शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२०

मामी©️

 काही काही नाती,ओळखी मनात खोलवर रुतुन बसतात.कधी कधी तुमचे रक्ताचे नातं नसतच मुळी. ना तुम्ही रोज भेटता. कधीतरीच तुमची भेट होते आणि जणू मध्ये मोठाच्या मोठा  काळ गेलाच नाही असेच वाटते. मागच्या पानावरून पुढे तश्याच तुमच्या गप्पा सुरू!  बोलणं, सुखदुःखाची देवाण-घेवाण आरामात चालू राहते. बहुतेक वेळा माणसांचे एकमेकातील संबंध  वयाच्या प्रत्येक  टप्प्यावर  बदलतात. पण मामींबरोबरचे माझे नाते तसेच राहिले.  अगदी तीस वर्षे. त्या नात्याला कुठल्याही नावाचे लेबल नव्हते.   जगापासून चार हात लांब राहणाऱ्या मामींनी मला आपलं समजलं, माझ्या बालिश हट्टांचा त्यांनी मान राखला. त्यांच्या आठवणी आज या आठवणींच्या पसा-यातून आवरणार आहे.



                             मामी©️


माझं लग्न नुकतच झालेल. सर्वच नाती नवीन कोरी करकरीत. कालपर्यंत कुमारी असलेली मी आज ऐटीत सौभाग्यवती होऊन वेगळेच नाव लावत होते.  कालपर्यंत मी होते फक्त बहीण मुलगी! आता या भूमिकेतून एकदम मला अपग्रेड केलं होतं. सून ,वहिनी, बायको अशा अनेक नवीन नात्यांमध्ये! अजूनही त्या नवीन ओळखी लक्षात ठेवत होते जोखत होते. आणि एक दिवस घरी सासूबाईंनी सांगितलं आज तुम्ही दोघं मामा मामींना भेटून या.

            मामा मामी म्हणजे माझ्या सासऱ्यांचे सख्खे मामा आणि मामी. वयाने मामी माझ्या सास-यांएवढ्याच. मी निघण्या पूर्वी सासूबाईंनी जाताना हळूच सूचना केली" हे बघ मामी काही बोलल्याच नाही तर  मनाला फार लावून घेऊ नकोस." खरंतर प्रत्येक माणसाला कोऱ्या मनाने  भेटायला मला फार आवडतं. म्हणजे आपण आपले धुळाक्षर गिरवायचे. कधी गरज पडली तर पुसून टाकायचे. परत नवीन अक्षरे लिहायची. त्या  माणसाची  नवीन  पाटी तयार करायची.  आयुष्याच्या  प्रत्येक टप्यावर आपणही बदललेले असतो आणि माणूसही त्यामुळे दर वेळेस नवी अक्षरे !

              शहराच्या मध्यभागी मामींचे घर.घराला नावही मामींचेच! घराचं फाटक उघडलं आणि कोकणाच्या वाडीत आपण शिरत आहोत असंच वाटलं. मध्ये लालट मातीची वाट. दोन्ही कडेला लाल विटांचा एक फुटाचा  बांध.  बांधा पलीकडे झाडांची तुंबळ गर्दी.  त्यात काय नव्हत? डाळिंब आपल्या लाल केशरी फुलांनी डवरले होत. जांभळाचे उंचच उंच झाड कुतूहलाने वाकून बघत होते, लिंब जरासा शिष्ठ  चेहरा करून उभा होता,पांढ-या फुलांनी लगडलेली तगर मस्त हसत होती. एक दोन फुटकळ माड आकाशाकडे बघत ध्यान लावून बसले होते. अजून पुढे गेल्यावर तुळशी वृंदावन. झोकात लाल रंगात रंगवलेलं. समोर सारवलेल्या जमिनीवर  अतिशय देखणी रांगोळी. राधाकृष्ण  लिहिलेले. अक्षर अतिशय सुरेख वळणदार.  कडेला एक हौद.  घर जोत्यावरचे.समोर लाकडी झोपाळा. झोपाळ्याच्या  आधाराच्या दांडीवर सोडलेला जाईचा वेल तोही छानपणे झोपाळ्यावर फुले टपटपवतोय. त्याच्यामागेच कौलारू घर. या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एवढी मोठी जागा आणि एवढं छानसं घर खरंच वाटत नव्हतं.

         घराचे दार जवळजवळ आठ पायऱ्या चढल्यावर  आणि तिथंच मामी उभ्या.  लाल पांढऱ्या रंगाची कॉटनची साडी, मध्यम उंची शेलाटा बांधा  लखलखीत गोरेपण , अगदी एकारान्त कोकणस्थी आडनावाला साजेसे घारोळे डोळे एकदम मनीम्याऊ, काळाभोर  केसांचा अंबाडा. लालबुंद कुंकू गो-यापान कपाळावर अशा सुस्वरुप मामी सगळ्यात वरच्या पायरीवरून मला पारखत ,आजमावत होत्या. या म्हणून त्यांनी आमचं स्वागत केलं. 

          मामींनी मला काही प्रश्न विचारायच्या आधीच त्यांच्या बागेबद्दल मी बोलायला सुरुवात केली थोड्या अगोचरपणेच. कारण खरोखरच झाडे पाने, फुलं हा माझा खास वीक पॉईंट. आणि एवढ्या निगुतीने लावलेल्या बागेच्या मालकीणी बरोबर बोलणे म्हणजे पर्वणीच की!आणि मग जी काही आमची दोस्ती  झाली की बस! पहिल्या भेटीतच मामींनी झाडापासून केलेल्या अनेक कलावस्तू  मला दाखवल्या.  झाडाच्या वळणदार खोडाची नर्तकी , एवढेच नाही तर घोसाळ्याच्या जुन्या जाळीदार फळापासून  तयार केलेले घरटे आणि त्यात छोटीशी अंडी त्यांची कलात्मक वृत्तीच दाखवत होती.मामींना भेटून नमस्कार करून लगेच परत यायचं हा पाच मिनिटांचा कार्यक्रम  दीड दोन तास कधी लांबला हे मला कळलंच नाही.जाताना मामींनी जाईची फांदी दिली आणि गोल करून कशी लावायची हे समजावून  सांगितले.

        अतिशय गरीब घरात जन्मलेल्या या सुस्वरूप आणि हुशार मुलीचे लग्न मामांशी झाले. मामा अतिशय सधन घरातील स्वतःची इस्टेट राखून असलेले .शेतीवाडी भरपूर.  दृष्ट लागावा असच हे जोडपं. लवकरच एकत्र कुटुंबातून बाहेर पडून त्यांनी  या बंगल्यामध्ये स्वतःचा संसार सुरु केला आणि त्याच वेळेला मामांना मानसिक आजार जडला.बायपोलार डिसऑर्डर .काही काळ अतिशय चांगले प्रेमळ, बुद्धिबळ खेळणारे  मामा वर्षातले काही महीने उगाच बडबड करणारे, वेडावाकडा खर्च करणारे, कुठल्याही घरी जाऊन काहीही मागणारे .कधी कधी मामा व्हायचे गायब. मग मात्र मामींचा धीर सुटायचा. आमच्याकडे तातडीने निरोप पाठविला जाई.मामा परत येत. बहुतेक वेळा पूर्ण  लुटले गेलेले. कोणी तरी चांगूलपणाने पोहचवलेले.

               या अशा पतीची मग आई व्हायच्या मामी. स्वतःला  नसलेल्या संततीची जागा आजारी मामा भरून काढत. मामा औषध उपचारांनी बरे होत .मामींबद्दल त्यांना आकाशभर कृतज्ञता वाटायची. मामी परत त्यांच्या झाडाझुडपांचे कोडकौतुक करण्यात मग्न व्हायच्या.नवनव्या कलाकुसरीच्या वस्तू जन्म घेत. मामींनी त्यांचे विश्व मामा आणि त्यांची बाग एवढ्यापुरतेच सीमित ठेवले होते. कदाचित मामांच्या आजारामुळे असे झाले असावे.

                माझ्या घरातील सर्व कार्यक्रमांत  मामींचा सहभाग असावा असे मला फार फार वाटे. आधी कोणाकडेही न जाणा-या  मामी  माझ्या बोलवण्याने थोडा वेळ तरी येतच असत. कदाचित आमच्या समान आवडीने त्या माझ्यात कोणीतरी जवळचे या दृष्टीने पहात होत्या.कधी कधी कौतुकाने एखादा खाण्याचा पदार्थही आमच्याकडे येऊ लागला.सणासुदीला आमच्या घरातूनही जाऊ लागला.

           आम्ही यथावकाश  दोघांचे तीन झालो. मुलाला त्या झोपाळ्याचे आणि हौदाचे भारी वेड. इतर कोणत्याही  मुलांना आसपास फिरकूही न देणा-या मामी चक्क त्यासाठी   त्याचे कौतुक करीत. आवर्जून त्याची आवडती मारी बिस्किटे बरणीत भरून ठेवत.मलाच कानकोंडे वाटायचे. माझ्या घरी बाग बघायला येणं  हा एकच विरंगुळा  होता त्यांचा.खूप गप्पा होत त्यावेळी. त्यात फलटणच्या त्यांच्या बालपणीच्या गप्पाही असत. मामी अकरावी झालेल्या.  ते पण त्या काळात.हे मला या गप्पातूनच कळल.पण कधीच त्यांनी नशीबाला दोष दिला नाही.

           अखेर  मानसिक असंतूलन झालेल्या मामांचे देहावसान झाले.मामा पक्के नास्तिक. मामींचा देवावर गाढ विश्वास. पण मामांच्या इच्छेप्रमाणे  कोणतेही क्रियाकर्म  न करता माझ्या पतींने अग्नी दिला.आता त्या घरांत मामी एकट्याच.घरात मदतीला नोकरचाकर ठेवलेले. 

         मधे बरेच दिवस गेले. मुलांच्या शाळा, प्रॅक्टीस या कारणांनी मामींकडे फेरी झालीच नव्हती.एक दिवस मी भेटायला गेले तर मामी बाहेर पायरीवर बसलेल्या. पूर्वीच्या काळ्याभोर केसात आता उन सावल्या मुक्कामाला आल्या होत्या.चेहरा उतरलेला. मला हळूच सांगू लागल्या. अग घरात भानामती होतेय.माझी चांदीची भांडी नाहीशी होत आहेत. घरात भरपूर कर्मचारी, त्यांची विश्वासार्हताही पारखलेली नाही. हे मामींना सांगायचा खूप प्रयत्न  केला पण कर्मचा-यांवर अविश्वास  दाखवून काढून टाकण्यापेक्षा  भानामतीवर विश्वास ठेवणे त्यांना सोईचे वाटत होते.जाम ऐकल नाही त्यांनी.

              मामी आता थकू लागल्या.घरातले चाकर मंडळीही

पुरेशी लूट करून उडनछू झाले. ते निसर्गात रमलेले घरही थकल्यासारख वाटू लागले. संध्याकाळी  तर दिव्याच्या पिवळ्या उजेडात तेथे थांबणेही नको वाटायचे. तुळशी वृंदावन मात्र तसेच टकाटक! रांगोळीही तशीच!इकडची रेघ तिकडे नाही.मामींना माझ्या घरी येऊन राहण्यासाठी खूप विनविले.  पण इतरवेळी माझे ऐकणा-या मामींचा नकार दृढ होता.

          माझ्या मुलाच्या लग्नाला मामींनी यावे या साठी मी गाडी पाठवली. कधीच कुठल्याही  लग्नाला न जाणा-या मामींनी माझी ही इच्छाही पूर्ण केली. त्यांनी मला सांगून दोन सुती साड्या आहेर म्हणून आणवल्या आणि स्वीकारल्या. लग्नात अर्धा तास थांबून मामी घरी गेल्या.परत त्या उदास पिवळसर प्रकाशाच्या घरात. मीच मनात खंतावलेली.

        मामींकडे जाणं माझ्या व्यापाने थोड कमी झाल होत.मामींना मोबाईल  फोन किंवा लँड लाईन घेण्याचे सांगूनही ऐकायला तयार नव्हत्या.बरे नसले तर मागील आऊट हाऊस मधल्या भाडेकरूंबरोबर निरोप येई. तेही भाडेकरूंच्या  इच्छेवर अवलंबून. तसे मामींचे कुठल्याच भाडेकरूशी सख्यही नव्हते.त्या तशा सर्वांपासून अंतर राखून रहात.

          ब-याच दिवसात मामींकडे जाणे झाले नव्हते. मध्यंतरी त्यांचा कोणी एक नातेवाईक त्यांच्या जवळ घरी रहायला आल्याने आम्हीपण मनात निर्धास्त  होतो.

मग एक दिवस अचानक मामी गेल्याचे कळले. तिथे आम्ही पोहोचण्याआधीच क्रियाकर्म उरकले होते. मामी नाहीत त्या घरात एक सेकंद थांबणेही  असह्य झाले.

              गेली बेचाळीस वर्षे माझ्या अंगणात  मामींनी मला पहिल्या  भेटीत दिलेली जाई फुलते आहे. दर पावसाळ्यात भरभरून फुले देते आहे. अगदी मामींनी माझ्यावर केलेल्या स्नेहाच्या वर्षावासारखीच. इतरांसाठी  खडूस, तुसड्या ठरलेल्या मामींचे त्याच्यासारखेच देखणे  आणि सुगंधी  मन मला अनुभवायला मिळाले हेही नसे थोडके. आजही तेथून जाताना मामींची रांगोळी  काढणारी सुबक लांब बोटे  आठवतात. क्षणभर चष्म्यातून अंधुक दिसू लागते. मग मात्र मी निग्रहाने तेथून निघते. 

********                ****         ********        ********

          माझे इतर लेख वाचायचे असल्यास खालील लिंक  बघावी.


https://drkiranshrikant.pasaara.com   





७ टिप्पण्या:

  1. खूप छान. 🙏🏻🙏🏻🙏🏻
    मामी, अस्सल जीवन जगल्या. उत्तमपणे उतरले कागदावर. शब्द, कल्पना सत्य व सौंदर्य सर्व काही छान रंगविलेस

    उत्तर द्याहटवा
  2. नातीगोती ही अशीच असतात. जन्मभर सोबत करणारी.मधूनच सय येते..

    उत्तर द्याहटवा
  3. मामींच्या स्वभावाचा पोत मनाला खुप स्पर्शून गेला.
    तुमच्या आठवणींचा पसारा आम्हा वाचकांना समृद्ध करून जातोय.खुप शुभेच्छा. ��

    उत्तर द्याहटवा