शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०

शरद-हेमंत©️

                  



कॅनडातील फाॅल सिझनचे  मनसोक्त कौतुक  करताना,अनुभव घेताना आठवत होते ,  त्याच वेळी आपल्याकडील  घराघरात आणि घटाघटात उगवलेले धान्य. ते लाजरे ,नाजुक, उत्सुक पोपटी कोंब, नवरात्रीतील आदीशक्तीची पूजा. मातीची सृजनशीलता. तो तारूण्याचा उत्साह आणि रंगलेला गरबा.कॅनडातील फाॅलचे चटकीले रंग भरूनही वर उरणा-या रंगाच्या त्या फुलपाखरी साड्या ते झगमगते घागरे.मग ठरवलंच,आता लिहायचं त्या आपल्या शरद हेमंताबद्दल.

    

                       शरद -हेमंत©️

 

            खरं तर ॠतुंच्या  चांगल्या भरभक्कम  सहा जणांच्या कुटुंबात एकच गडबड उडाली असते.दबक्या आवाजात सगळे बोलत असतात. कुटुंबप्रमुख  चांगलेच रागावले असतात.ग्रीष्मच तो!सगळ्यांना  सळोकीपळो करत असतो. नद्यांच्या  पात्राची आता वालूकामय मैदान झाली असतात.सर्वत्र असते फक्त मरगळ. धुसफुस. फुफाटा म्हणजे जणू उन्हाळ्याचे संतप्त फुत्कार.

            आता रागावलेल्या घरधन्याला सावरायला, शांत करायला  सरसावते वर्षा राणी. तुता-या घुमू लागतात, रणदुंदूभी वाजू लागतात. ॠतुंच्या घरातील कर्तबगार स्त्री म्हणजे वर्षा ऋतू. खुषीत असली तर लफ्फेदार हिरव्याकंच वस्त्रात मिरवत येते नाहीतर ग्रीष्माच्या हो मधे हो मिसळून सगळ्यांचे धाबे दणाणवते.  ग्रीष्माचा अध्याय पुढे सुरुच. वर्षा ऋतू शिवशक्तीचे रुप! अर्धनारी नटेश्वरासारखे.कधी ममताळू तर कधी शिवरुपातले तांडव आहेच. घरातील कर्ता करविता जरी ग्रीष्म असला तरीही तिजोरीच्या चाव्या संभाळतो तो वर्षा ऋतूच. त्यामुळे सर्व ऋतूंच्या सोहळ्यात भाव खाऊन जाते तीच.

              याऩंतर " आम्ही आलो ssss, पोतडीत खूप गमती घेऊन" असा कुजबुजता डायलॉग मारत प्रवेश करतात लिंबू टिंबू पण समस्त ऋतूचक्राचे लाडके' शरद-हेमंत' ऋतू. बाकी सर्व ऋतूमंडळी आवाssज कोणाचा अशा आरोळ्या ठोकत प्रवेश करते झाले तरीही शरदहेमंताची जोडगोळी येते शांतपणे. दोघेही एकमेकांत बेमालूम मिसळूनही स्वतंत्र. स्वत:चा आब राखून, जणू सयामी जुळेच. शरद ॠतूची उजवीकडची बाजू पावसाने भिजवलेली तर हेमंताची डावीकडची बाजू थंडीने सुखावलेली. कसलीच   फार तकतक यांना मानवत नाही. त्यामुळे 'अती' पूर्णपणे वर्ज. ना कडक उन्हाळा, ना गोठवणारी थंडी, ना धो धो पाऊस.शरद हेमंत असे उंबरठ्यावरचे. मवाळ! पण त्यांच्या जवळ असते आनंदाची उत्साहाची गुरूकिल्ली.येताना त्यांच्या पोतडीत ठासून भरले असतात चंदेरी सोनेरी आनंदाचे दिवस.

           पारिजात, जाई जुईंनी पावसाळ्यानंतर विश्रांती घेतलेली असते. पण आता या ॠतुंच्या स्वागतोत्सुक कार्यकर्त्याचे काम करतो झेंडू.   शरद-हेमंताच्या आगमनासाठी जागोजागी मदमस्त पिवळे केशरी गोबरे झेंडू  आपले ‘ढाई किलोका’ गोलमटोल हात हलवत सज्ज असतात.एका किडमिड्या काडीवर ताठ मानेने उभा असलेला झेंडू. अनेक छोट्या छोट्या मखमली पाकळ्यांची गच्च आवर्तने.सतत हसणारा.रंग तर इतके सुंदर की बस!  महाराष्ट्रात तरी या छोटूल्या शरदहेमंताला सजवायचे काम करतो तो झेंडूच. त्यांना खरे वैभव देतो तो झेंडूच. रसरशीत, सोनकेशरी, वाटोळा, आनंदी ,जणू सुखी माणसाचा पिवळा कोट यालाच ऋतुचक्राने  दिला आहे असा झेंडू. कधीकधी वाटत की इतक्या सुंदर फुलाचे नाव मायमराठीने इतके रुक्ष कां बरे ठेवले असावे? हिन्दीत तो असतो भारदस्त ‘गेंदा’, तर इंग्रजीमधे ‘marigold’ असे सोनेरी झळझळीत नाव. मग मराठीतच असा 'डू' कारान्त का? बहुधा शरद हेमंताचा झेंडा फडकवणारा ‘तो’ लाडीकपणे झेंड्याचा बनला झेंडू. शरद –हेमंतासाठी तो आपले सोनेरी वस्त्र बिनदिक्कत पसरतो, दारावर  तोरणात सजतो, रांगोळीत खुलतो. कधी कधी जोडीला शेवंती, मधूमालतीही फुलून सांगत असते "जरा इधरभी देखिये साहेबा"

         शरद हेमंताला खेळायला निळे स्वच्छ आकाश मोकळे असते. कधी काही  चुकार पांढ-या ढगांची चवड असली तर असते. वर्षा ऋतूने मोठेपणाचा आब राखत आपला काळ्या ढगांचा पसारा आता आवरला असतो.रात्रही अधिकाधिक देखणी होऊ लागलेली. खरेतर तोच चंद्रमा आणि तेच नभ पण वर्षभरातील बाराही पोर्णिमा स्वतंत्र बाण्याच्या. प्रत्येकीचा बाज वेगळा प्रसाधनही वेगळे. पण पोर्णिमा नुसती पहायची नाही तर अनुभवायची म्हणजे ती कोजागिरीचीच. कोजागिरी येते तीच मुळी स्वच्छ, दुधाळ, मधाळ वातावरण घेउन. चंद्रिका आता मुक्त झालेली असते. ना ढगांचा घुंगट ना उगाचच लाजणे. आकाशातील ते झळझळीत पण सोज्वळ रूपडे आपलं गारूड धरेवर पसरविते. त्या चंदेरी झोतात सर्व हिणकस वितळून जाते.उरतो तो शुध्द रुपेरी प्रवाह. मग गरमा गरम दुधाबरोबर गप्पा रंगू लागतात, कुठे गाण्यांच्या लकेरी हवेला सुरेल बनवितात. पत्यांचा डाव रंगात येतो. सारा चराचर जणू उत्कटपणे चंद्राला सांगत असतो “मी जागा आहे” , “मी जागा आहे.”

            या शरद हेमंताच्या कालावधीत तांदळाच्या शेतात जायचा योग आला तर तुमची अनेक जन्मांची पुण्ये फळाला आली आहेत असे समजावे. अहाहाsss पाणी पिऊन तरारलेली ती रोपे,जड झाले ओझे अस पुटपुटत वाकलेल्या त्या सोनेरी लोंब्या, शेताजवळून जाताना हळूच कुरवाळणारी सुगंधी हळवी झुळूक , वाह, कुठे लागावेत ते एअर कंडीशनर? 

     आपल्याकडे  यावेळी सणावारांची मांदीयाळी असते. शरद हेमंत तर त्यांच्यासवे घेऊन येतात नवरात्री. ते सृजनाचे पुजन. त्या आदीशक्तीची आराधना.नवधान्याचे स्वागत.तृप्तपणे वहाणा-या नद्या.नऊ दिवसांनी येणारा हसरा दसरा.

        लहानपणी नवरात्रीत सर्वात जास्त आकर्षण  असायचे भोंडल्याचे. पाटावर हत्ती रेखून त्याला हळदी कुंकू वाहून जोरकस आवाजात गायलेली भोंडल्याची गाणी! .हातात हात गुंफलेले. हसरे चेहरे, लयबद्ध  टाकलेली पावले आणि ओठात भोंडल्याचे गाणी! अस वाटायच झेंडूंच्या गोल गोल गच्च पाकळ्यांसारख्याच आम्ही पाकळ्या आहोत आणि सगळ्या जणी मिळून एक छानसे  फुलच आहोत.नंतर दंगल उसळायची खिरापत  ओळखायची. खिरापतीचा डबा वाजवला जायचा. काही चतुर आणि चाणाक्ष मुली पटकन आवाजावरूनच ओळखायच्या. कधी खिरापत ओळखली नाही की सुरू व्हायच

    " वाटली डाळ"???? -----अंssहं

     चुरमु-याचा चिवडा?------   नाहीsss परत डब्यांचा खsड खssड आवाज.

     "मग नारळाच्या वड्या?" एक चिमुकला आवाज

" नाहीच मुळी"

"ए खिरापतीचा पहिलं अक्षर सांगना" आता सगळ्यांनाच घाई झाली असे. यथावकाश खिरापत ओळखली जायची. सगळ्या गोल करून खाली बसायच्या आणि ती घासभर स्वर्गीय चवीची खिरापत सगळ्यांना मिळे . अगदी मुलांनासुध्दा. काय वेडेपणा आहे असा शिष्ठ  चेहरा करून उभी असलेली मुल खिरापत खायला लगेच यायची.

      नवरात्रीत अष्टमीला कुमारी पुजन असायचे तेव्हा आम्हाला खास  आमंत्रण. मग लफ्फेदार  परकर  घालून  आम्ही जायचो.मोठ्या मोठ्या मावशा , आज्या आमचे पाय थुवायच्या. छान छान वासाचे थंड थंड चंदन लावायच्या. केवढा तरी मस्त खाऊ असायचा. त्या दिवशी आम्ही  असायचो देवीस्वरूप. कसले मस्त वाटायचे.

          कोजागिरीच्या त्या रात्र रात्र रंगलेल्या मैफिली , या सगळ्यांवर कळस चढवायला आलेली लखलख दीपावली! नुसता निखळ उत्साह, आनंद. हवेत एक कुरकुरीतपणा असतो.पहाटे अंगावर उबदार दुलई हवीहवीशी वाटते. खोलवर घेतलेल्या श्वासात शीतल, स्वच्छ हवा सुखावत जाते.त्यात उन्हाळ्याची धग नसते,पावसाळी ओलसरपणा नसतो,असतो तो फक्त गोडसर , स्वच्छ, करकरीतपणा.त्रिपुरारी पोर्णिमा  येते. कु. तुळशी धुमधड्याक्यात सौ.कन्हय्या बनून रुक्मिणी मातेची सावळी सवत होते.आता शरद हेमंत आवराआवरीला सुरवात करतात.

           शरद हेमंताची शाळा संपायची वेळ येते.थोडी पिवळी पाने शांतपणे वृक्षाची साथ सोडत असतात. त्या पानांचे शिंपण  झाडाखाली होत असते. नेमस्तपणे. रोज त्याचा ढीग हळूहळू  वाढतच असतो. घराघरात दुलया आता कपाट सोडून बाहेर आलेल्य असतात. गरमागरम खिचडी आणि आंबट तिखट ‘सार’ यांची आठवण होऊ लागते, मग जाणवते की आता निरोप द्यायची वेळ झाली आहे. पेटत्या शेकोटीच्या साक्षीने शरद हेमंत अलविदा म्हणतात. 

        हवीहवीशी गुलाबी थंडी घेऊन वृद्ध, ‘राजा ययाती’ सारखे उसने तारुण्य मिरवणारा शिशीर ऋतू येतो. बघताबघता गुलाबी म्हणून कौतूक केलेली ही थंडी आपले मायावी रूप सोडून खरेखुरे रूप दाखवू लागते. आपल्या थंडगार कवेत गुदमरेपर्यंत आपल्याला आवळते अन एक दिवस वसंतासमोर सपशेल लोटांगण घालते. वसंत येतो  सुगंधात न्हाऊन आणि कोकीळेच्या आवाजात  शिट्टया मारत. नव्या ऋतूचक्राची परत  सुरवात!!. अव्याहतपणे चालणारे हे ॠतुचक्र! 


माझे इतर ब्लॉग्स वाचण्यासाठी  लिंक  :

https://drkiranshrikant.pasaara.com 

८ टिप्पण्या:

  1. इथ मात्र शब्द संपत्तीचा वसंतोत्सव ग. जियो

    उत्तर द्याहटवा
  2. योग्य शब्दांचा साज लेऊन ऋतूचक्र छान सरकले.झेंडूची किमया सुरेख. त्याच्या नामकरणाचे विचार चक्र, प्रत्येकाच्या मनात चेतवले गेले. खूप छान, सुखद.

    उत्तर द्याहटवा
  3. नेहमी येणाऱ्या ऋतुचे नवजात बालकाला प्रथम पाहतानाचे कौतुक देणाऱ्या लेखिकेला सर्वांच्या अनुभवांना तरल करण्याबद्दल धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  4. अप्रतिम

    शब्दांचा साज.निसर्गाचे अलंकारिक अवलोकन.झेंडूचे रसरशीत वर्णन.प्रत्येक शब्द जिवंत होऊन मनातल्या तारा झंकारत ठेवतो.बालकाच्या अबोध निष्पापतेचेसारे भाव या निसर्गाच्या किमयेत दडलेले आढळले

    उत्तर द्याहटवा