शुक्रवार, २९ मे, २०२०

सुट्टीतील घर©️

लोकांचे जथ्थे चालले होते. तळतळत्या उन्हात, अनवाणी,उपाशी पोटी!  बकोटीला बारकी पोर, पाठूंगळीवर एखादे!.थकले भागले पाय ओढत.! अर्जुनाच्या मत्सवेधा प्रमाणे त्या कोट्यावधी लोकांचे एकच लक्ष !ते आहे , त्यांचे आपलं 'घर'. हे घर नुसते दगडामातीचे नाही, ते सिमेंट- विटांचेही नाही ते आहे श्वासांनी उभारलेले. त्या छताला,भिंतींना हात लागलेत आजोबा पणजोबांचे. मातेने इथेच अर्धपोटी राहून आपल्याला खाऊ घातले आहे.बालपणातील मान ,अपमान या घराच्या भिंतींनी बघितले आहेत.नव्या दुल्हनचे कुंकुमात रंगलेले हात याच घराच्या भिंतीवर आहेत. तेथून दूर जाताना घरांनी कढ आवरत शुभस्तः पंथानु  असे हळूच कुजबुजले आहे ते ' घर!



                सुट्टीतील घर©️

कधीतरी एखाद्या लखलखत्या सकाळी सुट्टीच्या दिवशी आपल्या घराला न्याहाळावे आणि  जणू जादूच्या पोतडीतून बाहेर पडता पडता घराने आपल्याकडे बघत डोळे  मिचकावेत असा अनुभव अचानक येतो. आपण घरात असल्यामुळे सुखावलेले  घर बघताना खूप छान वाटत. आपलंच घर  सुट्टीच्या दिवशी एवढे वेगळं दिसत यावर विश्वासच बसत नाही. 
          कामाच्या निमित्ताने सतत घराबाहेर म्हणजे अगदी रामप्रहरी सुध्दा घर सोडणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांना हा अनुभव वेडावून टाकतो. रोज भल्या सकाळी मी घर सोडताना  पुन्हा-पुन्हा पांघरूण ओढून घेणारे ,भांड्याच्या पसा-याकडे त्रयस्थ नजरेने पाहणारे माझे घर माझ्या चांगले परिचयाचे आहे.  
    तेच एखाद्या   पावसाळ्यातल्या सकाळी आळसटलेल्या सुट्टीच्या दिवशी जरासे दुलईच्या ऊबेतून बाहेर पडून घराकडे पहावे तर घर क्षणभर अनोळखी वाटते. ओलसर हिरवी वस्त्रे घालून चमकदार थेंबांच्या मौतीक माळा तारांवर, पानांवर,फांद्यावर घेऊन ते चमचमत असते.धुळ भरली पाने रात्रीतनच कोणीतरी खसखसून धुवून काढलेली असतात.खरतर पहाट आणि सकाळ यांच्या मधे जी छोटीशी कालकुपी असते ती फारच रसिली !. सूर्याच्या किरणांनी अजून कुबेराच्या कोठारातून  पिवळेधम्मक सोने  लूटून आणलेले नसते.अंधार असतो पण तोही कासाविस करणारा नाही तर अंधुकसा, हवाहवासा. गव्हल्या गव्हल्यांनी कमी, कमी होणारा अंधार आणि तिळा, तिळाने वाढणारी पावसाळी ढगाळ पण सोनेरी सकाळ ! ती मिरवत पावसाळ्यातले सकाळचे घर सामोरे येते.किंचित सर्दावलेले,अंधारलेले. मला स्वतःला ही अद्भूत  वेळ फार फार आवडते. कित्येकदा एखादा अद्भूत खजिना या वेळेत अचानक गवसतो. बागेतल्या मोठ्या मोठ्या अळूच्या  पानांवर हि-यांना  ,मोत्यांना चुरून पसरलेले असते आणि ते भलमोठ्ठ काळसर अळूचे पान या पळपुट्या संपत्तीला आपल्या पानावर मनोभावे राखत  असते. हे आपलंच घर आहे यावर विश्वासच बसत नाही. घराचे हे रूप मला पूर्णपणे नवीन असले तरीही अतिशय लोभसवाणे वाटते. सोनेरी उन्हे दारा खिडक्यातून आता हक्काने आत येतात. आपली नितळ नजर माझ्यावर फिरवीत कुजबुजतात अगं आमचा रोजचा खेळ असाच रंगतो.पण तूच नसते न आमच्यासमवेत. घराचा कोपरान् कोपरा खुदखुदतो. किरणातून पसरणारे सुवर्णकण पांघरून पलंगा खालील कोळ्याचे जाळे अलंकृत होते आणि इवलासा कोळी लाजून स्वतःला अधिकाधिक त्यात गुरफटवून घेतो. घरातून रेडिओवर भक्तीगीते ऐकू येऊ लागतात त्यातच मिसळला असतो कपबशांचा नाजुक किणकिणाट.गॅसवर तापणा-या दुधाचा आणि चहाचा विशिष्ट  वास! आज मी घरात त्यामुळे माझ्यासाठी खास चहा किंचित वेलची आणि आले घालून केलेला.! माझा रोजच्या घाईतला रोजचा चहा सुध्दा पटकन डिप डिपवाला !बाहेर बागेत हिरव्याच्या अनेक छटा मुक्तपणे उनसावल्याचा खेळ खेळत असतात.बागेतली सानुली फुलपाखरे आणि  सोनसावळ्या पक्ष्यांची लगबग माझे लक्ष वेधून घेते. घराचे हे भाबडे रूप बघत रहावेसे वाटते .आपल्याच चौकटीतून बाहेर पडून घर मोकळेढाकळे होत असते. नेहमी कामासाठी मी घर सोडून जाताना घर माझ्याकडे त्रयस्थपणे दुराव्याने बघत असते.आज झपाटल्यासारखी मी त्याला न्याहाळत बसते. सकाळ  हळूहळू  चढत जाते. बाहेर ढगांची झिम्माड आणि रेडिओच्या आवाजात मिसळून गेलेला पावसाचा एकसुरी  आवाज. मुलांचे खेळण्याचे आवाज.स्वयंपाक घरातील चुरचुरत्या फोडण्यांचे वास,मुलांच्या कोवळ्या आवाजात ऐकू येणा-या कविता, मधूनच भांडण घेऊन माझ्याकडे येणं. सगळ दुस-या त्रिमितीत घडत आहे अस वाटू लागते. रोज एवढ्या घडामोडी मी 'मिस'करते? दुपारी अधिकच अंधारून येते.एकसुरी पाऊस बदादा कोसळू लागतो.कोसळणा-या पागोळ्या घराभोवती मस्त डबकं  तयार करतात. मुलांची होड्या सोडण्याची धांदल उडते.घरात जायफळाच्या काॅफीचा वास दरवळतो आणि त्याजोडीला कांदाभज्यांचा जीभ चाळवणारा घमघमाट . घर वात्रटपणे एक टपटपणारी पागोळी नव्हे पाणमाळ माझ्यावर भिरकावले, जणू मौतिक माळ! अगदी राजाधिराजाच्या आविर्भावात! पावसाळी सांज मात्र अधिकच ओलसर आणि उदास! मुलांच्या किणकिण आवाजात शुभंकरोती ऐकू येत असते.मग खूपच छान वाटत.उद्या पासून परत सक्काळी सक्काळी घर सोडून कामावर जायचे?अजून या सुट्टीतल्या घराला नीट बघितलेच नाही!
        उन्हाळ्यात  रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी डोळाभर आळस पांघरून मी  लोळत असताना मधूनच घर मला शुक शुक  करून बोलवतोय हे लक्षात येऊनही ही मी  त्याच्याकडे कानाडोळा करते. हो! होयच मुळी त्याची मिजास मी कशाला चालवू? आणि कधीतरी भर दुपारी तळपत्या वेळी कामावरून घरी येण्याचा योग येतो तेव्हा त्या तप्त उन्हातलं ते शांत सन्यस्त घर पाहून मीच स्तब्ध होते. इकडे सूर्याची पेटलेली होळी आणि तिकडे स्वः चिंतनात मग्न अंतर्मुख घर! बागेतली झाडेही बोक्या सारखी डोळे मिटून पहुडलेली असतात .सरत्या वैशाखात कासावीस  झालेले घर रात्री चांदण्यांची उटी सर्वांगाला माखत बसते .अखेर कंटाळून त्या तेजोनिधी ला शरण जाते मग इवलासा ढग समस्त पाहुणेमंडळी बरोबर आकाशभर धुमाकूळ घालत फिरतो . धुळीचे लोट घराला भिडतात. विजेचा चमचमाट पाहून घरही क्षणभर डोळे मिटून घेते. घराची समाधी भंगावी म्हणून मी वेड्यासारखी वाट पाहते. त्याला परत कुटुंबवत्सल बनवण्यासाठी कोण प्रयास करते. इतक्यात संध्याकाळी आकाशात रंगपंचमीची झिम्माड उडते आणि घर माणसात येते. दुपारच्या सन्यस्त योग्याला मनोमन वंदन करत मी सुटकेचा निश्वास  सोडते.
            हिवाळ्यात धुक्याच्या गुलगुलीत  दुलईत घरही मस्त डुलक्या काढते..त्यावेळी तिट्टी मिटी लावलेल्या,दुपट्यात गुंडाळलेल्या बाळा सारखे ते दिसते. छतातून कवडसे घरात जमिनीवर उतरतात.त्यामधे नाचणा-या इवल्या धूलिकणांना पकडण्याची  नातवंडांची धडपड  आणि खिदळणे! घर त्यांच्या सारखेच बालक होते. वाढत्या थंडीत घराभोवती वाळक्या पानांचा ढीग साठायला लागतो आणि घर दिवसेन्दिवस वयोवृध्द दिसू लागते.
    वसंत ॠतूच्या आगमना नंतर घर परत कात टाकते .परत नव्याने बाळ होऊन दंगा करू लागते.प्रत्येक ॠतूत,प्रत्येक सणाला,रंगरोगण झाल्यावर मायावी पण चांगल्या राक्षसा सारखे घर रूप बदलते. दसरा दिवाळीला तर विचारायला नको.अंगभर रसरशीत  केशरी,पिवळ्या झेंडूंच्या माळा घालून आपली नटण्यामुरडण्याची हौस मागवून घेते. रात्री हळूच त्याची दृष्ट काढाविशी वाटते.
           माझ स्वतःचे घर. दिवस, दिवस मी इथे रहातेय. त्याला गृहीत धरते. घराभोवती फिरणा-या वास्तुपुरुषाच्या बद्दल आजीने सांगितलेल्या कथा आठवते आहे. काहीही बोलले तरी तथास्तु  म्हणणारा वास्तूपुरूष! कदाचित  यामुळे घर नुसते सिमेंट वीटांचे वाटताच नाही तर वाटते एक जीवंत ,सळसळता सखा! माझ्या सुखदुःखाचा साक्षीदार. प्रत्येक  प्रहरी बदलत्या ऋतूत प्रत्येक क्षणाला घराचे नवीन नखरे मला मोहवतात. कधी वाटतं नोकरी सोडावी आणि दिवसभर त्याच्याशी हितगुज करत बसावे पण कधीतरी दिसणारे आणि म्हणूनच विलोभनीय  वाटणारे त्याचे नखरे जर रोज पाहिले तर अतिपरिचयात अवज्ञा होणार नाही का?

५ टिप्पण्या: