दिल  मांगे मोअर अशी अवस्था व्हायची. त्या गवतात साप किरडे पण निघायची पण अज्ञानामुळे म्हणा किंवा आणि काही त्यांची भीती कधीच वाटली नाही. एकदातर पिवळी धम्म धामण पायवाटेवर आडवी पसरलेली. लाल पायवाट , कडेचे हिरवे पोपटी गवत,ढगाळलेले आभाळ  आणि ती जर्द पिवळी धामण.त्यावेळी पळून जावेसे वाटलेच नाही जणू नजरबंदी झाली होती. रानभूल पडली होती. हिवाळ्यात धुक्यात लपून पायवाट गम्मत करायची. उन्ह जरा वर आली की कडेच्या तुर्रेबाज गवतावरचे दवबिंदू  वाटेकडे बघून फिदीफिदी हसायचे पण तोवर सूर्यकिरणांनी क्षणभर त्यांना थोडावेळ चमकावून नष्ट केले तरी वाट आपली निर्विकारच आणि सुस्तावलेली. उन्हाळ्यात सोनेरी गवताचा पदर सांभाळणारी वाट  राजकन्याच वाटायची.त्यावरून चालत मुख्य रस्त्याला लागल्यावर वाटेला हळूच टाटा करून मी जायची. शाळेतून आल्यावर मुख्य रस्त्यावरून पायवाटेवर आल्यावर एकदम घरातच आले आहे असे वाटायचे.एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी गेले होते. महिन्यानंतर परत आले .रात्र झाली होती.काहीतरी वेगळ आहे चुकतंय असे वाटत होते सकाळी दार उघडून बाहेर बघतेय तो माझी मैत्रीण  तिथे नव्हतीच.चकचकीत काळपट रस्ता तिथे होता.गवत आणि लोहयुगातील शापित सुंदरी आता रस्ता बनून जीप आणि ट्रॅक्टर अंगावर घेऊन उभी होती. ना ती हसरी मुद्रा ना ती गवताची किनार.त्या दिवशी मी फार रडले आणि अशाश्वततेचा पहिला धडा त्या हळव्या वयात  शिकले.

           मैत्रीण, बहिणीसारख्या  पायवाटा खूप जवळच्या वाटतात.अचानक त्या तुम्हाला एखाद्या खजिन्यापाशी  बोटाला धरून नेतात.महाबळेश्वरला  असेच झाले.पावसाळी दिवस. ढग देखिल मजा करायला हिल स्टेशनवर आलेले. गर्दीं  टाळून आम्ही दोघांनी सक्काळी सक्काळी  एक सावळी पायवाट पकडली. मस्त हवा. आजूबाजूला हिरव्याच्या असंख्य छटा अगदी पाऊलवाटेवर झुकलेल्या, पावसाचे रेशीम धागे गुदगुल्या करताहेत,वर चढून एका सपाटीवर आलो . समोर चारी बाजूला कंच हिरवे डोंगर आणि बदाबदा कोसळणारे धबधबे. सर्वत्र भरलेला गुढ ओंकार स्वर. हे अद्भूत दृश्य  दिसले,ऐकले फक्त त्या सावळ्या वाटेमुळे.

        मध्यम छोटेखानी रस्तेही मला आवडतात. अशा रस्त्याच्या मधेच किंवा कडेला  एखाद खास झाड असतं, देऊळ, इटूकले संगित विद्यालय अशी त्या रस्त्याची ओळख असते. "अग चिंचेचं मोठ्ठा झाड आहे बघ" हा पत्ता असलेला रस्ता किंवा दत्ताची देवळी आहे बघ असा पत्ता असलेला  रस्ता मनमोकळा आणि आपलासा वाटतो.तिथे गाड्या फारशा नसतात. सायकली किंवा दुचाकी त्याही धिम्या गतीत! उगाच छातीफोड वेग नाही. एक दोन मोत्या, वाघ्या नावाची कुलूंगी कुत्री रस्त्यावर ऊन खात बसली आहेत, मुले बाहेर खेळताहेत . बिट्टी पोरं आजी आजोबा बरोबर कट्ट्यावर बसलेत.असे दृश्य नेहमीचे! या रस्त्याला जड वाहनांचे वावडे.एकदम कुटूंबवत्सल.

         सोसायटीतील रस्ते मात्र थोडे शिष्ठ वाटतात. थोड काही वेगळे घडलं तर डोळे वटारून नियमांच भेंडोळं अंगावर टाकतील आणि काढून टाकायची किंवा दंड भरण्यासाठी  धमकी देतील असे वाटतात. नियमावलींनी भरलेली पाटी म्हणजे  अमूक करू नका वगैरे त्या रस्त्यांचे अलंकार!

          काही रस्ते कायम आठवणीत रहातात. त्या रस्त्यात काही खास असते  अस नाही पण प्रियजनांच्या आठवणी तिथे रेंगाळत असतात.लग्नानंतर लगेच लोणावळ्याला आम्ही गेलो.  भल्या सकाळी दूरवर फिरायला आम्ही गेलो होतो. अनवट वाट.सकाळची वेळ आणि टपरीवर चहा घेत असताना आलेला पाऊस.तिथून खिदळत  हाॅटेलकडे पळताना आमच्याबरोबर पळणारा काळसर ओला रस्ता! खूप प्रिय वाटला तो. 

