शुक्रवार, २९ मे, २०२०

सांताक्लाॅज

कोकणातील प्रवासात रात्री एका सपाटीवर गाडी थांबवली होती.आकाशाचा काळाकरंद घुमट आणि तो कोसळू नये म्हणून त्याला लावलेले चांदण्यांचे असंख लखलखते खिळे.सारच अफाट. विश्वातील असंख्य आकाशगंगा, त्यातील अगणित तारे, त्या भोवती फिरणारे ग्रह.! त्यातील एक इटुकला भाग म्हणजे आपली आकाशगंगा, आपल्या आकाशगंगेतही लाखो तारे,त्यातील एक आपला तेजोनिधि सूर्य. त्याभोवती फिरणा-या पृथ्वीवरील 'मी' म्हणजे धुलीकणा इतकी नगण्य. क्षणात माझा 'मी ,मला, माझे" 'हा कोष गळून पडला.दुस-या क्षणी वाटले असेन मी नगण्य पणआज नात्यांनी,मित्रमैत्रिणींनी तर मला समृध्द केले आहे.

                     सांताक्लाॅज©️

मला आठवतंय साधारण दुसरी-तिसरीत असताना बाबांनी सांताक्लॉजचा एक चित्रपट दाखवला होता त्यात सांताक्लॉजचा तो लाल पांढरा पेहराव आणि टोपी ,ऐटीत भुरभूरणारी चंदेरी दाढी ,भुई चक्रा सारखे ओठातून होssहोs होsकरत उडणारे  हसू ,जादूच्या पोतडीतून त्याने आणलेल्या भेटवस्तू वाssssइतकं छान होतं न ते! त्या राजवर्खी कोवळ्या निरागस वयात कितीतरी दिवस सांताक्लाॅज खूपशा भेटवस्तू  घेऊन स्वप्नात यायचा.  त्याला भेटावं या एकाच इच्छेने मला पछाडलं होतं.  
          सांताक्लॉज ही अति रम्य कल्पना वाढत्या वयाबरोबर धुसर होत होत गेली.त्या काल्पनिक पण रंजक परीकथां मधे रमून जाणे पूर्णतः संपले. परंतू लहानपणी बहुदा सांताक्लॉजला भेटायची इच्छा कुठल्यातरी शुभक्षणी कल्पवृक्षाखाली बसून मी केली असावी, म्हणूनच प्रत्यक्षात त्याला भेटण्याचा मला नुकताच योग आला. नुसता योगच आला नाही तर मनसोक्त गप्पा झाल्या.मैत्री झाली , आणि ते सुद्धा त्याची भाषा कणभर सुद्धा कळत नसूनही! तरीही या गप्पा इतक्या रंगल्या की जीवाच्या जिवलग मित्रालाही न्यूनगंड यावा. मैत्रीला धर्म, देश भाषा यांच्याशी देणं-घेणं नाही हे परत परत जाणवलं.
      हे सर्व शक्य झाले मेसूद  आणि सेव्हील या तुर्की दांपत्यामुळे. मेसूद आणि सेव्हील ना आपल्या नात्याचे,ना धर्माचे, ना आपल्या देशाचे पण आज आमच्या मनात त्यांनी नुसते घरच नाही अख्खा राजवाडाच बांधला आहे. परी कथेतला सांताक्लॉज ही कपोल कल्पना नसून त्रिवार सत्य आहे हे मेसूद सारख्या देवमाणसाला भेटल्यानंतर तंतोतंत पटले. मेसूतचा एककलमी कार्यक्रम   म्हणजे आनंदाची पखरण करणे अगदी सांताक्लॉज प्रमाणे!
        पौर्णिमेच्या चांदोबा सारखा गोलम् गोल गोलमटोल,तुंदीलतनू, गोरा गोरा पान , विरळ केस चापून चोपून बसविलेला, इवल्याशा काळ्यापांढ-या दाढीचा , अति मिश्किल नीळसर डोळ्यांचा मेसूद! भेटला तेव्हा साठीच्या आसपास! अगदी करंगळीच्या पेरा एवढ्या बाळापासून थेट  पैलतीर एक पाय ठेवलेल्या वृध्दांपर्यंत मेसूद सर्वांनाच अतिप्रिय. याच्या गोबर्‍या गोर्‍या चेहऱ्यावर लुकलुकणारे हसरे डोळे, नाकावर घसरलेला चष्मा  ,ओठातून सतत सांडत असलेले बाल हास्य असा मेसूद भेटता क्षणी सर्वांचाच ताबा घेतो.जणू सकलजना  आनंदी ठेवण्याचा मक्ताच  याला मिळाला आहे.
              व्यवसायाने तो बाल शल्यविशारद आहे. इंग्रजी भाषेचा गंधही त्याला नाही. तुर्कस्तान मधिल अदाना येथे वैद्यकीय  व्यवसाय करणारा मेसूत! इस्लाम धर्मिय पण अतातुर्क कमाल पाशा  यांचा खंदा पाईक.त्यांच्या राष्ट्र पित्याच्या आदेशाप्रमाणे  युरोपियन संस्कृतीचा अधिक पगडा असलेला उदारमतवादी .  काही काळापूर्वी डिसेंबर मध्ये रोटरी  एक्सेंज प्रोग्रॅम मध्ये आलेला.  तुर्कस्ताननामे देशातला मेसूद ! आंग्ल भाषेत एकदम ढढम्. 'थँक्यू च्या' पुढे काहीही माहित नाही. प्रेमळपणा व्यतिरिक्त त्याला एकच भाषा यायची ती म्हणजे टर्कीश! जी आम्हाला समजणे अशक्य. पण गंमत म्हणजे  साहेबाची भाषा बोलणाऱ्या काही टर्कीवासियांना पेक्षा आम्ही कित्येक पटीने जास्त मेसूदशी गप्पा मारल्या आहेत अगदी भाषेची अडचण न येता.
 म्हणजे इथल्या वास्तव्यात मेसुद हाच मुळी सर्वांसाठीच परवलीचा शब्द झाला होता. इथं भेटलेल्या सर्वांच्या मनात त्याने नुसता कोपराच अडवला नाही तर सगळं मनच काबीज केलं आहे.
        एक्सचेंजमध्ये सेव्हील आणि  मेसूद हे तुर्की दांपत्य पाहुणे म्हणून माझ्या घरी उतरले होते.त्यांना भेटायला मुंबईत स्टेशनवर गेलेल्या माझ्या पुतण्याला पहिला धक्का बसला. स्टेशनवर प्रतीक्षालयात तुफान गर्दी आणि हे महाशय एक मोठ्ठा घोळका घेऊन हास्याचे मजले उभारत बसलेले, तिथल्या जमिनीवर! झकास फतकल घालून केन्द्रस्थानी बसलेले मेसूद महाशय आणि भोवती इतर प्रवासी! कल्याsण रे बाबा कल्याण! 
           मेसूद,सेव्हीलचा पाहुणे ते घरातलेच 'एक' हा प्रवास कसा झाला,  कधी झाला हे आमच्या लक्षात यायच्या आत ते आमच्यातीलच एक कधी झाले याचा आजतागायत आम्ही शोध घेतोय. पहिल्या दिवशी स्टेशनवरून त्यांना घरी घेऊन आलो. आगतस्वागत झाले. जेवणाची वेळ झाली.परदेशी पाहुणे त्यात पहिलाच दिवस  म्हणून युरोपियन आणि भारतीय पदार्थ मी निगुतीने केले होते.माझ्या आवडीप्रमाणे भरपूर कोथिंबीर घालून!  मेसूद जेवेना,सेव्हील त्याची धर्मपत्नी त्याला समजावते आहे तर हा आपला हुप्प!  नंतर हळूच सांगितले कोथींबीर नकोच नको,.स्वयंपाकात कोथिंबीर घातल्यावर रुसून बसणा-या मेसूदला बघून, राग यायच्या ऐवजी हसायला येत होत. त्याचा रूसवा लहान बाळासारखा नितळ,पारदर्शी होता.आणि नंतर आवडलेल्या पदार्थांचे नुसते कौतुक न करता पटापट फोटो काढून त्याची चव घेऊन त्यात काय काय पदार्थ आहेत याची चौकशी करणारा मेसुद  पाहुणा न वाटता घरातला भाऊ,दिर किंवा रूसणारा माझा धाकला आहे असेच वाटले.आवडलेल्या पदार्थाचं कौतुक करावं ते फक्त मेसूदने.  जरा छानपैकी सजवून पदार्थ  त्याच्या समोर आला की लगेच फोटो थेट तुर्कस्तानला मुलाकडे रवाना होई. मात्र आदानाचा कबाब हा सोलापूरी शीक कबाबा पेक्षा भारी आहे हा हट्ट  त्याने शेवटपर्यंत सोडला नाही.त्याच्या लहानबाळा सारख्या कुतूहलाचे आम्हा सर्वांनाच अती कौतुक वाटे. बालकांवरील शल्यक्रिया ज्या उत्साहाने, उत्सुकतेने तो बघायचा तीच उत्सुकता पोळी कशी बनवतात हे बघताना असे. 
              छान पैकी तयार होऊन मिटींगला आम्ही निघालो की मेसूदची धावपळ विचारूच नका ! तुर्कस्तानात 'नजर' लागणे याला प्रचंड महत्व! एक डोळा असलेले पिन जी नजर लागू नये म्हणून वापरतात ती आमच्या कपड्यांना तात्काळ लावली जायची.  का तर आम्हाला कोणाची नजर लागू नये म्हणून!वयाच्या साठीच्या आसपास त्यावेळी असलेले आम्ही आणि आम्हाला दृष्ट?आमच्या दृष्टीने  तो 'जोक ऑफ धी इयर' होता. लहान मुलाचीही दृष्ट न काढणारे आम्ही पण इथे त्याच्या समोर आमचे सगळे लॉजिक, आमचा शास्त्रीय दृष्टीकोन एकदम बाद.!
माझ्या वृध्द आईजवळही मेसूद ,सेव्हील बसत असत. शब्दांची गरजच नसायची.सेव्हील  आंग्ल भाषा छान बोलायची पण न बोलताही मेसूदने भरपूर गप्पा मारलेल्या असत. माझ्या आईला  तो नेहमी सांगे की पुढच्या वेळी एकदम फर्डा  इंग्लीश शिकून तो येणार आहे.मेसूदची स्वतःची आई पारंपारीक  विचारांची,तुर्कस्तानमधिल खेड्यात रहाते.आईवर त्याची विलक्षण भक्ती.तिच्या परंपरा आणि मेसूदचे पुरोगामित्व यांचा वाद अटळ होता.आई त्याच्याकडे कधिच येत नाही.हा श्रावणबाळ मात्र आठवण येताच आईकडे खेड्यात जाऊन,लाड पुरवून ,करवून पुन्हा रिचार्ज होऊन येतो .सेव्हील  यावरून मेसूदबाळाच्या भरपूर फिरक्या ताणत असे.
 बाहेरून घरी आल्यावर सेव्हीलचे पहिले शब्द असत 'होम ,स्वीट होम'.  मेसूद लगेच अंगठा वर करून अनुमोदन द्यायचा. आपल्याकडे झालेली  मेसूदची शब्दसंपत्तीतील नवी जमावट म्हणजे 'नमस्ते'. जायचे दिवस जसजसे जवळ येत गेले मेसूद रडवेला होऊ लागला.जाताना हा अगडबंब रडायलाच लागला.       
          त्यानंर साधारण सात महिन्यांनी आम्ही दहा जण तुर्कस्थान ला गेलो होतो त्यावेळी परत आमचा ताबा सेव्हील  मेसूदने घेतला. मेसूदने  चक्क चार-पाच आंग्ल शब्दांची संपत्ती गोळा केली होती .एखाद्या नवश्रीमंत सारखे या शब्द संपत्तीचे आमच्यासमोर प्रदर्शन करताना त्या शब्दांचा अर्थ आमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून त्याबरोबर असे त्याचा भन्नाट अभिनय! अगदी नटसम्राटाला लाजवेल असा! त्यावेळी त्याचा अभिनय आणि चेहऱ्यावरून उतू जाणारे तें नितळ हास्य! बस भाषेची गरज लागतेच कुठे?
        नेमकी इस्तंबूलच्या बाजारपेठेतून हिंडताना माझ्या पर्स मधील छोटी पर्स चोराने पळविली. त्यात ब-या पैकी पैसे.मेसूद सेव्हीलने तात्काळ मदतीचा हात पुढे केला. आग्रहच सुरू केला. जेव्हा मदत घेण्यास मी नकार दिला तेव्हा त्यांच्या चेह-यावरची वेदना मला कासाविस करून गेली.
     आमच्या सगळ्या ग्रुप मध्ये मेसुद आणि त्याची पत्नी सेव्हील एकदमच प्रिय.  त्यांचे रसायनच अद्भुत! बहुतेक वेळा पतीदेवांची नजर एकीकडे तर पत्नीची नजर विरूध्द बाजूस अशी अवस्था असते. हे दोघे मात्र बेमालूमपणे एकमेकात मिसळूनही  पूर्णपणे स्वतंत्र असलेले.एकमेकां बद्दल नितांत आदर असलेले.
          या पती-पत्नींच्या आवडीही वेगळ्या. मेसुद अतिशय भावनाशील. मदतीला सदैव तत्पर! पाहुण्यांना आग्रहाने खाऊ घालणारा आणि जर पाहुण्यांना खाऊ घातले नाही तर ते भुकबळीचे शिकार होतील या मतावर त्याचा नक्कीच विश्वास असणार,  नाहीतर तुर्कस्तानमध्ये बस मधून स्थळदर्शनास जाताना दर दहा मिनिटांनी नवनवीन पदार्थ आमच्यासमोर आलेच नसते .आणि तेही मेसूदच्या भन्नाट  अभिनयासह.  अशावेळी हसून हसून लोळण घेणे बाकी असे.तो पदार्थ पोटात स्थिरावतोय तोच  नवा खाद्यपदार्थ घेऊन   स्वारी हजर! हसत हसत डोळ्यातले पाणी पुसत त्या खाण्यावर ताव मारला जायचा. हे वेगळे सांगायला नकोच. या सर्व खाण्यामुळे  आम्ही मात्र दोन-तीन किलोंची जमावट आमच्या वजनात करून स्वदेशी आलो.      इस्तंबूल मध्ये तर बेली डान्स बघताना मेसूदच्या व्यक्तिमत्वाने भारावून बेली डान्सर आमच्याकडे वळून वळून आम्हीच एकमेव दर्दी आहोत अशा पद्धतीने नाच करू लागल्या.  जसे आम्हीच त्यांचे खास प्रेक्षक होतो.
. सेव्हीलचा  म्हणजे मेसुदच्या धर्मपत्नीचा कामाचा आवाका आणि उरक म्हणजे जणू जगातले आठवे आश्चर्य. अतिशय उत्साही सेव्हीलला दमणे थकणे हे शब्द मुळी माहीतच नसायचे. स्त्रियांवरचे अत्याचार निवारणासाठी दिवस-रात्र झटणारी सेव्हील तितक्याच उत्साहाने आमच्या दहा जणांच्या गटाला घेऊन इस्तंबुलच्या गल्लीबोळात फिरली आहे. आमच्या बरोबरच आमच्या चेंगट खरेदीत तीदेखील सामील झाली आहे. अगदी त्याच फसफसणाऱ्या उत्साहानीशी. तिचे वेळ पाळणे म्हणजे आकाशवाणीच्या घड्याळालाही लाज वाटेल इतके तंतोतंत. इस्तंबूल मध्ये आम्हाला रात्री आमच्या हॉटेलवर सोडून ती मुलाकडे राहायला जायची. मुलगा दोरूकचंद याचे घर  शहराच्या दुसऱ्या टोकाला. भलतेच लांब.पण तरीही सकाळी सकाळी बरोबर ठरलेल्या वेळी हॉटेलच्या लॉबीमध्ये सेव्हीलचा हसरा चांदोबा हजर असायचा .अगदी ट्राफिक जामचा अडथळा ओलांडून.
        मेसूदला सर्वांना खाऊ घालण्याची हौस अशी दांडगी की कधी कधी सेव्हीलला घरी पाहुणे येणार हे सांगायलाही तो विसरून जाई.एके दिनी सेव्हील आमचे लटांबर घेऊन दुस-या गावाला निघालेली आणि अचानक मेसूदने तिला रात्री घरी जेवणासाठी आणि आम्हाला भेटायला पाहुणे येणार आहेत असे  सांगितले.  आता तुर्की पती पत्नींच्या भांडणाची आतषबाजी बघायला मिळणार असे वाटले.आणि आम्हीच कानकोंडे झालो. पण सेव्हीलच ती! हे नेहमीचेच आहे या अविर्भावात आपल्या मैत्रीणींना फोन करून ती मोकळी.!रात्री पार्टीत तर मेसूदने पारंपारीक वेषात त्यांचे राष्ट्रीय  नृत्य केले. सेव्हील होतीच साथ द्यायला. आम्हालाही त्यात सामील  करून घेतले.दोन  डावेच पाय असलेले आम्ही, मनसोक्त त्या नाचात झोकून दिले.
           तुर्कस्तानमध्ये सेव्हील  आणि  मेसूदच्या छत्राखाली कुठलीच अडचण आसपास सुद्धा यायची नाही. मेसूद बद्दल बोलताना आमच्या ग्रुपमधील एकाची कॉमेंट फारच छान होती ,मेसूदमधे देव दिसतो आणि यात कणभर सुद्धा अतिशयोक्ती  नव्हती. 
 आम्हाला सोडून तुर्कस्तानला जाताना रडवेल्या झालेल्या मेसूदच्या आठवणीने आजही  डोळे भरतात.आम्ही तुर्कस्तान सोडतानाही अश्रुपाता बरोबरच परत भेटण्याचे वायदे झाले. त्यांचा मुलगा दोरूकचंद  आणि माझा धाकटा वयाने सारखेच!त्या दोघांच्या विवाहप्रसंगी जायचे बेतही ठरले आहेत.आजही फोनवरून किंवा संदेशाद्वारे आम्ही संपर्कात आहोत.
         अनेकदा असं वाटतं आयुष्याच्या या प्रवासात नवनवीन प्रवासी सहवासात येतात. काही मध्येच उतरतात. थोडी मनाला चुटपूट लागते पण लगेच नवीन प्रवास येतात. जुने सरकून बसतात. नव्या जुन्याची मोट कधी कुरकुरत कधी सुरळीत प्रवास करते .कधीकधी या प्रवासात अचानक आपल्या नशीबातील  सर्व ग्रह मंडळी गुपचूप आपापले उच्च स्थान पकडून बसतात. जणू काही  आपल्याला लॉटरी लागते. आणि कोण कुठल्या तुर्कस्थान मधल्या सेव्हील मेसूदच्या मैत्रीचे दान आपल्या पदरात पडते. आपल्याला खूप खूप श्रीमंत करून जाते.



४ टिप्पण्या: