शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०

आई©️

 



आई या जादूई शब्दात खर तर गंमत आहे ,कितीही भावंड असोत प्रत्येक मुलाला ती फक्त आपली स्वतःचीच आपल्यापूरती आई आहे असेच वाटते.या नात्यात हीच तर जादू आहे. लहानपणी तर शाळेतून आल्यावर पहिले झूट आई पाहिजेच.मग फक्त आपलंच टुमणे सुरू. आता वाटत आईला कधीही तुझा दिवस कसा गेला एवढ सुध्दा  विचारावं वाटल नाही मला!मी मोठी झाले.आईने सुध्दा तिचा रोल बदलला. ती मैत्रीण कम आई या रोलमधे फिट्ट  बसली. तरी माझा स्वार्थीपणा सुरूच. 

        यथावकाश मी आई झाले. पहिला त्याग मी केला झोपेचा. आधी माझ्या आईच्या जीवावर घनघोर झोपणारी मी बाळाच्या नुसत्या अ sअंsअsअं ने टक्क जागी होऊ लागले.कुणीही न उठवता. बहुधा हेच ते महान मातृत्व का?. त्यानंतर आई या नात्याबद्दल निर्माण झाले विलक्षण कुतूहल.  मग मला छंदच लागला 'आई' वाचायचा.बालरोगतज्ञ असल्याने या आई आणि मूल यांच्यात निसर्गाने निर्माण केलेल्या अनोख्या बंधाला भरपूर प्रमाणात बघता आले. शिकता आले.एकीकडे त्यागमूर्ती , धैर्यवान तर दुसरीकडे आपल्या हटवादीपणाने मुलाचे वाटोळ करणारी आई. मुलीचा दुस्वास करणारी अन् अती काळजीने मुलांना पांगळ करणारी. अती लाडाने कान चावणारा मुलगा घडविणारी ही पण आईची अनेक प्रिय अप्रिय रुपे बघायला मिळाली. मग जाणविले  अरेच्चा आई एक माणूसच!! त्यामुळे  अशा विविध करड्या काळ्या  छटा तिच्यातही असणारच! ती चुकाही करणारच. लोलकातून दिसणा-या सप्तरंगासारखी आई! जाऊ दे! शब्दात न पकडता येणारी म्हणजे आई. 



    आई©️



साधारण साठ वर्षांपूर्वीचा काळ.एक  मध्यमवर्गीय घर. घरात अक्षरशः चार महिने बिछान्याला आजाराने खिळलेली पाच सहा वर्षांची मुलगी आणि सतत  तिची शुश्रुषा करणारी तिची आई. मुलीला  मुदतीचा ताप म्हणजे टायफाॅईड झालेला, तोही उलटणारा.सतत तापाने फणफणलेली ती मुलगी! रोज डाॅक्टरांच्या भेटी सुरू.त्या काळात टायफाॅईड वर उपयुक्त औषंधांचे प्रमाण नगण्य. क्लोरोमायसेटिन हे औषध भारतीय बाजारात  नुकतेच आलेले.त्याची उपलब्धता अपुरी. त्यात त्या मुलीची तब्येत अति गंभीर झालेली.यमराज जणू शोधताहेत "चला कुठे गेली ती मुलगी?वेळ झालीय तिची. पण त्यांच्या दिव्य नजरेला जणू ती मुलगी दिसतच नाही. कारण ती मुलगी आणि यमराज यांच्यामध्ये खंबीरपणे, निश्चयाने उभी आहे एक किरकोळ तरूण स्त्री!त्या मुलीची 'आई' जणू यमराजाला ती आव्हान देते आहे "अरे असेल हिंमत तर माझ्यापलीकडे नजर टाक तिच्यावर." ती तरूण स्त्री  जागरणाने, काळजीने खंगलेली आहे.सतत मुली जवळ बसून डोक्यावर बर्फाची पिशवी ठेव, पथ्याचे खायला दे, ताप बघ, औषध दे यातच गुंतली आहे. जणू तिच्या त्या अशक्त कुडीने ती कालचक्र थांबवायचा प्रयत्न करत  आहे.

    सतत गुंगीत असलेल्या त्या मुलीला एकच आठवते. आईचा तो कपाळावरचा थंड मृदू स्पर्श. कधी ग्लानीतून डोळे उघडले की दिसणारा आईचा चेहरा , तिच्या धुवट सुती साडीचा किंचित ओशट वास आणि त्याबरोबर  खोली पुसल्यावर येणारा फिनेलचा उग्र वास. मृत्युने आ वासलाच होता. डाॅक्टरांनीही आशा सोडली होती. पण मृत्यूच्या तोंडातून नव्हे तर घशातून त्या आईने डाॅक्टरांच्या मदतीने मुलीला ओढून काढले. त्यावेळेस तरी त्या मुलीची जीवनरेखा होती तिची आई!   ही कथा माझी स्वतःची म्हणूनच मला खूप जवळची. जिव्हाळ्याची.


--   ------    ------ ------------------------   ----    --- 


ब-याच वर्षांपूर्वीची गोष्ट. रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली होती.  त्या गर्दीत फतकल मारून ती बसली होती. जवळच साधारण वर्षंभराचा मुलगा.कडेला उभी, मधुनच तिला ओठंगणारी,मधुनच खेळणारी तिची छोटी मुलगी.'तिच्या' अंगावर किंचित भडक कपडे. डोक्यावरून पुढेपर्यंत घेतलेला पदर. उभट चेहरा. डोळ्यात भकासपणा. मुलगा तेथेच बिस्किट चघळत बसलेला. आजूबाजूला  आपल्याच तंद्रीत खेळणारी साधारण चार वर्षांची तिची ती मुलगी!. खेळाच्या झिंगेत कुठलं तरी गाण म्हणणारी. मधनच बारक्या भावाशी लाडेलाडे बोलणारी.लहर आली की 'तिच्या' गळ्यात पडणारी. त्या घामट , पळणा-या गर्दीमधली एकमेव, झुलणा-या कळीसारखीच इकडेतिकडे डोलणारी!  .त्या गर्दीपासून दूर जणू स्वतःच्या छानशा बागेत खेळत असल्यासारखी ती मुलगी आपल्याच विश्वात रंगलेली. विलक्षण बोलका निरागस चेहरा.केसांच्या झिप-या. हसरे टपोरे डोळे.मुलीच्या आणि 'तिच्या' चेह-यात खूप साम्य. इतक्यात एक उंच माणूस तेथे आला. थोडया अधिकारवाणीने तो त्या बाईशी बोलू लागला. ती अजीजीने बोलत होती.परत परत मुलीकडे बघत होती. डोळे पुसत होती. मला भाषा कळत नव्हती. इकडे मुलगी खेळात मग्न. त्या स्त्रीने स्टाॅलवरून जाऊन कागदात वडे आणले आणि मुलीच्या हातात कोंबले. मुलीने खाली फतकल मारली. छोट्याच्या समोर एक घास धरला.तो अजूनही बिस्किटात मग्न आहे हे बघितल्यानंतर चवीने ती वडा खाऊ लागली. इतक्यात गाडीची शिट्टी वाजली. त्यांची गाडी बहूधा हीच होती.गर्दी अधिकच दाटली. मुलगी पटकन उठली .उरलेला वडा एका हातात धरून पटकन 'तिचा' पदर पकडला.तिने बाळाला काखोटीला मारले .एका हाताने मुलीला पकडले गर्दीने वहाणा-या डब्याजवळ ती गेली .ती बाई मुलासहीत आत शिरली. शिरता शिरता तिने मुलीचा हात सोडून दिला. क्षणभर काय होते हे मला रजिस्टर झालेच नाही. उसळलेल्या गर्दीत ती मुलगी क्षणभर दिसली तोच गाडी सुटली.इतक्यात तो उंच माणूस  कुठूनसा परत आला. रडणा-या मुलीचा हात धरून चालू लागला.मुलगी हमसून हमसून रडत होती.

               ------   -----  ---   ------ ------- --------


आठ दहा मुलांचा घोळका ओरडत चालला होता. आवाज टिपेला पोहोचलेला.मुलांची वयही साधारण पाच ते बारा. बारकी पोर मोठ्या पोरांकडे बघून डिट्टो काॅपी करणारे. ए वेडाsss वेडाsss तारस्वरात  मुले ओरडत होती. त्यांच्या पुढे एक कळकट   कपड्यातील पुरुष चालत होता. साधारण तिशीतला तो. आजूबाजूचं कसलाच भान नाही. मुले ओरडायला लागल्यावर वळून त्यांच्या अंगावर धाऊन आल्यासारखे करत तो पुढे जात होता. काही मुलांनी तर मारण्यासाठी  हातात दगड घेतले. देवाघरची फुले म्हणून ज्यांना कायम गौरविले जाते तीच ही मुलं. त्यांचे  निरागस बाल्य जणू आता विरून गेले होते. खिडक्या गॅलरीतून काही जण हा फुकटचा तमाशा बघत बघत हसत होते.इतक्यात विजेच्या वेगाने ती बाहेर आली. मुलांच्या घोळक्यांतील एका आठ वर्षाच्या मुलाला बकोटीला घट्ट धरले. इतर मुलांना जरबेच्या आवाजात तिथेच थांबवले. तिच्या आवाजात एवढा अधिकार होता की सर्व मुले तिथेच उभी राहिली. गम्मत हुकल्याचा राग काहींच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता. तिने  मुलांना डोळे बंद करून त्या कळकट कपड्यातील पुरूषांच्या   जागी स्वतःला किंवा आपली  प्रिय व्यक्ती आहे अशी कल्पना करायला सांगितली. तिचा बकोट धरलेला मुलगा तर आता रडकुंडीला आला होता. "आता तुमच्यातील एकजण पुढे चालेल आणि बाकी सर्व त्याच्या मागे ओरडत जातील. दगडही मारतिल" तिने जोरदार आवाजात सांगितलं. मुले आता चुळबुळू लागली. कोणीच पुढे येईना. "आता यापुढे कोणाचीही चेष्टा करताना प्रथम आपल्यालाच तिथं कल्पनेत उभ करायच" मुले कुजबुजत तेथून गेली. तिने हात पकडलेला मुलगा मात्र हुंदके देऊन रडत होता. आईची माफी मागण्यासाठी शब्द शोधत होता.

 --------    -------- -    ------- ----- -- ---------


माझे इतर लेख वाचायचे असल्यास खालील लिंक वापरावी 
https://drkiranshrikant.pasaara.com 



1 टिप्पणी: