शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

कोर्टाची पायरी ©️


            जर आठवणींच्या पसाऱ्यातल्या  खास विनोदी  आठवणी  आवरायच्या ठरविले  तर नक्कीच त्यातल्या काही काही आठवणी असतील न्यायालयातील!. तिथल्या अनुभवांचे स्मरण झाले म्हणजे अगदी खदाखदा नसले तरी गालातल्या गालात हसू येतेच. तेथील अशिलाचे आणि आणि फिर्यादीचे सवाल-जबाब म्हणजे पु ल देशपांडे ,चि. वि. जोशी अशा तमाम विनोदी लेखकांना कोळून प्यायलेले असतात. आत्तापर्यंत अशा विनोदांचा थोडा अनुभव  घेण्याची संधी मला दोनदा मिळाली. एकदा तर ती संधी मी अंगावर ओढवून घेतली. तर दुसऱ्यांदा बालरोग विषयातील तज्ञ म्हणून माझी साक्ष झाली. आज त्यातील एका आठवणीचा पसारा आवरणार आहे.




                          कोर्टाची पायरी©️


                "शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये "हे एक घासघासून बुळूक झालेल्या बोल्टमधल्या स्क्रू सारखे वाक्य! हे वाक्य सुध्दा, निबंधातून  लिहून,एकमेकांना  सतत सांगून ,ऐकून  निसरडे झाले आहे .अशा या वाक्याचा 'स्क्रू' कधीतरी माझ्या डोक्यातील बोल्टमधून  सुssळ्ळकन निसटून कुठेतरी घरंगळलेला असावा.    मी कोर्टाची  पायरी त्यामुळेच चढले. दुसरे सर्वात महत्वाचे म्हणजे हे वाक्य शहाण्या लोकांसाठी आहे. म्हणजेच मज साठी नाही. या वाक्यातील शहाणी? छे छे "ती मी नव्हेच!" लहानपणापासून ते आज्जी होईपर्यत शहाणपणा म्हणजे नक्की  काय हेच मुळी मला  कळलेले नाही. लहानपणी आई प्रेमाने 'माझी वेडू.' असे म्हणायची तर नवरोबाच्याही खुषीची पावती म्हणजे 'वेडाबाई '  अशी हाक हिच आहे! त्यामुळेच की काय ही अनेकांना मनस्ताप देणारी, उगाच चढलो वाटायला लावणारी  कोर्टाची पायरी मी  स्वहस्ते बांधली आणि त्यावर आरोहण केले.  त्यामुळे तक्रारीला वाव नाही. अर्थात कोर्टातील  प्रसंगाने माझी एवढी करमणूक झाली की आता मी या अनुभवाने नक्कीच म्हणेन, एकदा तरी आयुष्यात कोर्टाची पायरी चढायलाच हवी.

                त्याचं असं झालं साधारण ऐशीच्या दशकात  गाडी चालवायला नवीन नवीन शिकले होते. गाडीचे स्टेरिंग व्हिल हातात आल्यावर फारच भारी वाटायचं. हवी तिथे गाडी फिरवायला 'मौज वाटे भारी'. त्या कालखंडात  रस्त्यांवर गर्दीही कमी, आणि आत्ता सारखे दुभाजकही नव्हते. सगळे नियम काटेकोरपणे पाळत गाडी चालवणे खूप आवडायचं.

        नंतर काही वर्षांनी एकदा घरातून निघून एका चौकातून कार घेऊन  जात असताना  चौकातून गाडी उजवीकडे वळवली. नेहमीसारखा लांबलचक हात बाहेर काढून वळत असल्याचे सूचित केलं. तोच समोरूनच फोडणीला टाकलेल्या मोहरी सारखी  तडतडत येणा-या एका रिक्षाने, आता वेग कमी करेल असं वाटेपर्यंत काटकोनात वळलेल्या  गाडीला एकदम धडाssssमकन  धडक दिली .कोणालाच काहीही लागलं नव्हतं पण गाडीला छोटासा कळत नकळत  डेन्ट मात्र आला होता. रिक्षाला तेवढाही नाही.आता मात्र माझा पारा सहारा वाळवंटातील ऊन्हासारखा चढू लागला. कायद्याचे पुस्तक डोक्यात थैमान घालू लागले. एवढी सूचना देऊनही याने वेग का कमी केला नाही म्हणून रागावून  खाली उतरले. अपराध्याला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे.(हे मनातल्या मनात!). नेहमीप्रमाणे रिकामटेकड्यांची गर्दी जमली. मग काय! प्रत्येक जण जणू महातज्ञ! मग या तज्ञ लोकांच्या शंभर सूचना सुरू झाल्या.बहुतेकांचे म्हणणे म्हणजे" जाऊन द्या गरिब आहे रिक्षावाला".एकाने तर सांगितले" मॅडम तुम्हीच द्या त्याला थोडे पैसे. "गोबेल्सच्या प्रयोगासारखे सतत तेच तेच ऐकून.,शेवटी शेवटी तर गाडी चालवणे हेच कसे चूक आहे., आणि गरीब बिचारा रिक्षावालाच कसा बरोबर आहे हाच विचार माझ्याही मनांत येऊ  लागला.अरेरे बिच्चारा चुकीच्या बाजूनी येत असला तरी काय झाल? कशीही  वेडीवाकडी  रिक्षा हाकायचा त्याला जन्मसिद्ध  अधिकार  आहे. मीच गाडी रेटायला नको होती, असेही पटायला लागले. ज्या तावातावाने गाडीतून उतरले होते तो डोक्याचा ज्वलंत ज्वालामुखी आता अगदी हिमालय नसला तरी सूप्त  ज्वालामुखी होऊ लागला.राग थंड व्हायला लागला  . अखेरीस  तर रिक्षावाल्याने फक्त चूक कबूल करावी एवढीच माझी माफक इच्छा उरली.पण रिक्षावालाही मी ज्या गावचे पाणी पिते तेथलेच पाणी पिणारा. रस्त्यावर एवढा जबरदस्त फॅन क्लब त्याला मिळाल्यावर तो कुठला माघार घेतोय! मग मात्र मी  ठरवलंच की आपण केस करायचीच.

           मग आमची वरात गेली जवळच्या पोलिस स्टेशनात. रीतसर तक्रार झाली .पंचनामा झाल्यावर घरी आले. नव-याला सर्व सांगितले.  तो फक्त हसला. तेव्हा लक्षात आले ज्यावर चढू नये अशा  कोर्टाच्या पायरीची विटा आणि वाळूसिमेंट लावून आपण बांधणी सुरू केली आहे. चलो काही हरकत नाही. आता माघार नाही. एक नवा अनुभव!

           सहा महिने गेले. विसरूनही गेले होते  अपघात. आणि एक दिवस ओपीडी मध्ये भर गर्दीत मला कोर्टाचे समन्स आले. दोन दिवसांनंतर दुपारी बारा वाजता त्यांनी त्या केस साठी कोर्टात बोलवले होते म्हणजे ऐन कामाच्या वेळात. पण मन एकदम सह्याद्री सारखे कणखर झाले होते.आता मागे फिरणे नाही. अंगात वीरश्री संचारली होती. आता डोळ्यासमोर  आपल्या हिंदी सिनेमातले अनेक प्रसंग उभे राहिले.' तारीख पे तारीख पे तारीख' ओरडणारा सनी देवल,वक्त मधिल सुनिल दत्त! वकीलांचे काळे कोट. त्यांचे ते' माय लॉर्ड' ,न्यायाधिशांचे 'ऑर्डर ऑर्डर'  हे घुमू  लागले. ऍलिस इन वंडरलैंड सारखे पूर्णतः  वेगळ्या जगाची सैर. मजा वाटत होती. 

       अखेर तो दिवस  उजाडला.  आमच्या केसचा पुकारा केला गेला. न्यायाधीश स्थानापन्न झाले. माझी केस!  कोर्टात गर्दी होईल असं वाटलं होतं (??)पण माझा नवरा सुद्धा आलेला नव्हता .चार टाळकीही नव्हती. बहुधा रिक्षावाला आणि त्याचे दोन  मित्र तेवढे उपस्थित होते. न्यायाधीश यादेखील श्रीमती न्यायाधीश असल्यामुळे एक औरतही औरतके मनका दर्द जानती है असले खुळचट वाक्य मनात घुमायला लागले . सत्त्यासाठी लढणारी ' मी' मलाच एवढी महान वाटू लागले की माझ्या डोक्यामागे छानसे तेजोवलय आहे असाही भास मला होऊ लागला.

                लाल बासनातील श्रीमद् भगवत गीतेवर हात ठेवून माझा शपथविधी झाला. न्यायालयातील पहिल्या विनोदाची चुणूक  होती ती!   नुसत्या पवित्र पुस्तकांवर हात ठेवून  माणूस एकदम खरंखरं बोलायला लागेल हे समजणे म्हणजेच महा विनोद! ,"मीच तो चोर हो!" किंवा "मीच तो खूनी" अस सांगायला लागला तर वकीलांच्या पोटावर पायच येईल की हो! अजूनही हा शपथ प्रकार का चालू आहे हेच मुळी कळत नाही.  कोर्टात पवित्र थर्मग्रथांवर हात ठेवून जितकं खोटं बोललं जातं तितकं कुठेच खोटं बोललं जात नाही. 

            सुरुवातीला माझं नाव ,पत्ता,व्यवसाय हे सगळं विचारून झालं. तोपर्यंत कंटाळवाणा चेहरा केलेल्या वकिलाच्या चेहऱ्यावर जरा जान आली .अचानक माझ्यासमोर येऊन त्यांनी विचारलं" या समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का? "मी समोर पिंज-यातल्या व्यक्तींकडे पाहिले अगदी  नीटच..पण माझा मेंदू सहकार्य करायला तयारच नाही!! हा कोण ?साक्षीदार?की साध्या कपड्यातील पोलिस  की दस्तुरखुद्द  रिक्षावालाच?आता आली का पंचाईत.सकाळी मी पाहिलेला माणूस दुपारी परत आल्यावर त्याला ओळखणे अवघड!तिथं तो समोरचा पूर्णतः अनोळखी माणूस कसा काय ओळखणार मी! एक निश्चित, ती समोरची व्यक्तीच जर रिक्षावाला असेल तर वाssss अपघात भलताच मानवलाय की त्याला. सहा महिन्यांपूर्वी शेवग्याच्या शेंगेसारखा दिसणारा आता सुरणाच्या गड्डयासारखा  दिसत होता.  मी मान नकारार्थी हलवली. मॅडम तोंडाने सांगा "मी ओळखत नाही" तसे बोलल्यावर परत वकील साहेब उवाच" मॅडम हाच माणूस  रिक्षा चालवत होता ना?" , आता रिक्षा  चालवणारा माणूस  पुरुष जातीचा  होता एवढं नक्कीच!अगदी तो माणूसच होता एवढ नक्की सांगू शकते. आणि हे पण नक्की ती रिक्षा  घरातील कोणीही बोका, मोत्या , ढवळ्या पवळ्या हे पुरूष जातीचे पाळीव प्राणी  पिटाळत  नव्हते. पण हा  माणूस  सहा महिन्यापूर्वीचा रिक्षावालाच होता हे सांगणं अवघडच. काही तरी विनोद करायचा म्हणून मी बोलून गेले  "अहो तो काही शाहरुख खान होता का मी लक्षात ठेवायला?" अर्थात  शाहरूख खानलाही न ओळखण्याची किमया मी सहज करू शकते असा मला आत्मविश्वास  आहेच. पण हे सिक्रेट  तुमच्या माझ्यातले. इतक्यात न्यायाधीश बाईंनी समजुतीच्या स्वरात सांगितले  "जाऊ द्या हो मॅडम तुम्ही फक्त उत्तर द्या. उगाच मनावर घेऊ नका."

                पुढचा प्रश्न आला" मॅडम तुम्ही कुठल्या दिशेने येत होता आणि कुठल्या दिशेकडे जात होता"? थांब रे बाबा! या वकीलाचा  पेपर फारच अवघड वाटायला लागला. आता पटकन दिशा सांगणे कौशल्याचेच काम नाही कां? दरवेळी दिशा ओळखताना शाळेतील भूगोलाचे सर आठवतात .पूर्वेकडे तोंड केल्यावर डावीकडे उत्तर आणि उजवीकडची दक्षिण लक्षात ठेवूनच पुढच्या दिशा शोधल्या जातात.म्हणजे आधी पूर्व कुठे ते शोधा रे शोधा. त्यातल्या त्यात ईशान्य आणि वायव्य जरा तरी बऱ्या.थोडाच घोळ घालतात.  ईशान्यपूर्वेची राज्ये आणि वायव्येला खैबरखिंड यामुळे या दोन्ही थोड्याफार कळतात तरी; पण आग्नेय आणि नैॠत्य या दोन दिशांनी कायम माझ्याशी शत्रुत्व पत्करलय. त्यांनी डोक्यात नेहमीच खळबळ माजवली असते. नैऋत्य मोसमी वारे येतात म्हणजे  नक्की कुठून? , केरळ कडून का  चेन्नई  कडून हा नेहमीच गोंधळ होतो.  वकीलसाहेबांना कचकून अष्ट दिशा नव्हे दश दिशांची नावे फडाफड म्हणून दाखविण्याचा मोह झाला पण जान दे! छोडो.   रस्त्यावर इतक्या सगळ्या ओळखीच्या खुणा होत्या आणि वकील साहेब दिशांना सोडायला तयार नव्हते. मी पूर्व म्हटल्यावर त्यांनी म्हणावे मॅडम ती दक्षिण आहे हो .आणि मी उत्तर दिशा म्हणताच वकिल साहेब  पूर्वेवर ठाम होते. सा-या सरळसोट दिशा बिचा-या इतक्या एकमेकांत गुंतून गेल्या की तो गुंताडा कसा सोडवावा काही क्षण आम्हालाच काही कळेना.हळूहळू  गुंता सोडवताना मात्र मी खरोखरच थकून गेले.अखेर आमची सर्वांचीच भरपूर करमणूक होऊन त्या दिशांच्या गुंत्यातून आम्ही बाहेर पडलो. 

                 अशा रीतीने अजून काही प्रश्नोंत्तरांच्या फैरी झडल्या.  वर्षभराची करमणूक एका तासातच फस्त झाली होती.  चेहराही लक्षात नसलेल्या रिक्षावाल्यालाही मी पूर्णपणे माफ करून टाकले होते. त्यामुळे आचके देत देत माझी कोर्टातील केस मृत पावली.

          ही कोर्टाची पायरी माझी मी स्वतः बांधली आणि मी चढले अर्थात माझ्या मते यातील खलनायिका  होती ती रिक्षा! तरीही त्याच्यातून माझी स्वतःची भरपूर करमणूक करून घेतली. मस्त रिलॅक्स झाले. त्यानंतर परत एकदा मला  तज्ञ म्हणून व्यावसायिक दृष्ट्या मत  देण्यासाठी बोलवलं होतं.तेही मी अगदी मनापासून केले.त्यानंतर मात्र मनातल्या रामशास्त्री प्रभुणे यांना  आजतागायत मी विश्रांती दिली आहे. 


drkiranshrikant.pasaara.com

५ टिप्पण्या:

  1. वाह वाह,
    असे प्रसंग वर्णन लिहिले तर बोर्डात मराठीला पहिली येशील.
    मोहरीसारखी तडतडणारी रिक्षा ही उपमा कशी सुचू शकते?
    स्वहस्ते कोर्टाची पायरी बांधणे ही कल्पनाही वेगळीच.
    सर्व वेगळे आणि सहज,सिध्दहस्त आहे.
    खूप आनंद झाला कारण कृत्रिम काहीच नाही

    उत्तर द्याहटवा
  2. किरणताई एकूणच कोर्टाच्या कामकाजावर मस्त ताशेरे ओढलेत तुम्ही । अगदी तंतोतंत वर्णन । बोलता बोलता कोपरखळी कशी द्यायची ते तुमच्याकडून शिकावं । तुमच्या नेसमीच्या ओघवत्या सहज लिखाणाने प्रसंग जीवंत झाला आहे ।

    उत्तर द्याहटवा