शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०२०

डाकिया डाक लाया-----©️

 


माझ्या पिढीतील सर्वांनाच 'पोष्टमन' या नावाभोवती असलेलं खास वलय अगदी छान माहीत  आहे. आपल्याभोवती अनेक सुखदुःखाचे प्रसंग गुंफण्यात तो निमित्त मात्र! स्वतः मात्र कमलपत्रा सारखा अलिप्त!  दिवाळीला एक दिवस दिवाळीचा फराळ आणि खुशी घेतल्यावर कळायचं की पोष्टमन काका  हसतो सुध्दा. त्या दीपावलीच्या  दिवशी आवर्जून  सर्वांची चौकशी ते करायचे .त्या दिवशी नेहमी एखाद्या  यंत्रमानवासारखे वाटणारे काका एकदम आपले जवळचे कोणीतरी वाटत.माझ्या लहानपणापासून त्यांना 'काका' ही उपाधी मिळाली आहे ती अजूनही तशीच!

        आज इतर अनेक सोयींमुळे पोस्टमन काकांना घरातल्या अडगळीतल्या वस्तूंची कळा आली असली तरी पोष्टमनचा सुवर्ण काळ ज्यांनी अनुभवला आहे,ज्या पोष्टमनची वाट प्रिय व्यक्तीपेक्षा कांकणभर जास्तच बघितली गेली, त्या पोष्टमन काकांच्या अनेक आठवणी अनेकजणांना  नक्कीच  असतील.काहींनी त्यांना नुसतं गृहीत धरले असेल आणि कालौघात त्यांच्या उरल्या सुरल्या आठवणी पुसून टाकल्या असतील.

  आजचा पसारा पोष्टमनच्या नावे आवरणार आहे.त्या आठवणी आवरता आवरता परत ताज्या करू या.


         डाकिया डाक लाया---------- ©️



          एखाद्या नोकरीत सर्वात जास्त बहूरूप्याच काम जर कोणी केल असेल तर त्यात बराच वरचा नंबर द्यावा लागेल  निरोप्याला, म्हणजे आधुनिक युगातील पोष्टमनला . अगदी अथर्ववेदांतही त्यांचा उल्लेख आहेच.निरोप देणारे मग कितीही दूर जाऊन तो देणे असो त्याला गौरविले आहे कित्येक वर्षांपूर्वीच्या अथर्व वेदांत!

    रामायणात तर पोष्टमन  असतो बलदंड ,रामभक्त हनुमानाच्या रूपात, म्हणजे आजच्या पोष्टमनचे शांत स्थितप्रज्ञ रूप मात्र या निरोप्याने मोडीत  काढले होते आणि लंकादहनाने रावणाला स्वसामर्थ्याची चुणूक दाखवली  होती.अर्थात  देवांना आपले मानवांचे नियम कुठे लावतात? 

           कधी पोष्टमनने पक्षीरूपातही निरोपाची देवाणघेवाण  केली आहे. डौलदार आणि वळणदार मानेचा राजहंस आपला मानसरोवरातील कमलांचा परागचारा  सोडून  दमयंतीकडे जाऊन नलराजाचा निरोप देत असेल तेव्हा इतका कमनीय आणि नितांत सुंदर  तो  राजहंसाच्या रूपातील आदि पोष्टमन  बघून दमयंती म्हणत असेल "हा निरोप्या इतका सुंदर तर याचा स्वामी किती सुंदर असेल?! नल-दमयंतीसाठी राजहंस ठीक आहेत हो पण इतर राजे, जमिनदार निरोप्या म्हणून कबुतरांचा भरपूर उपयोग करून घ्यायची. गुट् ssर गू करत या रूपातही या पोष्टमनचे काम चोख! मग ते प्रेमपत्र असो वा युध्दाची गोपनीय माहिती!

     चाणक्याने सुध्दा चाणक्यनीतीत त्यावेळच्या पोष्टमनकाकाची खास दखल घेतली आहे. पण नंतर मात्र अनेक राजांनी ज्याचे रनिंग सर्वात भारी त्याला पोष्टमनकाकाची नोकरी पक्की केली. हातात घुंघुरांची काठी, त्याला गाठोड्यात बांधलेल्या चिठ्ठ्या, खलिता, वस्तू आणि असला तर  दवंडी साठी दणदणीत आवाजाचे वाद्यं  घेतलेला सहकारी. मग निघाले हे पोष्टमनकाका पळत! उन्हाळा पावसाळा थंडी कशाचीही पर्वा  न करता. रोज शंभर मैलाचा पल्ला तोही घनदाट जंगलातून ! बापरे बाप!!! काही काळाने पोष्टमन काकांना मिळाली पदोन्नति आणि दोन पायांऐवजी मिळाला मस्तपैकी घोडा. पण परत टांगती तलवार आहेच. कुठल्याही राजाला खलिता दिला आणि त्याला मजकूर नाही आवडला तर काय होईल ते सांगणं अवघडच.मग कधी कैदेत सडावे लागायचे तर कधी एकदम शिरच्छेदाची भीती. राजा शहाणा असला तर हा बिच्चारा फक्त निरोप्या आहे म्हणून   सोडून द्यायचा. तेव्हा भारतातून निरोपे जायचे थेट पर्शियापर्यत!

     पोष्टमन काकांचे  अशा अनेक कष्टांच्या पाय-या चढणे चालूच होते. मोगलांनी, इंग्रजांनी आपापल्या परीनं याला थोडे सुकर बनवायचा यत्न केला. पण अनेक शतकं इतक्या कष्टाचे काम प्रामाणिकपणे केल्यामुळेच पोष्टमन काकांच्या स्वभावात एक स्थितप्रज्ञता, अलिप्तता आली असावी. एकाच निर्विकार वृत्तीने पुत्रप्राप्तीचे पत्र आणि म्हातारीच्या मृत्यूचे पत्र, दोन्हीचे वाटप ते करू शकतात.

         खाकी कपड्यातील पोष्टमन अगदी ठराविक  वेळेला सायकलवर आमच्या गल्लीच्या  टोकावर येत असे.कानावर अडकवलेले पेन. डोळ्यावर गोल चष्मा ,बारीक लाल कडा असलेली खाकी टोपी आणि तसाच खाकी ड्रेस. एखाद्या माणसाचे दर्शनही किती आनंददायी  असते हे गल्लीतल्या रहिवाशांच्या  हालचालीवरून लक्षात यायचे. शेजारी शिक्षणासाठी रहाणारे विद्यार्थी घरच्या पत्तुराची वाट बघतच असायचे, तर काही  येणा-या पैशांची !. नाना आपल्या सैन्यातील मुलाच्या खुशालीची, पलीकडच्या काकी गावाला गेलेल्या काकांच्या पत्राची.कुणी कुठे नोकरीचा अर्ज केलाय त्याच्या उत्तराची आतुरतेने वाट पहात असत. आमच्या घरी तर बहिणीचे नुकतेच लग्न ठरलेले त्यामुळे पोष्टमन यायच्या सुमारास तिच्या सारख्या दारापर्यंत फे-या आणि आमचं खुदुखुदू हसणे सुरू असे. पोष्टमनच्या हातात ते निळसर पाकिट पाहिल की आनंद, उत्सुकता , किंचित लाजणं याचं एक झकास मिश्रण तिच्या चेह-यावर व्हायचे. मग काय आमचं चिडवणे सुरूच!  

              पोष्टाची 'तार' या प्रकाराबद्दल मात्र सार्वत्रिक  भीतिच असायची. तार म्हणजे वाईट बातमी. तार आली एवढी बातमी आली की घरभर अक्षरशः सन्नाटाच  पसरे. लहानपणी माझ्या घरीही सहा महिन्याच्या अंतरांनी आलेल्या दोन्ही 'तारा ' अतिप्रिय व्यक्तींच्या  मृत्यूच्या होत्या.त्यानंतर घरात उसळलेला कल्लोळ म्हणजेच तार असे समीकरण माझ्याही डोक्यात फिक्स झालेले. 

          अगदी ठरवून   मुद्दाम पोस्ट  ऑफिसमध्ये  जाऊन तार कशी पाठवतात ते पाहिले आणि ते कडाsssड कट् कड करणारे छोटेसे मशिन  म्हणजे बशालकृष्ण मुखातील ब्रम्हांडासारखे वाटले. अनेक निरोप एकवटले होते त्या कssड् sकट्ट मधे. तार जितकी गंभीर त्याहून जब-या आहे तिचा विनोदी स्वभाव हे तेव्हाच लक्षात आले!  प्रत्येक मजकूरासाठी एक कोड नंबर होता पण कधी कधी  तारयंत्र वापरणा-या पोष्टमन कडून भलताच नंबर टाकला जायचा.त्यामुळे व्हायचं काय वधूवर लग्नमंडपात असताना आणि भटजी तार स्वरात शुभमंगल सावधान म्हणून सावध करत असताना लग्नाला येऊ न शकलेल्या काकांची तार यायची रमेश यास पुत्रप्राप्ती झाली. अभिनंदन. बिचारा रमेश मनात म्हणे मी अजून वधूच्या गळ्यात माळही घातली नाही तोच मी पिता कसा झालो ?अचंबित!

       कधी कधी तार येताच न वाचताच रडण्याचा धुमाकूळ  उठायचा, मग पोष्टमन हळूच तार वाचून दाखवायचा त्यात दुसरीच आनंददायी बातमी असे.अशा गमती पण घडत. 

       पोष्टमन काका खेड्यात पत्र देखिल वाचून दाखवतात.स्वतः न गुंतता सुखदुःख वाटत जायचं म्हणजे खरच कष्टाचे काम! कोणाचे अश्रू पुसायला न थांबता किंवा आनंदात सामील न होता हा महाभाग पत्र वाचले की पुढच्या गल्लीत सटकतो. श्रीमद्भगवदगीतेतील " कर्मण्येवाधिकारस्ते------ ह्या वर्णनात  तंतोतंत बसतात पोष्टमन. ऊन वारा पाऊस, पूर ,आग दुष्काळ  हे सारे इतर जनांसाठी पण हे अस्तित्वातच नाही अशा आसोशीन काम चालते पोष्टमनकाकांच. त्यात बारीक गल्लीबोळात जिथे एकाच आडनावांचे अनेक आडनावबंधू एकवटले आहे तिथे कोणी ठराविक नारायण कुलकर्णी  शोधून त्याचे पत्र त्याला देणारा  हा माणूस खरतर धनंजय कथांमधील डिटेक्टीव्ह पेक्षा ही चतुर आणि चाणाक्ष!

       पोष्टमनचे पोष्टखाते हा एक वेगळाच महाविषय आहे. इंग्रजांच्या काळात नेटकेपणी तिकीट  आकारणी करून सर्वसामान्यांसाठी सुरू झालेली डाक सेवा अजूनही आपले स्वप्न वाटण्याचे काम नियमित  करते आहे. आता तर स्त्रीयांनीही ही निरोप्याची भूमिका स्विकारली आहे 

        तार सेवेने मात्र काही वर्षांपूर्वी आपले कड्कट्ट थांबवले आहे. आता इतर अनेक साधने उपलब्ध  आहेतच म्हणा. ज्या आपल्या परदेशस्थ प्रियाला पत्र पोहोचायला महिनेन महिने लागत तेथे शब्दशः क्षणात निरोप जाण्याची किमया सुरू झाली आहे. पण तरीही प्रियजनांना पाठवलेली पत्रे, ती लिहीताना मनात उठलेले तरंग, पत्र टाकल्यावर अरेच्चा असे उगाच लिहीले म्हणून हळहळणे हे सर्वच भूतकाळात जादूई यक्ष बनून थांबले आहेत. म्हणून जुने पत्र आज वाचताना खूप छान आनंदाची पखरण करते.

           आज जरी पोष्टमन काकां बरोबर पत्रांची देवाणघेवाण नसली तरी अजूनही पोष्टमनला पहाताच तीच उत्सुकता, तीच प्रियजनांचे पत्र मिळण्याची हुरहूर नेहमीच वाटते. आज हाडामासांच्या जीवंत माणसाची बरोबरी किंवा वरचढपणा नवीन तंत्रज्ञान  करते आहे. ते जलद आहे, सोईचे आहे कबूल. पण अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत  आयुष्याचा न जाणवणारा पण महत्वाचा भाग होता पोष्टमनकाका! नवयुगाच्या रेट्यात ज्या वेगाने तो  बाहेर फेकला आहे तो वेग बघूनच खरच भीती वाटते. आज जात्यात पोष्टमन काका आहेत पण उद्या? कदाचित उद्या आपणही सुपातून जात्यात जाऊ. कालाय तस्मै नमः!

        

 माझे इतर ब्लॉग्स वाचण्यासाठी खालील लिंक वापरावी. 

https://drkiranshrikant.pasaara.com 

३ टिप्पण्या: