शुक्रवार, १५ मे, २०२०

शब्दांचा ठेवा©️



इंदोरची आज्जी तिथल्या कामगारांशी हिन्दी मधे बोलायला लागली की आमचे खुसुखूसु हसणं सुरू व्हायच. आज्जी मुळ कोकणातील. इंदोरला वर्षानुवर्ष राहूनही तिचे राष्ट्रभाषा बोलणे म्हणजे आनंदी आनंद!,"आजी तू इथल्या लोकांची हिन्दी बिघडवतेस बघ" ही आम्हा नातवंडांची कायमची तक्रार!. आजीचे उत्तर एकच"अग, कोणाच्या मनाचं दार उघडायचं असेल तर त्याच्याच भाषेत बोलायला हवे."आजीची कोणाशीतरी कोकणीत गप्पा मारायची इच्छा मात्र कधीच पूर्ण झाली नाही. आजोबांना कोकणीचा गंध नव्हता.आज आठवणींचा पसारा आवरताना हे सगळच फार फार आठवत होत.वाईटही वाटत होत.


              शब्दांचा ठेवा©️

               खरं तर परवा गंमत झाली .घरी पाहुण्या आलेल्या वहिनींनी आपल्या दोन वर्षीय बाळाला कौतुकाने सांगितलं "सोनू गोष्ट सांग बघू" आणि मला पूर्णतः अनोळखी भाषेत  सोनुने गोष्ट सुरु केली. गोंधळलेल्या आणि कौतुकाच्या नजरेने हे काय चाललय म्हणून पाहीपर्यंत, वहिनी  आपल्या  सोन्याकडे  प्रेमाने बघत म्हणाल्या "किती छान सांगितली न गोष्ट,तहानलेल्या कावळ्याची "छान मराठी बोलतो हो सोनू"!इतक्या वेळ मी  मूढा सारखी विचार करत होते एवढे छोटे पिल्लू मल्याळी ,स्पॅनिश अशी कोणती तरी अगम्य भाषा कुठे शिकला असेल ? मी आपली विचारमग्न!  अरेच्चा! सोनूने आपल्या  बोबड्या  न कळणा-या शब्दांनी जगप्रवास करून आणला आहे की!  तो देखील आपल्या  मायमराठीतून . मला भले न कळो पण वहिनींना त्या गोष्टीतला शब्द न शब्द व्यवस्थित कळला होता. मनात विचार आला आईला  समजतात  ते बोल म्हणजेच   'मातृभाषा'.
                खर तर मातृभाषेची व्याख्याच करायची तर  जन्माला आल्यापासून  जी भाषा शिकतो आणि नंतर आपल्या विचारांना, भावनांना जी भाषा योग्य आकार देते ती 'मातृभाषा'. बिरबलाच्या प्रसिद्ध गोष्टीतील व्यापारी जेव्हा दरबारात येऊन अनेक भाषा सहजतेने बोलतो आणि याची मातृभाषा कोणती असं बादशहा बिरबलाला विचारतो ,तेव्हा बिरबल एक युक्ती करतो. रात्री व्यापारी झोपला असताना त्याच्यावर पाणी ओतून उठवतो आणि उठताना व्यापारी त्याच्या मातृभाषेत ओरडत उठतो. मातृभाषा फक्त आपली असते आपल्या माणसांसाठी बोललेली,आपल्या माणसांकडून  शिकलेली .ना तिला कुठल्या बदलाचे वावडे ना नवनवीन लकबी आत्मसात करण्याचे दु:ख! .
              भाषेच्या संदर्भात  लहानपणची आठवण म्हणजे इंदोरचा आजोळचा प्रवास! भला लांबलचक प्रवास होता तो! जवळजवळ दोन दिवस लागायचे. आजोळी जायचं म्हणून पौर्णिमेच्या चंदामामा सारखा दुधाळ  उत्साह मनावर फेसाळत असायचा पण माय मराठीशी काही काळ फारकत या कल्पनेने मनावर थोडी काजळीही  धरलेली असे. इंदोरहून परत येताना भुसावळ येताच लाल डगले वाले 'कुली' जेव्हा 'हमाल' व्हायचे तेव्हा  मराठी भाषिक प्रांतात शिरण्याची पहिली खूण लक्षात यायची.  मनाच्या चांदोबाचा सोनेरी सोनेरी लखलखता सूर्य व्हायचा.
        प्रत्येकालाच आपली मातृभाषा अतिप्रिय! अशावेळी मनात सहज विचार येतो त्या 'आदी' शब्दाचा! लाखो  वर्षापूर्वीचे चंद्र- सूर्याच्या किरणांना ही प्रवेश नाही असे काजळलेले महाकाय अरण्य! मोठे भयावह प्राणी! या प्रतिकूल परिस्थितीतही अपार जीवन लालसेने संकटांना शह देणारा तो आदी पुरुष आणि ती आदी स्त्री .वणव्याने जळणाऱ्या  जंगलाकडे आपल्या निरुंद केसाळ कपाळाच्या खोबणीत लपलेले डोळे रोखून पहात असताना त्यांच्या मनात कोणते शब्द उमटत असतील? त्यांनी अखेर दगडावर दगड घासून पहिली ठिणगी  पेटवली असेल ती लपापताच झालेला आनंद त्या आदी स्त्री-पुरुषांनी कसा व्यक्त केला असेल? भूभूत्कार  करून? छाती ठोकून ?आपल्या स्त्रीला कवेत घेऊन? आपले अजानुबाहू पसरून नाचत ओरडून? भाषेशिवाय शब्दांशिवाय त्यांनी आपला विजय कसा व्यक्त केला असेल या उत्सुकतेपोटी 'गुगल 'गुरूजींना मी शरण गेले. गुगल गुरूजी म्हणाले 'तथास्तु ' गुरुजींनी उच्चारले 'खुलं जा सिम सिम' मग फटाफट अनेक पर्याय समोर ठेवले. त्यातील एक म्हणजे 'आssह ' हा तो प्रथम उच्चारलेला शब्द. शब्दातून ध्वनीत होते संकटाची सुचना.या शब्दानंतर भाषा अनेक रूपांत समृद्ध होत गेली.
                 विकसनशील आदिमानवाने कोणता शब्द उच्चारला होता याचं तर उत्तर मिळालं पण ती आदी स्त्री  आपल्या बाळाला जिवापाड जपताना केवळ स्पर्शाने, नजरेने प्रेमाचा  नैसर्गिक बंध बळकट करत असेल?.आदिमानवाला भय, प्रणय ,वात्सल्य ,मत्सर या भावना शारीरिक पातळीवरच जाणवत होत्या,त्यांना शब्दरूप नव्हते. आणि हळूहळू त्यांना शब्दरूप दिले गेले. विचारांचे शब्द आणि त्यातून भाषा असा हा भाषेचा प्रवास.
       . निसर्गाचे ऋतुचक्र जसे अव्याहत फिरते तसेच प्रत्येक पिढीत बदललेली भाषा देखील .संस्कृती प्रमाणेच भाषा प्रवाही आणि सर्व समावेशक असते.म्हणूनच मध्ययुगीन 'ओवी' कितीही गोड वाटली तरी आपली बोलीभाषा' ती 'नसते. शिवकालीन काळ आपल्या अस्मितेचा, जिव्हाळ्याचा पण आपण भाषा बोलतो तर ती शिवकालीन नाही तर सध्याची संकरित आणि नव संस्कारित. आज नवऱ्याला अरे म्हणण्याच्या काळात दिव्य प्रतिभेच्या गडकऱ्यांच्या सिंधू सारखे' इकडून' येण झालं हे बोलण सलज्ज, मान मर्यादा ठेवणारे न वाटता हास्यास्पद वाटते. आमच्याशी बोलताना मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटुंबात रुळलेले शब्द उच्चारणारा, माझा मुलगा मित्रांमध्ये मात्र वेगळीच भाषा केव्हा वापरू लागतो तेच कळत नाही. पण भाषेतला हा बदल अपरिहार्य आहे एवढे मात्र नक्की.
      गम्मत म्हणजे इंदोरला आजोळी  गेल्यावर मामा आणि आई एकमेकांशी बोलायचे खास खुमारीने.खास इंदोरी मराठी. अगदी तुझं आहे तुझं पाशी या नाटकातील  काकांजी सारख. "अरे यार करून तर राहिले न. कशाला  बकबक करून राहिलास?" आई असं बोलायला लागली की आम्हा बहीणींची मात्र मस्त करमणूक व्हायची.मग मी आणि बहिण आमचा हुकमाचा एक्का म्हणजे आमच्या दोघींचीच खास 'पट' ची भाषा  सुरू करायचो .खास आमची दोघींची,दोघींनी तयार केलेली 'पट'ची भाषा!. सगळ्या भावंडांची एकदम भंबेरी  उडायची.'च' च्या भाषेपलीकडे कोणाचीच झेप नसायची.लहान भावंड तर बिटबीट नजरेने नुसतं बघतच रहायची.
              एक गोष्ट मात्र निश्चित प्रत्येक भाषेला स्वतःची खास खुमारी आहे. सीमाभागातील भाषेमध्ये म्हणूनच  भाषांच्या मिश्रणातील गोडीमुळे विलक्षण मिठ्ठास आलेली आहे. माय मराठीला कानडी झुल्यात बसवून हेलकावे घेणारी बेळगावी मराठी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते. तर कानडी मराठीच्या जोडीला खुमासदार उर्दू आली की किंचित उग्र  अबे काबेची  सोलापुरी कानावर येते."अबे तिन केलतन् काम. कशाला बे उगा बोंबलतो" हे खाssस सोलापूरी! खमंग सोलापुरी चटणी आणि भाषा सारखीच. कोल्हापुरी भाषा तेथील' 'पावण्यासारखीच'  शिस्तीत येते. सांगली वरील पुणेरी भाषेची छाप लपता लपत नाही. मुंबईकर बोलायला लागला की काssssय रे! असाच लांबलचक हेल काढतो .  व-हाडी भाषा तेथील दिलदार लोकां सारखी. पुणेरी मराठी मात्र अनुनासिक आणि टोकदार रोखठोक. आपली मराठी भाषाच जर एवढ्या इंद्रधनू स्वरुपात येत असेल तर इतर भाषांचे ही असेच फुलोरे असणार. भाषेचे कंगोरे,सौदर्य, कोलांट्याउड्या  शिकणं त्यात चिंब होणे म्हणजे आनंदोत्सवच! जणू आईच्या मांडीवर बसून केलेला धुडगुस!
            एकदा  आमची मात्र गंमत झाली. आता मायबोली मराठी, राष्ट्रभाषा हिंदी, वाघिणीचे दूध इंग्रजी, यावर पुरेसे प्रभुत्व असल्याने आपल्याला आपल्या देशात कधीच काही अडचण येणार  नाही या ब्रह्म कल्पनेला दक्षिणेकडील प्रवासात पूर्णपणे सुरुंग लागला. बेंगलोरहून उटीला जाताना रानातील तो सुनसान लांबलचक रस्ता.चंदनचोर वीरप्पन ची भीती आणि आम्हाला अगम्य असलेल्या भाषेत असलेल्या मार्गदर्शक पाट्या. आपल्या उच्च शिक्षणा बद्दलचा आमचा अभिमान कधीच गळून पडला. येथे तर आम्ही पूर्णपणे निरक्षर ठरलो होतो .अखेर आमच्या बरोबर असलेल्या एकाने त्या भाषेतील नवसाक्षराने अंकलपीच्या तालावर त्या पाट्या कशाबशा वाचल्या आणि आमचा प्रवास सुरू झाला.
          अशा अनेकांच्या अनेक मातृभाषा, त्यांनी जोडलेली मनाची बेटे. भटकंती करताना सहजच कुठल्यातरी दूरस्थ परक्या जागी मराठी शब्द कानी पडावेत त्यावेळी खरोखर स्वर्गस्थ आई भेटल्यासारखा आनंद होतो.प्राणी आणि पक्षी, अगदी डाॅलफीन सारखा जलचर यांची वेगळीच भाषा असते. लहानपणी वाचलेल्या गोष्टीत पक्षांची भाषा जाणणारा एक चतूर शहाणा असेच .मला त्याचा नेहमीच हेवा वाटे.
       भाषा म्हणजे परस्परांशी संपर्काचा मार्ग.अक्षरांचे शब्द शब्दांची वाक्य आणि वाक्यांची भाषा त्यातील अर्थांची ओझी वाहतात शब्द .ते शब्द फुंकर घालणारे ,लाजवणारे ,प्रेमळ ,दुखावणारे , आपलेसे वाटणारे कधी दूरस्थ. कालप्रवाहात ते उत्क्रांत होत गेले तरी या शब्दात भावनांची मुळे त्या आदिमानवाने घट्ट रुजवली आली आहेत. त्या प्रथम 'अssहा'शब्दापासून ते आजच्या भाषे पर्यंत .
      भाषेच्या श्रेष्ठत्वा बद्दल एकमेकांचे वाभाडे काढणाऱ्या सर्वांनाच हे सांगायची वेळ आली आहे,  हा शब्दांचा ठेवा जपायचा आहे वाढवायचा आहे. त्याच्या छायेत राहायचं आहे. समृध्द व्हायचे आहे.त्या आदीमानवाने भाषेचे बीज दिले.त्याचा झालेला वटवृक्ष आपणच संभाळणार आहोत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा