मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१

रंग©️

                      निसर्ग  नुसताच चितारी नाही तर  बेलाग जादूगारच आहे. क्षणाक्षणाला त्याचे हे जादूई प्रयोग सुरूच असतात. सतत आपले आश्चर्याचे धक्के देणं चालूच असत बेट्याच !  स्वच्छ , दुधी, चमकदार प्रकाशकिरण एका रेषेत पळत ऐटीत पाण्याच्या थेंबात शिरतो काय अन् दुस-या बाजूने वाकडा होऊन बाहेर पडतो  तेव्हा त्यात लपवलेले सप्त रंगाचे भांडार पसरलय याचं वेड्याला भान कुठे असते? आपण मात्र हा सप्तरंगी पिसारा बघून विभोर होतो. रंग म्हणजे निसर्गाचे रत्न भांडारचं! या सात रंगातील ते तीन मुख्य रंग! एकमेकांत मिसळले की नवा रंग तय्यारच. प्रमाण थोड कमी जास्त केल्यावर द्रौपदीला मधूसुधनाने पुरवलेल्या अनेकरंगी वस्त्रांसारखेच रंग तय्यार.

       लालचुटूक रंग तसा रूधिराचा रंग त्यामुळे हे लालसाहेब थोडे उग्र चिडलेले . कायम युध्द ,बळी असल्या मंडळींशी यांची जवळीक.भडकपणा यांचा स्थाईभाव.कधी कधी हा रंग रक्तस्राव रूपात समोर येतो तेव्हा भल्याभल्यांचे होश उडतात.या रंगाच्या गडद छटेवर डाॅक्टर मात्र खूष! गो-या, काळ्या,पिवळ्या तपकिरी या कुठल्याही रंगाची कातडी असो त्या खाली वहाणारे रंक्त लाल.आपल्या नीलरक्ताचे कौतूक करणारेही याला अपवाद नाहीत.

       गजाननाच्या लंबोदरावर बसलेला लालेलाल जास्वंद मात्र त्या गौरीपुत्राच्या देहावर बसून आपला भडकपणा सोडून एकदम मवाळ  होतो. देखण्या गणरायाचे सर्व अनिष्टांना उदरात नष्ट केल्याने झालेले गरगरीत उदर आणि त्यावर विराजमान टचटचीत लालभडक जास्वंद.अहाsssइतके राजस दिसतात नं बाप्पा!

       या रंगाच्या उग्र स्वभावाला न शोभणारी कोवळी, सुखद छटा आहेच. रमणीच्या मृदू , कमानदार ओठांवर ,गालावर जेव्हा स्वारी विराजमान होते तेव्हा भल्याभल्यांचा विश्वामित्र होतो. अशा सुंदरीला फुल द्यायच ते पण लाल भडक कळीदार गुलाबाचेच. 

   खर तर प्रेमाचा रंग आहे गुलाबी पण प्रेमभेटीला दिलेला लालबुंद रंगाचा गुलाब भाव खाऊन जातो. आपल्याला मिळणा-या प्रत्येक लाल गुलाबाबरोबर ती रमणी मात्र आपल्या कटाक्षाने सर्वांची ह्रदय रक्तबंबाळ करत असते. लाल रंगाला आपण कितीही भडक म्हणून दूर्लक्षले तरी बालकांचा तो सर्वात लाडका रंग आहे. अनेक रंगाची खेळणी पलटण म्हणून समोर उभी केली तरी बिटबीट डोळ्यानी त्याकडे बघत बाळ निवडतो फक्त लाल खेळण.तस पाहिले   तर हा लालेलाल लालबाबा तांबारलेल्या रंगेल आणि तापट डोळ्यात मुक्काम करून खूष असतो म्हणा..

  कलींगडासारख्या फळाच्या ताबा या लालसाहेबांनी घेतल्याखेरीज त्यात गोडी कुठली यायला? असा शौर्य,  क्रौर्य, रंगेल पणा , लज्जा, संताप आणि गोडी दर्शविणारा लाल रंग. याचे सारेच विरोधाभास.

  लाल रंगात किंचित पिवळा मिसळत नेला की तय्यार  केशरी रंग. कुणी याला नारिंगीही म्हणतात.स्वाभिमानाने , शौर्याने तळपत आत्मसमर्पण करणारे 'केसरीया' आणि आगीच्या उफाळणा-या लाल केशरी ज्वाळेत जोहार करणा-या कुलवंत याच रंगाला लपेटतात .यांत कोण कोणाचा मानमरातब वाढवतो हे ठरविणे अवघडच. जरीपटक्याचा भगवा आपल्या इतिहासाचा मानबिंदू. आकाशाच्या निलिम्यावर लखलख भगवा जरी पटका क्या बात है! मनामनात शिवरायांच्या शौर्यगाथेची आनंददायी उजळणी होते.अभिमान रोमरोमातुन ऊतू जातो.

           रसदार संत्री याच नारिंगी रंगाची.रंगापासून चवीपर्यत मोहकच मोहक पण हिरव्यागार मध्यम उंचीच्या झाडावर जेव्हा ही केशरी वाटोळी संत्री बहरतात तेव्हा ते झाड या मर्त्य जगतातील न रहाता एकदम स्वर्गीय झाड होते. नारिंगी रंगातील देखणी झाड आणि मधनच चमकणारी हिरवी पाने.मैनू तो मर जावा!

                    पिवळा मैत्रीचा रंग. सुखद , लख्ख,उबदार, आश्वासक!उगवतीची आणि मावळतीची सोनकिरणे. कुबेराचे भांडार लुटून पृथ्वीवर पसरलेला सोनसडा.केवड्याचा पिवळा धम्म. सोन्याने त्याच्या लखलखत्या पिवळेपणाचे घातलेले गारूड  मिटताच मिटत नाही. मनावर चेटूक करणारी रसरशीत पिवळी धामण. ती सळसळायला लागली की नजरबंदी झालीच म्हणून समजा. कांचनमृगही अस्साच सोनसळी  असावा . निश्कांचन अवस्थेत वनवासाला गेलेल्या सितामय्यालाही या पिवळ्या मोहापासून सुटका नव्हती.नाहीतर सीतामय्याला त्या कांचनमृगाचा मोह  कां पडावा? लग्नात तर हळदीने अधिकच लखलखणारी नववधू मामा ने दिलेली अष्टपुत्री नेसून अंतरपाटा पलीकडे उभी रहाते तेव्हातर तिच्याभोवती समई सारखाच इवलासा पिवळा प्रकाश पसरला आहे असे वाटू लागते.

         नीळा आणि पिवळा रंग झिम्मा फुगडी खेळून  गळ्यात गळे घालून बसले की दिमाखदार प्रवेश होतो हिरव्या रंगाचा. कधी पिवळा शिरजोर तर कधी निळा! मग काय हिरव्याच्या छटाच छटा तय्यार. इतक्या छटा असलेल्या या सम हाच !हिरव्याच्या छटा तरी किती! पश्चिम घाटातील एका झाडाचा रंग दुस-यासारखा असेल तर शपथ.! किंवा वसंतात कुतूहलाने डोकावणारे बालपालवीच्या छटा बघाव्यात.सगळ्याच भिन्न आणि भन्नाट. पाचूचा  रंग हिरवा. सर्वव्यापक हिरवा.शांत. डोळ्यांनाच नव्हे तर तनामनाला सुखावणारा. थंड करणारा.कुठल्याही रंगाची किंवा वास्तुची शोभा वाढवायची असेल तर हिरव्या या समृद्ध रंगाला तिथे स्थान द्यायचे.ती वास्तू कितीही साधी असो त्या हिरव्या रंगाची जादू होताच प्रासादतुल्य होते.ह्या हिरव्याची आस ही वेगळीच  त्या भल्या थोरल्या वाळवंटाला विचारा हिरवी तहान काय असते ते! कधी कधी मात्र पिकल्या पानाचा हिरवा देठ त्याची आणि इतरांचीही फजिती करतो.

        या उलट देवतांची प्रचिती देणारा रंग आहे निळा. चमचमता अफाट दर्या असो नाहीतर निळ्या अभाळाचा घुमट , त्या रंगाकडे नजरेत न मावणा-या व्याप्तीकडे बघताना विश्वरूप दर्शनच होते. मंत्रोच्चारासारखी खर्जातली, निळ्या समुद्राची गाज देवत्वाची प्रचिती देते. निळ्या रंगाला देवत्व देतात ते अंगभर त्या रंगात रंगलेले आपले देव. हसरा खोडकर  घननीळ बाळकृष्ण, एकवचनी नीलवर्णी पुरुषोत्तम श्रीराम, नीळकंठ शंकर आणि गळ्यात धवल पार्वतीचा कोमल हात, निळा सावळा विठूराया,निळ्या रंगातील सर्वसंहारक कालीमाता या निळ्याचे प्रतिनिधीच जणू.कधी कधी हा नीलबावरा डोळ्यात स्वार होतो.तर कधी फुले पक्षी फुलपाखरांतून परत शिव सुंदरतेची प्रचिती देतो. 

        निळा आणि लाल यांनी संधान साधले की पारवा आणि जांभळा आलेच. निळ्याला आणि लाल रंगाला थोडी कसरत करावी लागतेच म्हणा नाहीतर एकदम गडद जांभळा हजर. छान तोल साधला तर पारवा रंग आहेच. दोन्ही रंग सुखद. त्यातून पारवा रंग हा मला कायम कुठल्यातरी शापित राजकन्येचा रंग वाटतो. अती देखणा पण दुर्लक्षित.जांभूळ आणि रसरशीत भरताची वांगी यात चमकदार जांभळा रंग खुदखुदतो.कधी कधी गो-यापान देहावर कद म्हणूनही तो साजिरे दिसते.

                   .

           असे अनेक रंग !अगदी तानापिहीनीपाजा पर्यंत. परत त्यांची सरमिसळ आणि तयार होणारा नवाच रंग. आनंददायी उत्फुल्ल मनावर चेटूक करणारे पण----- सर्वात सुंदर म्हणजे यांचा निर्माता सर्व समावेशक श्वेत   रंग. शांत,विचारी, प्रत्येकाला खास व्यक्तिमत्व बहाल करणारा पांढरा! सात्विक, वैरागी! मात्र केसात हे पांढरेराव पहिल्यांदा मुक्कामाला आले की  भल्याभल्यांची भंबेरी उडते. वाराणशीला मात्र तेथिल कृष्णभक्त परित्यक्ता  त्या सफेद वेषात बघून मनावर जे मळभ आले ते अजूनही ओसरले नाही. तसेच रोहिणी नक्षत्रापासून जर आकाश पांढूरक्या ढगांनी भरू लागले की बळीराजाचा चेहरा पांढरा फटक पडतो.

       काळा रंग म्हणजे सगळ्या रंगाची गिचमिड.नुसते तीन प्राथमीक रंग गप्पा मारायला एकत्र आले की  गुढतेच भल मोठ्ठा वलय असलेला काळा रंग तयारच!. या रंगाची जादू  बदनाम आणि भयकारी !  काळी जादू नकोशी, अंगावर सरसरून काटा आणणारी.!!   विचारही कासाविशी  वाढवणारा.पण मग आठवते विष्णूदास नामांची रचना ' रात्र काळी , घागर काळी' हे काळ्यातील सौदर्य दर्शविणारे . रमणीच्या गौर मुखावरील काळा तीळ भल्या भल्याभल्यांची झोप उडवतो. बाळाला दृष्ट लागू नये म्हणून काळीच तिट्टी मिट्टी हवी नं? काळी शांत रात्र म्हणजे विश्रांतीची नांदी आणि नक्षत्रांची झुंबर  अधिकच लखलखतात अवसेच्या काळ्या रातीच !  काळे ओथंबलेला ढग म्हणजे अमृतकुंभच.

      अजंठ्यामधे एक फार सुंदर भीत्ती चित्र आहे. लवाजम्यासह राणी निघाली आहे.सा-या गो-या सेविका आणि त्यात उठून दिसणारी काळी अप्रतिम सुंदर राणी! अगदी द्रौपदीची आठवण यावी अशीच! काळ्या रंगाबद्दल आपल्या मनात असलेला दुजाभाव केवळ त्या दिडशे वर्षाच्या गुलामगिरीचे प्रतिक तर नाही ना?

     रंगाची खरच फार मोठी गंमत म्हणजे शुभ्र पांढ-याच्या पोटात सात रंग दाटीवाटीनी बसले असतात पण हेच सात रंग स्वतंत्रपणे एकत्र येतात तेव्हा ते धवल नसतात तर तयार होतो कुळकुळीत काळा रंग..पांढरा आणि काळा एकाच नाण्याच्या दोन बाजू. दोन्हीही समतोल  राखणारे एक दिवसासारखा उत्साही तर दुजा रात्रीसारखा गुढ!

    एक मात्र खरे. रंग जगाला सौदर्य बहाल करत असले तरी वास्तवदर्शी आहेत काळा आणि पांढरा रंगच,आणि त्यामधे पसरलेल्या कब-या छटा अगदी मानवी स्वभावासारख्या. जर पांढरा ते काळा हा प्रवास या राखाडी प्रदेशातून केला की आयुष्य ख-या अर्थाने जगलोय. काळा पांढरा आणि त्यांनी निर्माण केलेल्या अनेक राखाडी कब-या छटा आपले पाय जमिनीवरच ठेवतात एवढे मात्र खरे आता. आता इथे इतर रंगांचे महत्व संपते


२ टिप्पण्या: