शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

रंगबिरंगी ,भटकभवानी भाग 3©️

 बघता बघता' पसारा'तील आठवणींचा पसारा आवरताना सहा महिने उलटले.  पण गंमत अशी झालीय एक आठवण आवरते तोवर त्यातून शंभर आठवणी निर्माण होत होत्या अगदी रक्तबीज राक्षसा प्रमाणेच.  या राक्षसाच्या रक्ताच्या एका थेंबातून असंख्य रक्तबीज राक्षस तयार होत .अगदी तस्सेच. अर्थात त्या राक्षसांचा निःपात कालीरूपात दुर्गादेवीने केला पण माझी एक एक आठवण आवरताना तयार होणा-या अनेक आठवणींना कोण आवरणार? 


                  भटकभवानी भाग 3, रंगबिरंगी©️


          आता परदेश प्रवासाचे कौतुक कोणालाच उरलेले नाही. माझ्या  लहानपणी परदेशी जाणारा माणूस म्हणजे जादुई नगरीत जाऊन तिथल्या अप्राप्य, अतर्क्य जादूच्या गोष्टी घेऊन येणारा!. झगझगीत  झिग लावल्याप्रमाणे चमकणारा.  वेगळाच माणूस वाटायचा. त्याचं बोलणं वागणं वेगळच.  पण आता सोलापूर ते पुणे जितका प्रवास करत नाही त्याच्याहून जास्त परदेशी प्रवास करणारी मंडळी आपल्याकडे आहेत. पण एक मात्र खरे प्रत्येकाची परदेश प्रवासातील बघण्याची नजर वेगळी. कुणाला निसर्ग भावतो .कोणाला लोक ,कोणाला कारखाने तर कोणाला वास्तुशिल्प.

              कॅनडा माझ्या मुलाची आणि आणि सुनेची कर्मभूमी!  तेथिल आमची चिमुकली नात म्हणजे आमच्यासाठी मोठ्ठ लोहचुंबक.सतत तिकडे खेचत असते  पण---- असो. जवळ जवळ अडीच वर्षांनी भेटणारी नात जेव्हा विमानतळाच्या बाहेरून आपल्या आई बाबांचा हात सोडून धावत येऊन झेप घेते आणि कोवळ्या हातांनी मिठी मारते तेव्हा सोळा तासाच्या प्रवासाचं पूर्णतः सार्थक तिथेच होते.

                 कॅनडाची हवा तशी  महाविक्षिप्त आणि विचित्र महालहरी. सहा महिने नुसती थंडी! थंडी पण अशी की जगात हिमयुग सुरू झालय आणि पृथ्वीचा हाच अंत आहे असच वाटावे. हिम पडताना श्वेत धवल! पण नंतर कळकटलेला. सर्वत्र पसरलेल्या गढूळ हिम राशी, शरीरातील पेशी पेशी गोठवणारी थंडी, झाडांचे खराटे ,पाय घसरून पडण्याची सतत भीती, गाडीही घसरण्याची धास्ती आणि ट्रॅफिक जॅम. या सगळ्या नकोशा वाटणाऱ्या गोष्टीला उतारा म्हणजे तिथला वसंत ऋतु, उन्हाळा आणि मला सर्वात आवडलेला फॉल किंवा ज्याला ऑटम असं म्हणतात. म्हणजे आपल्या 'शरदहेमंत' ॠतुचा 'कॅनडास्थित' भाऊच. कॅनडात आपल्यासारखे भरगच्च सहाॠतूंचे कुटूंब नाही तर हम दो हमारे दो असे आटोपशीर!.उन्हाळा, ऑटम -,हिवाळा आणि वसंत.सरता उन्हाळा आणि जवळ येणारा हिवाळा यांच्या चिमटीत सापडलाय ऑटम.


                 हिवाळा अजून दूर कोपऱ्यावरच्या वळणावर असतो अजून घरात त्यानी प्रवेश केलेला नसतो आणि उन्हाळाही चार पाय-या वरच असतो. घर आता एका वेगळ्याच मोडमध्ये आणि मूडमध्ये असते.हे घर तुमचे माझे नाही तर निसर्गाचे घर. साधारण ऑक्टोबरमध्ये ही निसर्गाच्या घरात मोठी लगीन घाई उडालेली असते आणि हे घडत असतं कॅनडात! तिथल्या झाडांत, तिथल्या मैलोनमैल पसरलेल्या जंगलात. पण तेथे होत असलं, तरी ते श्वेत-धवल नसते.याउलट 'बिग कलरफूल इंडियन वेडिंग 'म्हणण्या इतक ते 'रंगबिरंगी' असते. आता एवढं मोठं  लग्न निसर्गात  आहे म्हणजे त्यासाठी झाडांची व-हाड नटून थटून तयार होणारच. आता लग्नं म्हंटले की पहिली खरेदी कपडे साड्यांची. करवली बनलेली काही झाडे कुणालाच न जुमानता आधिच आपले मनभावन लालेलाल गाऊन घालतात. आजूबाजूला पसरलेला हिरव्या झाडांचा दर्या आणि ही करवल्या झालेली वेडी उत्साही झाडे आधीच  सजलीत आपल्या खास लाल पोशाखात!. मग मात्र इतर पोक्त झाडे डोळे  वटारून रागवत असतात . "आत्ता पासूनच खास कपडे घातलेत मग ऐन विवाहाच्या वेळी खराब नाही का होणार? पंधरा दिवस आहेत अजून लग्नाला." पण या करवल्या कुठल्या दाद देतात?पंधरा दिवसांनी फक्त पंधरवडाभर  चालणारा लग्नाचा सोहळा!. दिवस सरतात. अजूनही हिरवीगार असलेली झाडं  हळू हळू आपल्या प्रसाधनाची सुरवात करतात. आपले खास पोशाख तय्यार करू लागतातआणि मग उसळतो अनेकविध रंगांचा  कल्लोळ. चटकदार नारंगी, मंद पिवळा, ,मला जांभळाच आवडतो असे सळसळत्या पाना पानात बोलत गर्द जांभळा कद घालून एखाद झाड देखरेख करत असते. जरा वेगळाच रंग बरा वाटतो.असे संवाद झाडाझाडातून पानापानातून उमटायला लागतात. काही झाडे एकदम रसरशीत तजेलदार पिवळी, कुणी मंद तपकीरी पिवळी.काही आदिम, रौद्र,गूढ जळजळीत लाल रंगाला  पसंती देतात.  काही लालट पिवळी, नारींगीच्या विविध छटा कुणी पसंत करतात. घरात   एखाद्या वृद्ध  स्त्रीने  जाऊंदे माझी साडी आहे तिच ठीक आहे म्हणून गप्प बसावं आणि आपली जुनी साडीच नेटकी करून वापरावी तशी आपली हिरवीच पानं अधिक तजेलदार करून काही झाडे उपस्थित रहातात. व-हाड तर मस्त सजलंय. काही मेपलची झाडे दर चार दिवसांनी  नवनवीन रंगांचे पेहराव बदलतात. हिरवी पिवळी , तपकीरी, लालेलाल. नटवी मेली! रंगांची झिम्माड!आसमंताला एक आगळीवेगळी शीतल पण झळझळीत आग लागली आहे असे वाटू लागते. सारेच विरोधाभास. 

             शेतात मक्याची कणसे अंगोपांगी गच्चीम भरली असतात. सफरचंदांचा भार झाडांना सोसवेना झाला असतो. छोटा छोटा होणारा दिवस, सुखद हवा, गडद शाईसारखा आकाशाचा मंडप. लग्नाची तयारी तर फक्कड झाली असते.लग्न असते  ------ वर असतो सरता उन्हाळा  आणि वधू  अर्थातच येऊ घातलेली श्वेतधवल थंडी. अशा या दैवी लग्नाला आम्ही उपस्थित होतो. आमची तक्रार एकच की आम्हाला हे सारे भव्य दिव्य, रंगबिरंगी दृष्य पहायला सहस्त्र नेत्र का नाहीत. ते बघताना त्या उबदार विलोभनीय रंगीत निसर्गाचे थोडेसे दडपणच आले होते. असे म्हणतात  मरणापूर्वी  दिव्याची वात नेहमीच मोठी होते.उन्हाळाही आपली सर्व संपत्ती सारे सौदर्य सारे जीवन  नववधू हिवाळ्याला अर्पण करून,प्रदर्शन करून तिच्यात विलीन होतो म्हणूनच का हा निसर्ग  सर्वांगाने रंगतो?


            त्यातच हॅलोविनच्या कार्यक्रमातील भुतं, चेटकीणींची मांदियाळी उठलेली असते.थॅक्स गिव्हींगची गडबडही घरोघरी असतेच. असा हा भारलेले आणि मंतरलेला फाॅल सिझन.माझा प्रिय प्रिय ऑटम. 

एखाद दुसरी करवली बघा आत्ता पासूनच मखडतेय.

व-हाण सजलंय बर! तयारीत रहा. 


         याच सुमारास मला भेटला ॲन्टॅरीओ.अगदी प्रथम दर्शनी प्रेमात पडावा असा. मैलोन मैल पसरलेला तरी आपलासा आणि आटोक्यातला वाटणारा हा तलाव. याला तलाव ,सरोवर म्हणणे म्हणजे कद्रूपणाची कमाल. या ऑन्टॅरीओत मोठ्या लाटा येतात, गलबत चालतात कधी मधी जहाज सुध्दा!. हिवाळ्यात तो होतो बर्फ आणि त्याच्या पाठीवर  मस्तपैकी स्केटींग करू देतो.जगातले दोन नंबरचे मोठे सरोवर म्हणून स्वतःचे कौतूकही करून घेतो.अशा या मिनी गोड पाण्याच्या समुद्राबरोबर माझी छानशी मैत्री झाली होती.रोज त्याला भेटायला गेले की तासभर तरी शांतपणे गप्पा व्हायच्याच.तो लपापत्या लाटांनी बोलायचा. मधेच सीगल्स पण यायचे .तो अंगावर खेळणा-या बोटी , जहाजे दाखवायचा,सूर्यकिरणांनी त्याला भेट म्हणून दिलेले सोनं चांदीही लाटांवर लादून समोर पसरायचा.कधीकधी उगाचच खोटंखोटं रागावून मोठ्या लाटांचे तांडव करून हसायचा. त्याच्या मूड प्रमाणे बदलते रंग खरतर सरड्यालाही लाजवायचे.कधी कन्हैयाचा नीळा, कधी सावळ्या विठूची काळी घोंगडी तो पांघरायचा.झाडाचे हिरवेपण ल्यायचा.चमकदार सूर्यकिरणांनी दिलेले , कधी चांदीचे कधी सोन्याचे असे विविध चमकदार कपडेही घालून गोल्ड लेक, सिल्व्हर लेक अशी उपाधीही स्वतःला लावायचा..खर तर पूर्ण  टोरांटोची तहान भागवणा-या ,तिथल्या शेतीचा, कारखान्यांना पाणी देणारा, द्रौपदीच्या अक्षय पात्राप्रमाणे अखंड  भरलेला हा ॲन्टॅरीओ तो असली उपाधी लावायला अगदी योग्य. टेचदार,डौलदार राजहंस,बदकांचे लटांबर आमच्या आजुबाजुलाच बागडत असे. मित्र म्हणून ऑन्टॅरीओने मला काय शिकवले याची यादी फार मोठी आहे. सत्य शिव  सुंदर याची प्रचिती होती ती.कधी कॅनडाला गेलात तर जरूर त्याला भेटाच आणि माझा नमस्कार सांगा.

        

माझा प्रिय मित्र चंदेरी झोकात. 

   

      बदक आणि राजहंस गप्पात सामिल. मैफिल मस्त रंगली आहे.


       सून मुलाकडून भरपूर लाड करवून कॅनडाला आम्ही टाटा करतो. नातीने आमच्याबरोबर यायचे म्हणून इटुकली बॅग केव्हाच भरून ठेवली असते.परतीच्या वेळी  तिला चुकवून निघावे लागते.अजून एक अग्निपरीक्षा!लेकाला सुनेला टाटा करताना माझ्या मित्रालाही मनात टाटा करते. परत यायचा वायदा करते. विमानातून खिडकीतून वाकवाकून तो निसर्गाचा लग्न सोहळा अनुभवते.मग मात्र वेध लागतात माझ्या सोलापूरचे. माझ्या घराचे.



माझे आधीचे 'पसारा' मधील लेख वाचायचे असल्यास खालील लिंक क्लिक  करावी.

   https://drkiranshrikant.pasaara.com 

४ टिप्पण्या:

  1. मस्त!निसर्गाचे आपल्याला अपरिचित रूप.
    मुलांपेक्षाही नातवंडे जास्त लळा लावतात हा सार्वत्रिक अनुभव असावा (कारण मानसशास्त्रज्ञ सांगतील?).

    उत्तर द्याहटवा
  2. हा सखा निसर्ग अनोळखी असूनसुध्दा तो तुमचा मित्र ही ओळख जवळचीच की..! छान..

    उत्तर द्याहटवा