शुक्रवार, २४ जुलै, २०२०

आखोमें क्या जी---©️ - -

रात्रीच्या प्रवासात समोरून येणा-या बैलांच्या डोळ्यावर उजेड पडल्यावर त्यांचे लखलखते डोळे एकदम भारी दिसतात.जणू दोन विजे-याच. सतत पेटलेल्या. ते बघण्यासाठी रात्रीचा प्रवास करावा इतके छान.पसारा आवरताना इतर ज्ञानेंद्रिये आवरून ठेवायचा प्रयत्न केला पण डोळे ,एक महत्वाचे ज्ञानेंद्रिय  राहूनच गेले.स्पर्श जितका बोलका असतो तितकेच किंबहुना जास्तच बोलके असतात डोळे. काळे, निळे, हिरवे, घारे तपकीरी कुठल्याही रंगाचे असो, डोळे  मनाचा आरसा बनतात. मुखाने काहीही शब्द फुटत नसले तरी डोळे चुगली करतात. नकारातला होकार उमटतो डोळ्यांमधून .  सुंदर विश्व पाहण्या पलिकडेचे म्हणजे मनाचं प्रतिबिंब दाखवणारे हे डोळे.  पसारा आवरताना असे अनेक डोळे आठवताहेत. चलो ये भी सही है! हा डोळ्यांच्या आठवणीचा पसाराही कधीतरी आवरायलाच  हवा.

                  ©️आखोमें क्या जी------

            खर तर सुंदर डोळ्यांवर कवींनी सतत  कवितांचा रतीब घातला आहे आणि घालत रहातील.टपोरे डोळे, बदामी डोळे,मीनाक्षी,हरीणाक्षी अशा अनेक सुंदर उपमांनी डोळ्यांचे वर्णन केले आहे.विविध रंगांची मुक्त खैरात झालेले हे डोळे! कुणाचे चमचम नीलमणी तर कुणाचे पानांसारखे हिरवे ,जीव घाबरवणारे घारे,जीव ओवाळून  टाकावे असे तपकीरी आणि आपल्याकडे असतात तसे शांत संयत काळे .त्यांना नटविण्याच्या अनेक त-हा. काजळ ,सुरमा ही तर डोळ्यांभोवती देखणी महिरपच. या महिरपीत  सजून, अजून अधिकच साजिरे दिसणारे आपले डोळे!  खर तर डोळे आपल्या मनाचा आरसा आहेत. रागावलेले, लालभडक,तिरसट,आत्मप्रौढ व्यक्तीचे डोळे मनावर एक ओरखडा उमटवतातच. मग ते कितीही छान टप्पोरे असले तरी उसमे वो बात नही, वो जान भी नही !
       अगदी चिमुकल्यांचे डोळे कधी पाहिले तर, ते डोळे नसतात, असते ती असते एक सुंदर चित्रफित. कडेवर,खांद्यावर  बसून उंचावरून जग पहाणारे हे डोळे! कायमच उत्सुक, विस्फारलेले, हसरे , रडवेले किंवा पेंगुळलेले तरी असतात. गंमत म्हणजे ते हसता-हसता रडवेले  होतात, तर रडता-रडता त्यांची सोनपाखरे होतात. हे डोळे कसेही असो, काजळाने बरबटलेले हे डोळे कोणाकडेही बिनधास्तपणे एकटक बघायला लागतात. आणि तेव्हा जी एकाग्रता,उत्सुकता उतरते डोळ्यांमध्ये, ती  डोळ्यांना एखाद्या देखण्या शिल्पासारखे बनवते. कपाळावर भुवयांच्या धनुकल्या कायम ताणलेल्या, डोळे विस्फारलेले. काय बघू आणि किती बघू अशी मनाची अवस्था. फार फार सुंदर दिसतात बाळं तेव्हा. अगदी तशीच मांजराची पिल्ले. खेळताना त्यांच्या डोळ्यांमध्ये अगदी असाच भाव असतो. पिवळ्या गरगरीत डोळ्यांमध्ये मोठ्या मोठ्या झालेल्या काळ्याभोर बाहुल्यांमुळे ते अधिकच निरागस दिसतात.डोळेही अगदी विस्फारलेले जणू सारे जग त्याक्षणीच बघायचं आहे.पिऊन टाकायचे आहे.निरागस शब्दच जणू डोळ्यांचे रूप घेऊन येतो.
         केरळमध्ये हत्तीची पिल्ले मनसोक्त  हुंदडताना पाहिली. गोंडस आणि अती खेळकर.शरीराच्या मानाने डोळे खूप लहान पण त्यातले खेळकर, मिस्कील आणि बिलंदर भाव भन्नाट.त्यांना बघितल्यावर आठवतात आईस्क्रीम पार्लर मधे आलेली तीन चार वर्षांची मुले.  या वयात मुलांचा थोडा थोडा राग लोभ , 'हे आमचंय' असे 'आमचे तुमचेही' सुरू होते. ह्या मुलांचे डोळे  बघावेत ते आईस्क्रीमच्या  दुकानात. चवड्यावर उभे राहून टाचा उंचावून  काऊंटरच्या आतील डब्यातील आईस्क्रीम  बघताना त्यांच्या डोळ्यातले भाव विलक्षण असतात.समाधीच लागली असते त्यांची.  डोळे बोलत असतात. सगळीच आईस्क्रीम्स घ्यायची त्या डोळ्यात तीव्र इच्छा असते .  प्रत्येक  आईस्क्रीम बघता-बघता त्यात ती पूर्णपणे हरवून जातात. आता कसलेच भान नसते. अर्जुनाच्या  लक्षवेधासारखेच आता लक्ष केंद्रित  होते आईस्क्रीमवर ! हे हरवलेपण त्यांच्या डोळ्यांमध्ये वाचता येते. अखेर आईस्क्रीमची निवड होते. डोळ्यात शंभर वॅटचे बल्ब पेटतात. नुसता आनंद ! हातात आईस्क्रीम आल्यानंतरचा आनंद असतो जगज्जेत्याचा.   डोळ्यात जणू जगज्जेता सिकंदर  अवतरतो. आईस्क्रीम हातात आल्यावर आधी दादाच्या हातातल्या आईस्क्रीम कडे बघितले जाते मग परत आपल्या आइस्क्रीम कडे बघून कोणाच छान आहे हे ठरवलं जातं पण ते मनातल्यामनात.अगदी एकाग्रतेने मग आईस्क्रीमचा चमचा ओठाजवळ येतो. आता तोंड बरबटलेल्या या चिमुरड्यांचे डोळे दिसतात एखाद्या योग्यासारखे. डोळे आता होतात ओठ. आता शब्द  असतो तृप्त,पण अजून!!हे बोलणारे डोळे आणि त्यातिल  सर्वभाव बघायला कुठलेही  आईस्क्रीमचे पार्लर गाठावे.
        बालपण संपते आणि डोळे अधिक सजग आणि सावध होतात अर्थात बालपणाची कोवळी झाक अजूनही लपता लपत नाही. थोडासा निर्ढावले पणा आला तरीही बालपण अजून डोळ्यात दिसत असतं .त्यामुळेच मनाविरूध्द काही घडले की सर्वप्रथम जखम दिसते ती डोळ्यातच . एखादी चूक घडली तर नजर चुकवणे, टाळणे बघावे ते याच वयात.क्षणात ते पाझरू लागतात. हळूहळू कोवळीक कमी होऊन संयम, निर्धार,तर  क्वचित खोटेपणा यांची भाषा दिसू लागते. कुत्र्याचे धड पिल्लू नाही आणि पूर्ण वाढलेला कुत्रा नाहीये अशा अवस्थेतल्या  पाळलेल्या कुत्र्याचेही तंतोतंत असेच. बघावे तर अगदी ह्याच भावना त्याच्याही डोळ्यात असतात .थोडासा बालपणाचा गोडवा, नियम मोडण्याची वृत्ती, थोडीशी भीती, थोडासा बेदरकारपणा त्याच्या डोळ्यांमधून डोकावत असतो.
         तरुणपणी मात्र डोळे बोलतात ती भाषा तोपर्यंत पूर्णतः अनोळखी असते. डोळ्यांची ही पूर्णतः नवीन भाषा अबोलपणे बरंच काही  बोलत असते. सुखद, उबदार, सुवासिक, सुंदर गुलाबी रंगाची प्रेमाची भाषा. डोळे भिरभिरतात. तो माझ्याकडे बघतोय किंवा ती माझ्याकडे बघते हे त्याच्याकडे न बघताच कळायला लागतं. लपंडाव छान रंगतो. शब्दांची गरजच नसते. डोळे सर्वांच्या नजरे पलीकडे जाऊन चुगली  करतात. दोन नजरेचे गुफ्तंगू सुरू होते. रुसवा, लटका राग ,लाज यांचा गोफ विणला जातो.  कधीकधी दुर्दैवाने या नजरेतील गुलाबांची जागा घेतो वैशाखातील लाल भडक गुलमोहर !मग संताप, वैर,  मानहानी, तिरस्कार ही सैतानी पावलं नजरेचा ताबा घेतात.असे डोळे पाहिले की आठवते चेन्नईच्या मगरींच्या फार्मला दिलेली भेट.  चेन्नईला आम्ही गेलो होतो तेव्हा तिथल्या मगरींचा मोठा फार्म बघायला गेलो. मी आणि माझे पती. आत शिरताच एक विचित्र उग्र वास सर्वत्र भरलेला. काळ्याभोर मगरी तेथे पहुडलेल्या.पाच फुटापासून ते तीस फुटांपर्यंत. गंमत म्हणजे कोणाचीच हालचाल नाही.  डोळे बंद.  त्यामुळे क्षणभर वाटलं की येथे जिवंत मगरी  नाहीत तर फक्त मगरींचे पुतळे  आहेत.  चांगलेच फसलो की आपण. आणि असा विचार करेपर्यंत समोरच असलेल्या दोन मगरीनी अचानक आपले डोळे खाडकन उघडले. कधीच विसरणे शक्य नाही ते हिरवट पिवळे अपारदर्शक बटबटीत डोळे.   हृदयाचा ठोका चुकला. त्या मगरी सरकल्या. आमच्या दिशेने आल्या. आणि त्यानंतर छूमंतर झाल्यासारखं प्रत्येक मगर डोळे उघडून हालचाल करू लागली.ते डोळे निर्विकार, दगडी तरीही क्रूर.कधी कधी वाटत जर कडक उन्हाळा मानवी स्वरूपात समोर आला  तर  तो पांढराफटक,उंच आणि त्याचेही डोळे असेच असतील.कावेबाज, पिवळेकरडे! भक्षाचा  घास घेण्यास उत्सुक.
    तारुण्य मागे पडते डोळ्यातील गुलाब कधीच गायब होतात. संसार मुलंबाळ यांच्यात  डोळे अधिकच  सजग होतात. एखाद्या घुबडासारखे.  सर्व  दिशांना नजर भिरभिरते कारण कुटुंबाची जबाबदारी असते न! कुठेही गेले तरी घारीसारखेच लक्ष असते आपल्या घरकुलावर. वर्षे जातात आणि साक्षात्कार होतो, अरेच्या, पुस्तक दोन हातावर धरलं तरी अक्षर अगदीच अंधुक दिसताहेत!  तात्काळ डोळ्याच्या डाॅक्टरांची भेट. अन् आपल्या डोळ्यांना मिळते एक मैत्रीण.चाळिशी .पुढच्या आयुष्यभरचा सहप्रवासी म्हणून! ही जणू जिवाशिवाची भेट. पुढच्या आयुष्यात एक वेळ आपण आपल्या सावली शिवाय राहू पण चष्म्याशिवाय छे! शक्यच नाही. डोळ्यांचा नवा दागिना.नवी महिरप.
         मूर्तीमंत कारुण्य म्हणजे काय तर गायीचे डोळे. अगदी ती मारकुटी असली तरी. कारण तिचे अंतकरण असते लोण्याचेच! तिचे फक्त डोळे बघायचे. त्यात थोडासा अविश्वास असला तरी ठळकपणे जाणवते ते फक्त कारूण्य. सा-या विश्वाची कणव तेथे एकवटली असते.  मला आठवतंय  इंदोरला खाटीक गाईला ओढत नेत होता तेव्हाचे ते तिचे डोळे विसरणं शक्य नाही. हतबल, भिती,अनिष्टाची चाहूल आणि तरीही ओतप्रत भरलेले कारूण्य. ते डोळे पाहिल्यावर चार रात्री नीट झोपू शकले नाही. स्वतःच्या नगण्यतेची जाणीव तीव्रपणे होत होती. ते डोळे बघितले तेव्हा आजूबाजूच्या  कित्येक आजी-आजोबांची आठवण झाली.  वृद्धत्वाच्या सावल्या पसरू लागतात आयुष्यातील चुकलेली गणित, ठोकताळे डोळ्यासमोर अंधुकशी येतात .आता ना नजरेत भावनेचे तांडव ,  ना कुठली इच्छा.   फक्त अपार माया, शांत ,तृप्त किंवा विद्ध पूर्ण हरवलेली नजर असते. आधी कोणाच्याही नजरेचा ठाव घेणारी नजर ह्रदयात उतरणारी , भेदक नजर आता मात्र आधार शोधत असते. मांडलेला डाव उधळून जोडीदार ,प्रियजन पुढे गेलेले असतात.   थकलेल्या नजरेला आता त्यांची आस लागलेली असते .पहाटे हळूहळू मावळलेल्या तारकां सारखेच आयुष्यातील एकएक भावना,लालसा नजरेतून नष्ट होत असतात. सर्वात त्रासदायक असतात मृत्यूनंतरचे ते पूर्णतः थिजलेले भावहीन  डोळे.
               या उलट दांडेलीच्या अरण्यात अक्षरशः पाच फुटावरून पक्षीराज गरूडाने आमच्याबरोबर जमवलेली मैफल अशीच अविस्मरणीय.पायात पकडलेला  जिवंत सळसळणारा नाग.पक्षीराजाची ती भेदक नजर.त्या तीक्ष्ण  नजरेत भय नव्हते. होता तो बेदरकार भाव. आम्ही तर त्या देखण्या रूबाबदार सम्राटाच्या खिजगणतीतही नव्हतो. अशी ही नजर विसरणे तरी शक्य आहे?  औरंगाबादचे अजंठ्याच्या गुहेतील बुध्द मूर्ती त्या शीतल दयार्द्र अर्धोन्मिलित नजरेनने सतत तुमचा पाठलाग करत असते. सगळ्यात गंमत झाली इटलीच्या प्रवासात. तिथला समर पॅलेस  बघताना भिंतींवरचा सरदार आपल्या ऐयाशी नजरेने आमच्याकडे बघत होता.चक्क न्याहाळत  होता तो. आम्ही उभे होतो त्याच्या उजवीकडे.  हात मेल्या! थोड सरकून समोर आलो तर नजर तशीच आमच्यावर रोखलेली  पण आता त्यात होती विलक्षण जरब.जणू आगीचे लोळच!अजून कडेला जाऊन डावीकडून त्याच्याकडे पाहिले तर महाशय आमच्याकडेच  बघत आहेत पण नजर ,महाकनवाळू,प्रेमळ  जणू माझे आजोबाच.  ज्यानी ते चित्र काढले त्या अनामिक कलाकाराला  शतशः वंदन.या उलट जिवंत जनावरांना जेव्हा प्राणी संग्रहालयात ठेवतात तेंव्हा कंटाळलेले, परिस्थितीला विटलेले त्यांचे डोळे बघताना आपल्याच पोटात कालवते.
             असे हे आपले डोळे.जगाची ओळख करुन देणा-या, हे सुंदर जग दाखविणा-या दोन खिडक्याच. पण गंमत अशी की डोळ्यांच्या खिडकीत उभे असते आपले मन. त्यामुळेच समोरच्या व्यक्तीला डोळ्याचे सौदर्य दिसतेच पण जास्त भावते डोळ्यातून दिसणारे मन. घडाघड वाचता येते ते. समस्त स्त्रीवर्ग यात एकदम तरबेज. मग ती थकली भागली आज्जी असो वा आई, पत्नी! कधी कधी वाटतं  या दोन डोळ्यांतील भावनांचे तांडव लपवायला एवढा आटापिटा  करावा लागतो मग त्या सहस्र नेत्र देवांचा राजा इंद्राचे  काय?? महाशय आधीच रसरंगिले, महालंपट ! त्यात हजार डोळे. इंद्राणी समोर जायचीही चोरीच की! मात्र एक खरे, जितके जास्त निर्ढावलेले मन  तितके हे मन लपून बसते .वाचायला अवघड होते..
           . दृष्टीहिन व्यक्तीचे स्पर्शज्ञानच त्यांचे डोळे बनतात.अंधशाळेत काम करताना सतत जाणवायचे स्पर्श,वास,आवाज  सारेसारे होतात  हे डोळे.
        असंख्य प्राणी ,असंख्य डोळे, पण डोळ्यांची भाषा जवळजवळ सारखीच.मग तो उत्तर ध्रुवावरचे एस्किमो असो वा आफ्रिकेतील पिग्मी असो .त्यांची मातृभाषा वेगळी असते पण त्याची डोळ्याची भाषा एकच!प्रेमाची , लालसेची,रागाची कारूण्याची.कधी डोळे वटारून , कधी मिचकवून, कधी बारीक करून  हा संवाद सुरूच असतो. फक्त माणसांची नाही तर सर्व  प्राणीमात्रांचीही डोळ्यांची भाषा.आणि खरंच या डोळ्याच्या भाषेला समजून योग्य वेळी सबुरीने  वागलो  तर   वाद आटोक्यात  येतील.  नाही कां?

https://drkiranshrikant.pasaara.com





       

३ टिप्पण्या:

  1. मँडम खूपच सुंदर लिहीलय. विचार फुलपाखरां सारखे मधुकण वेचत इकडून तिकडे अलगद फुलांवर उतरलेत. हँटस आँफ.

    उत्तर द्याहटवा
  2. मँडम खूपच सुंदर लिहीलय. विचार फुलपाखरां सारखे मधुकण वेचत इकडून तिकडे अलगद फुलांवर उतरलेत. हँटस आँफ.

    उत्तर द्याहटवा