शुक्रवार, १३ मार्च, २०२०

गप्पा

              गप्पा©️


आमच्या छोट्याला घेऊन प्रवास म्हणजे आसू आणि हासू यांनी लदबदललेलं खास कौटुंबिक संगीत नाटुकले असतं .आम्ही बसस्थानकावर येताच या नाटकाची नांदी होते ."आई कधी येणार ग बस?" हे नमनाचे गीत वेगवेगळ्या पट्टीत आधी आळवले जातं .मग माझ्या मूड प्रमाणे पुढील संवाद सुरू होतात." येईलहं सोन्या आता". किंवा जर मी रागवले असले तर," काय रे सारखी घाई ,जरा म्हणून धीर नाही" "या दरम्यान बस येते .आत बसल्यावर लगेच दुसरा प्रवेश रंगात येतो. आता धृपद असते आई sssआई कधी येणार ग गाव ?एव्हांना माझ्या डोक्याचं चांगलंच भिरभिर झालेलं असतं ,स्वाभाविकच पुढचं नाटक छोट्याच्या अश्रूच्या पुरात वाहून जात.
         अखेर अशा अनेक प्रयोगानंतर मी आमच्या आसुंनी भरलेल्या नाटकाचे स्क्रिप्ट बदलायचं ठरवलं .यावेळी बस मध्ये बसताच छोट्याने नेहमीचे संवाद सुरू केले पण मी मात्र वेगळाच पवित्रा घेतला छोट्याला समोरच्या काचेतून दिसणाऱ्या झाडांच्या कमानी दाखवत म्हणाले" पाहिलंस रस्त्याच्या मध्यावर एकमेकांना पान मिठी घालून झाड कशी गप्पा ठोकत बसली आहेत . काय बोलत असतील ती पान एकमेकांच्यात?" भिवया ताणत छोट्याने काचेतून पाहिलं आणि एकदम टाळ्या वाजवत झाडाचे संवाद त्याने बडबडायला सुरुवात केली मग तो एका बाजूचा एक झाड झाला तर मी रस्त्याच्या दुस-या बाजूचे! आता आम्ही दोन झाडे बनून रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांची खूप चेष्टा केली,फांद्या तोडणाऱ्या मुलांना सज्जड दम भरला, पक्षांच्या लाडिक तक्रारी ऐकल्या. गावापर्यंत रस्ता केव्हाच पार झाला होता झाडांच्या गप्पानी आमचा प्रवास लडिवाळ आणि सोनेरी केला होता
                 गप्पांची जादू अशी दाट सावलीसारखी पसरली की आंबलेली थकलेली मनेही कशी एकदम ताजीतवानी आणि मोकळी होतात .काही काटेकोर माणसांना गप्पाच वावड असत ते सोडलं तर गप्पांना स्थळ ,काळाचं ,वयाचं कशाकशाचा बंधन नसतं. रात्री एकएक चांदणी येऊन आकाश सतेज होत जाते तसेच गप्पाच असतं .कधी खरकट्या हातांनी भान विसरून त्या जेवणाच्या टेबलवर रंगतात, तर कधी कोजागिरीचा गरगरीत चांदोबा आपले दूधाळ हास्य उधळत आकाशात मजेत फिरत असतानाही गप्पांचा सूर लागत नाही .अशावेळी हातातल्या आटीव दुधाचे प्याले निव्वळ उपचार होऊन राहतात.    
                  माझ्या लहानपणी आई आम्हा दोघी बहिणींना वाटीत लाडू देई तो घेऊन आम्ही थेट बाहेरच्या खोलीची खिडकी गाठायचो.खिडकीच्या कठड्यावर, त्या ऐसपैस सिंहासनावर बसून आमच्या गप्पा सुरू होत मग कणाकणाने लाडूचा गोडवा जिभेवर विरघळत असताना गप्पांची खुमारी अंगभर पसरायची . खूप खूप मस्त वाटायच.आम्ही काय एवढं बोलायचं कोण जाणे पण त्यावेळी अनुभवलेला तो राजवर्खी आनंद अजूनही आठवतो. आम्हा दोघींचे ते खास तरल विश्व होतं.
           गप्पांचा स्वभाव  व्यक्ती ,व्यक्ति गणिक बदलतो .घरात साजूक तुपातली माय मराठी बोलणारा माझा थोरला, त्याच्या  मित्रांच्यात मिसळतो ते गप्पांचा पोत बदलूनच या मुलांच्या गप्पा खऱ्या अर्थाने रंगतात रस्त्यावरच. एक पाय जमिनीवर  ,तर दुसरा आधांतरी दुचाकीवर तर अशा त्रिशंकू अवस्थेत सुरू झालेल्या या गप्पा मनमोकळ्या हास्य सरी केव्हा बरसू लागतात हेच मुळी कळत नाही,  आणि टपोरी भाषा कधी फवारू लागतात हेच लक्षात येत नाही
         या उलट्या आम्हा मैत्रिणींच्या गप्पा. अगदी काॅलेज जीवनापासून आम्ही एकत्र. एकमेकींच्या पक्क्या मैत्रीणी .प्रत्येकीच्या प्रेमाच्या गुलाबी कालखंडाच्या साक्षीदार, त्यामुळे आमच्या गप्पा म्हणजे रंगपंचमी असते थोडा कोपरखळ्या, थोडी चेष्टा ,खूप जिव्हाळा . अनेक विषयात रंगत रंगत आम्ही सून या आवडीच्या विषया पर्यंत येतो ,तेव्हा आमचे रंगचक्र किंवा गप्पा चक्र पूर्ण झालेलं असतं.
       काही जणांबद्दल उगाचच आपल्या मनात आढी असते . अशाच कोण तरी दूरच्या पाहुण्या आमच्या घरी आल्या होत्या त्यांचा चौकस स्वभाव ,प्रत्येक बाबतीत लक्ष घालण्याची सवय, सारखे उणे काढणे ,त्यामुळे मी त्यांच्या आसपास जाणेही  टाळत होते एके रात्री अचानक वीज गेली ,आणि मग घरातले आम्ही सारेजण बाहेर पायर्‍यांवर आलो मागोमाग या पाहुण्या आल्या .त्या रात्री त्यांनी त्यांच्या लहानपणीचे किस्से सांगून आम्हा सर्वांना अक्षरशः पोट दुखेपर्यंत हसवले. कधी नव्हे ते आईने आणि अज्जीनेही इतक्या गमती जमती नंतर सांगितल्या की वीज आज रात्री येऊच नये आणि गप्पा अशाच रात्रभर चालू राहाव्यात असं वाटू लागलं .आपली आई आजी इतकेच नव्हे तर या पाहुण्या बाईही एके काळी आपल्यासारख्याच लहान खोड्या करणाऱ्या मुली होत्या हा शोध मला तेव्हा लागला .
        कधी कधी वाटतं सुख सुख म्हणजे काय ?बाहेर आषाढ मनसोक्त कुंदत असावा.  हिरवट वास सर्वत्र भरून राहिला असावा. मऊ दुलईला लपेटून अंगभर निखळ ऊब   मुरवत जिवाच्या जिवलगा बरोबर आपल्या गप्पा रंगाव्यात. आपण भूतकाळातील मोरपीस फिरवाव त्यांनी वर्तमानातल्या गुलाब पाकळ्या पसरायच्या आणि दोघांनी मिळून भविष्यातल्या इंद्रधनूचा वेध घ्यायचा. या गप्पात चिमुकली कोपरखळी असावी,लाडीक रुसवा असावा, हुरहूर वाटत डोळ्याच्या कडा नकळत ओल्या व्हाव्यात.अर्थातच हे कधीतरीच सठी सहामाशीच व्हावे नाही तर या गोडमिट्ट सुखाची मीठ्ठी गप्पांना बसेल आणि त्याची नेहमीचे "तू तू मैमै" चा खमंगपणाच हरवून जाईल नाही का?

३ टिप्पण्या: