शुक्रवार, १७ जुलै, २०२०

चांदोबा©️

काही काही गोष्टी आपण  गृहीत  धरतो. यात कधी बदलच होणार नाही याची जणू खात्रीच असते आपल्याला. पण  अव्याहत फिरणारे निसर्गचक्र आपल्याला हळूच  सांगत असतं बाबा रे हा क्षण महत्वाचा.पुढच्या क्षणात काय होईल कुणास ठाऊक. एवढच कशाला आपला रोजचा चंद्रही  त्याच्या  बदलत्या कलांमधून आपल्यासमोर  जीवनाचे हेच तत्वज्ञान मांडत असतो. लहानपणापासूनच या मंतरलेल्या चंद्र चांदण्याच्या जगाला आपण पहात पहात मोठे होत असतो, शिकत असतो पण अखेर अतिपरिचयात अवज्ञा. आज पसारा आवरताना या आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग असलेल्या चंद्राबद्दल, चांदोबा बद्दल आठवणी आवरून ठेवाव्यात असे वाटले. अर्थात यातील काही आठवणी आहेत मोबाईल फोनपूर्व काळातील.


                            चांदोबा©️


        एखाद्या कॅलिडोस्कोप मधून सतत बदलते आकृतीबंध दिसावेत तसेच या चांदोबाचे आहे. लहानपणी काऊ, चिऊ, हम्मा यांच्याबरोबरच  लहानग्यांना भेटतो  चांदोबा ! भेटतो तोच मुळी सवंगड्या पेक्षाही  जवळच्या रूपात! तो असतो  सर्व बच्चे कंपनीचा मामा. अर्थात हा मामा   खरोखरच प्रेमळ आणि लपाछपी खेळणारा. हा चांदोबा ,खऱ्या मामांना हेवा वाटेल इतका  लाडका. मला आठवतंय माझा थोरला खूप लहान असतानाच पोहायला शिकला. त्याला पोहणे आवडायला चंद्राचा फार मोठा सहभाग होता. संध्याकाळी  तो पोहताना चंद्राचे त्यांच्याबरोबर  पोहणारे प्रतिबिंब हा त्यातला एक आनंदाचा आणि स्फूर्तीदायक भाग असायचा.कारण प्रत्यक्ष  चांदोमामा त्याला पाण्यात सोबत करत असे, त्यामुळे स्वारी खुष. 
        त्यावेळी बालगीतातही  दमल्या भागल्या चांदोबाला लपाछपी खेळताना आपसूकच लिंबोणीचे करवंदी झाड दिले जायचे. त्या झाडाच्या त्या करवती कात्रीदार पानामागे त्या गोलमटोल चांदोबाला लपणे  शक्य तरी आहे का? मग या गमतीच्या खेळात चांदोबा व्हायचा आऊट !आणि बाळही  खुष! बाळ सकाळच्या जेवणाला काऊ ,चिऊ ,आत्या, मावशी यांच्या नावाचे खास घास घ्यायचा ,पण रात्री मात्र एकमेव चांदोबामामा त्याला पुरेसा व्हायचा. मग कोणाचीच आठवण यायची नाही त्याला. बाळ छानपैकी जेवायचा . आज मात्र ब-याचदा हातात मोबाईल फोन घेऊनच बाळाचे जेवण संपते.
                    आपल्या   पौगंडावस्थेने दमदार पावलांनी जेव्हा आपला ताबा घेतला असतो तेव्हा मात्र हा आकाशस्थ चांदोबा आणि आपले नाते  बदलते. आता तो मामाबिमा कोणीच नसतो . त्याला मामा म्हणणेही हास्यास्पद  वाटते. तारूण्याच्या उंबरठ्यावर हा बालपणातील सखा, आपला चांदोबा थोडासा दुरावलाच असतो म्हणा आपल्याला.आता आपल्या दृष्टीने तो असतो एक साधा उपग्रह तेही आपल्या पृथ्वीचाच. आता तो भेटतो शास्त्राच्या पुस्तकातून.कधी त्याला ग्रहणबिहण लागलेच तर लक्ष जाते त्याच्याकडे, नाही असे नाही. पण तेवढ्यापुरतेच . आकाशातील चंद्रापेक्षा आजूबाजूच्या चंद्रमुखीच अधिक  आवडू लागतात.       
            नंतर तारुण्यकाळात  आपसूक मनात विचार असतो आपला जोडीदार कसा हवा? 'सुंदर.' अर्थात ह्या सुंदरतेचे मापदंड  प्रत्येकाचे  वेगवेगळे.पण एक निश्चित की ती चंद्रासारखी असावी. चांदोबा मदतीला एका पायावर तय्यार, अगदी कुठलाही राग मनात न ठेवता. मुलगा, मामा ,भाऊ या भूमिकेत लिलया वावरणारा चंद्र अचानक कौटुंबिक भूमिका सोडून रसिला रंगीला होतो. आता तो चंदेरी सोनेरी किरणातून असे काही  सटासट मदनबाण  मारतो की बस. आपल्या तारूण्यात आता हा चांदोबा असतो आपला मार्गदर्शक.     मग एकदाचा   हवा तो जोडीदार मिळाल्यावर मात्र चांदोबापेक्षा 'ती' जास्तच सुंदर वाटते.ती पण तितकीच कृतघ्न! चक्क त्याला चांदोबाचा फुल तोडून आणायला सांगते. बिच्चारा चांदोबा ! तो ही मग प्रेमिकांच्या संकेतस्थळी चावटपणे कधीही मुक्तपणे घुसतो.
          आज एकविसाव्या शतकातही मुखचंद्र म्हणावे का चंद्रमुख या संभ्रमात प्रेमीजन पुरेपूर गोंधळले असतात. कदाचित  चंद्राची आणि प्रेयसीची तुलना अपरिहार्य  असावी.
        वृद्धापकाळात  किंवा कधीकधी तरूणसुध्दा चांदोबाला शब्दशः चक्क डोईवर घेतात. नतद्रष्ट त्याला टक्कल म्हणून हिणवतात हे वेगळेच!
               या आकाशस्थ  भावावर स्त्रीवर्गाचे मनापासून  प्रेम!.भाऊबीजेचा हक्काचा भाऊ.  संकष्टीच्या दिवशी तर चंद्र साहेबांना भलताच भाव येतो. चंद्रोदय कधी आहे हा  धोशा   सगळ्यांच्याच. संकष्टी काय किंवा मुबारक ईदीच्या दिवशी  हे महान चांदोबा एकदमच डिमान्ड मधे.त्याच्या दर्शनाशिवाय तोंडात पाण्याचा घोट जाईल तर शपथ. करवाचौथ म्हणजे चंद्राचा पोळाच! चाळणीतून शतचंद्राचे  दर्शन घेतले की उपवासाची सांगता. पियाचा,मियाचा नंबर त्या दिवशी दुसरा. पहिला अर्थात चांदोबाचा.
           अमावस्येच्या रात्री अनेक तारकांची झुंबरे उजळणारे आकाश असो वा पौर्णिमेचे एकच टवटवीत फुल आणि आजूबाजूला फिकुटलेले चांदणे असो, दिलासा द्यावा तो चंद्राने. अवसेची 'काळी कासाविशी ' संपून बीजेची महादेखणी चंद्रकोर येते अगदी  नजाकतीने ! वाटत जणू  अमावस्या कधी नव्हतीच. मग प्रत्येक रात्री चंद्राचे  वेगळेच रूपडे.  तो चांदोबा कधी नखरेल टेचात येणारी चवथीची कोर तर कधी प्रौढत्वाकडे झुकलेली स्थूलकायेची अष्टमीची , कधी चक्क  लिमलेटच्या गोळीचा आकार होऊन याची भ्रमंती सुरूच.
           पौर्णिमा येते. चंद्राच्या सर्व रूपातील सर्वात सुंदर रुपडे. आपल्याकडे प्रत्येक पौर्णिमा  सुंदर, पवित्र आणि  धार्मिक दृष्ट्या महत्त्वाची असते. गंमत म्हणजे प्रत्येक पौर्णिमेच्या चंद्राची नजाकत आगळीवेगळी! हनुमान जयंतीला पौर्णिमेचा वाटोळा पण फिकुटलेला चंद्र कायम भेदरलेला दिसतो जणू बाल हनुमान  सूर्याला सोडून त्यालाच आता ग्रासणार आहे. वटपौर्णिमेचा सात्विक ,बुद्ध पौर्णिमेचा अध्यात्मिक , होळी पौर्णिमेचा लखलखित आणि ह्यावर बाजी मारतो कोजागिरीचा चंद्र. सारी कायनात एक तरफ और  जोरूका भाई दुसरी तरफ याच तालावर म्हणता येईल ,अकरा पौर्णिमा एकीकडे आणि शरद पौर्णिमा दुसरीकडे. इतकी सुंदर असते नं ती. आकाशातील चुकार ढगांशी आट्यापाट्या खेळत चांदोबा मार्गक्रमण करीत असतो. . पौर्णिमेचा उजेडही असा की पहिलीचे मोठ्या,ठळक, अक्षरांचे पुस्तक त्या उजेडात  सहज वाचावे.
            याउलट जपान, युरोप आणि अमेरिकेत भुते मात्र हमखास पौर्णिमेच्या रात्रीच बाहेर येतात. कल्पना करा तिकडे सर्वत्र पसरलेले पांढुरके राखाडी बर्फ. पर्णहीन झाडांचे सांगाडे त्यांचे ते विलक्षण आकार. हाडांचा खुळखुळा करत हृदयापर्यंत पोहोचणारी नकोनकोशी वाटणारी थंडी. अशावेळी मनातील भयगंडाने  पिशाच्च रूप घेतले नाही तरच नवल! एखादी हलणारी सावली किंवा करकरता  आवाजही अंगाला कापरे भरवतो .चांदोबानेही आपले सोज्वळ रूप सोडले असते.  पांढरा फटक आणि गुढ!. परदेशातील पौर्णिमा ही  भूतखेत आणि त्यांच्या मित्रमंडळींची  खास लाडकी. मग धिंगाणा घालायला ते मोकळे.
               जगभरातल्या भूतांखेतांनी  त्यांच्या त्यांच्या सोईने आपापल्या दिवसांची वाटणी करून घेतलेली दिसते. भारतात समस्त जनतेला घाबरवायला अमावस्येला त्यांना अधिक सोपे,आनंददायी वाटत  असावे.  भारत  देशात आणि त्याच्या उपखंडात अमावस्या ही भुताखेतांना बहाल केली आहे .  भूतांखेतांच्या  गोष्टींची सुरवातच होते मुळी " अवसेची रात्र होती." त्यामुळे  आपली भुतंखेतं ,वेताळ ,मुंजे  मौजमजा करतात,चेव येऊन खेळतात, माणसांना भीतीबीती दाखवत हिंडतात ते मुख्यत्वे अमावस्येला. चांदोबाच्या सुट्टीच्या दिवशी.   
       कधीकधी आपल्या चांदोबाला तत्वज्ञ व्हायची लहर येते आणि मग कृष्ण पक्षात होणारा क्षय आणि शुक्ल पक्षात वाढणाऱ्या कला एवढ्या भांडवलावरच तो अधिकारवाणीने बोलू लागतो आणि त्याच अधिकाराने समुद्राला तो कसा नाचवतो हे देखिल सांगु शकतो.
                     कधी कधी वाटतं कशाला चंद्राचे वर्णन करायचं? उपग्रहा सारखा उपग्रह. पृथ्वी पेक्षा थोडा वेगळा. माणसाने त्याच्यावरही आपले भक्कम पाय रोवले आहेत.खरं आहे सगळ. पण म्हणून चंद्राचा देखणेपणा थोडा तरी कमी होतो कां ? मुळीच नाही.आणि माणसाने  जसे बुध्दीच्या बळावर चंद्रावर पाऊल टाकले आहे तसेच सौंदर्यपान करण्याची रसिकताही त्याजवळ आहेच नं?. त्यामुळे चांदोबाचे हे कौतूक असेच   रहाणार.
         एखादा छानसा जलाशय असावा. नुकतीच तिन्हीसांजेने हळूवार माघार घेतली असावी. पक्षीही स्वगृही शांतपणे बसलेले. पुसटसा घंटानाद. शाल लपेटण्याएवढाच हवाहवासा गारवा. आकाशात एखादी चुकार चांदणी बावरून आपल्या सख्यांची वाट पहात"अग बाई लवकरच आले की मी " असे पुटपुटत असावी आणि या सुरेख नेपथ्यावर चांदोबाचा दिमाखदार प्रवेश.जलाशया पलीकडे  क्षितीजावर भला मोठ्ठा, गोलमगोल, लालट पिवळा, तांब्या पितळीच्या अगडबंब पराती सारखा चांदोबा आपल्याकडेच बघत असतो.  तो गोलमटोल चांदोबा हळूहळू  आपला केसरीया उतरवून सात्विक श्वेतवस्त्रांकीत होतो. आणि आकाशात वरवर चढताना, परातीएवढा चांदोबा आता  रुपेरी ताटली एवढा चिमुकला होतो.  पण दिमाख तोच.  चालही तशीच डौलदार .धरती आणि आकाशात रंगणारे हे नाटय जीवाच्या जीवलगाबरोबर भान विसरून पहावे आणि आपल्याच भाग्याचा हेवा करावा.
             https://drkiranshrikant.pasaara.com 

३ टिप्पण्या: