गुरुवार, ११ जून, २०२०

मुरलेले लोणचे

पूर्वी हिन्दी सिनेमात  हिरो एकमेकाद्वितीय ध्येयाने पेटलेले असायचे. ते असे हिराॅईनला पटविणे आणि थोडे तोंडी लावण्यासाठी  दुष्टांचा  नायनाट. मोठ्या हिकमतीने  हा  आपला हिरो अखेर हिराॅईनला पटवायचाच  . मग आनंददायी संगीत वाजू लागायचे . 'धी एंड' या सोबत एक वाक्य यायचे "  नयी  शुरुवात"  खर तर 'सिनेमा अभी बाकी है दोस्तो'. कारण  आत्तापर्यंत आपण बघितलेला असतो तो असतो ट्रेलर.  लग्नानंतर दोन अगदी वेगळ्या घरातले, वेगळ्या पध्दतीने जगणारे , अगम्य स्वभावाचे दोघे एकत्र येतात आता मात्र ख-या अर्थाने सिनेमाला सुरवात होते. नंतरची कथा अधिक रोमांचक! सर्व नवरस ठासून भरलेले. कोणी सांगत नाही पण थोड्याफार फरकांनी सर्वांची सारखीच, तितकीच वेगळीही! आज पसारा नीट लावताना आसपास  घडणा-या घटना, थोडा तुम्हारा थोडा हमारा मांडणार आहे.करकरत्या आणि आंबटचिंबट हिरव्यागार  कैरीच्या फोडीसारखे हिरो हिराॅईन एकत्र येतात.प्रेमाचे स्निग्ध तेल पडते आणि लोणचे मुरायला ठेवले जाते.

                           मुरलेले लोणचे

          सनईचे सुर घुमतात.' शुभमंगल सावधान! 'सावधान'' 'सावधान''सावधान'  भटजी महाशय आपल्या कमावलेल्या आवाजात परतपरत बजावतात. पण तिकडे लक्ष द्यायला नवरा,नवरी रामदास स्वामींसारखे द्रष्टे मुळीच नसतात. त्यामुळे एकमेकांच्या गळयात  वरमाला घालून ते  मोकळे होतात.जेवणावळी संपतात. नावासहित ती बदलते. नवे घर, नवी माणसं आणि सगळ्यात महत्वाचं ज्याच्यासाठी सगळं सोडलं तो आपला माणूस. दोघंही  करकरीत कैरीच्या फोडीसारखे.रेखीव   आणि एकसारखे .   तो एकुलता एक. थोडासा लाडावलेला पण साधा. तीही तिच्या  माहेरच्या घरातली  परीराणी. लाडूबाई.
                 त्याला मनापासून वाटत असतं  जगातली सर्वात सुंदर, हुशार ,गृहकृत्यदक्ष पत्नी आपल्यालाच मिळाली आहे.पाच ऐश्वर्या  आणि सहा माधुरी दिक्षित  एकत्र केल्या तरी हिची बरोबरी ?छे छे शक्यच नाही.  तो  या विचारात मश्गुल! तिच्या स्वप्नाळू डोळ्यात तो कर्तबगार ,अति हुशार, दहा ऋतिक रोशन ओवाळून टाकावं असा हँडसम. दोघे एकमेकांवर एकदम खूश.  थोडे दिवस जातात .कैरीला  तिखट-मीठ ,मसाला छान छान लागलेला असतो.
           तिच्या मग हळूहळू लक्षात येतं, 'छे बाई हा फारच आई आई करतोय. प्रत्येक गोष्टीत आईला कशाला  विचारले पाहिजे?" मनात नोंद घेतली जाते .त्या नव्या दिवसात त्याच्यावर रागवणे शक्य नाही म्हणून त्याच्या आईवरच थोडा राग निघायला लागतो.स्वयंपाक घरांत भांडी थोडी जोरांत वाजू लागतात. त्यालाही वाटतं ही उठसूठ  सारखी माहेरीच काय जाते? मग  तोही थोडा वैतागायला लागतो. तिच्या लक्षात येतं हा जरी आपल्या भोवती, भोवती करत असला तरी आपल्याला अनेक सवती आहेत.नंबर एकची सवत म्हणजे त्याचे मित्र त्यांचा पत्त्यांचा ग्रुप, त्याचं तिला सोडून ट्रेकिंगला जाणं! .अजून घरात लहान बाळ नसल्याने  त्याच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवण्याची तिची इच्छा. त्याच्यावर कोणी अधिकार दाखवला की तिचा तडफडाट. तिच्या अजून लक्षात येऊ लागते आपल्याला वाटला तेवढा काही हुशार नाहीये.  डॅशिंग तर अजिबात नाहीये . किती तरी अव्यवस्थित!  कंजूस क्रमांक एक! तो देखिल विचार करत असतो ,कसली आळशी आहे ही बया, सकाळी कधी म्हणून वेळेवर उठत नाही. जरा मित्रांबरोबर गेलं तर हिची आदळ आपट सुरू!  तिखट मिठ मसाला लावलेल्या कैरीच्या फोडी आता घुसमटत असतात.त्यांच्या कडा सारख्या एकमेकांवर घासत असतात.
               एकदा कधीतरी स्फोट होतोच. तू तू मी मी चा खेळ रिंगण धरतो. जणू गोल गोल राणी,इथे इथे पाणी
 तो.--समजतेस कोण स्वतःला. तुझ्या पेक्षा सरस  छप्पन मिळाल्या असत्या------------
ती - मग करायचे होते त्या छप्पन जणींशी लग्न आणि बसायचं होत आपल्या जनानखान्यात हुक्का पित! तुझ्या अव्यवस्थित पणा पासून माझी सुटका झाली असती.
तो------
ती------'
धडाsssम. धुsssडूम जोरदार लक्ष्मी तोट्यांची आतिशबाजी 
  सुरु!. आता खबरदारी घ्यायची असते पाणी डोक्यावरून  न जाण्याची!मग नशिबाला दोष देणे ,अश्रुपात इत्यादी कार्यक्रम सर्व ठरल्याप्रमाणे होतो.रागावून तो घरातून जातो मग मात्र ही काळजीत पडते रात्री उशिरा  तो परत येतो पण अजून घर धुमसतच असते. दोन दिवसाने आठवणीने तो तिच्यासाठी भेटवस्तू आणतो, आणि ती खास त्याच्या आवडीचा पदार्थ करते.त्याच्या किंवा तिच्या  विरोधात जर कोणी ब्र काढला की मात्र दोघेही 'हातोमे हात' लेकर सज्ज! .लढाईचा पवित्रा घेऊन.मग विरोधकांची होते पळता भुई थोडी. आता कैरीच्या फोडींवर स्निग्ध तेलाचा तवंग चमकू लागतो.कैरीच्या फोडी शांत होतात. कधी कधी मात्र तिचा मित्र किंवा त्याची मैत्रीण  उगाचच संशय पिशाच्च  निर्माण करतात.कधी इतर 'षड्रिपू ' डोके वर काढतात. अशा अवघड परिस्थितीमध्ये आठवायचे भटजींनी बजावून सांगितलेले  'सावधान'.वेळ कसोटीची असते. 'सावधान'चा भटजींनी दिलेला इशारा आठवून सावध व्हायची हीच वेळ.नाहीतर लोणच्याला बुरशी येणारच.मग टाकण्या शिवाय इलाज नाही.असेच कधी तरी दोघांच्या इगोच्या टक्करीत होते.कुणीच मध्यम मार्ग शोधत नाही आणि लोणचे पूर्णतः नासते.
               बाळाची चाहूल लागते घरकाम नोकरी आणि आता बाळाची जबाबदारी वाढते. अपेक्षा एकच याने थोडीशी मदत करावी. तो शहाणा  असला तर मदतीचा हात पुढे करतो. बाळाला सांभाळतो. रात्री जागतो सुध्दा. ती मात्र कामाला एवढं जुंपून घेते की आपला दिवस चोवीसच्या ऐवजी छत्तीस तासांचा का नाही हे कोडं तिला पडतं.त्याच्यापेक्षा बाळात ती जास्त गुंतत जाते. सर्व आघाड्यांवर लढता लढता ती पूर्णपणे थकते. जर तो खुशालचेंडू असला तर एक छोटासा व्रण  त्याच्याबद्दल तिच्या मनात निर्माण होतोच.कधी कधी संसारात अडचणी येतातच. कधी आर्थिक टंचाई , कधी अकाली मृत्यूची सुनामी . त्याला मात्र दोघेही  एकमेकांच्या साथीने तोंड देतात.
 मधुनच मतभेदाचे लवंगी फटाके फुटत असतातच. पण त्यात पूर्वीच्या लक्ष्मी छाप बाँबचा धमाका नसतो. थोडा  रूसवा फुगवा पण असतो पण तेवढ्या पुरतेच.  लोणच्यातील कैरीच्या फोडी धड करकरीत नाही अन् धड मऊ नाही अशा.
           मुले मोठी होतात दोघांच्यात संवाद जरा कमी झाला असतो. पण इतक्या दिवसात एकमेकांची इतकी सवय झाली असते की तरुणपणी डाचणारे त्याचे मित्र, अव्यवस्थितपणा याचा इतका त्रास होत नाही. त्याच्या आईचा  पण आता राग येत नाही. दोघींच्यामधे वेगळाच बंध तयार होऊ लागतो.  तो मुलांचा अभ्यास तर घेतोय, मुलीला क्लासला सोडतोय याचं कौतुकच वाटतं. अधुन मधुन  शब्दांचे फटाके उडतात पण बरेचसे फटाके फुसकेच असतात .त्यात पूर्वीचा दम नसतो.कोणीच फारस मनावर घेत नाही.  कैरीच्या फोडी आता थोड्या मऊ. वर लालेलाल खार! तोंडाला पाणी सुटेल असा.
            मुलं आपापल्या घरट्यात जातात.घरातले वडिलधारेही एक एक करून न परतीच्या प्रवासाला जातात. जिथून सुरु झाले तिथेच वर्तुळ पूर्ण होतं सिनेमा संपत आला असतो. आणि नव्याने सुरू होतं नव आयुष्य! ते दोघंच आता. एकमेकांच्या कुठल्याच गोष्टीचा त्रास होईनासा  होतो. आणि उरते एकमेकाबद्दल  प्रचंड काळजी आणि आत्मियता . मैत्रिणींनी किंवा मित्राने बोलवले तरी एकमेकांना सोडून जायला नको नको वाटू लागतं. औषध घेतलं की नाही, ते रात्री झोप का नाही लागली तिथपर्यंत नुसती काळजी! अर्थात भांडण हे जन्मसिद्ध हक्क असल्याने आता फक्त फुलबाजा तडतडतात पण तेवढ्याच! आता तुझं माहेर, तुमचे आई-वडील, या विषयातला रस पूर्णपणे संपला असतो. आता त्याच्या  नुसत्या 'हू' मधला  सर्व अर्थ तिला कळतो तर तिच्या आईsग या उच्चारातल्या तिच्या वेदना त्याला समजतात. 
       लोणच्याची बरणी उघडली तर मस्त खमंग वास सुटलेला असतो हिंग, मेथ्या, मोहरी घमघमत असतात.वर लालेलाल तेलाचा खार!   खाली मऊ आतपर्यंत तिखट-मीठ मसाला मुरलेल्या फोडी एकमेकांना खेटून बसलेल्या असतात आणि सर्वजण म्हणतात वाssss लोणचं छान मुरले हो!

५ टिप्पण्या:

  1. संसाराच्या निरनिराळ्या stage चे अतिशय सुंदर वर्णन.

    उत्तर द्याहटवा
  2. गतकाळातील टिकाऊ, आवश्यक, सर्वत्र हमखास आढळणारा पदार्थ.त्याची 'रेसिपी' छानच जमलीय.मुरलेले लोणचे आता अभावानेच सापडते.'गोइंग स्टेडी', 'लिव्ह इन', ' इन रिलेशनशिप', 'ब्रेक अप', इ. नवीन झटपट पदार्थ लोकप्रिय व्हायला लागले आहेत (त्याची खंत नाही पण नोंद घेतो आहे एवढेच).

    उत्तर द्याहटवा
  3. कधी कधी वाटले की हीला आपल्या धरातले ईतके डीटेल्स कसे काय कळले, अतीशय ऊत्तम रेसीपी॰हीच का ती लहान पणीची अखंड बडबड करणारी कीरण असा प्रश्न पडतो.

    उत्तर द्याहटवा