शुक्रवार, १ मे, २०२०

पाणवठा भाग2--बांधावरचा कावळा

माझ लग्न ठरल्यावर माझ्या भावी पतीला मी   सांगितले,' रहात घर लहान असले तरी चालेल पण घराभोवती मोकळी जागा हवी, ज्यातून आकाश आपल्या घरात उतरून मस्त गप्पा मारेल.सूर्य किरणे सैरावैरा घरभर हुंदडतील. पहिल्या पावसाला इच्छा  झाली तर थेट खिडकीतून आत येऊन गरम भजी खाईल." क्षणभर हे असले बोलणे ऐकून तो गडबडला. नंतर हसला .तथास्तु वदला. आज माझ्या घराभोवती मोकळी जागा नाही पण घराला झकास गच्च्या आहेत.त्यात पक्षांचा पाणवठा आहे. , ती जागा कायम happening असते.आज पसारा आवरताना या पाणवठ्यावर घडलेले  एक शोक नाट्य आठवले!
(पाणवठा भाग 1 पसारा आवरताना नीट आवरून ठेऊन दिला आहे. त्याचीही लिंक पाठवत आहे . https://drkiranshrikant.pasaara.com/2020/03/blog-post_26.html )




              ©️पाणवठा भाग 2--बांधावरचा कावळा


माझ्या घराच्या दोन गच्च्यां पैकी मोठी गच्ची मुळातच राजस! अगदी देखणी म्हणण्यासारखी सुंदर. त्यातच अनेकविध झाडाझुडपांनी पाना फुलांनी सजल्यामुळे स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या अलंकृत ललने सारखी भासते. पश्चिमेकडे असलेला कठडा आणि पूर्वेकडे शयनगृह त्यामुळे सूर्य वर येईपर्यंतही गच्चीत सावल्या पसरलेल्या असतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले ह्या सावल्या पांघरून निद्रेचा आनंद सूर्य माथ्यावर येईपर्यंत घेतात. दुपारी मलूल  झालेल्या झाडांना कुरवाळत गच्ची गरम सुस्कारे टाकते. सूर्य कलायला लागताच गच्ची खरोखरच खास कार्यक्रमा साठी सजलेल्या ताई सारखी वाटते. दुधाळ चांदणं आता गच्चीचा ताबा घेते. मादक रातराणी आणि जाई जुई मोगरा यांच्या गंधाने असा रसरशीतपणा तिच्या अंगांगावर दिसतो की आलेला पाहुणा म्हणतो व्वाsss. मुलांचे वाढदिवस साजरे होतात ते याच गच्चीत. त्यानंतरचे त्यांचे खेळही रंगतात इथेच. घरातील वाळवणही इथंच सुस्तावते. वाळवणाबरोबरच उन्हाने अंग शेकणाऱ्या आजीबाई गच्चीत येणारी फुलपाखरं, सूर्यपक्षी ,बुलबुल आपल्या लुकलुक नजरेत साठवतात. एकदा तर चक्क ससाण्यासारख्या दिग्गजांनी लावलेली हजेरी आम्ही कित्येक दिवस मनात चघळत होतो. पण एवढं सगळं असूनही खरा भाव खाऊन जाते ती छोटी गच्चीच! धाकट्याच्या खोलीला जोडून 'छोट्या गच्चीने 'आपला सवतासुभा केला आहे. खरोखर छोटीशी दहा बाय दहाची गच्ची. या गच्चीत झाड झाडोरा नाही .झोपाळाही नाही. पण विलक्षण आत्मीयता आहे .रसिले पण पुरेपूर भरलेला आहे., ,आणि म्हणूनच या गच्चीत बांधाला पाठ टेकवून, पाय लांबवून बसायचं की गप्पांचा फड रंगलाच पाहिजे. खास मंडळींच्या ओल्या मेजवान्यांना या गच्चीखेरीज पर्यायच नाही .घरी पाहुण्या म्हणून आलेल्या नवविवाहितांच्या पाहुणचारात राहिलेली कसर ही छोटी गच्ची सहजतेने भरून काढते. या गच्चीत चंद्र चांदण्यात रात्रभर विसावून उठणारे युगुल सकाळी टवटवीत कळी सारखे दिसते. अशा या आमच्या घराच्या दोन गच्च्या मध्ये त्यांना विभागणारा फक्त एक बांध. मात्र दोघींच्या मनोवृत्तीत अनेक कठड्यांचे अंतर.मोठी कुटुंब वत्सल राजश्री प्राॅडक्शन,तर दुसरी छोटी रंगरसिली!
                 दोन्ही गच्चीतील मधल्या बांधावर पक्षीगणांसाठी काऊचा घास आणि पाण्याचं भांडं मी नेहमीच भरून ठेवते सकाळी सकाळीच हा चिमणचारा खायला कावळ्याची झुंबड उडते. पोट भरताच बांधावर शितांचा पसारा टाकून आपलं शेणाचा घर बांधायला त्यांची पांगापांग होते ती थेट उन्ह् तापल्यावर.  चिमण्या मात्र आपले मेणाच घर बांधून त्याची सजावट करून सावकाशीने येत असाव्यात. मला तरी कधी दिसल्या नाहीत.मध्यानीचा सूर्य झाडाच्या सावल्या त्याच्या पायाखाली दडपेपर्यंत ही सर्व पक्षी मंडळी गायब झालेली असतात एवढे मात्र खरे. 
           एकदा लखलख उन्हात तो कावळा मला दिसला. बांधावर शरीर आक्रसून तो बसला होता .करवतीने मधोमध आडवी कापल्यासारखी चोच आणि त्यातून लपणारी काळीकुट्ट जीभ! निस्तेज फिसकारलेला  तुटका पंख सावरणेही त्याला अवघड जात होते. मोडका पाय आणि फाटका पंख घेऊन हा कावळा इथे कसा आला हेच मुळी मोठं आश्चर्य होतं. त्याचे सारे भाईबंद नित्य कर्मासाठी केव्हाच गेले होते .वरती सूर्याची होळी ढणाणा पेटलेली आणि पायाखाली निखा-यासारखा तापलेला बांध . तो कावळा आज शगून  न सांगताच नुसताच थिजून बसला होता. भांड्यातल्या पाण्यात तुटकी चोच त्याने बुडवली पण नाकातोंडात शिरणाऱ्या पाण्यामुळे ते देखील त्याला अशक्यप्राय होते.आता थोडीशी चोच बुडवून ती ओली करण्याचा त्याचा अविरत प्रयत्न चालू झाला. आजूबाजूला पसरलेल्या खाऊकडे मात्र तो ढुंकूनही बघत नव्हता. 
     मावळतीला सूर्य झुकताच एकुलत्या एका धडक्या  पायावर उड्या मारत बांधाच्या टोकापर्यंत गेला ,आणि तेथून त्यांनी कसबसं जवळचे झाड गाठले. दुसऱ्या दिवशीही त्यांने हजेरी लावली .त्याच्या भाईबंदा पासून दूर बांधाच्या एका बाजूला तो बसून राहिला .इतर कावळ्यानी त्याची दखलही घेतली नाही. कावळे उडून जाताच परत एकदा पाण्यात जीभ बुडवायची ,चोच बुडवायची त्यांचा आटापिटा सुरू झाला. कोणी दुजा कावळा त्याला काऊचा घास भरवेल म्हणून आशेने त्याच्या आसपास मी घोटाळू लागले. पण एकही जातभाई फिरकेल  तर शपथ! मग मी भाताचे मोठे मोठे गोळे बनवले बांधावर पसरट भांड्यात ठेवले. त्याची अर्धतुटकी चोच त्यात शिरली पण चोची भोवती फक्त शिते चिकटली .समोर अन्नाचा ढिग असूनही कावळा आपला उपाशी. नंतर कापूसकोंड्याच्या गोष्टीप्रमाणे तो काही दिवस नियमित येत राहिला, पण आम्हाला जवळ येऊ देत नव्हता. .त्यासाठी बांधावर कापड बांधून आडोसा केला त्याखाली मात्र तो बसू लागला .आम्ही जवळ जाताच एक धडका पंख केविलवाणा फडफडे. अशक्तपणा ने त्याला आता उठणेही अशक्य झालं होतं गर्कन फिरणारी काकदृष्टी पूर्णपणे मंदावली होती. तुटक्या पायामुळे शरीर अधिकाधिक खुजे झालेलं. संध्याकाळी झाड गाठण्याची आतुरता आता पूर्ण संपली होती. .त्या दोन गच्चांना  विभागणा-या बांधाचा तो जणू अविभाज्य भाग झाला होता. कणाकणाने तो आमच्या नजरे समोर झिजत होता. त्याच्या इतकेच आम्ही हतबल होतो. पुढचे पाच-सहा दिवस त्या आडोशाखालून हलायलाही तयार नव्हता. एक दिवस लोबत्या तुटक्या पंखातले त्राण जाऊन तो पूर्णतः बांधावर पडला. खुजी मान कशीबशी छातीवर टेकलेली ,आणि एकुलता एक धडका पाय मात्र कसरत करत करत उभा!
            अचानक एके सकाळी तो जणू हवेत विरून गेला. त्याचे प्राणहीन शरीरही कुठेही मिळाले नाही. अगदी घराचा परिसर आणि दोन्ही गच्च्या  धुंडाळूनही तो कधीच मिळाला नाही .
          तो बांधावर असताना सुट्टीवर गेलेले कावळे आठ दिवसात परत गच्चीत हजेरी लावू लागले . गच्चीपण मोकळेपणाने फुलू लागली .
        पण माझे काही प्रश्न कायमच अनुत्तरित राहिले. जिथे दोन फुटाचे अंतर ओलांडणै त्या कावळ्याला समुद्र लंघनापेक्षाही  अवघड होतं, तरी प्राण जाताना तो तेथून कुठे गेला? यासाठी लागणारे बळ त्याला मिळाले कुठून ?कोणाकडे आणि कोणासाठी त्यांनी  झेप घेतली? ही सारी अजुनही मला न सुटलेली कोडी आहेत. पण तो कावळा प्रसंगावशात माझ्या गच्चीत आला, , अनिच्छेने का होईना तो तिथे राहिला आणि अखेरीस निघून गेला हेच सत्य .त्याचा 'शेवटचा दिस  गोड 'व्हावा म्हणून मनापासुन मी यत्न केले हे पण तेवढेच सत्य. कदाचित त्याचा आणि आमचा तेवढाच ॠणानुबंध होता.     



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा