शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०

लग्नाला जाते मी. भटकभवानी भाग4©️

     विवाह हा आपल्याकडील सोळा संस्कारातील महत्वाचा संस्कार. पूर्वीची नेमस्त आणि आजची झगझगती लग्न म्हणजे पत्रावळ ते पंचतारांकित  प्रवास केलेली.आपली लग्न म्हणजे दागिने, साड्या, रंगलेले गाॅसिप,गर्दी,नाच गाणी थोडंफार रुसणे फुगणे.कधी कधी दुस-या संस्कृतीतील विवाह आठवणींच्या पसा-यातून डोके वर काढतात.आता ते एवढ सांगताहेत तर ही आठवणही पसा-यातून आवरायलाच हवी नं?




 लग्नाला जाते मी. भटकभवानी भाग 4 ©️


 माझ्या पुतण्याची अवस्था ' ले गई दिल गुडिया जापानकी' अशी झाली . अर्थात आता आमचा जपानचा प्रवास होणारच हे सांगायला जोतिष्याची गरज नव्हती.   अखेर जपानमध्ये  शिंटो पद्धतीचं लग्न होणार हे ठरले.आणि भारतात आपल्या पद्धतीने!  आपल्या आवडत्या माणसाशी परत परत वेगवेगळ्या प्रकारे लग्न करणे मला तरी फार फार रोमँटिक वाटते. जपानमध्ये तिच्याशी जन्मभर सुख दुःखात साथ द्यायच वचन द्यायचं आणि भारतातही तशाच आणाभाका घ्यायच्या एकदमच भारी! माझी होणारी सून जपान मधील शिंटो संप्रदायाची. जपान मधले जगप्रसिद्ध लढवय्ये सामुराई हे या शिंटो संप्रदायाचे. त्यामुळे जपान मधले लग्न बघण्याची खूपच उत्सुकता लागली. पूर्वी जपानमध्ये लग्न मुख्यत्वे अशीच  शिंटो पद्धतीने होत.आपल्याकडे दक्षिणेत जशी देवळात लग्न लावण्याची पद्धत आहे, तशीच तिथेही.आता मुले किंवा मुली लग्नबंधना पेक्षा स्वतंत्र रहायचे पसंत करतात त्यामुळे  हे प्रमाण खूपच कमी झाले आहे. जपानी युवतींनाही लग्नात नटणे मुरडणे अन् लग्नविधींचा आनंद अनुभवासा वाटतो, मग त्या चक्क नवरदेवविरहित लग्न सोहळा साजरा करतात! हौसेला मोल नाही म्हणतात, पण ही त्याच्या पुढची पायरी!

          आमचे अगदी जवळचे कुटुंबीयच जगभर पसरलेले. त्यामुळे अमेरिका, कॅनडा, दुबई, भारत आणि मलेशियातून आम्ही  जमणार  होतो. ब-याच दिवसांनी मलाही माझा मोठा मुलगा, सून, दीर ,पुतणी जावई हे सगळे भेटणार होते त्यामुळे मन टवटवीत  झालं होतं.

          जपानी व्याह्यांनी  ड्रेस कोड सांगितला होता. स्त्रियांसाठी किमोनो आणि पुरुषांसाठी सूट. अर्थात आमच्या मापाप्रमाणे किमोनाचीही सोय केली जाणार होती. अगदी आमच्या बुटांची मापे सुद्धा जपानला रवाना झाली.इथून साड्या न्यायचा प्रश्न निकालात निघाला. सामान कमी झाले आणि कुटुंबातील समस्त नरपुंगवांनी आनंदाने झुलू नृत्य केले.

        एक एक करत  आम्ही व-हाडी जमलो टोकियोच्या मध्यवर्ती ठिकाणी. आमच्या हॉटेलचे बुकिंग झाले होते. मुख्यत्वे टोकीओला होती जागेची चणचण. त्यामुळे हॉटेलच्या खोल्या लहान. बघूनच हबकलो आम्ही. आमच्या भरभक्कम बॅग्ज आणि आम्ही या खोलीत बसणार कसे हा कूट प्रश्न  सर्वांनाच पडला पण खोल्यातही सर्व सुखसोई  इतक्या व्यवस्थित बसवल्या होत्या की ' देखतेही रह जाओगे'.तेथे खाली एका हाॅलमधे वाय फाय फुकट असल्याने अनेक देशांचे युवक युवती ,आणि जपानी सुध्दा, लॅपटॉप घेऊन तेथे बसलेले असत. तरुणाईला आवडेल असं संगीत अन् सजावट! तेथे बसल्या बसल्या आमच्याही  वयातील काही वर्षे गळून जायची.

           अखेर विवाहाचा खास दिवस आला बाहेर रेशमी पाऊस झिमझिमत होता. मध्येच सूर्य किरणे झाडांना, तिथल्या घराघरांना  सोन्या चांदीचा वर्ख फासून जात होते. हवेत सुखद गारवा होता. आणि आणि आमचं वऱ्हाड निघालं लग्नमंडपात. खूपशी उत्सुकता आणि आतुरता त्याचं झकास मिश्रण प्रत्येकाच्या मनात झालं होतं

             टोकिया सारख्या भल्यामोठ्या पसरलेल्या शहरात मध्यवर्ती जागा होती ती! छोट्याशा टेकडीवर गाडीने एक वळण घेतलं आणि एक लोखंडी फाटक उघडलं. क्षणभर असे वाटले की आतापर्यंत त्याबद्दल  ऐकले त्या स्वर्गाच्या छोटेखानी प्रतिकृतीस जिवंतपणी भेटतो आहोत.  अतीशय शांत जागा होती ती. त्याच्या आजूबाजूनला पसरलेले टोकीयोचा, तिथल्या आवाजाचा कुठेही मागमूस नव्हता.लालसर लाकडाचे एक अतिशय देखणं देऊळ, वर हिरवट पॅगोडा सारखं छप्पर ,त्याला साजेशीच छोटेखानी बसकी  लाकडी इमारत मागच्या बाजूला आणि समोर पटांगण त्यापुढे अत्यंत मनमोहक उद्यान. खूप छान, रेखीव  तरीही नैसर्गिक अवस्थेत सर्व झाडे वाढलीत असे वाटावे.  झाडांची रंगसंगती, झुडपांची फुलं कुणी न लावता सहजतेने आली आहे असं वाटावं इतके छान!  त्या पॅगोडाच्या भोवती अतिशय सुंदर व्हरंडा आणि त्याला व्यवस्थित पॉलिश केलेला लाकडी कठडा.इतक्या पवित्र ठिकाणी सहचाराची शपथ घेणे अहोभाग्यम.

           मुलाकडच्या आणि मुलीकडच्या व-हाडासाठी मागच्या इमारतीत टुमदार खोल्या होत्या. सर्व  स्त्रियांना सर्वप्रथम पाय धुऊन नवीन चप्पल घालून एका खोलीत अतिशय अदबीने नेले.दरवेळी कमरेत झुकून आदर दाखवणे म्हणजे मस्त  व्यायाम.तरीच जपानी ललना इतक्या शिडशिडीत!  खोली छोटीशी.एक खुर्ची एक कपाट आणि एक भिंत  आरशाची. आणि तेथे पूर्णत: स्त्री राज्य. जपानी भाषेत मुलीकडच्या स्त्रियांचे हास्यविनोद  चालू होते. त्यात आम्हीही सहभागी झालो.तेव्हा परत जाणवलं की कित्येक वेळा न कळणा-या भाषेतील संवादही सुखावून जातो. आम्ही जाताच आमचा ताबा किमोनो नेसवणाऱ्या दोन मुलींनी घेतला. प्रौढ स्त्रियांना काळा, त्याच्यावर फुलाचे डिझाईन असलेला किमोनो तर लेकी सुनांना  फिकट रंगाचे.  यामध्ये बदामी ,पिस्ता, फिकट पिवळसर अशा रंगाचे फुलाचे डिझाईन असलेले किमोनो वापरायची पद्धत आहे. 

          तसं पाहिलं तर किमोनो थोड अवघड प्रकरण आहे. लहानपणी जस साडी नेसायची असली की हात वर करून आई समोर उभे रहायचो तस्सच आता वाटत होते.आता आई ऐवजी त्या दोन युवती आम्हाला किमोनो नेसवत होत्या. इथं गाठ, तिथ नी-या, इथं खोचून ,अखेर आम्ही किमोनोत शिरलो. म्हणजे किमोनो तसा किचकटच आहे. अर्थात साडी नेसणा-यांना या खोचाखोचीचे विषेश काही वाटत नाही हे वेगळे. पायात कापडी सुबक बुट सरकावले गेले. केसांचा  छानदार जुडा  आणि  त्याला  मोत्यांची  मोठी  पीन.  जपानमध्ये  दागिने  कोणीच घालत नाही. पण या पीनला  फार महत्त्व असतं.  कधी ती  मोत्यांचे द्राक्षाच्या घोसा  सारखी असते तर कधी    फुलांचं डिझाईन असलेली. आमच्या हातात छानशी पर्स दिली तर दुस-या हातात प्रसिद्ध जपानी पंखा! गंमत अशी की जपानी स्त्रिया छोटी छोटी पावले टाकत पटपट पटपट वेगाने का चालतात  हे तो सर्वांगाला घट्ट आवळून टाकणारा किमोनो घातल्यावर लक्षात आले.

     सर्वप्रथम एका मोठ्या हॉलमध्ये दोन्ही व-हाडांची एकमेकांसमोर बसून जुजबी ओळख झाली. बहुतेकांना इंग्रजीच्या गंध नव्हता. त्यामुळे सतत दुभाषाची गरज लागत होती एक अतिशय हसरी जपानी मुलगी होती ती हे काम उत्साहाने करत होती. मुलीकडे व-हाडी होते नऊजण आणि आम्ही बाराजण.म्हणजे आमचं व-हाड  जपानच्या व-हाड्यांच्या तुलनेत भलमोठ्ठ! भारतीय लग्नात उपस्थितांची संख्या चारशे पासून पुढे कितीही असते हे कळल्यावर आमच्या व्याह्यांनी जो आ वासला की किती तरी वेळ तसाच होता.

           नंतर निघाली आमची वरात व्हरांड्यातून देवळाच्या मुख्य दारापर्यंत. ती वरात विसरणे अशक्य! तो एक अद्भूत अनुभव होता. सर्वप्रथम डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर एका विशिष्ट पोशाखांनी झाकलेला महंत किंवा पुजारी बासरी सदृश्य एक वाद्य वाजवू लागला त्याच्यामागे मुलाचे आई-वडील आणि त्यानंतर इतर नातेवाईकांनी एक एकेरी रांग केली. बासरीचे सूर घुमू लागले. धीरगंभीर आवाजाने जणू कृष्णनीळी जादू केली. आधीच पावसाने ओलसर, स्वच्छ, हसरी झाडं,आणि ओला झाल्याने अधिकच गूढ वाटणाऱा तो पॅगोडा! बॅग पायपर च्या गोष्टी सारखा वाद्य वाजवत जाणारा तो महंत .आणि त्याच्या मागे आम्हा बारा जणांची रांग.त्यामागे मुलीकडचे व-हाडी. तिथं फोटो काढायला परवानगी नव्हती. आणि बोलायलाही नाही. आळी मिळी गुपचिळी करत त्या वातावरणाचा आनंद उपभोगत आम्ही त्या पॅगोडाच्या बाहेरच्या खोलीत म्हणजेच सभागृहात शिरलो. जपानी लोक बारीक चणीचे त्यामुळे तेथिल बैठकही बसकी आणि छोटी म्हणजे तमाम भारतीयांचे दुःस्वप्नच! सर्कशीत स्टूलावर बसणा-या हत्तीचे दु:ख आम्हाला समजले.

           इतक्यात नखशिकान्त अंग झाकलेल्या मोग-यासारख्या  पाढ-याशुभ्र किमोनोत सूनबाई आली.शुभ्र रंग म्हणजे नव्या जीवनाची सुरवात. पतीचा रंग घेऊन त्यात एकरूप होणारा रंग. उंचशा गोलाकार टोपीने डोके झाकण्याची आख्यायिका तर फारच रोचक.सासूबद्दल जी असूया आहे ती शिंगाच्या रूपात डोक्यावर असते ती झाकण्यासाठी ही टोपी!.म्हणजे सासू सून प्रकरण इथेही आहेच का?  सामुराईच्या धवल कपड्यात नवरदेव. इतके राजस दिसत होते नं ते दोघेही., नजर ना लगे.

       वधू -वर गर्भागृहात गेले. सर्वत्र पांढ-या चिठ्या आणि पताका लावलेल्या आणि त्यावर ती जपानी चित्रलिपी. एक मादक सुवास सर्वत्र भरलेला.स्त्री महंत, जिला मिको म्हणतात, आणि दुस-या महंताने मंत्रपठण सुरू केले.प्रथम वंदन शिंटोंचा देव कामि.अगदी आपल्या गणेश वंदने सारखच.वधू वरांच्या अंगावरून दुष्ट प्रेतात्म्यांची छाया काढून टाकली. शिंटो  समुदायात निसर्ग पुजेला अतिशय  महत्व.वृक्ष,भूमाता,जल ,तेज ,वायू यांचे स्मरण सतत करतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात. दोघांनी पंचमहाभूतांची मनोभावे पूजा केली आणि नतमस्तक झाले.पूर्वजांना वंदन केले.एवढा प्रगत देश पण सर्व  कर्मकांडे  आहेतच.

      नंतरचा महत्वाचा कार्यक्रम म्हणजे नव-या मुलीने उष्टावलेली साके आणि मुलाने उष्टावलेली साके परस्परांनी नऊ वेळा प्यायची. ते ग्लासही गोल्डी लाॅक्सच्या अस्वलाच्या भांड्यासारखे मोठे मोठे होणारे. नंतर मुलाकडील सर्वांनी घोट घोट साकी तीन वेळा पिणे ती  असते मुलीने उष्टावलेली . साके ही तांदळापासून बनवलेली वारूणी. मुलीकडच्या व-हाडाने त्याच वेळी मुलाने उष्टावलेली वारूणी तीन घोट प्राशन केली.शांत लयबद्ध मंत्रोच्चारात आणि पावसाच्या टपटप या पार्श्वसंगितात हा सोहळा संपला. जपानी लोकांच्यात मद्याचे प्रमाण कमीच.त्यांचे एकच व्यसन जाणवले ते होते काम, अधिक काम ,परफेक्ट काम. पण नव-या मुलाची उष्टी साके त्याला त्यांच्यात सामावून घेतल्याची खूण म्हणून आवर्जून  घेतात.

        त्यानंतर एका पंचतारांकित हाॅटेलमधे पन्नासाव्या मजल्यावरून टोकीओदर्शन करत आणि भेटवस्तूंचे आदानप्रदान  करत हा आटोपशीर देखणा सोहळा संपन्न झाला..

      यथावकाश इथेही भारतीय मराठी पध्दतीने विवाह संपन्न झाला. व्याही, विहीणबाई,मेहुणी  असे आटोपशीर व-हाड पण इथल्या सर्व  कार्यक्रमांत अगदी वराती समोर नाचण्यातही त्यांनी मनापासून भाग घेतला.  लेकीने अंतर्पाट बाजूला झाल्यावर जेव्हा वरमाला नवरदेवाच्या गळ्यात घातली, तेव्हा कुणाही भारतीय माउलीप्रमाणे आमच्या जपानी विहीणबाईही  ढसढसा रडल्या, तर व्याहीबुवांनीही हळूच डोळे टिपले. काही भावना या वैश्विक असतात हेच खरे.मग तो भारत असो वा  जपान. 


माझे इतर ब्लॉग्स वाचायचे असल्यास खालील  लिंक वापरावी


https://drkiranshrikant.pasaara.com 

५ टिप्पण्या: