गुरुवार, १८ जून, २०२०

भटकभवानी भाग 1




"बहुतेक तुझ्या पायावर चक्र असावे",अर्थातच आज्जीने माझ्याबद्दल काढलेले उद्गार आहेत. कारण जितके भटकणं शक्य आहे तितकं  मी करतच असते. सुदैवाने  माझा नवरा या बाबतीत माझ्याच जातकुळीतला. तो ही भटकाच. भटकायची माझी आवड पाहून आजीने मला लहानपणीच नाव दिले भटकभवानी. दर्यावर्दी  सिंदबाद हा माझा लहानपणचा हिरो. ओळीने काही महिने घरात काढल्यावर मोकळे आकाश, वेगवेगळ्या ठिकाणच्या खास पदार्थांचे वास, तिथली झाडं, तिथले प्राणी, तिथली भाषा सगळं खुणावू लागतात पाठीवर रक्सॅक पडते आणि मग लगेच सुरू होतं रेडी स्टेडी गो .  या' 'प्रवासाच्या युनिव्हर्सिटीत' अनेक गोष्टी  शिकायला  मिळाल्या  आहेत. या 'प्रवासाने' फार मोठ्ठा आठवणींचा पसारा मांडलाय. चला आज थोडुसा  तरी आवरावा.
शक्य झाले तर नुसते आठवणीत न रमता नीट आवरून ठेवावा.

                     भटकभवानी भाग 1



         साधारण पंचावन्न वर्षापूर्वी  शाळेत असताना लक्षात राहिलेला प्रवास म्हणजे आजोळी जायचा, इंदोरचा प्रवास. खर तर वार्षिक  परीक्षा सुरू व्हायच्या आधीच घरात आईला वेध लागायचे माहेरचेच आणि  आम्हाला  आजोळचे. अभ्यास करताना आई बाबांचे काय ठरते इकडेच कान असायचे. इंदोरला जायचे ठरल्यावर कधी एकदा परीक्षा  होतेय असे व्हायचे. हा प्रवास कधी पुण्याहून कधी कोल्हापूरहून कधी सांगलीहून जिथे आम्ही राहत असू तिथंन केलाय. अगदी मालगाडीच्या डब्यांसारखा लांबलचक प्रवास. तीन-तीन वेळा रेल्वे बदलावी लागायची. दोन दिवस लागायचे. आई खरच शूर वीर! दोन मुलींना घेऊन इतका अडनीडा प्रवास करायलाही तय्यार!.स्वतः शिक्षिका असल्याने तिची कधीच कोणाच्याच सोबतीची अपेक्षा नसायची.आणि कसली भीतीही नसायची. कधीकधी रिझर्वेशनचा डब्बाच नसायचा.किंवा रद्द व्हायचा.  मग त्या उतू जाणा-या रेल्वेच्या गर्दीत आम्हाला सुखरूप  नेणारी आमची बहादूर आई! आणि आम्ही दोघी चतुर आणि चाणाक्ष  लहान मुली. 
          हमाल जेव्हा आपल्याला प्लॅटफॉर्म वरून उचलून खिडकीतून रेल्वेच्या डब्यात टाकतो किंवा फेकतो त्याला' मच्छी गोता' म्हणतात हे ज्ञान  या प्रवासातच मला प्राप्त झाले. त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे एक होल्डाॅल, भलीमोठी पत्र्याची ट्रंक. .ट्रंक कुठली  पेटारेश्वरच तो.! आग्र्याहून सुटका वगैरे ऐतिहासिक नाटकात सहज खपेल असा. काही नाही तर गेला बाजार जादूचा पेटारा म्हणून वापरायला जादूगारांसाठीही परफेक्ट! ही आईची खास लाडकी ट्रंक! बाकी छोटे-मोठे सामान, खाऊचे डबे वगैरे  असा भरगच्च प्रवास असायचा. रेल्वे डब्याच्या खिडकीतून आमच्या पाठोपाठ ती भली मोठी ट्रंक आत कशीबशी सरकवली जायची. त्या ट्रंकचे कचकोर कोपर  जर कोणाला लागलं तर शंभर टक्के भांडणाला सुरुवात झालीच म्हणून समजा. लाकडी बाक त्यावर  दाटीवाटीने बसलेली मंडळी. खाली पण बसलेली मंडळी त्यात  कोणालाही न लागता ती ट्रंक उतरवणं हे ऑलिम्पिक मेडल मिळवल्या सारखं होतं. या ट्रंकेचा दुसरा फायदा म्हणजे त्यावर आरामात बसता यायचं अशी एकदम दणकट. आधी जास्तीत जास्त पसरून जागा अडवून बसलेली माणसं गाडी सुरू होताच चिवडा जसा डब्यात हलवून बसतो, तशी नेटकेपणाने बसायची आणि आम्हालाही बसायला कधी कधी जागा मिळायची. हळुच एखादी आज्जी  मग आईला विचारायची "कयो दोनो छोरी  लेकर   अकेले जा रहे हो?कोई मरद  नही साथमें ?  दोनो छोरी? छोरा नही?" मग लांबलचक सुस्कारा, सुरकन नाक ओढून नंतर आकाशाकडे बघून डोळे टिपणे,अरेरे करणं, हे कुठल्याही आज्यांचे  कार्यक्रम ठरलेले. आई फक्त हसायची , पण त्या क्षणी आपल्या धाडसी आई बद्दल अतिशय  अभिमान वाटायचा. आणि छोरा ,छोरा करणा-या आजीचा राग राग यायचा.  छोरा नाही या कणवे पोटी आम्हाला कधी अगदी जवळ बसवून घेतले जायचे.  ब-याचदा भर उन्हाळ्यात लाल जर्द  जरीची साडी  नेसलेली पोटापर्यंत  घुंघट काढलेली  दुल्हन  आणि दर स्टेशनवर तिला भेटायला येणारा तिचा 'मिया' बघताना मज्जा येई . कधी पान, कधी चहा, कधी डबा द्यायच्या  निमित्ताने सुरवार  झब्बा,  डोळाभर सुरमा  घातलेला मियाॅ त्याच्या डब्यातून धावत आमच्या डब्याकडे येत असे.  दुल्हनची मान लाजून  लाजून गुडघ्यात गेली असे. त्याला अखेरपर्यंत आपला मुखचंद्रमा ती दाखवत नसे. तिच्या मुख चंद्राचे दर्शन आम्ही पामराने घेण्यात मात्र पहिला नंबर पटकवला असे.
               भर उन्हाळ्यात कोमेजलेले,  उलट्या दिशेने  पळत सुटलेले वृक्ष, मळकटलेला करडा पिवळा प्रदेश, त्यात आमचा डबा  इंजीनाजवळ असला तर कल्याणच !कोळशाच्या इंजिन मधून उडणारा काळा धूर आणि कोळशाची भुकटी तोंडावर चिकटलेली आमची ध्यानं ! त्यामुळे स्टेशनवर उतरेपर्यंत आम्ही नक्की कोणत्या खंडातून आलो हा प्रश्न आम्हाला पडतच असे.  दोन पायावर चालणाऱ्या गोरिलाचे आपण वंशज आहोत याची पूर्ण खात्री पटायची.डोळ्यात कोळशाचे कण गेल्यामुळे सारखे चोळून' 'गुलाबी आॅखे' अशी आमची अवस्था व्हायची. रेल्वेचा प्रवास आणि  'गुलाबी आॅखे' या दोन गोष्टींचे  समीकरण इतकं  डोक्यात फिट्ट बसले होतं की  मी जेव्हा पहिल्यांदा' गुलाबी आॅखे जो तेरी देखी' हे गाणं ऐकल ,खर तर अतिशय रोमॅन्टीक गाणं, पण रेल्वे प्रवासाने त्यातला शृंगाराचा धूर उडविला होता. त्यामुळे  तेव्हा पटकन बहिणीला मी म्हणाले या हिराॅईनने नक्कीच  रेल्वेचा प्रवास केलेला दिसतोय.  कर्मधर्मसंयोगाने त्या सिनेमाचे नावही होते 'धी ट्रेन'! म्हणजे शिक्कामोर्तबच!
                 मध्यप्रदेशाकडे जसजसे जाऊ तसे मराठी ऐवजी हिंदी शब्द कानावर पडू लागत. बाहेर गव्हाची शेती, बसक्या आणि समोर वळलेली टोकदार  शिंगे असलेल्या गायी,  कलाकंद पुडी भा ssजी सारखे पदार्थ आले की आपण आजोळच्या  जवळ आलो ते जाणवायचे. 
              एकदा स्टेशनवर वाॅटरबॅगेत पाणी भरायला आई गेलेली, शेजारी बसलेल्या  बाईला आमच्याकडे बघायला सांगून, ती पटकन आलीच नाही. गाडीचे शंटिंग सुरू झाले त्या वेळी पोटात भितीने उठलेला गोळा आठवतो.  तशी भिती  नंतर गणिताच्या पेपरलाही कधी वाटली नाही. 
              या प्रवासातला शेवटचा प्रवास म्हणजे खांडवा ते इंदोर रात्रीचा प्रवास.या प्रवासात  रात्री 11 ते पहाटे चार पर्यंत आई खरोखर  रात्रभर झोपायचीच नाही पहारा करत बसायची. आम्ही दोघी बहिणींनाही अती उत्सुकतेने  झोपच येत नसे. स्टेशनवर हमालाने डोक्यावर ती पत्र्याची बॅग घेतली की आई आम्हाला छोट्या छोट्या वस्तू हातात घ्यायला लावायची.  तो हमाल त्या वस्तू घेण्यासही तयार असायचा,तो मागेही लागायचा पण आई त्याला कधीच एवढे जास्त ओझे द्यायची नाही. कधीही हमाला बरोबर तिने मजुरीसाठीही घासाघीस केली नाही. तो मागेल तितके पैसे द्यायची. या छोट्या छोट्या गोष्टीतून आम्ही खूप काही शिकत होतो ,घडत होतो.
      जून मधे  आजोळहून परतताना एखादा वळीव पाऊस झालेला असायचा .त्यामुळे चमचमणारे समांतर रूळ आणि ओली झाल्याने काळपट दिसणारी खडी , कडेच्या रुक्ष वातावरणात किंचित ओलसरपणा आणि कळकट पिवळे कपडे काढून कायाकल्प करून पोपटी झालेले कडेचे गवत ,राजबिंडे दिसणारे वृक्ष,मग हा वेगळाच मार्ग  आहे असे वाटायचे.खरोखर आजी-आजोबांना सोडून येताना घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटायचे .  पण शाळा आणि वडील हे दोन मोठ्ठे लोहचुंबक, त्यामुळे परतीचा प्रवास जास्त वेगाने होई. मराठी भाषिक राज्य सुरू झाले की वाटायचे चला आता आपले गाव आले. स्टेशनवर उतरवून घ्यायला वडील आलेले असायचे. कसलं मस्त वाटायचं त्यांना बघून!" काय ग सगळ ठीक ना?" एवढेच विचारायचे  मग आम्हा दोघींना काय सांगू आणि किती सांगू असं व्हायचं.
       त्यानंतर मी मेडिकलला असताना आई आणि मी परत दोघीच इंदोरला गेलो होतो.आता दोघींच्या भूमिका बदलल्या होत्या. आई प्रौढ तर मी तरूण त्यामुळे त्यामुळे दोघींचे रोल्स थोडेसे बदलले होते. आता आईला  संभाळून नेत होते मी. रात्री एका गावाला ओलांडून मधेच रेल्वे थांबली. बाहेर कुळकुळीत काळा काळोख! अचानक  डब्यात आठ दहा माणसं कुर्‍हाडी , बंदुकी घेऊन शिरले. उघडेबंब,धोतर, खांद्यावर कांबळ्, अंगांवर जखमांचे व्रण. हिंदी सिनेमात बघितलेले डाकूच जणू. आता झोपेचे सोंग घ्यावे का  उठावे हेच कळेना.गब्बर पासून सगळे डाकू डोळ्यासमोर  आले. आज पहिल्यांदा  आई माझ्या जीवावर निर्धास्त झोपली होती.    त्या क्षणी माझी अवस्था पूर्णतः बधिर  झाली होती. बहूधा जाग्या झालेल्या सह प्रवाशांची  तीच अवस्था  असावी. पण नंतर त्यांच्यामागे उभे असलेले दोन  पोलीस पाहिले. भानावर आल्यावर हळूच चौकशी केली तेव्हा ते आत्मसमर्पण करण्यासाठी  जाणारे डाकू होते. त्यावेळी जयप्रकाशजींच्या  आवाहनाला या  डाकूंनी  प्रतिसाद दिला होता.
       आत्ता पर्यंत आलेल्या अनुभवांवर कडी झाली काही वर्षांपूर्वी  . परत तोच प्रवास पण आता सोलापूरहून. आता मी माझ्या पाच वर्षाच्या मुलाला घेऊन आणि  वृध्द आई-वडिलांना घेऊन इंदोरला जाताना!.सुरवातीचा सोलापूर ते दौंड प्रवास तर छान झाला. दौंडला गेल्यावर कळले  गाडी चोवीस तास लेट. एक दिवस प्रतिक्षालयात काढला . अखेर रेल्वे आली.गाडीत आरक्षण असूनही मस्तपैकी पथारी पसरून कोणीतरी झोपलेले. लांबचा प्रवास, त्यात थकलेले आईवडील आणि  लहान मुलगा . आता तलवार,  दांडपट्टा, गनिमी कावा सगळ चालवावं लागणार होत.'जय भवानी जय शिवाजी ''हर हर महादेव ' चला आग्र्याहून सुटके पेक्षा रोमहर्षक  पध्दतीने अखेर जागा मिळवली.
          इंदोरहून परत येताना आणि वेगळीच त-हा. येताना पुण्यापर्यंत बसने यायचे ठरलं होत. बस रात्रीची! पहाटे पुण्याला पोहचणारी. महूच्या पुढे जंगलात गाडी आली अन् गाडीवर धडाधड दगड पडू लागले. लुटेरे-----डाsssकू असे कंडक्टर ओरडू लागला.त्याने हे नेहमीचेच असल्यासारखं पटापट बसमधिल तरूणांना  दांडकी  दिली. बायकांना डोकी खाली गुडघ्यात घालायला सांगितले. ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत बस तशीच रिव्हर्स  मधे न्यायला सुरवात केली. दगड अधिकच  वेगाने आपटू लागले. इतक्यात सुदैवाने मागून येणा-या चार बसेस आल्या तोवर दरोडेखोर पळाले होते. भरपूर अॅडरिनलीन रक्तात धमन्यातून  सैरावैरा पळत होते. पण शेवटी 'All is well that ends well'.
          अजूनही प्रवासातला' 'प्र' जरी ऐकला तरी आमचे कान टवकारले जातात. लगेच आम्ही गूगल गरूजींची मदत घेतो.प्रवासाचे बेत सुरू  करतो. ते करतानाही मस्त मजा येते. 
 प्रवास मग तो दोन पायांनी असो वा विमानाचा ,आम्हाला कुठलाच निषिध्द नाही .आम्ही दरवेळी तो तेवढाच रोमहर्षक  करतो.  आमच्या प्रवासाच्या वेडाची लागण आमच्या दोन्ही  मुलांनाही झाली आहे.  असेच उत्तरोत्तर  प्रवास घडू दे आणि या अप्रतिम ,सुंदर  धरती मातेला वेगवेगळ्या ठिकाणी आधिकाधिक भेटायची संधी मिळो.नवनवीन अनुभव घेऊन  अधिकच संपन्न, अनुभव श्रीमंत  आम्ही होवो. आमेन.

४ टिप्पण्या: