शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२०

दृष्य -अदृष्य ©️

  



कामाचा कल्लोळ  उसळला असतो आता कसं होणार असा विचार करता करता हळू हळू सर्व कामं मार्गी लागत जातात. कधी कधी अस वाटत  त्या अष्टभुजे सारखेच आपल्यालाही अनेक बाहू आहेत. एकमेकांच्या मदतीने हे सारे हात फटाफट सर्व कामे करताहेत. माझी काळजी घेताहेत.खर तर सर्वच हात अती महत्वाचे. कधी ते 'दृष्य' हात असतात तर कधी एखाद्या  कठपुतलींच्या खेळासारखे पडद्याआडचे 'अदृष्य'. 

       कधी हे हात' "ए आई",किंवा' अहो आईंच्या" रूपात मदतीला यायचे कधी मैत्रिणीच्या! ब-याचदा घरात काम करणा-या बाईच्या!.  घरातल्या या कामवाल्या बायकांचे योगदान मोजणे अशक्यच.  भले त्या मोबदला घेत असोत पण त्यांच्या जीवावर मी अनेक छंद जोपासले आहेत .गावाला जाऊन घराची काळजी न करता मौज मजा केली आहे. यामुळेच त्यांनी माझ्या आठवणीतील पसा-यात फार मोठी जागा व्यापली आहे. आज तोच आठवणींचा  पसारा आवरायचे ठरविले आहे.


                       दृष्य  - अदृष्य ©️


 माझे लग्न  झाल्यावर मी रूग्णालय सुरू केले तेव्हाच तीही घरात आली. ती आली होती काम आहे का हे विचारायला. कशीबशी चार फूट उंची. शिडशिडीत, गोरटेली. चेह-यावर प्रचंड आत्मविश्वास आणि कपाळावर आधेली एवढे भळभळीत लालभडक कुंकू. गळ्यात काळी पोत. वयाने साधारण माझ्याएवढीच. मला दवाखान्यात आणि घरात दोन्हीकडे मदतनीस हवी होती आणि ही एकदम तय्यार. रात्री दवाखान्यात आणि दिवसा घरात अशी कामाची वाटणी सुध्दा तिने करून टाकली. अगदी मी काही बोलायच्या आतच. मीच मनांत साशंक होते एवढे काम हिला झेपेल कां म्हणून! तिने तेथेच जाहीर  केले तिच्या घरी झोपण्यापूरतीही जागा नाही.त्यामुळेच रात्रीची दवाखान्यातील ड्युटी हवी. हे सगळ बोलताना कुठेही  लाचारी अजिबात नव्हती.  होती फक्त परिस्थितीची जाणीव! पगार ठरवतानाही लाजणं नाही ,आढेवेढे नाहीत की तुम्हीच सांगा किती देणार म्हणून गुगली नाही. सर्व एकदम स्पष्ट. त्या काळात माझीही नवी नवी प्रक्टीस सुरू होती. पेशंटकडे पैसे मागताना मला प्रचंड संकोच वाटायचा कारण धट्टी कट्टी गरिबी आणि लुळी पांगळी श्रीमंती असल्या  विचाराचा पगडा माझ्यावर  होता. तिचा तो स्पष्टवक्तेपणा,मोकळेपणाच मला फार आवडला . अशा त-हेने तिचा घरात प्रवेश झाला.

          रात्री रुग्णालयातील  काम संपवून सकाळी आठच्या सुमारास  ती घरी गेली की सकाळी दहावाजेपर्यंत आंघोळ  करून  हजर!  अनेक भारतीय स्त्रीयांप्रमाणेच तिची कथा होती. वयाच्या चौदाव्या वर्षी लग्न. कारणही  नेहमीचेच. घरात पाच सहा मुले! वडिलांना कामधंदा काही नाही. आई आजारी. लग्न होईपर्यंत  आईबरोबर चार घरं तीही धुणीभांडी करायची. लग्नानंतरही ही परवड थांबली नाही. पहिल्याच दिवशी नव-याने तिला हाकलून दिले. कोवळं वय, अपमानित, मनावर आणि शरीरावर अनेक जखमा घेऊन ती माहेरच्या वळचणीला आली. पेटलेल्या गरीबीच्या वणव्यात अजून एका झाडाची आहुती. त्या दिवसापासून ती तिच्या भावांची माय झाली. सगळ्यात धाकट्या भावावर तर हिचा विशेष जीव!

          हळूहळू  तिचा चांगलाच परिचय होऊ लागला. तिचा आवाज गोड होता. लहान बाळांना छान खेळवायची. त्यांच्यासाठी बडबडगीते  तालात म्हणायची .त्यामुळे पेशंट खूष! पेशंटबाबतीत कधीच  कंटाळा नाही. लहानवयात हलाखीच्या परिस्थितीतून तावून सुलाखून निघाल्यावरही तिची विनोदबुध्दी शाबूत होती. नकलाही फार छान करायची. आवर्जून  वृत्तपत्र वाचायची.घरातही सणवार तिच्या लक्षात असायचे आणि त्याप्रमाणे गोडाचा पदार्थ ताटात  हजर व्हायचा. साठवणीचे डबे वेळेवर स्वच्छ करणे ही कामही ती आपणहून करे. ओवा,गवती चहा, कढीलिंबाची रोप कुठुनकुठुन आणून तिने लावली. मी काही सांगायचा अवकाश ती ते काम करून टाकायची. कामही असं नेटकं की बस देखते रह जाओगे.हे सगळ अशक्य वाटतय नं? पण सुदैवाने हे खर होते.  अरेबियन नाईट्स मधल्या अल्लाउद्दीनचा जिनी माझ्याकडे आलाय याची मला खात्रीच होऊ लागली. 

मला एका गोष्टीचे कायम आश्चर्य वाटायचे ते तिची तिच्या नव-याबद्दलची  प्रेमभावना बघून.एक दिवसाचाही सहवास नाही पण वटसावित्रीची पूजा म्हणजे तिच्या दृष्टीने सर्वात मोठा सण! हळू हळू लक्षात येऊ लागलं की ती ज्या समाजातून येते आहे तिथे 'सवाष्ण'या शब्दाला फार मोठ्ठे वलय आहे. हळदीकुंकु,सवाष्ण भोजन याची आमंत्रणे म्हणजे तिच्यासाठी आनंदाची परमावधी! सत्य परिस्थिती सांगून किंवा त्याची जाणीव देऊन या आभासी आनंदाला टाचणी लावायचे धाडस आणि इच्छा  मला कधीच झाली  नाही.

या आमच्या बाईची एक आवड खास होती. सिनेनट जितेंद्र खास लाडका. त्याची एकदम फॅन. एकदा शनिवारी सगळ पटापट आवरून ती निघाली. "बाई तोफा बघायला जाते"मी बुचकळ्यात!नंतर लक्षात आले तिच्या लाडक्या जितुचा तोहफा हा चित्रपट दूरदर्शन वर होता.

            माझ्या धाकट्याची  तर जन्मानंतर पूर्ण जबाबदारी तिने घेतली.तो बोलायला लागल्यावर जेव्हा त्याने तिला प्रथम हाक मारली तेव्हा तर हजार सवाष्ण  भोजनाचा आनंद तिला झाला. त्याच काळात मला काही कालावधीसाठी हाॅस्पिटल मधे दाखल व्हावे लागले. सासूबाईंनाही त्यावेळी तिची खूपच मदत झाली.  

       दवाखान्याचा व्याप वाढू लागलेला.मदतनीस म्हणून अजून दोघी तिघांना घेतले. सुरवात तर छान खेळीमेळीच्या  वातावरणात झाली. सर्व कामं  समजवून  द्यायला ती होतीच. मग हळूच थोडी धुसफुस कानावर येऊ लागली. आलेल्या दोघीजणींमुळे तिच्या सार्वभौमत्वाला धक्का बसू लागल्यावर ती वैतागायला लागली. अजून तक्रारी आमच्याकडे येत नव्हत्या पण गटबाजी  लक्षात येऊ लागली. एक दोन वेळा सर्वांचेच बौध्दिक  घेतले. त्यानंतर काही काळ शांतता की परत जैसे थे! 

       अर्थात  सर्वच राजश्री प्राॅडक्शनसारखे गोड गोड होते असे नाही.मधूनच तिच्या अंगात काय संचारायचे कोण जाणे घरातल्या इतरांवर शिरजोरी करायला जायची मग मात्र तिला थोड रागवावं लागायचंच. मधुनच तिच्या डोक्यात  तिच्याशिवाय आमच घरच चालणार  नाही हा किडा वळवळायला लागायचा.  मग मात्र मी तिला तिच्या घरी पाठवून द्यायची. तिच्या अपरोक्षही माझे घर व्यवस्थित  चालते हे लक्षात आल्यावर गुपचूप परत कामाला यायची. पण एवढ्या तेवढ्याच  मानापमानाच्या गोष्टी.मीही फार खास चिडून किंवा तटून बसत नसे आणि ती पण काय समजायचे ते समजत असे.

      दुर्दैवाने  त्याकाळातच  तिच्या नव-याच्या मृत्यूची बातमी आली. इतक्या वर्षात न पाहिलेल्या  नव-यासाठी आणि त्याच्याबरोबरच चितेवर राख झालेल्या सवाष्णपणासाठी ती रड रड रडली. त्याच्या गावालापण जाऊन आली.अर्थात त्याच्या दुस-या बायकोने तेथे तिला थांबूनही दिले नाही. 

        तिला मधूमेह झाला. स्वतःची काळजी, औषधे घेणे ती व्यवस्थित  करायची.व्यवस्थितपणा हा तिचा स्थाईभाव होता.आता तर तिला झेपतील एवढीच कामे  तिच्यासाठी  ठेवली. फक्त घरात देखरेख. या नव्या भूमिकेत ती छान स्थिरावली. माझ्या आजारी सास-यांची आणि माझ्या आईचीही छान प्रेमाने काळजी आपणहून घ्यायची. घरातील मस्तवाल कुत्राही जेवण घ्यायचा ते तिच्या किंवा माझ्याच हातून. ते देखिल ती प्रेमाने करायची. 

          माझा धाकटा शिक्षणासाठी दूर गेला पण आमच्याबरोबरच तिची चौकशी नेहमीच असे. मधून मधुन तिलाही फोन तो करत असे. तिच्या धाकट्या भावाने भांडून सवतासुभा उभारला. तिच्या ते फार जिव्हारी लागलेले आम्हाला जाणवत होते.

        तिला कुठल्याही परिस्थितीत कामावरून जा असे सांगायचे नाही हे आम्ही पक्कं ठरवलं  होत. तू हवी तेव्हा ये घरात बस आणि जा असेच तिला सांगितले  होते. पण इतके दिवस घर संभाळल्या मुळे,सतत काम केल्यानंतर तिलाच फुकट पगार घेणे योग्य वाटेना.  अखेर तिने काम बंद करायचे ठरविले. पस्तीस वर्ष ज्या घरात ओतली ते घर ती सोडणार होती.

         तिच्यासाठी एक छानसा कार्यक्रम आम्ही सर्व कर्मचा-यांसहित  आयोजीत केला. जेवण साडी आणि पुढील आयुष्यासाठी पुंजी. आम्हा दोघींनाही अश्रू  आवरत नव्हते. 

         ती कोण होती?. ती नुसती घरकामाची मोलांवर काम करणारी नक्कीच नव्हती.भले मी मालक होते पण माझ्या अडीअचणींना रक्ताच्या नात्याइतकीच खंबीरपणे तिची साथ असायची. ती माझे दृष्य अदृष्य  हात होती . माझी कित्येक कामे त्या हातांनी प्रेमाने केली होती.आज कित्येक कर्मचा-यांचे काम चुकवणे बघितले की हे फारच जाणवते. तिने वेळप्रसंगी माझं घर संभाळल होत. माझ्या घरातील आजा-यांची सेवा त्याच हातांनी केली होती. तिच्या जीवावर मी नवनवीन क्षेत्रात मुसाफिरी करू शकले.

         अजूनही नियमित ती भेटायला येते. खूप थकली आहे ती.एकटीच रहाते.आल्यावर गार ताक  पिते. माझ्या डाॅक्टर मुलासाठी कॅडबरी आणते. अगदी काबुलीवाल्यासारखीच. फरक एवढाच माझा धाकटा तितक्याच आनंदाने, आत्मीयतेने कॅडबरी घेतो. आज  तिच्या या सदैव मदत करणा-या हातांच्या आठवणी मला तशाच नीट ठेवायच्या आहेत . त्यातून उतराई वगैरे होण्याचे  माझ्या मनातही येत नाही कारण काही काही ओझी आनंददाई असतात. ती नीट संभाळून ठेवण्यातच खरा आनंद असतो.

 

माझ्या इतर लेखांची लिंक

https://drkiranshrikant.pasaara.com 






         

        

७ टिप्पण्या:

  1. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. खूप मोजक्या आणि सुंदर शब्दात तुझ्या आठवणी तू लिहू शकतेस हे कौतुकास्पद आहे!!💐💐👍

    उत्तर द्याहटवा
  5. हळवहळवं करून टाकतेस बयो. एकादमात रिचवणं डोळेभरून आलं

    उत्तर द्याहटवा
  6. मनापासून प्रेम करणारे असे स्वकीय भेटणे हे अतिशय भाग्याचे आहे. त्यांच्याशी नाते फक्त आपुलकी ने बांधलेले असते. खूप छान लेखन.

    उत्तर द्याहटवा