       परदेशांत ते सिक्स लेन च्या पुढेच असलेले आखीव रेखीव  रस्ते बघताना खूप छान वाटतात. त्यांचे संगोपन,प्रसाधनही एकदम झक्कास. सतत वाहनांच्या अरेरावीला तोंड देणारे हे रस्ते कुटुंब प्रमुखासारखे वाटतात . मला तेही आवडतात याची मुख्य मेंख आहे की ते मला नातीकडे नेतात. मुलाच्या घरासमोरचा  चालण्याचा  नेटका रस्ता. सायकलीं पळायला वेगळा रस्ता मस्त मज्जाच की. हे रस्ते अगदी ' गुड मॅनर्स 'असलेले. नितळ, क्रिम सारखे !कडेला हिरव्यागार हिरवळीची किनार मिरवणारे.  त्यांच्याशी आधी मैत्री करताना बिचकायला झाल पण नंतर आमचे सुर छान जुळले.

         हम रस्त्यात सध्या मला खूप आवडलेला  रस्ता आहे भूतान देशातील पारो या छोट्या गावातला. अतिशय रूंद आणि स्वच्छ .दोन्ही  तोंडांना  डोंगर . एका डोंगरावर धर्मस्थळ.रस्त्याच्या कडेला दुकाने. त्याच त्या रेखिव खिडक्या. पिवळ्या तपकीरी  रंगांची लयलूट.उतरते पॅगोडासारखे छप्पर! रंगबिरंगी भेटवस्तूंनी नटलेली दुकाने. मधनच एखाद्या हाॅटेलमधून येणारा चीझचा उग्र वास!

      खाण्यावरून आठवले कोल्हापूरला शाळेतून येतानाच्या रस्त्यावर  सोळंकीच्या दुकानातला दुध कोल्ड्रींगचा  गोड गोड वास आणि बेकरी समोरचा ताज्या पावाचा भाजताना आलेला खमंग खरपूस वास.  त्यामुळे तो रस्ता एकदम लाडका.

              मी स्वतः भक्तीमार्गी  नाही पण हजारो लाखो भक्त विठूराया साठी ती लांबलचक वाट ज्या भक्ती भावाने चालतात की तो रस्ताही लोण्याहून मऊ होत असेल.आपसुकच असंख्य माऊलींना चरणस्पर्श करताना कृतार्थ  होत असेल. येवढ्या कृतज्ञतेला आपला प्रतिसाद मात्र एकदम कृतघ्न! खाल्लेली अन्नाची पाकिटे,  त्या रस्त्यावरच!. त्या रस्त्याने केलेल्या निषेधाकडेही आपले लक्ष नसते.

         कॅनडात मी आणि माझी सुन मक्याच्या शेतातील भुलभलैयामधे  शिरलो.आमच्या शिवाय कोणीही नाही. सांज वेळ! प्रकाश धुसर! सूर्य टाटा करायच्या मूडमधे. सर्वत्र पसरलेले घनदाट मक्याचे शेत. अनेक बारीक पाऊलवाटा. त्यात दोघींची चुकामुक झालेली.कुठल्याही वाटेवर वळले तरी बाहेर उघडणारे दार मिळेना आणि कितीही फिरलो तरी शेत संपेचना. वाट आपली हसतेच आहे. अंधार पडायला  लागला आणि सुदैवाने घामेघुम झालेल्या का होईना अखेर  आम्ही दोघी भेटलो. मग नेटाने बाहेरचा रस्ता शोधला.

       अशा अनेक आठवणीतील रस्ते  आणि वाटा. कधीकाळची चिमुकली पायवाट कालांतराने राजरस्ता होते. तिला पायवाट म्हणून घडविणारा धाडसी एखादाच किंवा एखादीच असते. दगडधोंडे, काटेकुटे कशाचीच पर्वा न करता ते जंगलातून चालू लागतात. पाय , अंग रक्तबंबाळ  होत असते. त्यावेळी बाकी सर्व राजमार्गाचा आनंद घेत असतात आणि त्या तयार होणा-या पायवाटेची यथेच्छ  निर्भत्सना करीत असतात. पायवाटेला तुच्छतेने हसत  असतात. पायवाट आपल्याच मस्तीत घडत  असते ,हळूहळू आकार घेत असते. काही काळाने उत्सुकतेपोटी इतरेजन दबकत त्या पायवाटेवरून निघतात अगदी सावधपणे.बिचकत .अंतिम सौदर्य त्यांना मोहवून टाकते. मग मात्र निघतात झुंडीच्या झुंडी. मग त्या पायवाटेचा कधी राजमार्ग  होतो कोणालाच कळत नाही. तोवर कोणी नवा वेडा नव्या पायवाटेच्या शोधात निघतो.परत नवा राजमार्ग  तयार करायला.

                    

माझ्या इतर लेखांची लिंक

https://drkiranshrikant.pasaara.com 

४ टिप्पण्या: