शुक्रवार, ५ जून, २०२०

(वि)स्मरण

माझी आई शिक्षिका.अगदी हाडाची! कधीही  मी माहेरपणाला गेले की ती असायची विद्यार्थ्यांच्या घोळक्यात. मला थोडा हेवाच वाटायचा.वयाच्या नव्वदीपर्यंत ती  गणिताचे रायडर्स सोडवत बसे. पण एवढी हुषार आई , कुठेही निघाली की रस्ता मात्र चुकणार म्हणजे चुकणारच. कित्येक वेळा रस्ता चुकून भलत्याच भागात आमची वरात जाई. आईच्या या गुणाने(?)एकच फायदा झाला सारे गाव अगदी कोपरा न कोपरा आम्हाला माहीत झाले. त्या उलट वडिलांचे. सा-या रस्त्याचा नकाशा नव्हे, महाराष्ट्रातील सर्व रस्ते गल्ली बोळांसहीत त्यांच्या डोक्याच्या काॅम्यूटरमधे फिट बसले होते. वडिलांचे रस्ता लक्षात ठेवण्याचा गुण   किंवा आईचे गणिती डोके न घेता तिच्यासारखे ठरावीक  गोष्टींचे विस्मरणच वारसाहक्काने मला मिळाले आहे.चला या (वि)स्मरणाच्या 'आठवणींचा(?)' पसारा आवरुन नीट ठेऊ या.



(वि)स्मरण©️

सिनेमा थेटर खचाखच भरलेलं.  गाजलेला सिनेमा होता तो. वीस वर्षांपूर्वी कुंभमेळ्याच्या जत्रेत 'बिछडलेले' भाऊ एकमेकांसमोर येतात. सुरुवातीला त्यांच्यात गैरसमजातून माफक मारामारी  ढिश्शुम ढिश्शुम वगैरे होते. पण नंतर एकमेकांचं रक्तबंबाळ शरीर बघितल्यावर दोघांनाही एकदम साक्षात्कार होतो आणि 'ये तो अपनाच खून है'!  झालं! मग जोरजोरात देवळात घंटानाद होऊ लागतो.शंख ध्वनी त्याला साथ देतो. झाडे , पर्वत मनसोक्त डोलू लागतात.जणू ब्रह्मांड ता था थै करतंय.  लगेच भाsssई,छोsssटू असा पुकारा करत या दोघां बिछडलेल्या बछड्यांचा मिठ्या मारण्याचा कार्यक्रम पुढील दहा मिनटे चालतो. आणि इकडे थिएटर मध्ये शिट्या आणि टाळ्यांचा पाऊस!.ताई माई अक्का  हुंदके देत देत अश्रूंनी ओलाकच्च झालेला पदर परत परत पिळतात. माझ्या दृष्टीने मात्र ते दोघेही नायक ,बंधूराज आता मर्त्य मानव ते देवता असे पदोन्नत होतात . आता असे बघा अंगभर एवढ्या जखमा असूनही, भले त्यातून ऑरेंज कलरचे रक्त( हिन्दी सिनेमांनी ज्ञानात घातलेली भर म्हणजे रक्त शेंदरी ते गुलाल यातील कुठल्याही रंग छटांचे असू शकते.)  वहात असूनही एकमेकांना केवळ रक्ताचा थेंब बघून पटकन  ओळखणारे हे, सामान्य माणसं असतीलच कसे?त्यांचे हे असामान्यत्व  बघून मीही एकदम गहिवरते. वा काय भन्नाट स्मरणशक्ती  आहे त्यांच्या रक्तबिंदूची.त्यां बंधूद्वयांचे अफाट कौतुक  वाटायच कारण माझा विसराळू पणा.
.           विसराळू माणसं,वस्तू विसरतात. या पुढच पाऊल म्हणजे गप्पांच्या वा शाॅपिंगच्या  नादात आपल बाळ सुध्दा विसरतात. पण मी अख्खा माणूस विसरते. अहो दिवसेंदिवस पाहिलेला माणूस जर त्याची जागा आणि गणवेश बदलून आला तर हा कोण आहे 'वह कौन है' ?हे भले मोठ्ठे प्रश्न चिन्ह माझ्या डोक्यात इकडे तिकडे हुंदडू लागतं. माणसात झालेला थोडासाही बदल अगदी पेहराव ते मिशी कशातही असो पण माझ्या इटुकल्या मेदूला पेलवत नाही .
        काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा  कुरियर पेक्षा पोस्टमनची खूप चलती होती. आमचे रोजचे पोष्टमन काका  'डॉक्टर' म्हणून हाक मारायचे आणि पत्राचा गठ्ठा हसत हसत देऊन सायकलवर टांग मारायचे. त्यांचा तो खाकी ड्रेस आणि आणि लाल पट्टी लावलेली खाकी टोपी.  एकदम  प्रेमळ .मुलांचा वार्षिक  रिझल्ट त्यावेळी पोष्टाने  यायचा. हातात रिझल्ट देऊन पोष्टमन काका तिथेच घुटमळायाचे. माझ्या खुललेल्या चेहऱ्यावरून माझ्या मुलांचे घोडे गंगेत न्हायले  हे  लक्षात आल्यावर  आशीर्वाद देत 'पास झाली का' अस म्हणत सायकलवर  टांग टाकित.  एकदा दौंड स्टेशन वर ते मला भेटले. अर्थातच नेहमीचा गणवेश अंगात नव्हता,जागाही सोलापूर चे माझे घर नव्हती तर दौंड स्टेशन होती. त्यांच्या अंगात सदरा आणि पायजमा होता ."काय डॉक्टर इकडे कुठे?" आता आली का पंचाईत. एवढ्या भिन्न  वातावरणात त्यांना ओळखणार तरी कसे?चेहरा तर ओळखीचा वाटतोय पण हा गृहस्थ कोण हे काही केल्या लक्षात येईना.मेंदू उभा ,आडवा , तिरका खाजवला पण मेंदू मद्दच! " मी ना गावाला चाललेय" इति मी. काहीतरी बोलायचं म्हणून मी वाक्य टाकले ."छान छान,मी बहिणीला सोडायला आलतो . यदुळा लेकरांचा रिझल्ट कोण घेणार? म्हणजे रिझल्ट घ्यायला तुम्ही नाय तर"  त्या क्षणी युरेका युरेका युरेका! परवलीचा शब्द, 21 तोफांची मानवंदना हे सगळ सगळ कोणीतरी मला देत आहे अस वाटू लागले.  डोक्यातलं सर्किट पूर्ण झालं आणि पोस्टमन काकांची प्रतिमा डोक्यात उमटली . अहाs हा मी व्यक्ती ओळखली. सारे ब्रम्हांड टाळ्या वाजवत आहे असे वाटू लागले. 
             पेशंट, त्यांच्या तब्येतीच्या कुंडल्या , जन्म इतिहासा सहित  मला तोंडपाठ असतात. पण त्यांचे आई-वडील चुकून सुद्धा माझ्या डोक्यात इवलासा सुद्धा ठसा उमटवत नाहीत.नवे जुने लेख,पुस्तकातील उतारे कित्येक  वर्षे डोक्यात ठाण मांडून  बसतात. पेशंटचे  रिपोर्ट एक महिन्यानंतर सुद्धा आठवत असतात पण माणसे आणि रस्ते याबाबतीत पूर्ण बल्ल्या. माझा नवरा आमचं लग्न ताजं ताजं असताना, कोणी भेटला तर उत्साहाने मला विचारायचा "काय गं ओळखलस की नाहीस यांना?" पण जेव्हा मी आत्मविश्वासाने  कुलकर्णींना शहा, शहांना कांबळे,आणि कांबळेंना खान बनवून विश्वात्मकता साधायचा सपाटा लावला तेव्हा पुढचा धोका ओळखून त्याने असली कोडी घालणे पूर्णतः  बंद केले.  आता तर तो इतका तयार झाला आहे की  एखादा माणूस  त्यांच्या नावासहित मी बदलून टाकला तरी नवरा मला ओरडत नाही. "तुझ्या डोक्यातल्या वायरिंग मधला फ्युज उडाला आहे . तू तरी काय करणार "असा एक   दीर्घ सुस्कारा सोडून आकाशाकडे बघत तो म्हणतो. मला माणसाचा चेहरा लक्षात  रहात नाही हे शरणागतीचे पांढरे निशाण मी केव्हाच त्याच्यासमोर फडकावले आहे.
             काही हिंदी सिनेमात फक्त नायक सोडून समस्त जन, म्हणजे नायिका,  खलनायिका, उपनायिका, सहनायिका, सह नायक आणि समस्त मंडळी  माझ्यासारखेच माणसं लक्षात ठेवण्याच्या बाबतीत बाबतीत 'मठ्ठ 'असतात .नायकाने नुसता गालावर काळा तीळ लावला  किंवा मिशी लावून तो आला  तर गंमत म्हणजे त्याला ओळखणे तर सोडाच पण खलनायक  आणि त्यांच्या पिल्लावळींना तो एकदम 'अपनाच आदमी' वाटू लागतो.या उलट नायिका आणि सख्या केवळ मिशी आहे या कारणास्तव नायकाला ओळखायला ठाम नकार देतात. स्वतःची ओळख हिराॅईनला करून देतादेता हिरोची मग भंबेरी उडते. नायिकाही  सारखं  नायकाला हाडतूड करत असते.अखेर आपला नायक आपली मिशी काढून किंवा तिळ काढून 'वो मैच हूॅ '  अशी तिची खात्री पटवतो आणि मग ती गोड गोड हसते . चला म्हणजे माझ्या डोक्यातल्या वायरींग पेक्षाही त्या सिनेमाच्या डायरेक्टरच्या डोक्यातील वायरिंग, नायिका, सहनायक, उपनायिका आणि समस्त काम करणाऱ्या लोकांचे वायरिंग हे 'एकदम डबडा' आहे याचाच आनंद मला जास्त होतो. 'भला उनका डोका मुझसे भी जादा विसराळू'! मग माणसं लक्षात न रहायचे दुःख मी सहन करते.
          आमच्या घरी मुलांनी माझ्या विसराळूपणाचे ग्रेड्स केले आहेत. कधी कधी फारच मोठे घोटाळे  उडतात .घरी फ्रिज दुरुस्त करायला आलेल्या मेकॅनिकला ,माझ्या थोरल्या मुलाचा मित्र समजून जेवायचा आग्रह मी करू लागले . तो बिचारा आलेला मेकॅनिक कुठून पळून जावे हा मार्ग शोधायला लागला . आणि हे माझ्या मुलाच्या लक्षात येताच चपळाईची कमाल करत त्याने ही 'केस' हातात घेतली आणि मी यशस्वी माघार! थेट माझ्या खोलीत.
   सर्वात जास्त मी घाबरते ' काय ओळखलं का मला' या प्रश्नाला.  एक तर चक्क नाही म्हणणे किंवा मेंदू शिणवणे एवढेच पर्याय  समोर असतात. पण एकटी फिरायला निघाले की मी     भूमातेच्या एवढी प्रेमात पडते की नजर वर करतच नाही.परत ओळखलं  का? हा प्रश्न कानावर यायला नको.यावर उतारा म्हणून काही खुणा लक्षात ठेवायचा यत्न करतेय जसे शर्ट,टक्कल पण दुर्दैवाने मी लक्षात ठेवलेला शर्ट सगळ्यांच्याच  अंगात  दिसू लागतो. सारी कायनात  मेरे खिलाफ हो जाती है!
               अर्थात  या ठरावीक  विस्मरणाच फार दुःख करायला नको. जिथे दुष्यंत राजा आपल्या प्राणप्रिय प्रियेला शकुंतलेलाही विसरला आणि अखेर एका इटूकल्या अंगठीने किमया करून दोघांचे मिलन घडवून आणले तिथे माझ्या सारख्या सामान्याचे काय?. मला पण परवलीचा शब्द किंवा क्लू लागतोच.या विसराळूपणावर उत्तमोत्तम विनोद निर्मिती  झाली आहे आणि पुढेही होत रहाणार आहे. त्यातील खारीचा वाटा मी उचलते आहे एवढेच.
           माझी इटालियन  मैत्रीण  जेव्हा मला म्हणाली ,"अग सगळे इंडियन  सारखेच दिसतात,फरकच कळत नाही. " व्वा माझीच समानधर्मी!.फरक एवढाच, मी, गोरे काय, काळे काय किंवा पिवळे काय मला ते क्लोन्सच वाटतात त्यामुळे सगळ्यात तेवढाच घोळ  मी घालते.त्यामुळेच आपली मेंढरे किंवा म्हैस कळपातून ओळखणारे धनगर वा गुराखी मला आईनस्टाईन पेक्षा जास्त हुश्शार वाटतात.
            आता फक्त एकच  विनंती श्री. इंद्र देव, चित्रगुप्त आणि यमराजाचे फोटो कुणाकडे असल्यास त्यांनी मला जरूर द्यावेत.
. मी ते डोळाभरून पहाणार आहे. एवढच नाही तर डोळापाठ  करणार आहे म्हणजे स्वर्गात  वा नरकात गेल्यावर इंद्राला चुकून 'हॅलो यमराज' आणि यमाला हाय ऋतिक! अशी हाक मारायला नको, आणि रागावून त्यांनी  पुढच्या जन्मी परत 'विस्मरणाचा' 'डब्बल शाप'   द्यायला नको. 

२ टिप्पण्या: