शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

दिल हैं छोटासा©️

 

आज खेळात  तल्लीन झालेली मुले पाहिली. आश्चर्य  म्हणजे  मोबाईल  वा संगणकावर तो खेळ  नव्हता. खेळ  रंगला होता रस्त्यावर. इतकं छान वाटलं  न ते बघून. अर्थातच आमच्या लहानपणीच्या खेळांची आठवण प्रकर्षाने  झाली.लहानपणाच्या आठवणींचे किंवा आमच्यावेळी  असे होते ,हे स्मरणरंजन,भ्रमणरंजन सुरू  झाले, म्हणजे म्हातारपण चांगलच मुरलय! असो.

       चलो आज लहानपणीच्या आठवणी आवरायला हव्या.मला त्या रम्य वगैरे वाटल्या तरी आत्ताच्या पिढीला कदाचित हास्यास्पद  वाटतील.


             ©️  दिल है छोटासा----   


         खर तर 'कंटाळा आला' हे वाक्य त्यावेळेस  म्हणजेच माझ्या लहानपणी जवळजवळ  सर्वच मुलांच्या शब्दकोशात नव्हते.बरं, खेळासाठी काही खास वस्तूच हव्या असा पण अट्टाहास नव्हता. मी आणि बहिण गच्चीत  बसून आकाशातील ढग बघत असू मग त्याचा आकार कशाचा आहे हे सांगायचे हा खेळ मोठ्या आवडीने खेळत असू.पण गम्मत  अशी व्हायची ती ढगाला हत्तीचा आकार आहे असे म्हणेपर्यंत  तो लब्बाड ढग  सोंड आणि सुपासारखे कान गायब करायचा मग हत्ती व्हायचा पेटारा. मग आमचा हास्याचा धबधबा. कधीकधी दोघीही हटून बसायचो की मी सांगतेय तोच आकार बरोबर आहे. मग कट्टी. रेडिओवरच्या जाहीराती हावभाव करून म्हणायच्या , त्यात त्या प्राॅडक्टचे नाव ओळखायला लावायचे.गेला बाजार सुट्टीत पत्ते, कॅरम , ल्यूडो, सापशिडी इत्यादी खेळ असतंच. चांदोबा मासिक आल्यावर आधी कोणी वाचायचे यावर भांडण जुंपायचेच.ते जायचे आईच्या सुप्रीम कोर्टात.  तेच शेवटच अपिल. मुकाट्याने ऐकायला लागायचे. सर्कस आल्यावर तिच्याकडून स्फूर्ती  घेऊन " ढण्टssढॅण ग्रेट बाॅम्बे सर्कस "अशी आरोळी  ठोकून , दोन्ही हात सोडून सायकलवर  सर्कस सुंदरी बनायच्या नादात अनेक वेळा ढोपर अन् कोपरे फोडून घेतली आहेत मी.

              रात्रीची जेवण नेहमीच एकत्र ! ती झाल्यावर रेडीओवर सुरु असलेले नभोनाट्य ऐकताऐकता डोळे जड होऊ लागायचे. इतके साधे, सरळ, सोप्प आयुष्य होत ते.

         त्यावेळी ब-याचदा वीज महावितरणाची खपा मर्जी व्हायची  म्हणजे कधी वा-याची झुळूक  जरा जोरात येई किंवा गुलाबपाणी शिपडल्यासारखे चार थेंब ढगातून आले रे आले की वीज गुल.पण आम्हाला ती पर्वणीच असे कारण नंतर रंगायच मेणबत्ती पुराण.होय. पुराणच . कथा किंवा कादंबरी नाही कारण नेहमीच्या साचेबंद आयुष्यापेक्षा इतके सुरस आणि चमत्कारिक  असायचनं ते!

                      रात्री गप्पाष्टक रंगात आलेली असायची. आई बाबांचे लहानपणाचे किस्से ऐकताना मस्त रिमझीम पावसात नाचल्या सारखी झिम्माड मज्जा येत असायची.अशावेळी फटकन वीज जायची अणि मग सुरवात व्हायची मेणबत्ती पुराणाला. 

     "अग्गोबाई गेली कां वीज" या वाक्यापाठोपाठ सुरु व्हायचे धुमशान. पटकन आईची आज्ञा कानी यायची,ऊठ पटकन, लाकडी कपाटात वरच्या खणात उजवीकडे पुढेच मेणबत्ती ठेवली आहे ती घेऊन ये बघू पटकन. त्या बरोबरच, आपटू नकोस वेंधळ्यासारखी असा स्वभावगुणांचा उध्दारही असायचाच. एवढा सविस्तर मेणबत्तीबाईंचा पत्ता मिळाल्यावर काय बिशाद आहे त्या न मिळण्याची.तोवर आईचा आवाज कानावर आदळायचाच. नुसती मेणबत्ती नको आणू, तेथेच डावीकडे काडेपेटी ठेवलेली आहे ती पण घेऊन ये. सगळ्याच आया तुफान हुश्शार असतात त्यातुन आमची आई म्हणजे हुश्शार आयांची मुगुटमणीच. मी काडेपेटी न घेताच निघाले आहे हे तिला एव़ढ्या अंधारातही बरोब्बर समजलेले असे.आता मात्र त्या दाटलेल्या कुट्ट काळ्या अंधाराची जबरी भीती वाटायला लागायची.समस्त भूते, वेताळ, हडळी भोवतालच्या अंधारात लपून आता माझा कोणता पदार्थ बनवायचा यावर खल करत आहेत हे मला स्पष्टच जाणवायचे. मग मात्र भीमरुपी महारुद्रा, रामरक्षा, आठवतील त्या देवांची नावे जीभेवरुन घरंगळत. अखेर अंधारात कोणालाच माझी विजयी मुद्रा दिसत नसली तरीही मेणबत्ती नाचवत मी आईजवळ येई. इतक्या वेळ धडधडणारे छातीतले इंजीन आता स्टेशनात शिरल्यासारखे हळुहळू चालू लागे. मग पुढच्या दहा मिनीटात मेणबत्ती लावायचा कार्यक्रम रंगत असे.मेणबत्ती पेटली की काही थेंब खाली वाटीत टाकल्यावर मेणबत्तीबाई एकदम ताठपणे वाटीत उभ्या रहात. तिच्या ज्योतीचे मात्र नाचकाम सुरु होई. एकदा डावीकडे एकदा उजवीकडे तर एकदा उजवीकडून डावीकडे अशी सारखी लवलव,लवलव.

          खोली त्या उजेडात एकदमच अनोळखी वाटू लागे. भिंतीवर आमच्या मोठ्याच्या मोठ्या सावल्या दिसू लागत आणि मग सुरु होई खेळ सावल्यांचा.बाबांच्या हातातून  जादूई सावल्या भिंतीवर एकामागे एक हजेरी लावू लागत. मेणबत्तीसमोर बाबांची बोटे हळूच हालचाल करीत आणि बघताबघता नवनवीन प्राणीजगत भिंतीवर परेड करायला लागायचे.गरुड ते उंदीर आणि साप ते कुत्रा ,अगदी कट्टर वैरीदेखील भिंतीवर मात्र तुझ्या गळा माझ्या गळा म्हणत आहेत हे पक्कंच जाणवायच. कालिया फणा काढून फुतकारतो आहे तोच कुत्रा शेपटी हलवीत भुंकू लागायचा.एकामागे एक समस्त प्राणीसंग्रहालय आपली हजेरी लावून क्षणात नवे रुप धारण  करीत असे. एखादी फुलदाणी डोक्यात फुले घालून सजली की पाठोपाठ यायचे छत्रचामरे ढाळत छत्रपती. त्यांचे आगमन म्हणजे जणू सावल्यांच्या खेळाची 'समाप्त' ही पाटी असायची. मग खास आमच्या आग्रहाखातर एखादा चुकार प्राणी भिंतीवर साकारला जायचा.खेळ असा रंगतोय तोच मोठ्या बहीणीला आठवण यायची भुतांच्या गोष्टींची. आमच  सगळ लटांबर बाहेर पाय-यांवर एकमेकांना खेटून बसायचे. तोवर आईचा आवाज यायचाच, ताई घाबरवू नकोस ग छोट्यांना. आईचे सांगणे कानाआड केले जायचे हे वेगळे सांगणे नलगे.अमावस्येची अंधारी रात्र होती या वाक्याने सुरु झालेली गोष्ट शपथेवर भूत बघितल्याची ग्वाही देऊनच संपत असे. अर्थात हे भुताचे अनुभव नेहमीच कुठल्यातरी मैत्रीणीला किंवा तिच्या घरच्यांना आलेले असत.स्वत: कोणीच अनुभवलेले नसत. सगळ्याच गोष्टी इतक्या नाट्यमय ,रंगवून सांगितल्या जात की समस्त भुतेही भितीने थरथर कापत असावीत. मग आम्हा छोट्यांची पळापळ उडे. रामराम म्हणत आईला चिकटून बसले की जरा कुठे उतारा पडे.

      कधी कधी चांदण्या बघायला गच्चीत  एकमेकांचा हात धरून जायचो. तोवर बाबाही तेथे यायचेच. छान हवा असायची. सगळीकडे अंधारगुडूप.डोईवर आकाशभर लाह्या देवाने सांडल्या असायच्या. वेंधळा कुठला! जोडीला अर्धवट खाल्लेला बत्तासा असेच. बाबा मग सांगत हा मृग, ही अरुंधती, हा व्याध. असलं भारी वाटायचे ते ऐकताना!

         रात्रीच्या जेवणाची वेळ आता झालेली असायची. मग रंगायचे मेणबत्तीच्या उजेडांत जेवण. तो मंद पिवळा उजेड, त्या भिंतीवर नाचणा-या आमच्याच मोठ्याच्या मोठ्या सावल्या, ते मेणबत्तीवर झेप घेणारे पतंग,मधेच पंख जळाल्यावर चुर्रकन होणारा आवाज, आमच्या चेह-यावर रंगलेला खुमासदार उजेड-सावल्यांचा मुक्त खेळ, मधुनच हसताहसता चमचमणारे डोळे ,कुत्र्याचे ओरडणे, लसणीच्या फोडणीचा खमंग खास वास या सा-या, सा-या गोष्टी सर्व पंचेद्रियांना सुखावुन जात. द्रौपदीच्या थाळीसारखे मनही आनंदाने आकंठ भरुन वहात असे.भुते ,चेटकीणी, वेताळ मंडळींची भिती सातासमुद्रा पलीकडे अंधारात पळून जात असे.जेवणाचा शेवटचा घास घेईपर्यत चाललेले हे पुराण जणू फारच लांबले असे वाटल्यामुळे की काय वीजमंडळ वीज चालू करत असे. लख्कन दिवा प्रकाशमान होई.इतके विचित्र वाटायच तेव्हा.प्रत्यक्षाहूनी सावली मोठी केव्हाच गायब झालेली असे. भिंतीवरची नेहमीची पाल चुकचुकता दिसे आणि आम्ही भावंडे भानावर येत असू.आता सुरू होई मेणबत्तीवर फुंकर घालण्यासाठी भांडाभांडी. परत मेणबत्तीबाई काडेपेटी समवेत जाऊन बसे लाकडी कपाटात वरच्या खणात उजव्या आणि डाव्या बाजुला.

             ते सावल्यांचा खेळ, त्या मनात रामरक्षा म्हणत ऐकलेल्या भूताच्या गप्पा, ते आकाशदर्शन, मेणबत्ती भोवती अंधार उजेडातले जेवण, त्या उजेडात लखलखणारे डोळे आणि ती मेणबत्तीची नृत्य निपुण ज्योत सारेच मनात त्या ज्योतीसारखेच लवलवत राहिले आहे.

           अशा   छोट्या छोट्या आनंदाची झुडपे बालपणीच्या वाटेवर होती. अतिशय तजेलदार आणि सुगंधी झुडपे होती ती. खेळाच्या  साहित्याची चणचण, साधे कपडे,साध्या पध्दतीचा वाढदिवस या कशाचेच वैषम्य नव्हते.  कारण आनंद देणा-या झुडुपांनी वाट रंगीत झाली होती. छोट्या छोट्या गोष्टीत परातभर आनंद सहज मिळायचा कारण एकच. दिल है छोटासा ------ - 

          

 माझे आधीचे 'पसारा' मधील लेख वाचायचे असल्यास खालील लिंक क्लिक  करावी.

   https://drkiranshrikant.pasaara.com 


 

 

 

२ टिप्पण्या: