शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

आकाशवाणी ©️

 




             आठवणींचा पसारा आवरताना आठवतो रेडिओ. एखाद्या मित्रासारखी त्याची साथ होती. 'होती 'अस भूतकाळात कसं बोलू? बोलायलाच नको कारण हा मित्र अजूनही आवडता आहेच.पण वेगळ्या रुपात तो भेटतो .आता त्याच्याबरोबर टि.व्ही सारखे नवे मित्रही मिळाले आहेत.पण नवे मित्र मिळाले तरी हा जुना मित्र तेवढाच प्रिय आहे.

.              काही  दशकांपूर्वी घराघरात मोक्याची जागा अडवून बसलेला हा पाहुणा ,पाहुणा न रहाता आपल्या घरातील लाडका सदस्य सहजतेने झाला . अगदी आजी ते बाळापर्यंत सर्वांचाच 'नारायण' आणि नारायणकाका झाला. माझ्या पिढीतील आणि आधीच्या पिढ्यांच्या मर्मबंधातला रेडिओ. आज त्याच्या आठवणींचा पसारा आवरणार आहे.


                           आकाशवाणी. ©️


                           शाळेत असताना आणि आधी सक्काळी सक्काळी  जाग यायची ते रेडिओच्या टीडीडीs sssडीडीडी---- या खास आकाशवाणीच्या सिग्नेचर सुरावटींने.  आता उबदार पांघरूणाशी फारकत होणार याचा अंदाज आलेला असायचा. भल्या सक्काळचे सहा वाजायला काटे धावत असताना रेडिओ जणू बजावायचा ,'उठा आता'. पाठोपाठ भक्तीगीत सुरू व्हायची.रामाला, कृष्णाला उठवताना कौसल्या माऊली आणि यशोदा मैया कसल्या प्रेमाने ओथंबलेल्या स्वरात आर्जवी गीत आळवायची. कौसल्या  माऊली तर ' उभी घेऊनी कलश   दुधाचा" अशी प्रेमाने उभी! पण आमच्या मातोश्री मात्र कमरेवर हात ठेवून उभ्या. आधी प्रेमाने उठाss व्हायचं, नंतर धमक्या सुरू व्हायच्या. "आता उठता की पाणी टाकू"? भक्तिगीत संपत आल्यावर अखेर अंथरुणाला अलविदा करून आम्ही उठायचो.आन्हिक आटपेपर्यंत उदबत्तीचा वास घरभर दरवळत असायचा.  पुराने फिल्मी गीत सुरू झाले असायचे. आई बाबांचे सर्वात आवडतं गाणं म्हणजे कुंदनलाल सैगल. बरोबर आठ वाजता.त्या वयात त्या स्वरांची जादू फार कळायची नाही.कारण आम्ही गुंतलो असायचो "चाहे कोई मुझे जंगली कहे" या गाण्यात.

          आकाशवाणी  हे नावच असल भारी वाटायचे नं! कृष्ण जन्मानंतर कंसाने ऐकलेली आकाशवाणी किवा कोणा पृथ्वीतलावरील मानवाला चांगली -वाईट बातमी द्यायला आकाशातून दिलेली घनगंभीर सूचना म्हणजे आकाशवाणी. त्या तेहतीस कोटी देवांपैकी ही सूचना देण्याच काम कोण करत असेल कुणास ठाऊक.? त्या देवाचा आवाज  एवठा मोठ्ठा आहे का तो जादूचा माईक वापरतो हे प्रश्न  लहानपणी नेहमीच सतावायचे.

          मग रेडिओ म्हणजे लहानपणी जादूचा पेटारा वाटे आणि या जादूच्या पेटा-याची ऐट पण भारी असायची. त्याला आत बसायला मस्त पैकी कव्हर तेही भरभक्कम  लाकडाचे.त्याची फळी बंद केली की आत रेडिओ झोपायला मोकळा.रेडिओचा काळा तपकिरी  रंग आणि त्याची ती मोठ्ठी काळी बटणे. एक बटण फिरवताना आतली लालबुंद उभी रेषाही पळू लागायची आणि बातम्या सांगता सांगता आधी खर्रss खर्रssss करत एकदमच भलत्याच भाषेत गाणे सुरू व्हायचे, मग आम्ही हसून हसून लोळपोळ.!मग तोच खेळ सारखा.शेवटी कोणाकडून तरी हरकाटून घेतले की चिडीचूप! कित्येक वर्ष, शेजारच्या काकांनी सांगितलेले ,रेडिओच्या पोटातील दडलेले रहस्य खरेच वाटायच.ते म्हणायचे "रेडिओच्या पोटात दडली आहेत छोटी छोटी माणसं! ती माणसं गाणी म्हणतात, बातम्या सांगतात , आजी साठी कीर्तन करतात , तुमच्या सारख्या मुलांसाठी 'छान छान छान मनीमाऊच बाळ कस' हे बालगीत म्हणतात.ती माणस आतमधेच जेवण सुध्दा बनवतात." हे सगळ ऐकल की असलं मस्त वाटायचे नं! ती माणस बघण्यासाठी जीव पाखडायची मी!. एकदा काकांच्या रेडिओ दुरूस्तीच्या दुकानात मागची पाठ काढलेले रेडिओ  बघितले.आत लिलिपुटीयन ऐवजी नुसते वायरचे भेंडोळं बघून मला रडायलाच आले.

             रेडिओ  माजघर ते दिवाणखाना आणि आजी ते नातू या सगळ्यांना आवडीचे कार्यक्रम ऐकवायचा. आई साठी वनिता मंडळ, आपली आवड, आणि श्रुतिका किंवा नभोनाट्ये. दिदीसाठी विविध भारती  , बाबांसाठी बातम्या, नाट्यगीते, आजी भक्तीगीत आणि किर्तनावर  खूष! मी बालोद्यान साठी रविवारची वाट बघायची. स्वच्छ आणि स्पष्ट  उच्चार, बोलण्यातील लय माधुर्य  असलेली निवेदने त्या वयातही खूप आवडायची. रात्री नभोनाट्य ऐकताना त्यात काही वर्णनं आली की आमची कल्पनाशक्ती  सुसाट फिरायची. म्हणजे निवेदक वर्णन करायचा कोकणातील घराचं. मग आम्ही मनातल्या मनांत वाडीत फिरायला मोकळे. ती नारळी पोफळीची झाडे.मधुनच फुललेली नाजुक केशरी अबोली.  जांभ्या दगडाचे तुळशीवृंदावन ,ते सुरंगीचे वळेसर.मातीचा ओलसर वास आणि सुरंगीचा मंद वासही जाणवायचा.तिथला शितू , बापू डोळ्यासमोर उभारायचा. टि. व्ही ने मात्र सगळ्या गोष्टी रेडीमेडच दाखविल्यामुळे कल्पनाशक्तीला भरपूर आराम मिळतो. सगळ दिसतच आहे की समोर.कल्पनाशक्ती  कशाला वापरा?

          बुधवार संध्याकाळी तर अभ्यास,जेवणे लवकर उरकून सर्वजण रेडिओ भोवती जमत. रेडिओ सिलोनवर 'बिनाका' गीतमालेचा  बिगुल वाजला की जणू सर्व इंद्रिये व्हायची कान! मग ते खणखणीत नाण्यासारखे शब्द यायचे:भाईयो और बहेनो किंवा आवाजकी दुनिया के दोस्तो. त्या दाणेदार, लाटांची लयबध्दता असलेल्या अमिन सयानींच्या आवाजात होता दिलासा. त्यात उपदेशाचे डोस नव्हते. पण होता वडिलकीचा प्रेमळ अधिकार.पाठीवर आश्वासक स्पर्श  व्हावा असा तो आवाज!. अगदी कानातून ह्रदयापर्यंत  झिरपायचा. या कार्यक्रमात 'और आखरी पादानपर है..' म्हणून परत एकदा बिगुल वाजत असे आणि सरताज गाण लावलं जात असे. त्यावेळी आम्ही सर्व उत्सुकता, निराशा, आनंद अशा संमिश्र  भावनांनी ते ऐकत असू. हॅss हे गाण सरताज होण्याच्या लायकीचे नाही म्हणून ज्ञान पाजळत असू .वाद सुध्दा  व्हायचे. परत पुढच्या वेळेस कुठले गाणे येणार हे पैजेवार सांगितलं जायचे. 

         रेडिओची एक गंमत होती. महावितरणची वीज गुल झाली की रेडिओ  पडायचा धारातिर्थी! आमच्या शाळेचा रेडिओवर कार्यक्रम  होता.माझ्या वर्गातील एक मुलगी 'जीवलगा  राहिले रे दूर घर माझे' हे गाणे फारच छान म्हणायची. तिचे रेडिओवर गाणे होते. आजूबाजूला सगळ्यांना मी ऐकण्यासाठी सांगितले होते. कार्यक्रमाची सुरवात होताच वीज गेली आणि कार्यक्रम  संपल्याक्षणी आली.एवढ वाईट वाटल नं तेव्हा! ब-याचदा या छोट्या मोठ्या सुखदुःखाच्या गोष्टी रेडिओच्या आसपासच घडायच्या.नंतर नंतर तर नाट्यगीतांनी एवढ पछाडलं होत नं मला! नऊपर्यंत चालणारी नाट्यगीते ऐकल्याखेरीज मी शाळेची तयारी करायची नाही आणि रोज या नादिष्टपणाचा उद्धार ठरलेला.

         चीन भारत युध्दाच्या थोड्या आठवणी म्हणजे रेडिओवर प्रसारित होणारी देशभक्तीपर गीते. भारत पाक युध्दावेळीसुध्दा कान सतत चिकटले असत रेडिओला.शत्रूचे विमान पडले की जणू आम्हीच लढून ते पाडले आहे असा जल्लोष व्हायचा. 

                क्रिकेट मॅचही नुसती धमाल करायची. समालोचन इंग्लिश मधे असले तर सगळच कळायच नाही मग आई किंवा बाबांना भंडाऊन  सोडायच काय सांगितलं म्हणून! मग त्यावर पैजा!

रेडिओवर आपली आवड ऐकताना अनपेक्षितपणे आवडत गाण जे खूप दिवस मनात रुंजी घालतय ते ऐकायला मिळाल की दस्तुरखुद्द लता मंगेशकर भेटल्याचाआनंद व्हायचा .आज हवे ते गाणे सहजतेने ऐकायला मिळते त्यामुळे अचानक झालेला तो आनंद आताच्या पिढीला कळणे अवघडच!  

आमचं वय पुढे सरकत होते आणि रेडिओच्या लोकप्रियतेला ओहोटी लागून मध्यमवर्गीय घरातून तो गायब होऊ लागला होता. त्याची जागा कानामागून येऊन तिखटजाळ झालेल्या ट्रान्झिस्टरने घ्यायला सुरवात केली होती. बत्ती गुल झाली किंवा बाहेर बागेत कार्यक्रम ऐकायचा असला की ट्रान्झिस्टर चार बॅटरींच्या खुराकावर तय्यार. उचला हातात धरा आणि कुठेही जाऊन गाण्याचा रतीब घाला इतकं काम सोप्प. पण माझ्यासारखीला ज्याने रेडीओचे मखर पाहिले आहे ,ज्याने आजी ते नातवाला घरातल्या घरात आवडीचे कार्यक्रम ऐकताना बघितले आहे, घरात एखाद्या  माननीय सदस्यांचा दर्जा  मिरवला आहे त्या रेडिओला भंगारमधे जाताना बघून अक्षरशः अंतकरणात वेदना होत.

            आपल्याला मनापासून  आवडणारे कार्यक्रम आता ट्रान्झीस्टर ते कारॅवान पर्यंत सारेच ऐकवतात पण ते ऐकणे ब-याचदा एकट्याचेच काम. रेडीओसमोर भाजी निवडत बसलेली आई, वाती वळणारी आजी  त्यांच्या आजूबाजूला काहीतरी चॅवमॅव खात बसलेल्या आम्ही दोघी , दूरवर पुस्तक  डोळ्यासमोर घेऊन कान रेडिओकडे ठेवलेले वडिल या दृष्याला मात्र मी मिस करतेय हे नक्की!.

  पण एक खरे बदल हाच निसर्गाचा  स्थायीभाव आहे आणि तोच नियम,निसर्गाचाच एक अंश असलेल्या मानवाला आणि त्याने निर्मित यंत्रालाही आहे. तसे नसते तर आज टेचात असलेलं यंत्र  नवीन ,अधिक कार्यशील यंत्र येताच सहजतेने मोडीत निघाले नसते.त्यामुळे  रेडिओच्या  जाण्याबद्दल दुःख करण्यापेक्षा नव्याचेच मनःपूर्वक स्वागत करूया!

         

माझे इतर ब्लॉग्स वाचण्यासाठी खालील लिंक वापरावी 

https://drkiranshrikant.pasaara.com 



               

५ टिप्पण्या:

  1. खूप सुंदर लिहले आहेस.… जुन्या आठवणींना उजाळा मिळाला!! करावे तेवढे कौतुक कमीच आहे!!

    उत्तर द्याहटवा
  2. वो भी क्या दिन थे, जिसे दिलसे लगा रखा था

    उत्तर द्याहटवा
  3. साध्या विषयात, ईतका मोठा आशय असतो,आहे, हे छान समजावून सांगितलेस.जुन्या आठवणी जशाच्या तशा समोर उभ्या राहिल्या. खूप छान वाटले.

    उत्तर द्याहटवा