शुक्रवार, ८ मे, २०२०

कानोकानी©️

 बालरोग विभागातील पहिले सत्र!! आत्तापर्यंत  डॉक्टर होताना बच्चेकंपनी पेक्षा मोठ्या रुग्णांना जास्त तपासलेले. इथे पहिलाच बालरूग्ण, ह्रदयाच्या झडपा निकामी झालेला. तपासायला सुरवात केली. इवलीशी छाती. त्यात दम लागलेला त्यात हळू हळू थांबत थांबत हुंदके. स्टेथोस्कोप छातीवर टेकला. लsब डsब या ह्रदयांच्या ठोक्यात मधेच खर्रखर्र आवाज.आता मात्र सर्व ज्ञानेंद्रिये जणू कान झाले.कानात प्राण आणून ऐकणे म्हणजे काय हे झटकन कळले. त्यावेळी इकोकार्डीओग्रामची उपलब्धताही नव्हती. फक्त कान आणि आवाज ,त्याचे विश्लेषण. बस! शब्दशः त्याच्या ह्रदयीचे बोल ऐकत होते.आज पसारा आवरताना ते दिवस आठवले. चला ह्या आठवणींचा  पसाराही आवरायलाच हवा.                      



               कानोकानी©️


           योग योगेश्वर श्रीकृष्ण चक्रव्यूहाचा 'भेद ' कसा करायचा हे भगिनी सुभद्रेला  समजावून सांगत होता. गंमत म्हणजे गर्भ जलाच्या अतीव ऊबेत पहुडलेल्या अभिमन्यूने हुंकार देत देत श्रीकृष्णाचा'' 'मामा 'केला. त्या गोष्टीचे मला नेहमीच कुतूहल  वाटते. कदाचित प्रवासाच्या शीणाने गर्भवती सुभद्रा अंमळ पेंगुळली होती. रथाच्या झुल्यात हातातील वेग सांभाळत तो यदुनाथ चक्रव्यूहाचा भेद करण्याचे तंत्र आपल्या बहिणाबाईला तिच्या हट्टापाई समजावत होता., तेव्हा आपले   इवलाले सुबक करंजीसारखे कान टवकारून मातेच्या गर्भात उबदार काळोखात पहूडलेला अभिमन्यू ते ऐकत ऐकत हुंकारत होता. त्या गर्भाचे पुसटते हुंकार तो कृष्णमुरारी ऐकत पुढे बोलत होता. इकडे सुभद्रा मात्र थकव्याने निद्रिस्त झाली ..   हे पाहताच बंधू -राजांनी चक्रव्यूह भेद आणि घोड्यांचे वेग दोन्हीही आखडते घेतले . अर्धवट राहिलेल्या रहस्यकथे सारखा चक्रव्युहाचा अर्धामुर्धा भेद गर्भावस्थेतील अभिमन्यूस चुटपुट लावून गेला.
आपल्याभोवती सतत नादब्रह्म उसळत असते. कधी विलक्षण कोलाहल तर कधी असीम शांतता. पण या सर्व आवाजांच्या भोवऱ्यात स्थिर असतात ते मात्र कानच. मात्र ते काम करतात चाळणीचे! अर्जुनाने वेध घेतलेल्या पोपटाच्या डोळ्या सारखा हवा तोच आवाज या चाळणीतून मनापर्यंत पोहोचत असतो . आठवा बर ते शाळेतले दिवस.वर्गात दंगा टिपेला पोहचला असतो. बाॅम्ब फुटला तरी ऐकू येणार नाही अशी अवस्था! ! तोच शाळेतील घंटा वाजते . हुश्शार कान तो आवाज  बरोबर टिपतात आणि आपण सुसाट निघतो. किंवा बाळाला बडबड गीत गाऊन भरवता भरवता कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्याचे जेव्हा मी बाईंना सांगितले तेव्हा आई आणि गृहीणी होण्याची एक पायरी मी यशस्वी पणे पार केली आहे याची मलाच खात्री झाली. आई झाल्यावर हे सगळे आवाज आणि त्याचे बारकावे कान ग्रहण करू लागले .बाळाच्या रडण्याच्या पोतावरून जेव्हा त्या रडण्याचे कारणही समजू लागले तेव्हा तर मी नक्कीच मनकवडी आहे असे मला ठामपणे  वाटले. 
         तसं पाहिलं तर आधुनिक स्वयंपाकघर म्हणजे अनेक आवाजांची सहकारी संस्थाच! फ्रिजचे सतत घुमणे . त्यात मिक्सरचा खडखडाट, कूकरच्या चावट शिट्ट्या आणि हे कमी वाटते म्हणून की काय प्रत्येक भांड्यांनी आपला सूर त्यात लावलेला असतोच. या जोडीला माझे घर मध्यवर्ती! सुसाट गाड्या, धर्मस्थळे, प्रार्थनास्थळे  येथून येणारे आवाज, समोरच्या शाळेतील मुलींचा कोवळा आवाज, घरा समोरची जत्रा आणि तिथून ऐकू येणारी विविध भाषेतील गाणी अशा भरगच्च आवाजाच्या दुनियेत मी रहाते. हिमालयात ट्रेकींग करताना लक्षात आली तिथली विलक्षण शांतता. उंच सरळसोट देवदार वृक्षांच्या पानांची सळसळ नाही, ना पक्षांचा आवाज. ही शांतता बॅगेत भरून ,गाठोड्यात बांधून घरी घेऊन जावेसे वाटू लागले.ती शांतता ऐकताना, तंद्रीत चालताना पायवाट चुकले.खोल जंगलात शिरले.शांतता म्हणजे कोलाहालाचा परमोच्च बिंदू! क्षणापूर्वी आवेगाने पकडलेली कवेतील शांतता, इतकी प्रखर वाटू लागली की आता 'आवाज' ऐकण्याची तहान लागली. आता कुठलाही 'आवाज 'हवा होता. सातभाई पक्षांचा कचकचाट, कुत्र्याचे भुंकणे, अगदी माणसांची भांडणेही चालली असती. सहप्रवाशाचा किंवा गाईडचा आवाज ऐकण्यासाठी शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशी न् पेशी जणू 'कान' झाले होते.
              आपण भारतीय अती नाद प्रिय. जन्माच्या आनंदसोहळ्या पासून त्या अखेरच्या प्रवासापर्यंत साक्षीला आवाज हे हवेच. बाल जन्माची वार्ता ताशे नगारे देतात तर बाळाच्या कानात कुsssर्र करे पर्यंत बारशाची सांगता होत नाही. आपल्या लाडक्याला खेळणी हवी तीदेखील नादमय!कानांना,आत्म्याला कुरवाळणारे लताजी, मखमली तलतचे सूर, माणसांचे,वाहनांचे नाही तर गेला बाजार कुत्रा -कावळ्यंच्या आवाजांच्या सवयी असलेल्या माझ्या कानांना जपान मधे मात्र धक्काच बसला.कुठलाच आवाज नाही. कोणी कोणाशी बोलत नाही की एकमेकांकडे बघतही नाही. कुत्री शांतपणे मालकाबरोबर फिरताहेत. एक जण भू s चा सुर लावेल तर शपथ! लहान बाळ सुध्दा शहाण्यासारखी(?) आळी मिळी गुपचिळी! बुलेट ट्रेन साठी आम्ही थांबलो असताना सोळा सतरा वयाची  पन्नास मुले मुली आली. बहुधा सहलीसाठी! अशा वेळी आपल्याकडे जो कोलाहल उसळला असता तो आठवून मलाच कानकोंडे वाटू लागले. इथे मात्र मुलींचा चिवचिवाट नाही की तिरक्या नजरेने मुलींकडे बघत मारलेले शेरेही नाहीत. 
     काही आवाजांच्या प्रेमात आपण कधी पडतो हेच कळत नाही. कोल्हापूरचा रंकाळा तलाव म्हणजेच समूद्र या  माझ्या वेडगळ कल्पनेतून मला बाहेर काढण्यासाठी वडील मला घेऊन गेले थेट रत्नागिरीला! साधारण सात, आठ वर्षाची मी!  भरतीची वेळ होती आणि ते होते समुद्राचे प्रथम दर्शन.पहाताक्षणी प्रेमात पडण्याची पहिली अनुभूति. तो निळा हिरवा अथांग समुद्र ,त्या एकापाठी एक येणा-या  फेसाळ लाटा पण सर्वात जास्त आवडली ती त्याची खर्जातील गाज. मृद्गंध जसा मनात भरून घेतो तशीच ती सागराची गाज कानात भरून घेतली. नंतर काही वर्षांपूर्वी समुद्रकिनारी सह कुटुंब गेलो होतो.पावसाळा तोंडावर आलेला. रहायची व्यवस्था यथातथाच! रात्र झालेली.वीज गेलेली. तिथे रहाणारे फक्त आम्हीच.आकाशातील एखाददुसरा फुटकळ ढग आता मात्र सर्व मित्रांना घेऊन आकाशात धिंगाणा घालू लागला. इतक्यात तेथील व्यवस्थापक मिणमिण कंदील घेऊन आले.आम्ही उतरलो होतो तेथवर समुद्राचे पाणी येते. गाडीही काढणेही शक्य नाही अशा भयप्रद गोष्टी सांगून ते गेले.कुठलाही आवाज नाही,फक्त समुद्राची एकसुरी गाज. बरोबर वयस्कर सासूसासरे आणि दोन लहान मुले!आज तो नेहमी प्रिय असलेला सागर आता पा-यासारखा मनातून निसटू लागला .समुद्र त्याचे तोंड बंद करेल तर बर! , लाटाचा आवाज नकोच नको असे वाटू लागले.अशा या कानोकानच्या आठवणी.
    या कानांच्या आधारे निसर्गातील  स्वरगंगेचे दैवी शिंतोडे अगणित वेळा मनावर,आत्म्यावर शिंपले गेले आहे. काही साक्षात्कारी  क्षण अनुभवलेले आहेत.माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला आस्तिकतेच्या अंगणात  , दैवी स्वरांनी फिरवून आणले आहे .तर कधी मनाचा चक्काचूर करणारे आर्त रूदनही याच ज्ञानेंद्रिये ऐकले आहे.
     ब-याचदा वृध्दावस्थेत कर्णबधिरता आली तरी मान्य करायची तयारी नसते. घरातल्या टि.व्ही.चा आवाज जोरात यायला लागला किंवा सहा आणि दहा या दोन आकड्यांत अदलाबदल होऊ लागली की आपण
ओळखाव की घरातील थोरांचे कान रूसू  लागले आहेत.. माझ्या वडिलांचा कर्ण यंत्र घालण्यास दांडगा विरोध! वडिलांची  ठाम समजूत होती की आम्ही तोंडातल्या तोंडात बोलतो त्यामुळे त्यांना आम्ही बोललेले कळत नाही.अखेरपर्यंत त्यांनी कर्ण यंत्र घेतले नाही आणि कर्ण बधिरता कबुलही केली नाही..
      प्राण्यांची आणि वेगळीच त-हा.  दोन कुत्रे एकमेकांशी संवाद साधतात तो ऐकणे आणि बघणे एखाद्या नाटुकली सारखे असते. एकमेकांना बघून झालेली खुषी पुच्छाची चवरी ढाळत ढाळत अ अं उ sssऊं च्या बाराखडीने सुरू होते. समोरचे श्वान आवडले नाही तर मात्र भ भा भी××××ची शिवी गाळ सुरूच! सोबतीला अणकुचीदार दात विचकणे आहेच.रामपारी येणारे काऊ तर त्यांना खाऊ द्यायला जरा उशीर झाला तर जास्तीतजास्त कर्कश्श स्वरात माझी निर्भत्सना करायला मोकळे.! तोच खाऊ खायला जातभाईंना बोलवायचे असेल तर त्यांचा आवाज लगेच सौम्य!
           या ज्ञानेंद्रियाचा एक भाग म्हणजे आपला बहीर कर्ण! महाचावट!.   या चावट कानाने आपला मोठा दादा नेत्र यापासून तर चार आंगुळांची फारकत कायमची घेतली आहे. म्हणायला चार बोटांचे अंतर असले तरी डोळ्यांनी देखिले आणि कानानी ऐकलेले यात कित्येक योजनांचे अंतर असते. असा हा हलका कानफाट्या  कान, नटण्या मुरडण्यात मात्र सर्व अवयवांच्या चार पावले पुढेच असतो .इटूकला आहे पण त्याच्या नटण्याच्या त-हा किती म्हणून सांगू? कधीकाळी कानावर ऐटीत विराजमान झालेली भिकबाळी कोणाच्या स्वभिमानाला डिवचते .त्यातूनच रामशास्त्री प्रभुणे अंगावरील गरिबीची राख झटकुन झेप घेतात. .कधी कधी याच कानांवर अत्तराचा फाया नेटकेपणे बसतो आणि बसवणा-याचा रगेल ,रंगेल पणा षटकर्णी करतो.
       समस्त स्त्री वर्गाने मात्र स्वतःच्या  कानांना अनेक कर्णभूषणंनी मढवून आम्ही मुळीच 'हलक्या' कानाच्या नाही हे सिध्द केले आहे. मग ती फुलांनी कान सजवणारी ॠषिकन्या असो किंवा मला बाई फक्त हिऱ्याचे दागिने आवडतात असे म्हणणारी उच्चभ्रू महिला असो , बुगडी माझी सांडली ग म्हणत लडीवाळ तक्रार करणारी मराठमोळी तरुणी असो कर्णभूषणांचा मोह कोणीही टाळू शकत नाही .आणि हा  कानही असा नटवा की वरपासून खालपर्यंत चमचमते खडे, गोल गोल वळ्यांनी तो सतत सजत असतो. . कर्णभूषण सर्वांचेच लाडके.
           . आज-काल स्त्रियांची कर्णभूषणांची  मिरासदारी मुलांनी मोडीत काढली आहे कधी एका  कानात तर कधी दोन्ही कानातले डूल 'हम भी कुछ कम नही' म्हणत मुले मिरवत असतात.
              असे म्हणतात बाह्य कर्णाचा काहीच उपयोग नसल्याने पुढील काही पिढ्यांनी आपला लाडका नटवा कान नष्ट होणार आहे. कदाचित त्या भावी काळातील  आपले वंशज कौतुकाने आजच्या मानवाचे फोटो म्हणजे आपले फोटो एकमेकांना दाखवून सांगतील डोक्याच्या कडेला आपल्या पूर्वजांना जो अवयव फुटला आहे त्याला पूर्वी 'कान' असे म्हणत. अर्थात हा काळ फाsssर दूरचा असल्यामुळे आतातरी कानाला नटवायचे आपले काम सुरळीत चालू राहील
            एकदा बागेतील पुतळ्याकडे एकटक बघता बघता माझी छोटुकली नात पटकन म्हणाली ,"आजी ग बाहेरचे सर्व आवाज बंद करायचे आणि मनाचे कान उघडायचे, म्हणजे समोरचा तो पुतळा  बंद ओठांनी 'अssssगुल्या' म्हणतो ते ऐकू येते बघ! तो मनाचा आवाज". पुतळ्या मागे दडलेली आवाज करणारी कबुतरे तिने पाहिली नव्हती. पण तिचा तो 'मनाचा आवाज' आणि 'मनाचे कान' मला फार फार भावले .बघूया 'मनाचा आवाज' ऐकायला माझ्या मनाला कधी 'कान' फुटतात ते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा