शनिवार, ११ एप्रिल, २०२०

आमचा अशोक

शुक्रवार,हा दिवस आठवणींचा पसारा आवरायचा दिवस!. आज अनेक आठवणी सतावत होत्या 'मी मी 'म्हणत होत्या इतक्यात माझी नजर खिडकीकडे गेली. .बाहेरच धटिंगण ,तगडा,अशोक उभाच होता आपल्या पानांच्या टाळ्या वाजवत! माझे लक्ष वेधूनघेत. तीस  वर्ष तो आमच्या घरातलाच एक सदस्य आहे.आमच्या आयुष्यातला एक महत्वाचा घटक. म्हणूनच आमच्या या अशोकाची आमच्या या झाडाची आठवण या पसा-यातून बाहेर काढते आहे .


आमचा अशोक ©️

झाडाला कधी गोलरक्षकाच्या भूमिकेत तुम्ही पाहिलंय? नाही ना! मग जरूर आमच्या घरातील  अशोकाला भेट द्या. काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारण पंचवीस वर्षांपूर्वी छातीवर अनेक पदके चमकवणाऱ्या सेनानीचा थाटात हा अशोक घरातील भांडीकुंडी, ,चमचे, चिमटे तपेल्या  आपल्या भरगच्च पानापानात मिरवत असे. त्याला ही सारी बक्षीसे प्रदान करणारा असे माझा धाकटा.! दिड दोन वर्षाचा माझा धाकटा जेव्हा गॅलरीत लावलेले अडथळे पार करून ,एssक,दोन ,तीsssन असे म्हणत वस्तू  भिरकावत असे तेव्हा गोलकिपरच्या तत्परतेने आपल्या भरगच्च पानांनी त्यांना अडवायचे काम अशोक करीत असे. एकेदिनी तर नवलच घडले. सकाळी सकाळी डोळे चोळत अशोकाकडे पाहते तर काय चक्क लंगडा बाळकृष्ण आणि दत्त दिगंबरा ची मूर्ती अशोका वर झुला खेळत आहे. दैवी चमत्कार म्हणून मी हात जोडते ना जोडते तोच आजींची करूण किंकाळी सर्व उलगडा करून गेली. एक-दोन सादे मादे तीssssन करत धाकट्याने चेंडूसारखा भिरकावलेला  लंगडा बाळकृष्ण आणि दत्त दिगंबरा च्या मूर्ती अशोकाने तत्परतेने आणि चपळाईने आडवल्या होत्या . एकदा तर बादल्या, खुर्च्या भांडी, लटकलेले अशोकाचे वेडेविद्रे रूप बघून माझ्या एक दूरच्या नातेवाईक आपल्या खास अनुनासिक स्वरात म्हणाल्या "अगोबाई आत्तापर्यंत झाडांना फक्त फुले आणि फळे येतात असे ऐकले होते पण तुमच्या झाडाची तर त-हा वेगळीच हो. कै बै तरी विचीत्र झाड" आणि आज विचार केला की जाणवतं की धाकट्यांनी भिरकवलेली भांडी जर खरोखर रस्त्यावर पडली असती तर एखाद्या सज्जनाचा संसार सहज उभा राहिला असता. अर्थात हे व्हायचं नव्हतं. आणि त्याचा दोष द्यायचा आहे तर तो त्या अशोकालाच द्यायला हवा.
                      अर्थात हा अशोक म्हणजे हे अशोकाचं झाड माझ्या घरात आलं तेच मुळी अनपेक्षितपणे! छोटस रोपट. ते उपटून कोणीतरी रस्त्यात फेकून दिलेलं ,आणि "आईला की नाही झाडं खूप आवडतात" 'म्हणून माझ्या थोरल्याने मला ते मलूल रोप  निरागसपणे आणून दिले. "आईग बघ हे झाड, लाव कुठेतरी".इति थोरला "आपल्याकडे जागा नाहीये "त्याला सांगायचा प्रयत्न केला पण तो ऐकायला तयार नाही, मुळात घर भरवस्तीत!.जागा इंच इंच लढवू अशी अवस्था.कुंपणाशेजारी इटूकली  जागा होती, अगडबंब वाढणारा हा वृक्ष या छोट्याश्या जागेत लावायचं म्हणजे सर्कशीतल्या हत्तीने अगतीक होऊन छोट्या स्टूलावर बसण्यासारखं होतं. अर्थात ते जगण्याची शक्यता शून्य. शेवटी बालहट्टापुढे आम्ही सपशेल माघार घेतली. अखेर ब-याच चर्चेनंतर कुंपणाजवळची ही छोटीशी जागा निश्चित  झाली. कुपोषित, रोगग्रस्त बाळासारखा अशोक दिसत होता. एक इवलीशी फांदी. त्यावर दोन पिवळी आणि चार हिरवी पाने. ति हिरवी पानेही पिवळ्या रंगबदलाच्या तय्यारीत. अखेर ती पानेही पिवळी पडली .उरली फक्त वाळकुंडी काटकी. हे झाड काही जगत नाही हे माझ्या मनाने निश्चित केले,, पण तरीही इमानेइतबारे त्याला मी पाणी घालण्याचे काम करत होते. रोज बघत होते त्याला एखाद तरी पान फुटते का. अशोक अधिकाधिक  खंगत होता . तोच अशोकावर जणू कोणी हिरवीकंच मूठ मारली.अशोकाच्या सुकलेल्या अंगागातून लालट कोंब लसलसू लागले, मरगळलेल्या निष्प्राण अशोकाने सुरेखशी तान घेतली.त्याने नंतर कधीच खाली म्हणून बघितले नाही. सर सर सर सर तो वर झेपावू लागला. गुढीपाडव्याला तोरण करताना  हाताला येणारी त्याची पाने आता गॅलरी शिवाय हाताला लागेनात आणि मग लक्षात आलं आपला अशोक आता तरणाबांड झाला आहे.त्या एवढ्याशा काटकीचा पिळदार सब्बल बुंध्याचा वृक्ष आता सळसळतोय .आडव्या-तिडव्या पसरलेल्या फांद्याचे हात सsssळ सssssळ करीत मुलांच्या खोलीत डोकावू लागले. अशोकाचे मग झाले भटजीबुवा.ओसरीतून घरात ठाण मांडणा-या भटजीबुवांसारखी त्याने हाsहा म्हणताम्हणता मुलांच्या गॅलरीत बैठक जमवली.  
            एके दिवशी गंमत झाली अशोकाला न्याहाळताना  त्याच्यात काहीतरी बदल जाणवला एका पानाच्या बेचक्यात लांबलचक देठावर लगडलेला हिरव्या कळ्यांचा घोस ! मग काय सुरू झाली माझी हेरगिरी.हळूहळू अनेक कळ्यांचे घोस पानांशी लपाछपी खेळू लागले. .आणि एका भल्या सकाळी  जाऊन पाहते तो काय, कायम गडद हिरव्या सद-यात वावरणा-या अशोकाने चक्क पांढ-या कशीद्याचा सुरेख झब्बा अंगात चढवला आहे अगदी नवरदेवाच्या थाटात!.गर्द हिरव्या छब्ब्यावर पांढ-याधोप फुलांची वेलबुट्टी मोठी खुलून दिसत होती.. आपल्या आडमाप वाढलेल्या तगड्या भिमाला नवरदेवाच्या वेषात पहाताना कुंतीमातेला जसे भरून आले  असेल ना अगदी तस्सेच माझे मन हळवे हळवे झाले.
..सगळ्या कळ्या एकदमच फुलल्या होत्या. पांढरा फुलांनी नटलेला अशोक मोठा साजिरा गोजिरा दिसत होता. अशोकाचे हे साजिरे गोजिरे रूपडे  पंधरवड्यापर्यंत कसेबसे टिकते ना टिकते तोच अशोक अचानक लेकुरवाळा दिसू लागला. त्याची पाने अधिकाधिक गर्द होऊ लागली सावळ्या विठुरायाने  समस्त संत मंडळींना अंगाखांद्यावर खेळवावे तसा तो भासू लागला .आमचा हिरव्या पोपटी फळांनी लगडलेला अशोक ! त्याच्या निब्बर पानापानातून मायेची सावली पाझरू लागली. .

           हिरव्या फळांच्या बदलत्या रंगा बरोबरच नवनवीन पाहुणे मंडळींची झाडावर हजेरी सुरू झाली आणि मग सकाळी सकाळी तांबट पक्षी शेंड्यावर बसून आपली पिठाची गिरणी सुरू करायला लागला .दुपारी कोकिळेचा सेन्साॅरपासून मुक्त प्रेमालाप पानापानातल्या 'फॅमिली' रूम मध्ये रंगू  लागला. संध्याकाळी वटवाघूळ बुवांनी एका फांदीवर आपला मालकी हक्क जमवला आणि शिर्षासन करीत ते रात्रभर लटकू लागले.मैना जातायेता घटका दोन घटका गप्पा मारायला फांदीवर हजेरी लाऊ लागल्या.जाताना हळूच काळी जांभळी फळे चिमणीच्या दाताने उष्टावू लागल्या. शर्यत लावत खारी बुंध्यापासून ते शेंड्या पर्यंत सुसाट पळू लागल्या. काव काव करत कावळेही येणा-या अभ्यागताची वर्दी देवू लागले. 
              आकाशातून सावळे काळे मेघ कोसळू लागले आणि तिकडे अशोकाची काळी जांभळी झालेली बाळे जमिनीवर टणाटण उड्या  मारून केर काढणा-या बाईचे कंबरडे मोडून लागली.
   आमचा अशोक! त्याच्या सावलीत एखादी गती गर्विता मोटार फाsस फुssस   करत विश्रांती घेते .जालीम जमान्याला कंटाळलेल्या प्रेमीयुगुलांना त्याची सावली थंडावा देते. आणि बच्चेकंपनीचा गोट्यांचा डावही त्याच्या गर्द सावलीत अधिकच रंगतदार होतो.
 असा आमचा अशोक  थोडा लाडोबा, थोडा शहाणासुरता, पण आमच्या घरातलाच एक सदस्य ! त्याला वाढीला पुरेशी जागा मिळावी म्हणून त्याच्या जवळची विटांची भिंत काढून तेथे लोखंडी जाळी बसवण्यात आली .अशोका मुळे गाडीला घरात न घेता 'मुक्काम पोस्ट रस्ता 'येथे मुक्कामाला धाडली. अशोकाच्या फांद्या विजेच्या तारांची गुफ्तगू करू लागताच विद्युत मंडळांचा कु-हाडीचा बडगा त्याला शिक्षाही  करतो, पण तरीही शहरातल्या भर वस्तीमध्ये प्रत्येक दिनी प्रत्येक वर्षी आमचा अशोक फळतोय फुलतोय.
                 त्याला जर भेटायच असेल तर काही ओळखीच्या खुणा सांगून ठेवते.जरूर आमच्या घरातील  अशोकाला भेट द्या. आता हा अशोक कुठे आहे तर ,कुंपणाला चिकटून माझ्या घरात .  त्याला ओळखणंही सोप्प आहे .सरत्या वसंतात पोपटी,भगवा आणि हिरव्याकंच छटांचे चित्रविचित्र भडक कपडे घालून तो थेट हवाई बेटातील जाॅन किंवा जोसेफ सारखं हवाई नृत्य करतो. आणि हिवाळ्याची चाहूल लागताच मातकट पिवळा वेष घालून बैरागी बुवाचा आव आणतो.पावसाळ्यात तर त्याच्या हिरव्यागार कफनी खाली त्याची काळी जांभळी बाळे लपवून फकीरबुवाचे सोंग घेतो.जांभळे समजून पटकन तोंडात टाकणा-या पोरांची त्या कडूशार चवीने होणारी फजिती बघून खिदळतो सुध्दा.  आता एवढं वर्णन त्याला ओळखण्यास पुरेसं आहे नं?
 आमच्या अशोकाने असेच वाढावे आणि आपले गोल रक्षकाचे काम माझ्या पुढच्या सात पिढ्यांसाठी करत राहावे त्याची ती जगण्याची तीव्र लालसा, प्रतीकूल परिस्थितीतही असलेली विजीगीषू वृत्ती पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरावी.
                    

४ टिप्पण्या: