शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

रूची-गंध

करोनाची नकोनकोशी जवळीक वाढत आहे. "तो काय दूर चीन मधे आहे" म्हणेपर्यंत जवळजवळ सर्व देशांभोवती त्याचा विळखा आवळला जातोय.आयुष्याला वेगळच वळण लागत आहे. पण शुक्रवारी स्वतःला दिलेले पसारा आवरायचे वचन तर पाळायलाच हवे. या पार्श्वभूमीवर परवाच अमेरिकेतून पुतण्याचा निरोप आला की त्याच्या साठी पाठवलेली शेंगाचटणी त्याला एका बॅगेत आत्ता सापडली. जवळजवळ दोन महिन्यांनी . शंभर कोटीची लाॅटरी लागल्यासारखी स्वारी खुषीत होती. तेव्हाच ठरविले या वेळी पसा-यात "रुची आणि गंध" यांचा शोध घ्यायचा.




रूची-गंध©️

'रुची आणि गंध' म्हणजेच बोली भाषेतील 'चव आणि वास' ही जुळी भावंडेच.  त्यातील वास म्हणजे गंध , हा भाऊराया रुची ताईला एकदम पूरक! दोघांची गट्टी  पण अतूट ! पण नेहमीप्रमाणेच इथेही गंध 'तो' असल्यामुळे त्याला झुकते माप मिळालेच आहे. जिभेवर रेंगाळणाऱ्या रुचीला मात्र गंधा शिवाय पर्यायच नाही. पण गंध म्हणजे,' तो'.सर्वत्र एकटा उनाडतो त्यामुळे त्याचे खास स्वतःचे अस्तित्व असते. 
       असं म्हणतात की पूर्वीच्या नवाबी राज्यात मेजवानी नंतर हाताला पाक्वांनांचा गंध जितक्या दिवस राहील तितका त्या जेवणाचा दर्जा चांगला असं समजलास जायचा . सात सात दिवस त्या मसाल्याचा  वास हाताला बिलगून बसलेला असे..स्वतःच्या हाताचा वास घेत घेत रंगतदार मेजवानीच्या आठवणीं तृप्त जिभेवर घोळवत घोळवत नवा' खास' खाना 'कधी आहे याची वाट पहाणारे त्यावेळचे ते सरदार दरकदार! असे मेजवानीचा कल्पनेत आनंद घेणारेआणि आपल्या हाताचा पुन:पुन: गंध घेणारे सरदार आणि मानकरी नजरेसमोर आणले तरी हसायला येतं.
             माझ्यासारख्या एका सर्वसामान्य स्त्रीला मात्र भाजलेल्या पापडाचा खमंग गंध सुद्धा आठवणींनी कासावीस करतो. लहानपणी दर रविवारी रात्री तांदूळमुगाच्या डाळीची खिचडी, कढी आणि भाजका  पापड असा बेत ठरलेला ! रविवारी सकाळी तुडूंब झालेले जेवण, दिवसभर हुंदडल्यावर डोळ्यावर आलेली पेंग,अशावेळी वाफाळणारी पिवळी खिचडी, खोबरे आणि कोथिंबीरीचे हिरवे आणि पांढरधोप पांघरूण घेऊन समोर यायची .दळदार  तुपाचा गोळा त्या खिचडीवर मस्तीत बसलेला असे. वाफाळलेल्या खिचडीत क्षणात तुपाची ऐट ऐसी की तैसी होत असे. खिचडीत तो पूर्णपणे नाहीसा होई. गरमागरम कढी वाटीत गुपचूप वाफा टाकत बसलेली असे .लोणच्याचा लालेलाल रंग आपसूक नजर आणि जिव्हेला उत्तेजित करी,आणि या जोडीला येणारा भाजलेल्या पापडाचा , नाकातून शिरून जीभेला पाणीदार करणारा वास उरल्यासुरल्या झोपेला हद्दपार करी. रविवार संपल्याचे दुःखही ताटातून पोटोबात गायब होणा-या खिचडी सारखेच गायब होत असे. आजही तो पापड भाजल्याचा वास आला ना की त्या आठवणी पुनर् प्रत्यय देतात .उद्या शाळा आहे या कल्पनेने पोटात बेडूकउड्या सुरू होतात.मग जीभेवर  रेंगाळते तीच ती गरमागरम खिचडीची चव.
                     पण कधीकधी रुची गंधाची होते गट्टीsफूsss. मग तोंड चाळवणारी पावभाजी सुध्दा सर्दी झाल्यावर टीपकागदासारखी लागते. तेव्हा लक्षात येते चव आणि वासाची जुळ्याची गट्टी. सध्या भूमंडळाला त्राही भगवान करणारा करोना किंवा कोव्हीड19 याचाही घाला पडतो तो या रुचीगंधाच्या दुकलीवर..आजाराची सुरवातच होते तीच एका अवीट सुखाला पारखे होऊन.
           ..
      रुची जरी गंधा वाचून शरणागतीचे सफेद निशाण  फडकवत असली तरी गंध मात्र मधूनच आपल स्वतंत्र व्यक्तिमत्त्व मिरवतो. आठवणींच्या पायघड्यांवर आपली दणकट पाऊले दरवळत.! या गंधाची, सुवासाची, ,अनेक रूपं सामोरी येतात. कधी कोऱ्या पुस्तकाच्या वासाच्या रूपात तो शाळेच्या अनेक आठवणी उलगडतो.  भल्यामोठ्या उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आलेला शाळेचा पहिला दिवस, मृगाच्या पावसाने ओले झालेले रस्ते, तो हिरवट ओला वास,अंगावरच्या रेनकोट खाली दडलेले भलेमोठे दप्तर,रेनकोटच्या प्लॅस्टीकचा किंचीत उग्र वास, कोरा गणवेश. शाळेत जायच्या उत्सुकतेने पोटात दंगा करणारी फुलपाखरे ,त्याने पोटात होत असलेली पाकपुक आणि या सर्व संमीश्र  संवेदनांना वेढून राहिलेला करकरीत कोऱ्या पुस्तकांचा डोक्यात गेलेला वास.
       अशा अनेक कुप्या मेंदूने जपून ठेवलेल्या असतात.गंध बहुरूपी बनून आपली गंमत करू लागतो. वाळ्याचा मंद सुवास मनाला सहजतेने उन्हाळ्यात घामेघूम झाल्यावर ढोसलेल्या पाण्याचा थंडावा देतो. तर रातराणीचा गंध प्रियजनांच्या आठवणीने कासावीस करतो. पारिजातकाचा सुवास थेट मंगळागौर किंवा श्रावणी सोमवारच्या पूजेची शुचिता जागवतो. .रती मदनाचे दूत असलेले जाई जुई मोगरा तर आपल्याबरोबर अनेक मधुर आठवणींची गुंफण आणतात. माझे वडील शेतकी अधिकारी त्यामुळे घरही शेताजवळच. तांदळाच्या शेतातून येणारा तो दैवी सुगंध म्हणजे तर नास्तिकाला आस्तिक करणारा दूतच!
                    काही गंध? मात्र त्रासदायक असतात.वैद्यकीय शिक्षण घेताना प्रथम वर्षातील पहिल्या काही दिवसात ते लाकडासारखे पसरलेले मृत देह आणि तो फाॅरमॅलीनचा सर्वत्र भरून ,एप्रनला चिकटलेला वास. हॉस्टेलवर जाऊन खसखसून अंघोळ केली  तरी त्यातून सुटका नसे. कालांतराने, जाणा-या दिवसांबरोबरच 'काळ हेच औषध' हे पटायला लागले आणि आपसूक त्या नकोश्या वासाचा त्रास होणे कमी झाले. आजही तो फाॅरमॅलीनचा वास आला की आठवतात शरीर शास्त्रातील ते डिसेक्शनचे दिवस.
.         अनादी काळापासून गंधाने आपले खास स्थान निर्माण केले आहे. धूपबत्ती, सुवासिक फुलं याशिवाय देवांची पुजा अगदीच निर्जीव वाटते .मानिनी  शामल द्रौपदी अवर्णनीय सुगंधाची कुपी! तिचं काय किंवा पराशर ॠषींनी दिलेली सुगंधी देह कुडी मिरवणारी सत्यवती काय, ,गंधाने आपले खास स्थान तिथेही राखले आहेच. गुलाब अत्तराची अमोल देणगी देणारी नूरजहाँ  खरोखरच रसिक पण या रसिकतेला रंगेलपणा ची साथ मिळते तेव्हा मात्र गंध थोडासा आक्रमक बनतो..
          खरंतर प्रत्येक ऋतूलाही  स्वतःचा खास गंध आहे .आपल्या महानगरात तो येत नसेलही  पण कुठेही शांत गावात हा गंध तुमचा पाठपुरावा करतोच. 'ऋतुचक्र' या दुर्गाबाईंच्या रसरशीत अनुभवांत हिवाळ्यात आकाशी तेवणाऱ्या सूर्याला जाईच्या झेल्याची उपमा दिलेली आहे . दरवेळी ते वाचताना थंड थंड शिरशिरी बरोबर जाईचा मादक गंध मनात दरवळतो. असा हा गंध रुची बरोबर बंधू म्हणून मिरवता मिरवता स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व जपणारा!
                 रुची म्हणजे चव जरी गंधा बरोबर सतत रहायचा प्रयत्न  करीत असली तरी तिचा स्वतःचा संग्रह अफाट आहे.आता आमच्या सोलापूरच्या शेंगा चटणीची जर 'लत' लग गई ,तर त्या तावडीतून सुटका होणे अवघडच. प्रत्येकाची चवढव वेगळी.कुठलाही एक मापदंड तिथे लावणे अवघडच.काहींच्या हाताला असली भन्नाट चव असते की साध्या साध्या पदार्थांना एकदम चविष्ट बनवतात. तसच बनवायचा आपण प्रयत्न केला की तो पदार्थ गुपचूप , हळूच लपवून टाकून द्यायची वेळ येते.
 गंध आणि रुची यांची मनभावन प्रचिती जाणवते 'वाईन' पिताना. खर तर 'पिणे'हा शब्द अपमानास्पद वाटावा असा नजाकतदार तो सोहळा असतो. पेय पानाचे चषकही खास. ते टवटवीत गुलाबासारखे लालसर आणि चमकदार पेय आधी नजरेनेच प्यायचे. नंतर हळूच चषक गोलाकार फिरवत मनमुराद गंध घ्यायचा, मग अंदाज, कशापासून बनवली आहे याचा! आणि मग हळूच एकच इटूकला घोट जिभेवर स्वैर खेळू द्यायचा! अहाssssहा! आपल्याकडे गंध आणि रूची एकवटतात नैवेद्याच्या ताटात.दिवसभर विविध पदार्थांच्या संमिश्र गंधांची दिवाळीच सुरू असते.नजरेवरही त्यांची खास जादूई करामत होते. भाताच्या सुवासिक मुदीवर वरण पिवळ्या शेवंतीसारखे देखणे दिसत असते. नैवेद्याच्या ताटातील पदार्थ देवाला स्वर्ग सोडून भूतलावर आणायचे आवताणच.

                चवी बद्दलचा विचारच करायचा तर  कुणाला सौम्य सात्विक जेवण प्रिय ,तर कोणी असल्या  पचपचीत जेवणाकडे ढुंकूनही न पाहता तिखटजाळ जेवणच 'गोड' मानणारे .कडूशार कार्ल्याला  व्वा म्हणत ओरपणारे जसे आहेत तसेच गोड खाल्ल्याशिवाय जेवण होतच नाही असे मधुर महाजनही आहेतच.कचकचीत कांदा आणि घमघमता लसूण असल्याखेरीज काही जण जेवणाची कल्पनाही करू शकत नाही. या उलट ईsssकांदा म्हणत नाकाला पदर लावून नाक मुरडणारेही आहेतच. विष्णूच्या मत्सावतारावर अपरंपार प्रेम करणा-या आणि त्यांना उदरात प्रेमाने आश्रय देणार्या कविवर्य बोरकरांसारखेे आहेत तसेच 'मासे' हे नाव काढताच कपाळावर आठी चढवून उदरातील सर्व अन्न बाहेर काढणारे  महाभाग काही कमी नाहीत.भाजीला गाई गुरांचे अन्न समजून संबोधून सामीष आहारावर ताव मारणारे जसे आहेत तसे मांसाहार वर्ज्य करणारेही आहेत.'आमच्या पध्दतीचा स्वयंपाक 'म्हणजे नव्या सुनेला खिजवण्याचा खास 'परवलीचा' 'शब्द! खर तर प्रत्येक घरातला स्वयंपाक वेगळा. आजीच्या मुरलेल्या हातांची चव आईच्या हाताला नाही आणि नव्या सुनेला मात्र सर्वांची त्याच साच्यात बसवायची घाई.अशी ही 'रुची' कौटुंबिक कलहाला आमंत्रण देणारी, एवढेच काय, जगाच्या इतिहासालाही कलाटणी देणारी. अहो, त्या मसाल्याच्या मोहाने तरआंग्लांना भारतभू वर आणल ना.
               वासाची म्हणजे गंधाची आवड बदलणे अवघडच! पण वेगळ्या चवीची आवड मात्र कधीही निर्माण होऊ शकते .लहानपणी एखाद्या भाजीला हातही न लावणारा लाडका लेक लग्न झाल्यावर पत्नीच्या हातची तीच भाजी ओरपायला लागतो तेव्हा आईच्या नाकाला आपोआपच मिरच्या झोंबत नसतील तरच नवल! म्हणूनच वाटते  रुची म्हणजे अर्थात चव जर खरोखरच स्त्री म्हणून उभी राहिली तर एकूणएक स्त्री गुणविशेष आणि यच्चयावत दोषही तिच्यात ठासून भरलेले असतील.
              मला नेहमी आठवतं ट्रेकिंग करताना पंधरा दिवसांत घरच्या जेवणाच्या नुसत्या आठवणींनी पाझरणारी जिव्हा! तेव्हा जाणवलं की रुची गंधाने आपल्याला त्यांचा पूर्णतः गुलाम केले आहे .आणि हे गुलामगिरीत राहणेही तेवढेच सुखकारक!.
        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा