रविवार, २६ एप्रिल, २०२०

आइस्क्रीमचे दिवस

आइस्क्रीमचे दिवस©️


                    आईस्क्रीमच् दिवस म्हटलं की मन  चाळीस पंचेचाळीस वर्षे मागे जाते आणि आठवतं ते घरात बनवलेले आईस्क्रीम. तो  असायचा एक मोठा सोहळाच! 
                आजच्या मुलांना  हा सोहळा म्हणजे बाबा आदमच्या जमान्यातल्या कथा वाटतील .पण आज वयाची साठी पार केलेल्यांना तो काळ नक्कीच  आठवत असेल. आज रस्त्यावरच्या कोपऱ्यावर कुठल्याही प्रकारचे आईस्क्रीम सहजतेने मिळते. आणि आईसक्रीमचे अनेक प्रकारही असतात पण त्याकाळात एखाद दुसरे आईस्क्रीमचे  दुकान सोडलं तर सगळा आनंदच! आज घराघरात सतत घूsssकरीत घुमत बसलेला फ्रिज असतो त्यामुळे आईस्क्रीम काय किंवा बर्फ काय कशाचीच अपूर्वाई नाही.त्याकाळी मात्र , जर पोटभर आईसक्रीम खायचे असेल तर घरी आइस्क्रीम करणे हा एकच उपाय. नव्हे तो एक साग्रसंगीत कार्यक्रम असायचा, नव्हे सोहळाच होता तो.
                वार्षिक परीक्षा संपल्यावर एखाद-दुसरी आते-मामे बहीण घरी डेरेदाखल झालेली असे. जेवताना डोळाभर गुंगी आणणारा आमरस, दुपारी डाळपन्हे , भेळ,संध्याकाळची भटकंती ,आणि रात्री रंगलेला पत्त्याचा डाव हा आनंद खुद्द आकाशातला तो भगभगता सूर्य आमच्या बरोबरीने घेतोय याची खात्रीच असायची. उन्हाचा काव आता टिपेला पोहोचलेला असे.आणि गप्पा गप्पात विषय निघायचा आइस्क्रीमचा! मागच्या वर्षी कित्ती  छान झालं होतं यावर मात्र सा-यांचे एकमत होत असे .पार्थाच्या लक्ष वेधासारखे आता आमच्या डोळ्यासमोर असे आईस्क्रीम ,त्यामुळे आश्चर्य चकित व्हायची पाळी यायची आईची! दिवस-रात्र काम न करणाऱ्या ,धांगडधींगा घालणा-या या पोरी जीमी कुत्र्यासारख्या आज्ञाधारक झालेल्या बघून तिला आमच्या मागणीचा अंदाज आलेला असेच. आडवळणाने का होईना पण तिचा होकार येताच मनाला गारेगार करू लागे. आईस्क्रीमच्या दिवसाचा नुसता विचार! ते वैशाखातील कातावून टाकणारे ऊन कधीच  हद्दपार होई आणि समोर भासमान होई आईस्क्रीमचा दिवस! डोळ्यासमोर भूगोलात भेटलेल्या एस्किमो सारखा छानस चमकदार, ईटूकल, लोलकासारखे सप्तरंग टाकणारे, ठिबठिब पाण्यात निथळणारे बर्फाचे घर येई आणि घर भरून असणारे आईस्क्रीम. जिभेवर केव्हाच रवाळ गोड गोड पोटात आत पर्यंत गारवा पसरवणाऱ्या आइस्क्रीमची चव दाटू लागे.तसे पुन्हा ऊन्हाबोबरीने आइस्क्रीमचा दिवस आता तापू लागे. यावर्षी दूध किती घ्यायचं यापासून ते कुठल्या प्रकारचे आईस्क्रीम बनवायचं असले अनेक विषय अनेक मुद्द्यांसहीत  अहमहमिकेने मांडले जात. अखेर तडजोड होऊन सर्वाधिकार आईला दिले जायचे. बजेट आणि माणसं यांचा मेळ घालून अखेर दूधवाल्या भैय्याला किती शेर जास्तीचं दूध घालायचं हे सांगितलं जायचं मिशीतल्या मिशीत हसत तोही आमच्या आइस्क्रीमच्या आनंदात चिंब होई.
           एव्हाना माळ्यावरून धुळकटलेले जडशीळ आईस्क्रीमचे  भांडं आणि बादली खाली उतरवली जायची. उतरवलेले भांड  साफ करायची जबाबदारी आम्ही बहीणींनी आनंदाने स्वीकारली असे.दिवसभर पाण्यात भिजवून नंतर खसखसून ते साफ केलं जायचं लाकडी भलीथोरली बादली त्यात मधोमध बसणारे पंखा असलेल्या घट्ट झाकणाचे उभट भांड आता भलतच देखणे दिसू लागे.
                      मग सकाळी सकाळीच चुलीवर तापणाऱ्या दुधाचा खमंग वास त्याबरोबरच केशर वेलचीचा गोड सुवास घेऊन आला की डोळ्यातल्या झोपेची ऐशी की तैशी होई. पांघरुण  आवरायचं भानही राहायचं नाही. स्वयंपाकघरात चुलीवर मोठ्या पातेल्यात दूध रटरटत असे त्यात सढळ हाताने साखर केशर वेलदोडा पडलेला असेल ते अवीट चवीचं  दूध प्रत्येकाला एक एक कप मिळे. ती नुसती झलक असे पण त्यावरून आईस्क्रीम कसे होणार याच चवीचा अंदाज आम्ही चतुर आणि चाणाक्ष बहिणींना अर्थातच आलेला असे. दुपारची जेवणं पटापट आवरून पत्त्याचा डाव मांडला तरी डोळे असत घड्याळाकडे. चार वाजता वडील बर्फ  आणणार तोवर जाडजाड पोत्यावर आईस्क्रीमची बादली एखाद्या राणीसारखी ऐटीत बसलेली असे जवळच मोठ्या पितळी पातील्यात दळदार, मळकट खडे मीठ लाचार गुलामासारखे निपचित पडलेले असे.
                     वडिलांनी सायकलला बांधून आणलेल्या बर्फाच्या शीळेला आम्ही केव्हाच ताब्यात घेतलेले असे. ती नितळ ,पारदर्शक ,ओलीकच्च, थंडगार बर्फाची शीळ घरात आली की मन कसं हिमगौरी सारखे आरस्पानी होई. प्रत्यक्षात एवढा बर्फ आपल्या घरी असल्याची कल्पना पण तेव्हा सुखावह !कारण घरात तेव्हा फ्रिज नव्हते. इथं तर खरोखरीचा बर्फ  नव्हे भली मोठ्ठी बर्फाची शिळा आमच्या दिमतीला हजर असे . तो विलक्षण देखणा बर्फाचा तुकडा खाली पोत्यावर ठेवताच,फतकल मारून बसलेल्या बहिणी सरसावून त्यावर कचाकच हातोडी चालवायला सुरुवात करत. बघताबघता पोतं चमकदार ,ओल्या ,धारदार ,पांढऱ्या लोलकांनी भरून जायचे. त्या चमकदार खड्यांचे साजीर रिंगण मग छानपैकी सजायचे लाकडी बादलीत ठेवलेल्या भांड्याभोवती.!आदबशीरपणे त्यावर काळपट जाडेभरडे मीठ आपला फेर धरायचा. बर्फ- मिठाचे गुंफलेले थर बदलीच्या गळ्यापर्यंत आले की आई श्री गजाननाच्या स्मरणाने पिवळसर सुगंधित दुधाची एकसंध धार त्या पंखावाल्या भांड्यात ओतू लागायची. भांड गळवट भरलं   की झाकण घट्ट बंद केल जायचे. एक बहीण भांड्याचे हॅन्डल फिरवायला सुरवात करायची तर एकजण बादलीमधे बर्फ आणि मिठ ईमाने इतबारे टाकू लागे बर्फ टाकण्यात या दोघी बहिणी गुंतल्या की इतरांच्या वात्रटपणाला भरती येई. अचानक पाठीवर थंडगार शिरशिरी उठली म्हणजे कोणीतरी हळूच बर्फाचा तुकडा पाठीवर सोडला आहे.जीच्या पाठीवर तो आहे ती खिदळत तो काढायचा प्रयत्न करतकरत दुसरीच्या फ्राॅक मधे बर्फाचा तुकडा सोडी. फ्राॅकमधे शिरलेला तो हिमखडा काढता काढता पुरेवाट होई. परत हास्याच्या सरीवर सरी कोसळू लागत. हिमावर्षात आमची छोटीशी खोली ही थेट काश्मिरी शिकारा बने आणि आम्ही हिमप-या! मला खात्री आहे या छोट्याशा हिमावर्षावात खळाळणा-या आम्हा मुलींसाठी आणि त्यात न्हाऊन निघणार्‍या हिमगौरींसाठीच  बाबा एवढा भला मोठ्ठा बर्फाचा तुकडा आणत असावे.
                 तोवर हॅन्डल   फिरवणारी बहीण जरा दमली आहे अस वाटताच बाबा आपली  भक्कम मांडी घालून बसायचे.बाबांना हॅन्डल फिरवताना बघताच आई पटापट चमचे, बशा वाट्या आणून ठेवत असे. बाबांनी दमदार हातांनी हॅन्डल फिरवताच  जणू जादूची कांडी फिरायची. आईस्क्रीम तय्यार पुकारा व्हायचा.  हळुवारपणे भांड्याचे झाकणं उघडले जाई. सर्वांची नजर असे पाॅटमधल्या पिवळसर ,लुसलूसत्या राजस आईस्क्रीमकडे.  पहिला चमचा देवाला. मग सगळ्यांना वाटला जायचा .आजीचे डोळे लुकलुकू लागत. .रखमाबाई लाजत आपली बशी घेऊन दारामागे जाई. जीमी जीभल्या चाटत बैठक जमवी. हॅडल फिरवणारी बहीण आता  डब्यतला पंखा चाटून पुसून साफ करण्यात मग्न असे. ते गोडमिट्ट ,रवाळ थंडगार आईस्क्रीम जीभेवर सोडताना अतीव आनंदाने डोळे झाकले जात. त्याच वेळी लक्षात येई थंडगार आइस्क्रीम विरघळल्यावर  तयार झालेले दूध कसं मस्त लागतय.त्या रात्रीची स्वप्ने देखील रंगबिरंगी वैविध्यपूर्ण आइस्क्रीमचीच असायची आणि पुढच्या वर्षी मात्र मॅंगो आईस्क्रीम किंवा चॉकलेट आईस्क्रीम असे ठरवूनच या सोहळ्याचा समारोप व्हायचा. असा हा सोहळा अजूनही आमच्या  पिढीच्या कित्येक जणांची मर्मबंधातील ठेव आहे.
मनात आल्यावर तिन्ही-त्रीकाळ आईस्क्रीम चोपणा-या पिढीला हे कपोल कल्पित वाटू शकेल. पण त्या सामानाच्या जमवाजमवी पासून आईस्क्रीमच्या जन्मापर्यंतचा सोहळा ज्यांनी अनुभवला आहे त्यांना ह्या सोहळ्याचे महत्व नक्कीच कळेल.

1 टिप्पणी:

  1. आता आईस्क्रीम च नाव काढणं सुध्दा शक्य नसल्याने हे आईस्क्रीम जास्त च रूचकर लागलं,मला यानिमित्ताने बर्फाच्या लादल्या नेणार्या बैलगाडी चार येणारा ठकठक आवाज आठवला .

    उत्तर द्याहटवा