रविवार, २६ एप्रिल, २०२०

स्पर्श

      परवा नातीशी भरपूर गप्पा झाल्या. ती कॅनडास्थित अन् मी भारतात.      साडेतीन वर्षांची माझी नात तिची नवीन खेळणी दाखवत होती आणि ते किती, किती 'साॅफ्ट' आहे हे परत परत सांगत होती.आपल्या आजी आजोबांनी खेळण्यांना हात लाऊन बघावं ही तिची ईच्छा. पण तिलाच काय मलासुध्दा   वाटत होते,नातीला जवळ घ्यावे,तिच्या गबदुल गालांवरून हात फिरवावा.   चला आभासी तर आभासी पण दिसली तर होती न मला.मग तेव्हाच ठरविले या शुक्रवारी पसा-यात आजवर हरवलेले स्पर्श शोधायचे. तशा हृदयस्पर्शी, मनस्पर्शी घटना ही असतात पण ठरविले त्या नंतर कधीतरी हुडकायच्या पसा-यातून.! आता फक्त   'स्पर्श'.  स्पर्श म्हणजे पूर्णतः वैयक्तीक अनुभव.त्यामुळेच पसा-यातून हुडकणे सोप्पे गेले.


स्पर्श


टॅssहॅ टॅssssहॅ बाळाचा आवाज घरात घुमतो अन् घरदार त्याच्या तालावर नाचू लागते .कोणाच्याही मांडीचे राजसिंहासन आणि हातांचा झुला बाळाला शांत करू शकत नाही .इतक्यात लगबिगीने आई कुठून तरी येते बाळाला जवळ घेते.बाळ हसू लागते. इतकावेळ तारेवरची कसरत करणारे घरही त्याच्याबरोबर डोलू लागते. पटकन कोणीतरी कौतुकाने बोलते" पाहिलंत का,s इवलासा नाही गुलाम तोच आईचा हात ओळखू लागलाय लब्बाड" खरच अशी आहे स्पर्शाची जादू! पण म्हणतात ना 'अतिपरिचयात अवज्ञा' तसेच काहीसे या स्पर्शाचे आहे. सतत होत असलेले असंख्य स्पर्श या स्पर्शाची जादू थोडी बोथट करतात नाहीतरी प्रत्येक क्षणी घेतलेल्या श्वासाची तरी कुठे जाणीव असते आपल्याला? .आयुष्यातले सोनेरी स्पर्शकण मात्रआपल्याला सर्वांर्थांनी उजळवून टाकतात, तर नकोशा वाटणाऱ्या ओंगळ स्पर्शांची आठवण कोळ्याच्या चिवट धाग्यांत अडकवून तडफडवतात.  त्यातुन कितीही बाहेर पडायचे ठरवले तरी शक्यच नाही. एखादा विशेष स्पर्श परत मनाचे झरोके किलकिले करतो आणि मग कितीतरी चांगले वाईट स्पर्शांचे अनुभव सर्वांगांना लपेटतात. .खर तर बहुतेक सर्व स्पर्श हे अनंतात हरवणा-या माणसांसारखेच कालांतराने हरवून जातात.पण त्या अनुषंगाने फुललेल्या किंवा कोमेजलेल्या भावना मेंदूच्या स्मरणीकेत पक्या बसलेल्या असतात.

   लहानपणी बक्षीस मिळवताच धावत येऊन ते आजी-आजोबांना दाखवायची माझी सवय. आई आणि बाबा दोघेही नोकरी करणारे . आजी आजोबांना नमस्कार करताच पाठीवरून फिरणारा त्यांचा खरबरीत हात मनाला लोणी लोणी करायचा.घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटू लागायचे. डोळे उगीचंच चुरचुरायला लागायचे. असे का होते हे कळायचेच नाही.. तो थकलेला, सावकाश पाठीवर, तोंडावर होणारा स्पर्श  जळजळणाऱ्या डोळ्यांवर थंडगार पाण्याची पट्टी ठेवताच अंगभर झिरपणारा गारव्यासारखा . मनाला शांत शांत करायचा.
  घरातली मी धाकटी ! लाडोबाच!  रात्री आईने गोष्ट सांगायचीच आणि तिला बिलगून ती गोष्ट ऐकायची हा माझा हट्ट.  आईच्या कुशीत गोष्टी ऐकताना तिच्या त्या धुवट किंचीत ओशट वासाच्या साडीचा तो मऊमऊ स्पर्श आणि तो थोपटणारा मखमली आश्वासक हात. निद्रेच्या साम्राज्यातही  तो स्पर्श केवढा आधारवड व्हायचा. मग काय बिशाद आहे राक्षसांची आणि भुतांची माझ्या जवळपास फिरकायची? आई बरोबर बागेत फिरताना ती मुद्दाम कोवळ्या पानांचा स्पर्श अनुभवायला लावायची तेव्हा प्रश्न पडायचा आईचे हात अधिक मखमली आहे का ही बालपालवी?
       वाढत्या वयात स्पर्शाचे संदर्भही बदलू लागले. बालवयात बसमधून शाळेला जाताना बसमधल्या गर्दीत सर्वांगाला असंख्य स्पर्श होत असत. टोचणारा बाक,  गारेगार स्टीलच्या दांडा ,हाताला रग लागेपर्यंत कसेबसे धरलेले कडक हॅडल, खांद्यात कचकचून रूतलेले ते जडशीळ दप्तर, आजूबाजूला माणसे माणसे, परंतु हे सर्वच स्पर्श संदर्भ शून्य असायचे.त्यांना ना कुठल्या शब्दांचा आधार ना कुठला अर्थ. वाढत्या वयाबरोबर मात्र कधी कधी सहप्रवाशांच्या लालसेला स्पर्शरूप मिळाले. हेतुपुरस्सर केलेला स्पर्श ! मग नकोनकोसे वाटणारे स्पर्श आपसुकच चुकवता यायला लागले.

            त्या कैरीसारख्या करकरीत वयात सर्वच गोष्टींची अपूर्वाई असायची. मैत्रिणीला सोडून दुसऱ्या गावी जाताना डोळे पुसत पुसत तिने घट्ट पकडलेला हात कित्येक गोष्टी क्षणात बोलायच्या "कधी भेटणार ग आपण?" हा प्रश्न त्या हाताच्या स्पर्शातून सहजतेने उमटायचा .आज माझा करंगळी एवाढा नातू 'हाय फाईव्ह'  करतो तेव्हा त्याच्या स्पर्शात जाणवते की या क्षणी तो स्वतःला खूप मोठा अगदी त्याच्या बाबासारखा समजतो आहे. साधे हस्तांदोलन शब्दा वाचून कितीतरी गोष्टी सहजच बोलतात.सहज औपचारिक ओझरते हस्तांदोलन केवळ उपचार!.तेच खूप दिवसांनी भेटलेल्या प्रियजनांनी घट्ट पकडलेला हात खुशाली पासून, 'काय काय घडले' हे आपसुकच  सांगतात.अगदी तो स्पर्श सतत म्हणत असतो 'खूप आठवण आली तुझी.'

          दुर्दैवाने माझ्या सासूबाईंचे निधन झाले तेव्हा माझे पती काॅन्फरन्सला  मुंबईला गेले होते. घरात बारा तेरा वर्षे या अडनीड्या वयाचा माझा मुलगा, आजारी  सासरे आणि माझी वृध्द आई.सारे इतके अनपेक्षीत ..अशा वेळी मित्रमैत्रिणींचे सात्वंनपर स्पर्श धीराच्या,प्रेमाच्या अगणित शब्दांचे काम करीत होते.आजारी सास-यांना आणि आईला कसेबसे मी समजावत होते. ऑगस्टचा भर पावसाचा महिना,कधी नव्हे तो पाऊस बेभान झालेला.आता मुंबईहून कारने निघालेल्या पतीची, दिराची ,जावेची आणि मोठ्या मुलाची प्रचंड काळजी    वाटू लागली. बरोबर कोणी चालकही नाही त्यामुळे जास्तच. माझ्या धाकट्याने बहुधा हे ताडले असावे.त्याने माझा हात हातात घेतला मला जवळ घेतले आणि खरच सांगते त्या स्पर्शात माझी आई, हितचिंतक,माझे आजोबा ,शिक्षक सारे सारे एकवटले होते." मी आहे तू नको न काळजी करूस" असे ढळढळीत स्पष्ट शब्द त्या स्पर्शातून मला समजावत होते.माझ इटूकल्या रोपट्याचा खरच मोठा ,'अश्वथ' वृक्ष झाला होता. आधार, सावली देणारा.
   अशीच एकदा शाळेतून येताना वाटेत एका गोठ्यात कुत्री व्यायली होती. तिच्या त्या लूचणा-या गोंडस पिल्लातील  एक पिल्लू मी हळूच उचलले. त्याचा तो उबदार ,रवरवीत, जीवनाभिमुख स्पर्श, आणि त्याच्या काळ्याभोर ओल्या नाकाचा गार स्पर्श आमच्या दोघांच्या मधे एक खास अनोखा प्रेमाबंध निर्माण करून गेला. नंतर आमच्या घरातला तो एक लाडका सदस्य झाला. 
          वैद्यकीय महाविद्यालयात प्रथमच शरीरशास्त्र विभागात मृतदेहाचा तो टणक ताठरलेला, निर्विकार स्पर्श अंगावर सरसरून शहारा येऊन गेला. पण तेव्हाच त्वचा या सर्वात मोठ्या ज्ञानेंद्रिया बद्दल विलक्षण आत्मीयता  निर्माण झाली. कधी कधी काही आजारांचा घाला पडतो या स्पर्शावरच.! मग बघावे लागतात स्पर्शा शिवाय हतबल झालेले ते अवयव!
           काही काही स्पर्शांची कल्पनेतही एवढे धास्ती असते की विचारायलाच नको. सकल प्राणीमित्रांची माफी मागून लिहीते आहे.अनेक व्यक्तींना असते त्याप्रमाणेच पालीची मलाही  विलक्षण भीती. . तिचे ते फत्ताडे तरातरा पळणे,काळ्याकुट्ट ते पांढ-या फट्ट रंग छटांच शरीर ,ते दबा धरून बसणे आणि ते भक्ष मटकावणे त्यामुळे पाल जर एका खोलीत तर ती जाईपर्यंत मी घराबाहेर!.त्यात तिच्या विषाबद्दलच्या अनेक चित्तरकथा लहानपणापासून ऐकलेल्या .पुढे वाचन वाढल्यावर भारतीय पालीं भोवती असलेलं विषाचे वलय नष्ट झाले पण भीती मात्र कायम. आणि एकदा भिंतीवरून थेट मांडीवर उडी मारून आलेल्या या पाहुणीला दोन-तीन क्षण  (जे युगान्ता पर्यंत वाटले) अंगाखांद्यावर नकळत खेळवली,मानेवरून हातावर आणि तेथून जमिनीवर असा अफाट , अनपेक्षित प्रवास तिने केला. तिचा तो रबरी पण गिळगीळीत स्पर्श एक दुःखद स्वप्न म्हणून विसरायचा आजतागायत प्रयत्न करते आहे. मला लक्षात आले आहे, ही बया वाटते त्याहूनही किळसवाणी आहे.. इतकच नाही तर मी तिला जीतकी घाबरते त्यापेक्षा हजारपट तिला माझा तिटकारा,भय वाटतय.चला फिट्टम फाट झाली.अर्थात अजुन तरी पालीशी मैत्री करण्याचा माझा कुठलाही इरादा नाही.आणि तिचा तो गिळगीळीत  स्पर्श विसरणेही अशक्यच.
         मध्यंतरी पचमढी या थंड हवेच्या ठिकाणी गेले होते. झुळझुळणारा नितळ पाण्याचा झरा  संगीतमय स्वागत करत होता. छोटासा धबधबा अन् त्याला साजेसा इवलासा डोह. तीन चार दिवसांनी नळाला थोडेसे पाणी बघणारे आम्ही जर या आरस्पानी  सौदर्याने वेडावलो नसतो तरच नवल! डोहामधे पाय सोडून बसल्यावर अचानक काळे कबरे इवलाले मासे झुंडीने आले आणि सर्व बाजूनी पायाला लूचू लागले.फुलपाखरांनी  फुलावर ज्या नजाकतीने बसावे तितक्या अलवारपणे .! पायाला अतीसुखद संवेदना होत होत्या.त्या शब्दात पकडणे म्हणजे ढगांच्या आकाराबद्दल प्रत्येकानी अधिकार वाणीने सांगणे.हा अनुभव फक्त ज्याचा त्याने  अनुभवायचा!  
      स्पर्श नुसते बोलघेवडे नसतात तर रंगीत संगीतही असतात. हव्याहव्याशा माणसाचा प्रथम स्पर्श होताच स्पर्श रंगांधळा नाही तर तो गुलाबी, तर कधी सप्तरंगी कधी सुगंधी,सुरेल आहे याची जाणीव होते .
    काही स्पर्श केवळ नजरेने, शब्दांनी केले जातात.  लग्नमंडपात आई-वडिलांनी नजरेनी घेतलेला निरोपाने माझ्या वहात्या डोळ्यांना बांध घातला. ती प्रेमळ नजर मनाला, गोंजारत स्पर्श करत होतीआणि सासरी देखील कित्येक दिवस कवचासारखी  ती नजर सतत जाणवत राहिली .

वेदनेच्या प्रचंड डोहातून इवलेसे बाळ येते .त्या आपल्या अंशाला आपल्या छोटूकल्याला जवळ घेताना  मृदू ,मुलायम ,रेशमी या शब्दांनीही लाजावे असा तो स्पर्श अनुभवताना सर्व ज्ञानेंद्रिये जणु स्पर्शेंद्रीयेच बनतात. आई आणि बाळाच्या मधे जो खास बंध असतो त्यात स्पर्शाने आपला सिंहाचा वाटा उचलला असतो.अपू-या दिवसांच्या कोमेजलेल्या बाळाला सुध्दा ही स्पर्श संजीवनी  टवटवीत करते. 

       आजारपणात ममताळू परिचारिकेचा आश्वासक स्पर्श केवढा तरी दिलासा देतो .ब-याचदा बालरोग विभागातील परिचारिका  आणि तिथल्या बच्चूंमधे एक खास दुवा असतो.ती असते स्पर्शाची जादूई झप्पी .
        आज करोनाने  परत एकदा या असीम सुखावर घालाच घातला आहे.करोना केवळ  क्रूर नाही तर प्रिय जनांना दुरावण्याचे कामही करतो आहे.
ठिक आहे. प्रियजनांचा स्पर्श नाही तर बाकी अनेक स्पर्श आपली वाट बघत आहेत. वाळूचा रवरवीत आणि गवताचा थंड ओलसर, भुरभुरत्या पावसाचा गुदगुल्या करणारा,कडाडत्या उन्हाचा भाजून काढणारा असे असंख्य स्पर्श.फक्त ते अनुभवायला थोडा वेळ नक्कीच द्यायला हवा.
.        अशा अनेक स्पर्शांचे गाठोडे घेऊन आपली मार्गक्रमणा चालू असते. काही मोहवणारे काही फुलवणारे काही ओंगळ काही उदास असे हे असंख्य स्पर्श! 
        अखेरचा स्पर्श होतो तो मृत्यूचा. हा स्पर्श चूकवू म्हटले तरी शक्यच नाही.   मृत्यूचा स्पर्श होतो तो आपल्या माणसांना असह्य दुखःद! ..स्पर्शाच्या या वाटचालीचा अखेरचा टप्पा येतो तोच मुळी अग्निदेवतेची उबदार दुलई घेऊन किंवा धरती मातेच्या मृदूमुलायम कुशीत! पण तोवर आपण दूर दूर गेलेले असतो सर्व भावनांच्या नव्हे तर स्पर्शाच्या पलीकडे कधीच न परतीच्या वाटेवर.
           

४ टिप्पण्या: