सोमवार, ८ नोव्हेंबर, २०२१

जर तर©️

           एखाद्या  निखा-याने सर्रकन झटका बसावा आणि अंगावर कायमचा डाग पडावा तशा काही काही आठवणी असतात. विसरावे म्हटलं तरी शक्य नाही,नकळत लक्ष जातेच त्या डागाकडे.  अखेर सरकणारे दिवस,महिने,वर्षे त्यातील वेदना कमी करतात.  असं  जरी  वाटतं  असल तरी पुन्हा मनात सुरू होतो जर -तरचा गोफ! जर असं केलं असतं तर------ पण नंतर लक्षात येतं या जर तरला खरंच काही अर्थ नाही .झालेली गोष्ट होऊन जाते आणि आपला ठसा सोडून जाते .आज अशीच एकआठवण .

               

                         जर- - तर

©️

          जवळ जवळ चाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट.मी नुकतीच बालरोगतज्ञ झालेली होते आणि छोटेसे हाॅस्पिटलही सुरू केले होते.  सुदैवाने प्रॅक्टीस  बाळस घेऊ लागली होती. प्रॅक्टिस करत होते ते गावही नेमस्त.  पुण्या-मुंबईच्या मानाने ब-याचदा अत्याधुनिक  सोई कमीच! पण पेशंटला पुरेसा वेळ देणे, त्याच्या आजाराचा सविस्तर इतिहास घेणे, त्याची व्यवस्थित तपासणी करूनच निर्णयाप्रत जाणे  त्यामुळे अंतिम निकाल बहुतेक वेळा चांगलाच येत असे. त्यावेळचे पेशंट  मुख्यत्वे पोलिओ, उलटी जुलाब, टायफाईड आणि क्षयरोग या प्रकाराचे असायचे.

      असाच एक दिवस! दुपारची वेळ. एक पोरसवदा स्त्री, जणू कालपरवा पर्यंत परकरात वावरणारी .जास्तीत जास्त सोळा सतरा वयाची. चेंबटलेली, फिकुटलेली ,अशक्त.त्या वयातील रसरशीत पणाचा लवलेश दिसत नव्हता. तिच्याबरोबरचा तो पोरगेलासा तरूणही अशक्त आणि रापलेला!  किंचित मळलेला पायजमा  त्यावर पांढरा सदरा आणि डोक्यावर गांधी टोपी.त्यांच्याबरोबर त्यांचं आजारी मुल असे ओपीडी मध्ये आले. ते खेड्यातून आल्यासारखे दिसत होते.दोघांचे वय अतिशय लहान त्यामुळे  ते पहिलेच बाळ असावे हा अंदाज आला.  दोघेही आले होते  विजापूर जवळच्या एका खेड्यातून. पत्नीला मराठी अजिबातच कळत नव्हतं. थोड थोड मराठी त्याला कळत होत. बाळाला बघितलं. साधारण सात महिन्याचे बाळ, उलटी जुलाबांनी अंगातला पाणी कमी झालेलं, कुपोषित, अंगावर अनेक ठिकाणी कातडी जंतुसंसर्ग. शक्यतो अंगावर पिणारे मूल  हे इतके कुपोषित असण्याची शक्यता कमी. तसेच त्याला इतक्या प्रमाणात जुलाब होण्याची शक्यताही कमी असते आणि त्यामुळे बाळ बहुधा  वरच्या दुधावर वाढतंय हा माझा अंदाज बरोबर आला. अत्यंत कळकट झालेली बाटली. बाटलीच्या निपल वर  झाकण नाही आणि त्यामध्ये अतिशय पातळ दूध. सर्व  स्वच्छतेचे निकष धाब्यावर बसविलेले. बाळाच्या आजाराचे उगमस्थान तर कळलं. बाळाला तात्काळ ट्रिटमेन्ट देण्याची गरज होती त्यामुळे त्याला ॲडमिट करून घेतलं.बाळाच्या गंभीर तब्येतीबद्दल  वडीलांना पूर्ण कल्पना देऊन सही घेतली. प्रतिजैविक, सलाईन आणि आहार बाळाला सुरू केला.कानडी येणा-या आमच्या आशाबाई बाळाच्या आईला स्वच्छतेचे, आहाराचे धडे देऊ लागली. सतत  दुर्मुखलेला चेहरा करून बसलेल्या आईच्या तीव्र इच्छेला जणू बाळाने प्रतिसाद दिला .अंगावरचे स्किन इन्फेक्शनही कमी होऊन बाळाचे जुलाबही आटोक्यात येऊ लागले.  उलटी जुलाबाचे पेशंट हे अंगातील क्षार आणि पाणी भरून निघतात टवटवीत होतात जणू पाणी घालताच टवटवणारे रोपच..बाळाचे  असेच झाले. आल्या आल्या डोळे फिरवलेल्या बाळाने तीन दिवसांनंतर , बघून हसायला सुरुवात केली होती. सात दिवसात बाळाच्या वजनातही वाढ दिसायला लागली. जेंव्हा  जेव्हा बाळाला मी तपासत असे , दर वेळेला त्या आईचा अशक्तपणा मला बेचैन करायचा. तरणीताठी सतरा  वर्षाची ही बाई पूर्णतः शुष्क जणू वठलेले झाडच.   तीच्या हालचालीही अतिशय संथ! 

           दहा दिवस झाले.  बाळाला आता घरी पाठवण्याची वेळ आली. बिल भरण्याची तजवीज करण्यासाठी बाळाचा बाबा गावाकडे गेला होता. आता हॉस्पिटलमध्ये इतर पेशंट बरोबर फक्त आई आणि बाळ होते. बाळाच्या बाबाचा गावाकडून फोनही आला होता. पैशाची तजवीज झालीये मी उद्या सकाळी येतो उद्या सकाळी डिस्चार्ज द्या.

         त्या रात्रीची गोष्ट. रात्रीचा राऊंड घेऊन वर घरी गेले होते साधारण दोन वाजता कर्कश्य पणे हॉस्पिटल मधून घरात वाजणारी बेल  किरss कीsssर वाजू लागली.  मला हाॅस्पिटल मधे बोलवताना घंटा फक्त एकदाच वाजवा मी येत जाईन असे मी सांगितले असतानाही इतक्या वेळा सतत बेल वाजवल्यामुळे जराशी मी वैतागलेले. वर घरात येताना तर सगळे पेशंट चांगले होते. कशाकरता बेल वाजवत आहेत हेच कळेना तरी धावत खाली गेले.  काहीतरी भयंकर घडलेआहे हे नक्कीच. आणि पाहते तो काय त्या बाळाची आई शेवटचे आचके देत होती. ती तरणीताठी पण अशक्त बाई आचके देत होती. ऑक्सीजन सुरू केला प्राथमिक उपचार करण्यासाठी सलाईन लावायला नस शोधू लागले त्याच वेळेला त्या बाईने शेवटचा आचका  दिला आणि तिने डोळे मिटले. नवी-नवी प्रॅक्टिस. बालरोग विभागात बालमृत्यू बघायची जरी सवय असली तरी बाळाचे नातेवाईकाचा अशा पद्धतीने मृत्यू  हेच अनपेक्षित होतं. तिला कार्डीयाक मसाज दिला. अॅडरिनलीनचे इंजेक्शनही दिले. उपयोग शून्य. 

             एका  जेष्ठ सर्जनला एवढ्या रात्री फोन केला. त्यांनी धीर दिला. पोलिसांना फोन केला होता . कारण अर्थात  अचानक मृत्यू! बाकीच्या पेशंटचे  नातेवाईक अतिशय घाबरले होते. दिलासा देणार तरी काय? पोलिस तेथे चौकशीसाठी आले.   स्पेशल रूम रिकामी होती त्यामध्ये बाकी पेशंट आणि नातेवाईकांना हलविले. त्या रात्री बाळाची आई झाले मी आणि आमच्या आशाबाई.त्याला बेबी फुड देणे, दुध देणे  आम्ही करत होतो.

      मृत झालेल्या बाईचे शवविच्छेदन करणे आवश्यक असल्याने दुसऱ्या दिवशी तिचा नवरा आल्यावरच ते करायचे ठरले. तो काळ मोबाईल फोनचा काळ नव्हता. रात्री त्याला गावात फोनही लागेना.  बाळाच्या वडिलांशी संपर्कही साधता येत नव्हता.रात्रभर सर्वच जागे. सकाळ झाली रोजची कामं सुरू झाली. वाॅर्डातच तिचे प्रेत एका पलंगावर झाकून ठेवले होते. 

         मग साधारण अकराच्या सुमाराला बाळाचा बाबा आला.पूर्णतः अनभिज्ञ! अतिशय आनंदाने, समाधानाने आणि कृतज्ञतेने त्याने मला नमस्कार केला. त्याला अखेर ती दुःखद  बातमी सांगण्याचे महाअवघड काम करावेच लागले.  त्याच्या चेहऱ्यावरचे भाव आजतागायत मी विसरू शकले नाही. आश्चर्य , दुःख, वेदना. तो धावतच वाॅर्डकडे गेला. पद्मा पद्मा तो  आक्रोशत होता , पण त्याला जाताना हसून निरोप देणारी त्याची पत्नी आता निपचित पडली होती.  अखेर शववाहिकेतून सिव्हील हॉस्पिटला प्रेत हलविले.कालपर्यंत पद्मा नावाच्या जीवंत व्यक्तीची , बाळाच्या आईच्या देहाची आजची ओळख होती 'प्रेत'.

           पोस्टमार्टम झालं .त्यात फुफ्फुसात क्षयरोग 

 आणि अतिशय कमी रक्तांनी तिचा घात झाला होता. हा प्रसंग प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर तीन ते चार महिन्यात घडला. खूप काही शिकवून गेला. हे काय झाले  या प्रश्नाने तेव्हा माझं डोकं पूर्ण पिंजून गेलं होतं .

  मग  मनात सुरू झाले जर आणि तर.  जर तिला मी बाळाबरोबर  तिच्या  तब्येतीच्या अनुषंगाने प्रश्न विचारले असते तर? फक्त बाळावर लक्ष एकवटताना जरी ती माझी पेशंट नव्हती तरी माझ्या पेशंटची आई तर होती न ! अशा अनेक शक्यता मनाला त्रास देत होत्या.

       मनाला अतिशय थकवा आला होता आणि मग लक्षात आलं की जर-तर  फक्त रेशमी साडीला शोभून दिसते. जर कुठल्याही घटनेबाबत इथे  आपण जास्त विचार करत बसलो तर त्यातून आपलीच अपराधी भावना वाढत राहते. कित्येकदा ती अनाठाई असते. त्यामुळे जर-तरच्या शक्यतेच्या मागे न जाता आहे ती गोष्ट स्वीकारणे महत्त्वाचे. त्यातून बोध घेणे सर्वात महत्वाचं.  








       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा