शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०

लालपरी----भटकभवानी भाग5©️

 


          

          


           लहानपणीच्या जडणघडणीच्या वयात सर्वात जास्त प्रवास केला तो रेल्वे आणि यष्टीने! होय माझ्या लहानपणची यष्टी अजून कोणी लालपरी वगैरे झाली नव्हती. ती होती सर्वसामान्यांची यष्टी किंवा जरा शहरी मंडळींची एस.टी. - स्टेट ट्रान्स्पोर्ट. माझ्या प्रवासाच्या अनुभवांच्या  पसा-यात या लाल डब्ब्याचे  स्थान मोठे आहे. मोठ्या मोठ्या तत्वज्ञानाचे डोस मी प्यायले आहे याच बसमधे. समोरचा पॅसेंजर खिडकीतून डोके काढून ऑssssक करायला लागला तर त्या धारेत चिंब व्हायचे चपळाईने कसे टाळायचे हे शिकवले आहे याच यष्टीने! कुठलाही मोठ्ठा आव न आणता माणुसकी,चांगुलपणा ,स्थितप्रज्ञता शिकवली आहे या बसने.आणि शेजारचा पॅसेंजर जर डुलक्या काढताना आपला खांदा ही त्याची उशी आहे असे समजू लागला तर भिडस्तपणा न करता या त्याच्या ठाम समजूतीला मोडून काढणे केवळ  यष्टीमुळेच मला जमले.  .

             आज ठरवले पसारा आवरायचे तो एस.टी च्या आठवणींचा.काॅलेज ते घर असे अनेक प्रवास  तिच्याच पोटातून तर झाले आहेत. तिने मला वेळोवेळी इप्सित ठिकाणी पोहोचवले आणि म्हणूनच जिचे कौतुक हल्ली 'लालपरी म्हणून केले  जाते त्या आमच्या वेळच्या  एस टी.बस  बद्दल लिहीत आहे.



                      लालपरी-----भटकभवानी भाग 5©️


       बसच्या बाबतीत बोलायचे झाले तर वयाच्या आठव्या वर्षी एस. टी.बस मधन पहिल्यांदाच  प्रवास केल्यावर माझी काही  ठाम मते तयार झाली होती. ती म्हणजे महाराष्ट्र परिवहनचे चौकोनी मोठे वाहन, जिचा रंग लाल असतो आणि मधेच त्यावर पिवळा पट्टा असतो त्याला एस टी बस असे नाव आहे. या वाहनामधे तिच्या क्षमतेपेक्षा खूपच अधिक माणसे कोंबून बसवलेली  असतात. तिळमात्र जागा जरी रिकामी राहिली तर ड्रायव्हरकाका आणि कंडक्टरकाकांना रौरव नरकाची शिक्षा बहुधा असावी किंवा पापणीने डब्यात मिठ भरायला लावत असावेत. त्या भितीखातरच ते जितके जास्त प्रवासी शक्य आहेत तितके कोंबत असावेत. वरील सर्व विचार वयाच्या आठव्या वर्षी  बस मधे बसल्यावरचे आहेत(.शब्द आजचे)

    बसशी  माझी पहिली वहिली भेट तरीही  फारच छान होती. अगदी लक्षात राहण्यासारखी.आमची बदली झाली होती पुण्याहून कोल्हापूरला.मी साधारण सात आठ वर्षांची. मग एका सुट्टीत नुसतं कोल्हापूर  बघायला जायचं ठरलं. तोवर आजोळी जाताना रेल्वे प्रवास बराच झाला होता पण लालपरीबरोबर किंवा,लालपरीतून नव्हता. बस स्टॅन्डवर आम्ही पोहचलो.अबब केव्हड्या तरी  पिवळा कमरपट्टा लावलेल्या लाल बस! काही एकदम चकाचक नटलेल्या तर काही बस मला आजीसारख्या थकल्याभागलेल्या वाटल्या. थोडा रंग उडालेला. चेह-यावर गंभीरपणा.सगळ्या बसच  समोरून तोंड सपाट.चप्पट. काचेचे भव्य कपाळ आणि ब-याच खाली गोलमगोल काचेचे डोळे.पावसात त्या मोठ्या काचेच्या कपाळावरचे जलबिंदू गरागरा निपटणारे दोन हात! हंsssss त्याला' 'वायपर' म्हणतात तर. त्या आठ वर्षाच्या वयात कळलेला नवा शब्द. ज्ञानात नवी भर!त्यानंतर 'वायपरच्या' त्या लयबद्ध  हालचालींचे वेडच लागले. सुटूकन पाणी साफ करून परत नवीन येणा-या  पाण्याच्या थेंबांना हटविणारे वायपर. बस मधनच आsss च्छू करून दणदणीत शिंक द्यायची.त्याची वाट बघत मी बसायची खूप गंमत वाटायची. त्या पहिल्या प्रवासात काही सुखद आठवणी आहेत.वाटेत आंब्याने लदलेली झाडे. म्हणजे कै-याच होत्या त्या .त्याखाली मुद्दाम  लालपरी थांबली. मग टपावर चढून कै-या काढल्या. असा पहिला प्रवास तरी महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसमधून मस्त झाला.त्या वयात गर्दी, गैरसोय हे मुद्दे  माझ्या दृष्टीने नगण्य होते.  त्यामुळे त्यांचा त्रास झालाच नाही उलट सगळी मज्जाच वाटत होती.

         त्यानंतर या बस बरोबर झाली गट्टी. पण ते नुसते प्रेम नव्हते  ती होती 'लव्ह हेट रिलेशनशीप'! चुकून माकून ही लालगाडी अंघोळबिंघोळ करून वेळेवर आली आणि मधेच हट्टी म्हशी सारखी पंक्चरच्या नावाने बसकण न मारता वेळेवर पोहोचली की समजावे आकाशस्थ ग्रह उच्चकोटीचे आहेत.मग मात्र तिच्याबद्दलच्या प्रेमाला उधाण यायचे नाहीतर मनातली खदखद तिच्यावर काढली जायची.

           मेडिकलला शिकत असताना मात्र लालगाडीला पर्यायच नव्हता.सोलापूरला मेडिकलला अॅडमिशन घ्यायला लाल डब्ब्यातून निघालेले. बरोबर आई. बहात्तरचा तो मोठा दुष्काळ आणि वैराण शेतात पडलेली जनावरांची कलेवर! विसरणे अशक्यच! आधीच घरापासून दूर जायचे म्हणून मनावर दाटलेले मळभ त्यात हे दृश्य.

त्या वेळी  होत्या ठरावीक गाड्या. काही मस्तपैकी फिरत फिरत जाणा-या तर काही जरा  सरळमार्गी! .फिरत लांबचे वळण घेऊन जाणा-या गाड्यांचा आवडता स्टाॅप म्हणजे कवठे महांकाळ! एक तासाचा चुराडा ठरलेला. या गाडीचा कोल्हापूर  ते सोलापूर प्रवास तब्बल साडेसात ते आठ तास खायचा. गंमत म्हणजे काॅलेज युवकयुवती एकत्र प्रवास करत असले तर अंतिम स्थानी पोहोचेपर्यंत प्रेमात पडून त्यांच्या लग्नाच्या आणाभाकासुध्दा व्हायच्या! त्यामुळे  लांबून जाणा-या गाड्या वेड्या बेंद्र्या असल्या तरी त्या एकदम रोमॅन्टीक!

       या प्रवासात पावसाळ्याच्या दिवसांत दोन ठिकाणी बसला आडव यायचं पाणी! एकीकडे हातीदचा ओढा  आणि पुढे चंद्रभागा नदी. हातिदच्या  ओढ्याला पाणी आले की लाल डबा थांबायची एका तीरावर आणि दुसरी बस येत असे दुस-या तीरावर. ती येईपर्यंन्त जीव टांगणीला. मग ते एखादे तरी जडशीळ मेडिकलचे   पुस्तक असलेली बॅग ( घरी ते पुस्तक नेऊन थोड भापायला बर वाटायचे) घेऊन बैलगाडीत बसायचं आणि सावकाश ओढा ओलांडायचा.एकदा तर पाण्याची पातळी अचानक वाढली आणि बैल लागले पोहायला. बापरे!  पण असल्या प्रसंगात सहप्रवाशांची खूपच मदत व्हायची.

      पंढरपूरला चंद्रभागाबाईंनी बस अडवली की मदतीला यायची नाव !.छोटी वल्हवायची होडी.निसरड्या उतारावरून बॅग संभाळत त्या नावेत बसायचे. पैलतीरावर कसरत अधिकच! कारण आता निसरडा चढ चढायचा असे.मग परत दुस-या बसची वाट बघणे आलेच. अर्थात इथेही सहकाराचे महत्व कळायचे.

         एकदा मी सांगलीला बसमधे चढले आणि मिरजेला मैत्रीण. गप्पांच्या नादात तिकीट राहिले काढायचं आणि बस पुढे गेली तेव्हा तासाभराने लक्षात आले.कंडक्टरला तिकीट फाडायला सांगितले. बिचारा दोन तिकीटांचा हिशेब न लागल्याने आधीच कातावला होता. त्याने बस थांबवली आणि आम्हा दोघींना उतरायला सांगितले. आडरान आणि तटून बसलेला कंडक्टर! आधी समजुतीने सांगितले "हे चुकले असले तरी मुद्दाम केलेले नाही." पण तो काही हट्ट सोडेना. मग मात्र काली रूप घ्यावे लागले.गंमत म्हणजे पंढरपूरला विठ्ठलाने काय जादू केली कोणास ठाऊक? " ताई मला क्षमा करा म्हणत  नंतर त्या कंडक्टरने माफी मागितली.

आमच्या लग्नात मात्र लालपरी आमच्यावर रुसलीच होती. सोलापूरहून व-हाड येणार होत सायंकाळी पाच वाजता.घड्याळाचे काटे पळत दहावर गेले  तरी नव-या मुलाकडच्या मंडळींचा पत्ता नाही. माझे आई वडील हवालदील झालेले.अखेर एकदाची लालपरी आली रात्री अकरा वाजता. जुनोनी आणि नागजच्या मधे रूसल्या होत्या बाई. मग दुरुस्तीने खाल्ले तीन तास. जवळ कुठेही फोनची सोय नाही. रागच आला मला तिचा.    

  पुढे एकदा थोरल्याला घेऊन सांगलीहून येताना असाच प्रसंग आला. थोरला होता दोन वर्षांचा. मोहोळच्या पुढे बस पडली बंद.सर्व  प्रवासी पटापट बॅगा घेऊन चालू लागले. बॅग आणि झोपलेला थोरला यांना घेऊन जाणे अशक्यच.अंधार पडायला लागलेला. हा काळ पस्तीस वर्षापूर्वीचा.फोन ही नव्हते. सोलापूरला कळवताही येईना. मागून येणारी बसही भरभरून आलेली .अखेर सहप्रवाशच्या मदतीने एका मिनी ट्रकमधे बसून सोलापूरला आले.अशा त-हेने बसने मला धाडशीही बनवले.

         अशा अनेक आठवणी! भल्या आठवणी खूप जास्त. पण लालपरीची जेव्हा रातराणी व्हायची तेव्हा सहप्रवाशाच्या  वागणुकीत  झालेला असभ्य बदलही लक्षात यायचा.  हे  थोडे नकोसे अनुभव .

     माझ्या प्रवासात सहप्रवाशी असायचे मुख्यत्वे विठूरायाच्या दर्शनाला जाणारे. ,काही वाटेतल्या दुष्काळी गावातले सदाचिंतित शेतकरी , टवटवीत माहेर वाशिणी  , आणि थोडे फुटकळ माझ्या सारखे विद्यार्थी. असे अनेक प्रकारचे सहप्रवाशी भेटायचे.अंग चोरून बसलेले खेडूत, उगाचच ऐसपैस बसणारे शहरी. दोन खेडूत बायकांच्या डोईवरला पदर सावरत चाललेल्या सुखदुःखाच्या गप्पा,  त्यांची ती गठुडी. लेकुरवाळीची तारांबळ. रडणा-या बाळाला आजीबाईच्या बटव्यातील औषध सांगणारी कोणी आत्तीबाय,अशीअनेक माणसे बघायला मिळत.पीक पाण्याच्या गप्पा डोईच मुंडास काढत आणि पान लावत रंगायच्या. खडखडणा-या बसमधे पुस्तक वाचन जमत नसलं तरी विविध माणसं वाचायला मिळायची.

          आता या लालडब्याला एकदम परीकथेतील  परी बनविले आहे. तिचे बाह्य रूपही अधिकच रंगतदार केलय.    आज कित्येक वर्षे  मी या लाल परीच्या सहवासाला मुकले आहे. तो स्टँड वरचा कोलाहल. ती धावपळ करणारी मंडळी.तो सर्वत्र भरलेला विचित्र वास आणि किन-या आवाजात कंडक्टरचे ओरडणे ,त्याला भेदून येणारा तो न कळणा-या सूचनांचा आवाज. जेव्हा आता सांगलीला कारने तीन साडे तीन तासात पोहचते तेव्हा बस मधे काढलेले सहा आठ तास आठवतात. या लालपरीचा आत्मा तसाच निर्मळ आणि भोळाभाबडा आहे का तेही माहित नाही. पण इतक्या वर्षांनी तसा असण्याची शक्यता कमीच!

         कित्येकदा आयुष्यात ठरलेले ठिकाण गाठण्यासाठी  लागतो कोणी वाहक. तो कुठल्याही रूपात येतो  आपल्याला आपल्या ध्येयापाशी पोहचवतो. तसेच मला शब्दशः या लालपरीने काॅलेज आणि घरी सुखरूप नेले.

    असे अनेक प्रवास.  काही अचानक केलेले तर काही पूर्णपणे आखीव रेखीव .पण तो आयुष्याच्या अखेरचा प्रवास मात्र त्या खूप खूप ओळखीच्या पण तरी पूर्ण अनभिज्ञा  बरोबर.   आपला हा शेवटचा प्रवास मात्र अगदी सुटसुटीत.कुठलेच ओझे नाही. ना बॅगेचे ओझे ना आईने दिलेला खाऊ. फक्त एका श्वासांचे अंतर मग ओलांडून जायचे नव्या अज्ञात प्रदेशात. पूर्णतः अनोळखी!काळोखात कां उजेडात तेही माहीत  नाही.

        

माझे  इतर ब्लॉग्स वाचण्यासाठी खालील लिंक वापरावी 

https://drkiranshrikant.pasaara.com 

३ टिप्पण्या: