शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

प्रौढत्वी निज शैशवास जपणे

--आज शुक्रवार. नेहमीप्रमाणे आठवणींचा पसारा आवरते आहे. आज आठवण आली शाळेच्या दिवसांची. त्यावेळचे ते निबंध. कधी कधी त्या ऩिबंधांचा अर्थच कळायचा ऩाही ,तो कळायला इतकी वर्षे कां लागतात? काही प्रश्न सोडवता येत नाहीहेच खरे.
----

       प्रौढत्वी निज शैशवास जपणे----------     ©️
                   
जूनमधे शाळा सुरू होताच नेहमीच 'पावसाळ्यातील पहिला दिवस' किंवा 'मला आवडणारा पावसाळा 'या विषयावर निबंध लेखन सांगितले जाई. अशावेळी आम्ही समस्त  विद्यार्थिनी तत्परतेने कल्पनेतल्या कल्पनेत कपड्यांच्या बाजारपेठा धुंडाळून सृष्टी देवीला हिरवागार शालू नेसवून हुश्शss करीत असू. त्याकाळी जसे तिन्हीसांजेच्या आत घरी येणे आवश्यक होते तसे किंबहुना त्याहूनही आवश्यक होते पहिल्या पावसानंतर सृष्टी देवीला हिरवा शालू ल्यायला लावणे.निबंधात कोणीच सृष्टीदेवीने शालू नेसला असे लिहीत नसत.जणू हे पाचवी ते अकरावीतील तमाम विद्यार्थिनींचे आद्यकर्तव्य म्हणजे,  सृष्टी देवीला शालू 'ल्यायला' लावण्याचे असे.पावसाची सर येऊन जाताच सृष्टीदेवी जणू हिरवा गार शालू ल्यायलीआहे हे वाक्य घातल्याखेरीज जणू आपला निबंध पूर्ण होणार नाही अशी जणू खात्रीच असायची. . आता माझी नात इंग्रजी माध्यमातून शिकते आहे त्यामुळे Goddess earth wears green shyalu असं वर्णन तीच्या मीनी कपड्यांच्या कल्पनेतच बसत नाही त्यामुळे पहिल्या पावसात हिरवागार शालू नेसण्याची नव्हे ल्यायची सृष्टी देवी ची जबाबदारी सध्या कमी झाली आहे.
                  
              हा निबंधाबद्दल लिहायचा प्रपंच करण्याचे कारण म्हणजे    सृष्टी देवीचा हिरवा शालू एकवेळ परवडला पण काही काहीअसे रथी महारथी विषय त्यावेळी निबंधासाठी असत .त्यातलाच यच्यावत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकणारा विषय असे "प्रौढत्वी निज शैशवास जपणे "अर्थात नक्की याचा अर्थ काय याची शंका आमच्या सर्वांच्या चेहर्‍यावर कायमची ठसठशीतपणे उमटलेली असे .घरीदारी आईचे दणके पाठीत बसता बसता घोडी झालीस, अजून अक्कल नाही हे ऐकताना आपण मोठ्या झाल्याची खात्री व्हायची. आता आपण मोठ्या झालो म्हणून आई आणि मावशींच्या गप्पात कान खूपसतोय तोच, जा बघू इथून मोठ्यांच्यात तुझे काय काम असे हरकाटले जायचे. कधी छान पैकी आईची साडी नेसून प्रौढपणे बोंगा सावरत आणि पदर फलकारत जरा कुठे मिरवावे तोच कुणी काकू, आत्या ओरडायची, "नेसायच्याच आहेत ना नंतर साड्या कशाला नाही तो सोस? तळ्यात की मळ्यात या खेळासासखे शैशवआणि प्रौढत्व यात मोठ्यांच्या इच्छेप्रमाणे आम्ही सतत उड्या मारायचो .परिणामी आमचे सर्वच मुलींचे चेहरे सदैव कावरेबावरे आणि गोंधळलेच दिसत.निबंधाचाही पूर्ण बो-या वाजायचा हे वेगळ सांगायला नकोच.
                             
            लग्नानंतर मात्र सृष्टी देवीच्या हिरव्यागार शालूने घातलेल्या मोहिनी वर रंगबिरंगी दुपट्यांनी कधी बाजी मारली आणि घरात बागडणाऱ्या शैशवाचे हट्ट भागवता भागवता खरेखुरे प्रौढत्व कधी डेरेदाखल झालं हेच मुळी कळलं नाही.  घरासमोर भरणाऱ्या जत्रेतील मौजमजेपेक्षा त्यातील आवाजाचा त्रास अधिकच जाणवायला लागला,आकाशात मल्हार मेघुडे दाटल्यावर , लिंबोण्यांच्या टपटपणा-या सोन पखरणीपेक्षा रस्त्यातला चिखल जास्त सतावू लागला तेव्हा लक्षात आले की प्रौढत्व आले आहे आणि त्याने नुसतीच ओसरी बळकावलेली नाही तर त्याने संपूर्ण घरच व्यापले आहे .ऑक्टोपस सारखे त्यांनी आपल्याला पूर्णपणे जखडले आहे. पण हेही लक्षात आले की आपण कॉलेजच्या मैत्रिणी जेव्हा वर्षा-दोन वर्षात भेटतो तेव्हा कुठे हा प्रौढत्वाचा बागुल बुवा दरडावतोय? उलट आपल्याहूनही सान होऊन  तो दंगामस्ती करतोय .आमच्या वयाची पुटे एकमेकींच्या सान्निध्यात धुक्यासारखी तरल होतात आम्ही परत होतो 18 वर्षीय !तोच हास्याचा वर्षाव हस्ताच्या पावसासारखा कोसळू लागतो कधी कधी वाटतं घरीदारी अनेक खोट्या मुखवट्याआड आपला मूळ चेहराच आपण विसरून जातो. मग कुठले शैशव जपणे आणि कुठले काय!
                   शैशवास जपण्याचा  इतका आटापिटा का,  आणि कशासाठी ते जपायचे? शैशव म्हणजे काय  गुलबकावलीचे फुल आहे की साता समुद्रापलीकडे पर्वता मागे  दडवलेला राजकुमाराचा प्राण आहे?शैशव असे हळुवार झुळकीसारखे प्रौढत्वात मिसळून जातंय तेच छान आहे. नाहीतर घनघोर जंगलात चार वृक्ष अधिक लावले  म्हणून आनंदाने कोणी थुईथुई करत नाचत नाही ,पण वाळवंटात चार पाच झाडे दिसली तर त्याच कोण कौतुक होत. तसंच आहे ना या बाल्याचं! प्रौढत्वाचा बाज राखत वाळ्याच्या  मंद झुळकी सारखे शैशवाने यावे अवतीभवती फेर धरून प्रौढत्वाला खुलवून फुलवावे आणि थोडीशी चुटपुट लावत विरून जावं हव्याहव्याश्या पाहुण्यासारखा!!
                    
                  मध्यंतरी माझ्या नातीला बरे नव्हते तेव्हाची गोष्ट.तिच्या आजाराने घरावर जणू मळभ दाटले होते.त्यावेळी तिला भेटायला आलेल्या काकांनी तिच्यासाठी काचेचे रंगीबेरंगी स्ट्राॅ आणले होते. नातीच्या अगदी आवडीचे. नातीच्या  हातात आकाशीचे इंद्रधनु जणू आले होतं. बराच वेळ सर्वेंन्द्रीयांनी तिने ते गोंजारले.त्यांचा नितळ स्पर्श, ते आपटल्यावर होणारा किणकिणाट, डोळ्यासमोर धरताच त्यातून दिसणारी मोरपिशी दुनिया हे सारे अनुभवताना तिचा विलक्षण भावविभोर समाधिस्थ चेहरा आम्ही आसोशीने बघत होतो, नातीने मग सम्राज्ञीच्या अविर्भावात त्या मौल्यवान खजिन्याची वाटणी केली रसरसता लालबुंद   स्ट्राॅ स्वतःसाठी, गर्द जांभळा दादासाठी, या क्रमाने आई-बाबा ,आजी-आजोबा ,घरातली कामवाली एवढेच नाही तर आमचा कुत्रा पॅची पण सुटला नाही. आमच्या या छोट्या सम्राज्ञीची आज्ञा शिरसावंद्य मानून आमचे दल हलू लागले. काॅफीपानाचा कार्यक्रम ह्या रंगीत नळ्यांनी अधिकच रंगतदार केला . नातीने मग दिवसभर या नळ्यांनी दुध, ताक, सूप सर्व फस्त करण्याचा सपाटा लावला .कधी हातातल्या नळ्यांची अदलाबदल  केली तर कधी चिमुकल्या बालमुठीत सगळ्या धरून टाकायचा प्रयत्न केला .आजारपणाची घरावर पसरलेली मरगळ केव्हाच विरून गेली .छोट्या-मोठ्या काळज्या वादविवाद, जणू दूर भूतकाळात गेले होते . मी त्या लुटुपुटुच्या खेळात आपले गुडघे दुखतात हेच विसरले, आजोबांनाही पेपर मधे डोके खुपसण्यापेक्षा नातीचे सेनापती होणे अधिकच मानमरातब देणारे वाटू लागले. दादा चा अभ्यास पुढे गेला .सूनेची रोजची कामाची धांदल थांबली. त्या क्षणी आम्ही सर्वजण होतो लुटूपुटूची भांडणे करणारे भोकाड पसरणारे,भातूकली खेळणारे  माझ्या नातीचे जिवाभावाचे सवंगडी! रात्री ते सगळे स्ट्राॅ इवल्याशा मुठीत घट्ट धरून ती झोपली तिच्या त्या निरागस हस-या चेह-याकडे पहाता पहाता लक्षात आले आज अचानक अनेक आनंदाच्या कुप्या नकळत उघडल्या होत्या. सगळे हिणकस जळून गेले होते.उरला होता तो निखळ आनंद. त्या क्षणी मनाला जणू साक्षात्कार झाला वाटले आपले' 'स्वत्व' विसरणे म्हणजेच प्रौढत्वी नीज शैशवास जपणे!
              
                      

५ टिप्पण्या:

  1. लहानपणापासून आजपर्यंत चा काळ शब्दांकित केलास, खूप खूप छान वाटले.शैशव छान जपून ठेवलेस,तुझ्या सभोवतलची सर्व बालके व बालरूग्ण भाग्यवान आहेत, तुझ्या असण्यामुळे

    उत्तर द्याहटवा
  2. किरण इतक छान शब्दांत लिहिलयस, अगदी प्रत्येक क्षण मी जगले. तो श्रावणावर लिहिलेला निबंध - हिरवा शालू ल्यालेली धरणीमाला आणि लाह्यादुधाची आतुरतेने वाट पाहणारे नागराज आठवले—-lot of thanks

    उत्तर द्याहटवा