गुरुवार, ९ जुलै, २०२०

सुखी माणसांचा देश, भटकभवानी भाग 2©️

आपणही कधी कधी सुखी माणसाचा सदरा घालतो.मग सगळ्या गोष्टी कशा अगदी मनासारख्या होतात. प्रसन्न आणि तृप्त वाटत असते. आयुष्याच्या जीग साॅच्या कोड्यातले सगळे तुकडे योग्य जागी बसतात. आता आपण असतो एकदम' सातवे आसमानमें.' परत उतरूच नये इथून  असे वाटत असतानाच  धाडकन जमिनीवर  आदळतो.मात्र काही नशीबवान हा 'सुखी माणसाचा डगला 'कायमचा अंगात घालून बसतात.आणि अशी माणसं भेटली की असूया वाटतच नाही.  वाटते निखळ कौतुक, आनंद, समाधान.
आणि अशा सुखी माणसांचा  समुह ,देश बघण्याचा,अनुभवण्याची संधी मिळाली तर समजावे सध्या आपली ग्रहदशा उच्चकोटीची आहे.


                     सुखी माणसांचा देश©️
                          भटकभवानी  भाग 2

              "वेल कम टू भुतान सर .मॅडम हम भूतीनी लोग इंडियन लोगोंका बहोतही रिस्पेक्ट करते है!" आमचा गाईड तोंडातले चिंइगम आणि त्यातून निघालेला मुखरस तोंडातून बाहेर पडू नये म्हणून  दात ओठ आवळून बोलत होता. मला फक्त ऐकू आला   'भूतीनी' हा शब्द. खरंच सांगते विमानतळावर उतरल्या उतरल्या  एकदम भूतनी, डाकिनी, हडळी, चेटकिणी इत्यादी इकारांत भयावह मंडळी डोळ्यासमोर आली . प्रश्नार्थक मुद्रेने मी त्याच्याकडे बघतच राहिले. खर तर या सर्वच भयानक  मंडळींनी आखल्यासारखाच विमानाच्या लॅडींगचा मार्ग होता.अती दुर्गम. 
       म्हणजे त्याचं असं झालं होतं दिल्लीच्या प्रदूषणांतून निघून भुतानच्या पारो  विमानतळावर आम्ही उतरलो होतो. चारीही बाजूला गच्चीम डोंगर आणि मध्ये पारोचा  लिल्लीपुटीयन  विमानतळ. उतरताना एकच शंका ,पायलटला विमान सुखरूप  उतरवणे  जमेल नं? विमानतळावर उभे राहून घटोत्कचाने  आळस देता देता आपले दोन हात पसरले तर दोन्ही बाजूच्या डोंगरावरील एक दोन झाडे तो सहज उपटेल इतके त्या विमानतळाच्या अगदी जवळ डोंगर.अगदी चारी बाजूंनी वेढून  त्यांच्या  मधे बेचकीत  तो इटूकला,मिटूकला  विमानतळ. विमान उतरताना तळ्यात की मळ्यात सारखेच डोंगर का जमिन एवढेच मनात येत होते.  पण तो विमानतळ इतका नीटस, इतका  देखणा की जणू सौदर्य सम्राटच.  मनातले भय गायब! आता नजर हलत नव्हती. पिवळ्या भिंती, तपकिरी उतरते छप्पर, अप्रतिम सुंदर सजावटीच्या एकसारख्या खिडक्या, मधनच ड्रॅगनची,फुलांची रंगीत चित्रे.खांबावर कोरीवकाम यांची रेलचेल .त्यामुळे आमचा गाईड काय बोलतोय ते नीट कळतच नव्हतं .फक्त  मन  गोंथळलेल अन् डोळे सौंदर्यपान करत होते.
              आमच्या वेडावले पणाला बघून आमच्या गाईडच्या डोळ्यात  मिश्किल भाव उमटले." अभी बहुत देखना है" असं म्हणून त्याने आमचा ताबा घेतला. हॉटेलच्या दिशेने आमची गाडी निघाली. बाहेर निळा निळा रंगोत्सव चालू होता. आकाशाने आज स्वच्छ नीलमण्याचा  रंग निवडला होता.   विविध निळ्या छटांच्या  शाईच्या दौती आजूबाजूच्या डोंगरावर जणू उपड्या केल्या होत्या, त्यामुळे डोंगरावर त्यांचे काही ओघळ गडद तर काही फिकुटलेले दिसत होते. खाली दरीमधे धुके देखिल निळसरच.  त्याचा पोत, छटा आगळ्या वेगळ्या. पलीकडे निसर्ग सुंदरीने आपला तलम निळा हिरवा पदर स्वैरपणे पसरला होता. लहरी लहरी जाणारी  हिरवट निळ्या रंगाची स्वच्छंद वाहणारी नदी. कॉलेजमध्ये  मोरचूद म्हणजेच कॉपर सल्फेट शिकता शिकता त्या निळ्याने  मोहवले होतं. आज तोच रंग मनावर चेटूक करत होता. 
                नास्तिकालाही  आस्तिक करणारी ही निळाई! हिमालयाचे देवभूमी हे नाव सार्थ झाले होते.आपले समस्त निळे सावळे देव  जणू या देवभूमीत एकवटले होते. बहुधा त्यांच्या दिव्यकांतीचे प्रतिबिंब म्हणजेच इथला निसर्ग. त्या समोरच्या टेकडीमागे लपला होता  निळासावळा इवलासा  बालश्रीराम, टेकड्या पर्वतरांगांमधून   रांगत होता तो!. तर तेथे ते बर्फाच्छादीत शिखर नव्हतेच. तो होता घननिळ कान्हा !  लोण्याचा गोळा तोंडाला फासून यशोदामातेला चकवून दोन डोंगराच्या मागे लपला होता बाल कन्हय्या.दैदिप्यमान  निलकांतीचा. या दोन बालकांच्या लिला  'निळकंठ 'शंकर गौर पार्वतीला कवेत घेऊन कौतुकाने बघत होते एका उंच शिखरावरून! शेषशाही विष्णूही आपलं समुद्रातील आसन सोडून या  निळाईला अधिकच गहिरे करत होते. या साऱ्यांना आपल्या मायेच्या नजरेने बघत होता लेकुरवाळा ,संतवेडा सावळा विठोबा! जणू तिथेच उभा होता, दगडात, झाडात, डोंगरात.निळ्यात काळा मिसळला होता.परत वेगळीच निळी छटा. या निळ्याचे गारूड मनाला वेडेपिसे करत होते. त्या क्षणी वाटलं या देवतांवर त्यांच्या निळ्या सावळ्या रंगावर प्रेम करणारी बालकृष्णाची यशोदा, गोडुल्या श्रीरामाची माताकौसल्या, निळकंठाची पार्वती, विष्णूची लक्ष्मी किंवा विठोबाची रखुमाई सारेच विरून जाताहेत,एकरूप होताहेत या निळाईत .   भन्नाट अनुभव! ह्या निळ्यात विरघळून जावेसे वाटू लागले . या निळ्या सावळ्याच्या गारूडातून बाहेर पडायला खरंतर एक दिवस लागला. झिंगाट म्हणजे काय हे डोळ्यात आणि डोक्यात भिरभिरणाऱ्या निळ्या रंगातून जाणवत होतं.
        निळ्याची नशा आता कमी झाली होती आता आजूबाजूच्या  माणसांकडे ही लक्ष जायला लागले. किरा आणि घो हा राष्ट्रीय ड्रेस घातलेल्या मुली आणि मुलं नजरेत भरू लागली. सगळ्या मुली एकजात शिडशिडीत , मध्यम उंचीच्या आणि आणि टूथपेस्ट ची जाहिरात करत असल्या  सारख्या सतत हसऱ्या !हॉटेलमध्ये जेव्हा आम्ही पोहोचलो तिथल्या स्त्रीवर्गाने लगेच आमच्या बॅग्जचा ताबा घेतला. भल्यामोठ्या दोन बॅग्ज. त्यामुळे स्त्रीदाक्षिण्य दाखवत माझ्या मुलाने आणि नवऱ्याने त्यांना बॅग्ज उचलण्यास ठाम विरोध केला. पण त्या मुली त्यांच्याहून जास्त हट्टी ! हे आमचे काम आहे आम्ही करणारच असं म्हणून दोन मजले चढून पटपट पटपट त्या बॅग्ज त्यांनी आमच्या  खोलीत नेल्या सुद्धा.! आणि परत बक्षिसाची अपेक्षा अजिबात नाही. तेथे रेंगाळणेही नाही. कसल्या काटक आणि कष्टाळू मुली होत्या त्या. सगळ्या मुली होत्या स्वच्छ नजरेच्या आणि मोकळ्याढाकळ्या.
                  भूतानमध्ये बुद्धाला  पूजले जाते. अनेक बौध्द संतांचेही तेथे मोठे मठ आहेत त्यांचीही पूजा होते. आपल्यासारखेच ,अनेक प्रतिकांची पुजा. संतती प्राप्तीसाठी  प्रतिकात्मक म्हणून पुरुष लिंगाच्या मूर्तीची पूजाही एका मठात होते. बाहेर अनेक दुकानातून त्याच्या प्रतीकात्मक छोट्या मूर्ती  ठेवल्या होत्या.  हे सारे विकणाऱ्या होत्या तरूण भूतानी  मुली. या मुली न बिचकता  हे काम करत होत्या.अगदी सहजतेने.  भूतानमधला हा लख्ख मोकळा विचारप्रवाह खूपच सकस वाटला. 
     भूतानी लोकांशी बोलताना, त्यांच्याबरोबर फिरताना लक्षात आले या लोकांची दोन मर्मस्थाने आहेत. पहिलं म्हणजे देश. देशावर अत्यंतीक प्रेम. तिथल्या पौराणिक, धार्मिक, चमत्कारांनी परिपूर्ण अशा कथांवर ज्याला अंधश्रद्धा म्हणून आपण हसू अशा कथांवरही  विलक्षण विश्वास. काही बुद्ध भिक्क्षू  योगसामर्थ्याने  उडू शकतात  याचीही  त्यांना जाम खात्री अगदी या काळातसुध्दा. तुम्ही विरोध केलात तर अशा नजरेने पाहतील की बस . दुसरा  अत्यंत  हळवा कोपरा  म्हणजे  त्यांचे राजा,  राणी  आणि आणि  छोटासा राजकुमार. .कुठेही जा हे देखणे जोडपं आणि बालक राजकुमार फोटोमध्ये आपल्या सोबत असतातच. आणि त्यांच्या मंद स्मिताने आपल्याला दिलासा देत असतात .
       भिक्षूंचे मठ त्याला झाँग असे म्हणतात .तेथे अन्नकोट चालू होता. असंख्य प्रकारची फळे नैवेद्य म्हणून तिथे एकावर एक रचली होती त्याची  मोठीच्या मोठी लादी तयार केली होती म्हणाना! पण त्यावर बाजी मारली होती आपल्या पार्ले जी बिस्कीटांनी! तिथे विराजमान होऊन! पार्ले जीची चवडच्या चवड   होती .ब-याचदा  नैवेद्य दाखवताना तो असाच हवा  आणि तसाच हवा याचे नियम आपण देवांवर आणि आपल्यावर लादतो तसे भूतानला  नाही.  त्यामुळेच कॅडबरी चाॅकलेटचीही  वर्णी लागली होती नैवेद्य  म्हणून. देव खुष. कारण त्याच त्याच नैवेद्याची त्याच्यावर सक्ती नाही उलट हवे ते नवनवे  पदार्थ  हजर!आणि भक्तही  खुष.  आपल्या आवडीचा पदार्थ देवाला अर्पण केला म्हणून.
 भूतानी  मंडळी स्वच्छताप्रिय आणि शिस्तप्रिय.कचरा करणे, वहाने बेफाट चालवणे, छे!चुकूनही नाही. त्यामुळे निसर्गाने वारेमाप दिलेले सौंदर्य अधिकच देखणे होते.आठवड्यातील पाच दिवस  आपल्या राष्ट्रीय  पोशाखात वावरणा-या मुली आणि मुले शनिवार रविवारी वेगवेगळ्या विविध पोशाखात फुलपाखरांशी स्पर्धा  करतात. अनेक दुर्गम भाग असल्याने कष्टाला पर्यायच नाही. पण खर कौतुक आहे आनंदाने, हसत हसत त्यातून मार्ग  काढणे. या जीवनाविषयीच्या तत्वज्ञानाची जणू रोजची उजळणी चालू असते.
             आता भुतानला आलोय तर तिथले पदार्थ खाना तो मंगता है बाॅस. पण आम्ही भारतीय म्हणून  बिचारे हाॅटेलवाले आवर्जून भारतीय पदार्थ करत होते.अखेर त्यांना सांगितलं की बाबा रे आम्हाला तुमच्या देशातले पदार्थ खायचे आहेत आणि मग त्यांचा आनंद काय वर्णावा. सेव्हन कोर्सचे जेवण तय्यार. सामिष ते निरामिष !आणि ते फक्त आमच्यासाठी खास ! आणि मोबदल्याचे पैसेही नाकारले. कारण आम्ही त्यांच्या देशाचे खास जेवण आवडीने जेवत होतो. आता आमच्या चवीला ते जेवण आवडलं म्हणा . लाल मिरच्या भरपूर त्यात थोडीशी भाजी आणि भरपूर चिज तेही याकचे . थोडं उग्र असले तरी हे सारे मिश्रण  आणि हिमालयीन लाल  तांदळाचा भात  असा झकास बेत असायचा. लाल मिरच्या म्हणजे फार तिखट नाहीत पण बचकभर लाल मिरच्या  बघून घाम फुटला होता हे मात्र खर!   पण गंमत म्हणजे आम्ही ज्या सीझनमध्ये गेलो होतो तेव्हा   अत्र तत्र सर्वत्र त्या लाल मिरच्या दिसायच्याच दिसायच्या. कुठल्याही घराच्या सुंदर खिडकीकडे पहावं तर त्याचे पडदे या लाल मिरच्यांचे.  खिडकीच्या वरचा बंधाऱ्यावरही लाल मिरच्या पसरल्यातच. उतरते सुंदर छप्परही परत मिरच्यांचा गालिचा  मिरवतेच आहे. म्हणजे देव जसा सर्व दिशांना भरून दशांगुळे वर उरतो तशाच ह्या मिरच्या सर्वत्र दिसत होत्या .पण पिवळ्या घराच्या चॉकलेटी खिडक्यांच्या रंगसंगतीत या लालभडक  मिरच्या देखील भर घालत होत्या हे मात्र खरे.
           मला वाटतं त्या निळ्या हिरव्या.,लाल लाल पिवळ्या रंगछटा मधे  राहणाऱ्या या माणसांचे मनही असेच रंगीबेरंगी ! या विविध  छटांनी अधिकच मधुर केलेल त्यांचे व्यक्तिमत्व. 
त्यामुळे गुन्हेगारी ही अतिशय कमी. धर्मभोळे पापभीरू, देशावर आणि राजावर आत्यंतिक प्रेम करणारे,अती कष्टाळू या माणसांना जणू जन्मजात सुखी माणसाचा सदरा घालूनच देवानी  पाठवलं आहे. आणि हा सदरा ना कधी विटत ना मळत आणि फाटायचे नावच नाही. जन्माला आल्या आल्याच अंगात घातलेला हा सुखी माणसांचा सदरा मृत्यूनंतरही तसाच. पुढची पिढी ज्या पध्दतीने,प्रेमाने उंच पर्वतांवर आपल्या मृत पुर्वजांच्या  नावाने आठवणींच्या  पताका फडकवतात आणि अती आदराने पुर्वजांच्या  आठवणीत रममाण होतात तर मग मृत देखिल मृत्यूनंतर कशाला काढतील हा सुखी माणसाचा सदरा?उलट सरणा-या प्रत्येक दिवसांबरोबर तो सदरा अधिक अधिक चमकदार आणि सतेज दिसतो.  
              परत निघालो तेव्हा आम्हाला  सोडायला आलेला आमचा गाईडही गहिवरला होता. भारताबद्दल फार छान बोलत होता. तुमच्या मदतीमुळेच आमच्या इथं दिवे लागतात. नोकऱ्या मिळतात आणि त्यामुळे भारतीय लोक आम्हाला फार आवडतात पण आमचच मन जडशीळ झाले होते.
            मनापासून आवडलेला निळ्या निळ्या रंगात बुडालेला हा देश.  असाच सुखी माणसाचा सदरा घालून राहू दे .या सगळ्याला वरदान मिळू दे की हा सदरा कधीच फाटू नये, विरून जाऊ नये आणि त्याची चमकही कधीच कमी होऊ नये.
        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा