शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०

बाई©️



माझा हा ' पसारा' आवरताना कधी कधी वाटते' 'मी 'कोण? क्षणात जाणवतं मी  ब्रम्हांडातील एक अतीसूक्ष्म कण. पण या कणाला घडवण्यासाठी  वाढविण्यासाठी  किती जणांनी  कष्ट घेतले  आहेत.या सर्वांना ,त्यांच्या आठवणींना ओलांडून पुढे जाणे अशक्यच .यातील फक्त महत्त्वाच्या स्त्रियांचाच विचार जरी  केला तर आपसूक आठवतात दोन्ही आज्या. आईकडची आणि  वडिलांकडची. या दोन्ही आज्यांचे व्यक्तिमत्व  पूर्णतः वेगळे,लोभसवाणे. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्या संत महात्माही नव्हत्या ना दुष्ट प्रवृत्तीच्या! त्या होत्या माणसातले गुणावगुण असलेल्या स्त्रीया. या संपूर्णतः' मानवी' असलेल्या एका आजीबद्दलच्या आठवणी आवरायच्यात आज.  ही आजी म्हणजे इंदोरची आज्जी 'बाई'.

                            बाई©️

"हे भय्या जरा उस खोकेको उघडो और सगळ इस पिशवीमें डालो!" राष्ट्रभाषेचे अशी चिरफाड कानावर आली की समजावे इंदोर आजीचं कामगारांशी बोलणं सुरू आहे. ही आमची आजी म्हणजे आईची आई 'बाई' !' ही वयाच्या 14 व्या वर्षापासून इंदोरला  राहूनही राष्ट्रभाषेच्या चिंध्या केल्याशिवाय बोलायचीच नाही. हिंदीतल्या मान्यवर साहित्यिकांने जर ते ऐकलं असतं तर ते हाय खाऊन नक्कीच बेहोश   झाले असते.
     ही आमची इंदोरची 'बाई' चकचकित गोरी, केसांचा छोटासा अंबाडा, शिडशिडीत,मध्यम उंची, महा भेदक भु-या डोळ्यांची, नेटकी नऊवारी साडी नेसलेलीआणि झपझप चालणारी अजूनही डोळ्यासमोर आहे.कामाचा उरक अन्  सळसळता उत्साह, अचंबित करणारं! इंदोरला आम्ही जाताच दारात आपल्या लेकीवरून आणि नातींवरून  भाकर तुकडा ओवाळून टाकायला उभी. तिला बघूनच प्रवासाचा  शीण पूर्णपणे उडन छू व्हायचा.
              इंदोरचे ते घर म्हणजे आमच्या दृष्टीने एक राजवाडाच! घराभोवती भरपूर मोठी बाग आणि जवळजवळ  पंचवीस मोठ्यामोठ्या खोल्यांचा दुमजली  प्रासाद. प्रत्येक खोली खास अँटीक सामानाने सजलेली. आणि या घराची सम्राज्ञी माझी 'बाई'! मूळ कोकणातली .वयाच्या 14 व्या वर्षी आपल्या वकील नवऱ्याबरोबर नशीब आजमावायला  इंदोर सारखे अति अनोळखी ,संपूर्ण वेगळी भौगोलिक, भाषीय पार्श्वभूमी असलेले शहर त्यांनी निवडले .आणि वकिलीत आजोबांनी  आपले साम्राज्य उभारले.पण 'बाई'  मनाने अजूनही कोकणातल्या परसात, सड्यावर, वाडीत, पुळणीवर होती.  कोकणी म्हणी आणि कोकणी शिव्या सहजतेने वापरणारी. वाणी तर अशी अस्खलित की बस! पांडवप्रताप किंवा रामायण वाचायला बसली आणि त्यात वनवासातील हाल सुरू झाले की हमखास ऐकायला बसलेल्या चार-पाच बाया आणि दोन चार बीट्टी पोरं रडायला लागायची अगदी हमसून हमसून! इतक खुलवून खुलवून सांगायची ती.
           'बाईच्या' हाताला चवही असली भन्नाट होती. आम्ही तिकडे गेल्यावर खास तिचे पदार्थ करण्यासाठी स्वयंपाकाचा ताबा ती स्वतःकडे घेई. पण कुठलाच पदार्थ  मोजून मापून केल्याचं मला आठवत नाही.(आज कुठलाही खाद्यपदार्थ  करताना ग्रॅम आणि मिलीग्रॅम मोजून घटक घातले तरी पदार्थ  यथातथाच) स्वयंपाक घरात फोडणीला पदार्थ टाकून दुसऱ्या खोलीत काही कामाला ती जाई. आम्हाला चिंता या पदार्थाचे आता होणार तरी काय? पण परत येऊन अंदाजे हाताने तिखट मीठ टाकले की निघाली परत काहीतरी काम करायला! सगळाच स्वयंपाक  असा फिरत फिरतआणि अंदाजपंचे. पण खरंच सांगते पदार्थ झाल्यावर असा भन्नाट व्हायचा  की साक्षात देवी अन्नपूर्णाने तो केला आहे असा. अक्षरश ऊंगलीया चाटते रह जाओगे! हा गुण तिच्या आज्जीपणाचा होता की हाताचा हे देवच जाणे ! इंदोरमधल्या खाद्य पदार्थांच्या स्पर्धेत कायम पहिला नंबर तिचाच! संस्थानिकांकडे  आजीला  हळदीकुंकवाला बोलवणे आलं की काळी नऊवारी चंद्रकळा नेसून   दागिने घातलेली  आज्जी साक्षात लक्ष्मीच वाटायची.          
        घराचा चौक खूप मोठा असल्यामुळे  त्या भागातला  गणपती  आजी-आजोबांच्या घरीच बसायचा. मुलांचे भरपूर सांस्कृतिक कार्यक्रम होत असत.अर्थात  त्यावर देखरेख 'बाईचीच'  
       वर्षानुवर्ष माळव्यात राहूनही कोकणी तिरकसपणा जीभेवर कायम मुक्कामाला. कधीकधी अतिशहाणपणा करून कुठल्यातरी पुस्तकातले तत्त्वज्ञांन कोणी नातवंड सांगायला लागले की 'अहो'सखाराम गटणे' म्हणून ती हाक मारायची कारण पु.लं आणि चि. वि. जोशी तिचे आवडते लेखक. आणि वर म्हणायची कुठून शिकला पोपटपंची!
          बाईची बाकी नातवंड जवळपासच्या शहरातच, त्यामुळे तिला नियमित भेटत. तिला त्यामुळे वर्षा  दोन वर्षांनी  भेटणा-या आमची अपूर्वाई  अधिक.आईच्या आणि तिच्या जिव्हाळ्याच्या गप्पाही खूप वेळ चालत. मात्र आम्ही तिथे रेंगाळायला लागलो की लगेच आम्हाला हरकटायची. आम्ही गावात नातेवाईकांच्या कडे गेलो आणि परत यायला वेळ लावला तरी ती आईवर रुसायची.
         आजही जेव्हा जातीपाती वरुन खूनखराब्याच्या बातम्या ऐकते तेव्हा परत प्रकर्षाने  बाई आणि आजोबा आठवतात.ही गोष्ट आहे सत्तर वर्षापूर्वी त्यावेळी ऋग्वेद्याने यजुर्वेद्याशी  लग्न  जामविले तरी हाs हाकार होणारा काळ. त्या काळामध्ये आजी आणि आजोबांनी आपल्या मोठ्या डाॅक्टर मुलीसाठी निवडला हुषार , कर्तबगार डाॅक्टर मुलगा .आझाद हिन्द सेनेत कार्यरत पण पंजाबी.
              एकदा नववीत असताना मी सुट्टीत इंदोरला गेले होते तेव्हा बाईच्या हातात अगाथा ख्रिस्तीचे इंग्रजी पुस्तक. मी हादरले "अग बाई इंग्रजी शिकलीस तरी कधी?"ती म्हणाली "अगं काय सारखं ते पांडवप्रताप वाचायचं? परतपरत वाचल्यावर का पांडवांचा वनवास चुकणार आहे? का पुराणकथांमध्ये काही बदल होणार आहे? यांच्याकडूनच इंग्रजीचे धडे घेतले.तेवढच नवीन काहीतरी" त्याकाळात माझे स्वतः चे पाठ्यपुस्तक सोडून  इंग्रजीचं अवांतर वाचन शून्य. त्यामुळे'बाई' एवढी भारी  वाटली ना मला. आणि नंतर परत वर्षाने  मी गेले  तर इंग्रजीवर तिने खरोखर प्रभुत्व मिळवले होते. खरोखर आता विचार केला तर जाणवतं केवढी  प्रचंड हुशारी! तसे पाहिले तर फक्त तिसरीपर्यंत शिकलेली होती ती!
          पण एवढे असूनही हिन्दी भाषेत मात्र सुधारणा शुन्य.तेव्हा सारा चलाखपणा, हुषारी गायब! हिशेबातही अती चोख!पण हिन्दी जीभेपासून चार अंगूळे दूरच ठेवलेली. कोकण हा तिच्या मनातला खास हळवा कोपरा आणि कोकणीशिवाय कुठल्याच भाषेला  खास स्थान नव्हते तिच्या मनात. दुसरा हळवा कोपरा तिच्या मनात होता तो म्हणजे एका काचेच्या कपाटात ठेवलेली मातीची भांडी , काही मातीच्या बाहुल्या. भातुकलीतील बाहुलीच्या लग्नात स्वतःचे खरे दागिने सुद्धा आम्हाला देणारी आमची 'बाई' त्या साध्या खेळण्यांना मात्र आम्हाला कधीच हात लावू देत नसे. सगळं घर आम्हां साठी मुक्त असताना ते कपाट मात्र बंद ठेवत असे .शेवटपर्यंत हा कुठला हळवा कोपरा तिच्या मनात होता कोण जाणे.
            आमचे परत जायचे दिवस जसजसे जवळ यायचे तस-तशी बाई अधिकाधिक बेचैन होत असे. आम्हाला फ्रॉक घेणे, आईला साडी, खाऊ आणि सगळ्यात खास असे तिने आमच्यासाठी म्हणून लपवून ठेवलेली लिंबाच्या लोणच्याची बरणी. अजूनही कुठल्याही लोणच्याला त्याची सर आलेली नाही. अख्खे  लिंबू आणि त्यांचं लाल भडक लोणचं आत्ता सुद्धा विचारानेच माझ्या तोंडाला पाणी सुटते आहे.
             बाईच्या घरी नेहमी कोण कोण मंडळी मुक्कामाला असत.अगदी सहा-सात महिने सुद्धा आपल्या पूर्ण कुटुंबकबिला घेऊन नोकरी नाही या कारणाने काही कुटुंब राहात. नात्यातलीही कोणी कोणी असेच.या सर्व मुलांना दूध मिळावे म्हणून घरी म्हैसही पाळली होती. तेथे कोणताच आपपरभाव नसे.
        एवढी प्रेमळ बाई, पण आपल्या सूनांपासून फटकूनच असे.  अर्थात आम्ही जात असू तेव्हा तिच्या सुनाही सुट्टीसाठी आलेल्या. आमची बाई जशी आम्हाला आवडायची तशाच या सर्व माम्याही खूप खूप आवडायच्या.कसली मस्त मज्जा यायची त्यांच्या गप्पा ऐकताना! बाई आणि तिच्या सुना भांडल्या कधीच नाही पण तणाव आम्हालाही जाणवायचाच.  त्यांचं सासुसुनेच नाते कुठे किरकिरत होते कोणास ठाऊक.?
     परत माझी इंटर्नशिप संपल्यावर  आईला घेऊन इंदोरला गेले. आजोबा नुकतेच  स्वर्गवासी झाले होते. घर भकास वाटत होतं. पण बाई एवढ्या मोठ्या घरात एकटी राहत होती. मावशीने,मामांनी  दहा वेळा बाईला त्यांच्या घरी रहायला  बोलवले पण या अभिमानी बाईंनी आपले घर सोडले नाही. आजोबा गेले तेव्हा आजोबांनी एक अतिशय सुंदर मृत्युपत्र बाईच्या नावांनी लिहीलेलं होतं. आजोबांनी त्यात लिहिलं होतं "सरस्वती तू नुसती मूर्तिमंत सरस्वती नाहीस, तर तू अन्नपूर्णाही आहेस, लक्ष्मी आहेस. आज मी जो आहे तो केवळ तुझ्यामुळे .यातील प्रत्येक पैशावर फक्त तुझा हक्क आहे .हे घर केवळ तुझ्यामुळे घर म्हणून उभे राहिले." त्या मृत्युपत्राचे वाचन झालं तेव्हा सगळ्यांच्या डोळ्याला अश्रुधारा लागल्या होत्या. त्या काळात एकमेकांबद्दल असं प्रेम उघडपणे व्यक्त करणं हेसुद्धा मला वाटत   जरासे धक्कादायकच होते. बायकोनी आयुष्यभराची साथ केली ती ओळखून तिला सर्वोसर्व अधिकार आणि महत्त्व देणारे आजोबाही श्रेष्ठ!
      बाईने आता घरी जेवणाचा डबा लावला होता. आयुष्यभर आपल्या हातचं सुग्रास खाणं सगळ्यांना देणारी बाई,आज मात्र आम्ही आणि ती  त्या डब्यातले अन्न खात होतो. स्टोव्ह सुध्दा ठेवला नव्हता. घरातील सर्व वस्तू देऊन ती निःसंग झाली होती.
हळूहळू मिटत चालली होती. डोळे मात्र तसेच भेदक! जेवण म्हणजे कसेबसे दोन घास.नियमितपणे डाॅक्टर येऊन तपासून जात पण मनाने ती केव्हाच आजोंबांजवळ पोहचली होती.मला जाणवल  होतं, की साधारण सहा महिन्याचा कालावधी तिच्याकडे   आहे .कुठलंही साधन घरात नव्हतं पण आईने धडपड करून करून सगळे जमवून निघायच्या आदल्या दिवशी निगुतीने जेवण करून बाईला खाऊ घातले.बाईने लेकीचे मन राखून जेवण केले. दर वेळेस आजोळ सोडताना माझ्या गळ्यात, डोळ्यात काही तरी चुरचुरल्यासारखे व्हायचेच  पण या वेळी मनावर पूर्ण  मळभ पसरले होते आणि  डोळ्यातून ते मुक्त पणे वाहत होते. त्यानंतर दोन महिन्यांनीच बाई गेली. एक अतिशय स्वाभिमानी, हुशार, सुगरण, प्रेमळ आणि सडेतोड व्यक्तिमत्त्व, मनाने काळाच्या खूप पुढे असलेली माझी बाई, सारे कायमच संपलं.
             बाई गेल्यावर मामांनी काही काळाने  ते घर विकलं. नंतर खूप वर्षांनी पुन्हा एकदा इंदोरला  जायचा योग आला. त्यावेळी मुद्दाम माझ्या मुलांना घेऊन मी तिथे गेले. पण माझ्या आठवणीतला प्रासाद आता एका मोठ्या अनेक मजली टॉवरमध्ये बदलला होता. झाडे गेली होती.कुठलंही ओळखीचे चिन्ह तिथे दिसत नव्हते. 
        आज एवढच समाधान मला वाटतय की  वयाच्या साठाव्या वर्षी आंग्ल भाषेवर प्रभूत्व मिळवणारी 'बाई'  आणि   वयाच्या ऐंशीव्या वर्षात सुरेख इंग्रजी कविता करणारी तिची गणितज्ञ मुलगी म्हणजे माझी आई  यांची एक छान  साखळी आहे   .           
          आता विचार करताना वाटते बाहेरच्या अनेक कुटुंबांना बाईने आधार दिला .ना त्याचा कुठे  गाजावाजा ना स्वतःभोवती कौतुकाचे दिवे लावणे. ते कोणी बाहेरचे वाटलेच नाही तिला.सारे आपलेच.ती पिढीच आजच्यापेक्षा वेगळीच.एकमेकांना मदत करणे श्वास घेण्याइतके सहज होते. ती धार्मिक नव्हती. परंपरेचे जोखड,कर्मकांड सहजतेने तिने काढून टाकले. 'लोक काय म्हणतील?' ह्या वाक्याला तिने कधीच तिलांजली दिली होती. आज पिढी बदलली तरी माहेरची ओढ , जिव्हाळा  तोच आहे पण त्यातील सर्वसमावेशक वृत्ती लोप पावली आहे का?आज स्वतः आज्जी झाल्यावर बाईच्या कित्येक गोष्टींचा अर्थ  कळतो आहे. तिचा आनंद, व्यथा आज मी अनुभवते आहे.
           https://drkiranshrikant.pasaara.com 

८ टिप्पण्या:

  1. अतिशय सुंदर! आपल्या घरोघरी अशा स्त्रिया दिसतात ज्यांच्या घराच्या व माणसांच्या व्यवस्थापनातून त्यांच्या गुणांची, कौशल्याची चुणूक दिसून येते व कर्तबगारीला वाव मिळाला असता तर त्या कुठे पोहोचू शकल्या असत्या असा विचार मनात येतो.

    उत्तर द्याहटवा
  2. आजी हा शब्द आणि त्याला जोडलं गेलेलं माणूस, प्रत्येकाच्या मनात असतं.. त्याच्या भोवतीच्या आठवणींनी फेर धरला ! खूप छान !

    उत्तर द्याहटवा
  3. ते दिवस तो मनाचा मोठेपणा अन्... नकोच काही लिहीणे... शब्दातीत भावनेला हात घालतेस बयो... आप बढिय़ा हो बस

    उत्तर द्याहटवा
  4. ही वरची टिपणी माझी आहे. ती विद्यानंद नावावर कशी गेली समजत नाही..असो...-जयंत राळेरासकर.

    उत्तर द्याहटवा