आज अनुभवांचा पसारा आवरताना थोडीशी खिन्न, थोडीशी सुन्न होते. आज एक घटना ज्याला मी साक्षीदार होते ती सतत आठवत होती. एकीकडं अत्यंत आनंददायी तर एकीकडं तितकीच दुःखदायी अशी घटना.पूर्णतः विरोधाभासाच्या घटना. हे असच असते. पण तरीही आज थोड्या मळभ मनाने ही घटना तुमच्यासारख्या सुह्रदां समोर मांडणार आहे. हाही पसारा आवरून ठेवणार आहे. आणि मनावर पडलेल्या सावटांतून बाहेर यायचा प्रयत्न करणार आहे. गोष्टीतली नावं अर्थातच बदललेली आहे
ॲनिमल किंगडम©️
डॉक्टर देशमुख यांच्या रुग्णालयात संध्याकाळच्या धुसर सावल्या मुक्कामाला आलेल्या 'पाहुण्या' सारख्याच आडव्यातिडव्या पसरल्या होत्या. तिन्हीसांजेची वेळ त्यामुळे अधिकच कातर, उदास वाटत होती. दबक्या आवाजात निरोपांची देवाणघेवाण चालली होती. वातावरणातील ताण जाणवत होता. खालच्या मानेने आणि दबक्या पावलांनी ये-जा करणाऱ्या परिचारिकेच्या बुटांचा चटपट आवाजच काय तो गहिऱ्या संध्याकाळवर ओरखडे काढत होता. रुग्णालयाच्या बागेतली झाडं, रोप आज मान खाली टाकून उभी होती. रुग्णालयाची नेहमीच धीरगंभीर दिसणारी इमारत आज हुंदका दाबून ठेवल्यासारखी वाटत होती. डॉक्टर देशमुख यांच्या पत्नीच्या तर बंगला ते रुग्णालय अशा तिस फे-या सहज झाल्या असतील. त्यांच्या पायाला जणू उसंत नव्हती. लापशी, फळांचे रस असे विविध पदार्थ रुग्णालयात जात होते. आणि हिरमुसलेल्या भांड्यातून परत येत होते.डॉक्टर देशमुख अतिशय खिन्नपणे अतिदक्षता विभागात बसले होते. तेथे मृत्यूशी झुंज देत होती त्यांची जीवनदात्री, आधारवड ,प्रेममूर्ती आई -आई साहेब.
-------- ----- ---- 00000--- ------- ------
जडावलेले पोट सांभाळत पांढरीशुभ्र मनी आडोसा शोधत होती. दोन कुंड्यांच्या मागे असलेली बंदिस्त पण हवेशीर जागा मनीने आधीच हेरली होती. तिकडे तिचा मोर्चा वळताच रखवालदाराने काठीने ढोसून तिला हरकाटले. म्याsssव करत आपल्या गरगरीत घारोळ्या डोळ्यातील उभट भावल्या रोखत मनीने निषेध नोंदवला. ती सर्वत्र जागा शोधत होती. आपले जडावलेले पोट घेऊन! तिला घाई झालेली होती. ती पहिलटकरीण नव्हती तरी प्रत्येक खेपेस हिच उत्कंठा, हिच भीती तिला वाटायची. अर्धवट उघडी खिडकी दिसताच त्या खिडकीतून अलगदपणे तिने आत उडी मारली. आणि मनीचे डोळे लकाकले. टेबला खालची जागा मनीने हेरली. शांत,अंधारलेली अगदी तिला हवी तशी! खुडबुडत टेबलातीलतील खालच्या खणातील कागदपत्रांवर ती विराजमान झाली.
**********00000000*********
डॉक्टर देशमुख स्वतः नामांकित डॉक्टर. मित्र परिवार ही प्रचंड. त्यांच्या शब्दाखातर अनेक तज्ञ डॉक्टरांची फौज आई साहेबांवर उपचार करत होती. पण आईसाहेबांची क्षीण कुडी कशालाच दाद देत नव्हती. अनेक डॉक्टर भेटायला येत होते. डॉक्टर देशमुख आईसाहेबांना क्षणभर सोडून जायला तयार नव्हते. जणू घुटमळणार्या मृत्यूला ते आव्हान देत होते. काही दिवसांसाठी रुग्णालयातील कामकाजही त्यांनी बंद ठेवले होते.
---- -- ------- - ----0------------------
मनाजोगती जागा मिळताच काही काळ मनी सुस्तावली. डोळे किलकिले करत तिने मिशा फेंदारल्या. अंधारातच आजूबाजूची जागा मनीने न्याहाळली. मोकळ व्हायला आता फार वेळ लागणार नाही हे तिच्या लक्षात आले. पोटात मधूनच उठणाऱ्या कळेबरोबर मॅssssव असा हाकारा आपसूकच उमटत होता. काही क्षण असेच गेले आणि वेदनेच्या अग्रावर बसून इवलाली पिल्ले जगात आली. लडखडत आंधळ्या सारखी ती मनीला लुचत होती. तृप्त मनाने मनी त्या टेनिस बॉल पेक्षाही लहानश्या करड्या पांढ-या गोळ्यांना चाटत होती. आता पिल्लांना ठेवायला नवीन जागा मनीला हुडकायची होती. आणि मनीला अचानक भुकेची प्रथमच प्रचंड जाणीव झाली. पाठीची कमान करत मनी सावकाश उठली आणि झपाट्याने निघाली.
************00000***************
आजचा दिवस डॉक्टर देशमुख यांच्या आयुष्यातला खास दिवस! आज रुग्णालयही नेहमीचा गंभीर भाव सोडून, जणू गालातल्या गालात खुदखुदतय.दबकी कुजबुज थोडी मोकळी झाली आहे. हा दैवी प्रसाद समजा किंवा डॉक्टरांच्या इच्छाशक्तीची कमाल! आईसाहेबांनी आज डोळे उघडले आहेत. 'बाळ' त्यांनी हाक मारली. बाळासाहेब डॉक्टरांचे डोळे वाहू लागले. देशमुख मॅडमनेही रुमालाने डोळे टिपले. आता तिला डॉक्टरांच्या तब्येतीबद्दल जास्त काळजी वाटू लागली.
********0****0*******0********0********0******0
प्रचंड भुकेलेल्या मनीचा आज भाग्य दिन आहे. जास्त लांब न जाता समोरच बीळात शिरणारा उंदीर तीने हेरला. पिल्लांकडे परत जायच्या ओढीने मनीने त्या उंदराशी नेहमीचा जीवघेणा खेळ केलाच नाही. उंदराला मटकावून मनी झपाट्याने बाळांकडे परत निघाली.
-------- -----------0---- 0--- -----------
डॉक्टर देशमुखांना आता त्यांच्या रुग्णांची आठवण झाली. इतरांना आई साहेबांची काळजी घेण्यास सांगून ते बाह्यरुग्ण विभागाकडे वळले. डॉक्टरांना बघताच हातातील जळती बीडी कशीबशी लपवून रामसिंग पळतच तिकडे गेला.सर्व बंद होते. खोलीचे कुलुप काढले गेले. आतून उबट वासाचा भपकारा आला. डॉक्टरांच्या कपाळावर नापसंतीची रेषा उमटली. रामसिंगने खोलीचा दिवा लावला. खिडकी उघडली. डॉक्टर खुर्चीत बसले. इतक्यात टेबलाखाली असलेल्या चार पिल्लांनी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. त्या चुळबुळणा-या, वळवळणाऱ्या गोळ्यांना बघून आधीच थकलेले डॉक्टर भयानक संतापले. या गलथानपणा त्यांच्यालेखी क्षमा नव्हती. भेदरलेला रामसिंह पुढे आला. तो घाबरला होता. पटकन त्याने ती पिल्ले उचलली, पिशवीत कोंबली आणि तडक तिथून निघाला.
**************************00**********************
पिल्लांना सोडून गेलेली मनी पोट भरताच लगबगीने पिल्लांकडे निघाली. खिडकीतून खोलीत उडी मारताच मनी चपापली. भांबावलेल्या नजरेने तिने टेबलाकडे पहिले. आपण कुठे आलो हेच तिला कळेना. तिने धाव घेतली. जिवाच्या आकांताने टेबलावर उडी मारली. तिथल्या भकास पणे पसरलेल्या रिकाम्या जागेकडे बघताच मनीच्या तोडून टाहो फुटला मॅssssव. पण आवाज उमटेपर्यंत मनीच्या पाठीवर सटकन फटका बसला. म्याsssऊ म्याssssव असा आक्रोश करीत आपले दुधाचे तटतटलेले स्तन आणि दुखरे मन घेऊन मनी सैरावैरा पळत सुटली .बाहेर जाऊन घुटमळू लागली.
--------------0 -- -- 0 -------0------ ------ 0- ----
चांदीच्या वाटीतून घोटघोट ज्यूस आईसाहेब घेत होत्या. मुलाने आणि सुनेने केलेली सेवा बघून त्यांना कृतार्थ वाटत होते. आईसाहेबांच्या जिवावरचे संकट टळले म्हणून जंगी मेजवानी आयोजित केली होती .गाड्यांची रांग लागली होती.डॉक्टर सारख्या कर्तबगार माणसाची पार्टीही खास! ड्रिंक्स ते पुडींग सगळे पदार्थ अति देखणे, अति चविष्ट आणि नेटके. हास्यविनोद चालू होता. केविलवाण्या आवाजात म्याssssव म्यsssव करणाऱ्या मांजरीकडे कोणाचेही लक्ष नव्हते.
*************0********0********0**********0
आर्तपणे मनी ओरडत होती. आता तिला दुधाचे पातेलेही दिसत नव्हते किंवा तूरतूरत पळणारा उंदीर तिला आकृष्ट करत नव्हता .नेहमीच्या कावेबाज दिसणाऱ्या डोळ्यात आभाळ दाटले होते . फिरत, घुटमळत पिल्लांना शोधत होती ती. आक्रंदत होती.
---------0-- 0 -------------0------------ 0- - 0 -------- -
यावेळी मनीची तीन पिल्ले छिन्न- विछीन्न होऊन झाडा खाली पडली होती. सायंकाळच्या समयी घरट्यातील पिल्लांना दाणापाणी भरवयला निघालेल्या घारीने आपल्या तीक्ष्ण नजरेने झाडाखाली पडलेले चौथे पिल्लू बरोबर टिपले. ते हेरून क्षणाचाही विलंब न करता तिने झेप घेतली.ते आपल्या तीक्ष्ण नखांच्या पकडीत उचलले आणि झपाट्याने ती भरारत निघाली. घरट्यातील घारीच्या करड्या काळ्या पिल्लांनी जल्लोष केला. अहमहमिकेने चोच वासून भक्षाचे लचके आई कडून खायला ती सज्ज झाली.
*******0*******0********0********0********0
या आधीच्या लेखांसाठी लिंक :
https://drkiranshrikant.pasaara.com
मनीवर चरे उमटले ग
उत्तर द्याहटवा