शुक्रवार, २ एप्रिल, २०२१

चहापान ©️

                           चहापान©️


काही काही छोट्या छोट्या गोष्टी  कधी लार्जर दॅन लाईफ  होतात हेच मुळी कळत नाही.देवाभोवती असलेल्या वलयासारखेच खास तेजोवलय लाभत अशा गोष्टींना !फक्त योग्य माणूस योग्यवेळी तिथे असायचाच अवकाश की एकदम साईsssssसुट्ट्यो. 

    आता साधा चहापानाचा कार्यक्रमच पहा न! पूर्वी तर असे चहापानाचे कार्यक्रम बख्खळ असायचे.एखाद्या व्यक्तीला घरी बोलवायचे असेल आणि जेवणासाठी  वेळ काढणे दोन्ही पार्टींना शक्य नसेल अशावेळी त्या संकटातून अलगद सुटका व्हायची ती घरधन्याकडून. आत बघत ते जोरात बोलायचे ,"काय हो, जेवण नको म्हणतात पाहुणे मग रविवारी  बोलवायच का चहाला? आतन  तात्काळ पदराला हात पुसत गृहलक्ष्मी  दारात यायची."सगळ्यांनी यायच हं भावोजी.कोणी पाहुणे  असतील तर त्यांना पण घेऊन या हो." साधारण चार वाजता आलात तरी चालेल बर." खर तर चहापान तसा इटूकला, जेवणांच्या मानाने धाकला कार्यक्रम पण आता जेवणांना मागे सारून तो पुढे सरसावतो आणि अभिमानाने  एखाद्या स्वतःला बैल समजणा-या बेडकीसारखा फुगु लागतो.त्याबरोबर घरही अंगात आलेल्या देवर्षी सारखे   घुमू लागते. येणारे पाहुणे कोण आहेत त्यावरून चहापानाला पदार्थ काय करायचा हे ठरविले जाते.

       सकाळ पासूनच घर आवरण्याचा कार्यक्रम सुरू! दिवाणावरची चादर बदलणे आणि आता कोणी त्यावर घुधडले तर माझ्याशी गाठ आहे ही धमकी अधिक आज्ञा, पाठोपाठ  यायचीच. नवीन जाजम घातले जायचे .नवे पडदे झुळझुळायचे. खोलीतील जळमटे, धूळ स्वच्छ केली जायची.उशांवर छानपैकी भरतकाम केलेले अभ्रे  सजायचे. चुकून  दुस-याच घरात आपण आलोय असे ती चकाचक बैठकीची खोली बघून वाटायचे. फुलदाणी पण रंगित सुगंधी फुले डोक्यात घालून टेचात उभी असे. दारात मारलेल्या सड्याने मृगाचे शिंतोडे पडल्यासारखा मृद्गंध दरवळायचा.  

          पदार्थ कुठले करायचे हे ऋतूमानाप्रमाणे चाणाक्ष  गृहस्वामिनीने ठरविले असे. त्याची जय्यत तयारी झाली असे. घडाळ्याकडे बघत ती पुटपुटायची आल्यावर एकदम गरमगरम करून देईन हो. ठेवणील्या निगुतीने वापरायच्या कपबशा आणि प्लेट्स कपाटातली त्यांची जागा सोडायच्या. काचेच्या  मोठ्ठ्या जग् मधले   थंडगार पाणी  वाळ्याने अधिकच  रूचकर आणि सुवासिक  व्हायचे. टेबलावर छान पैकी लेसचा टेबलक्लाॅथ वातावरण अधिकच साजरे करायचा. दिवाळीच्या आसपास चहापानाला कुणाला बोलवले तर दिवाळीचे पदार्थही आटोपशीर बाऊलमध्ये टेबलावर आदबशीर हजेरी लावत. या बरोबरच घरातल्या बच्चेकंपनीला शहाण्यासारखं वागण्याबाबत वारंवार तंबी दिली जायची. 

          त्यातून तो ताईचा 'दाखविण्याचा ' कार्यक्रम  असला तर विचारायलाच नको. हवेतील सणसणून वाढलेला ताण , पाळण्यातल्या बाळालाही जाणवायचाच. घर तर इतके लखलखीत केले जायचे की पुढील छप्पन वर्ष  कोळ्याला छतावर जाळे विणायची भीतीच  वाटली पाहिजे आणि पालीला भिंती वर फिरायची !

       अखेर पाहुण्यांचे आगमन व्हायचे. त्यात तर इतक्या त-हा असायच्या की बोलायची सोय नाही.चारची वेळ देऊनही साडेपाच सहा पर्यंत यजमानांना तंगवत ठेवणारे. ब-याचदा त्यातील  काही शिष्ठ मंडळी आम्ही नाही बाई असल खात असली वाक्य टाकायला लागल्यावर गृहलक्ष्मीच्या नाकाचा शेंडा लालेलाल झाला नाही तरच नवल! काही मात्र एकदम शहाण्यासारखे वेळेवर यायचे.बच्चेकंपनीसाठी खाऊ आणणारच.  प्रत्येक गोष्टीला म्हणजे अगदी भरतकाम केलेले अभ्रे  ते फुले आणि काचेचे बाऊल ते पदार्थ  यांचे मनसोक्त कौतुक करतील, पदार्थांना योग्य तो न्यायही  देतील. मोकळेपणाने  गप्पा मारतील.भरपूर हसवतील.बरोबर आलेल्या स्त्रीवर्ग हळूच पदार्थाची पाककृती घरच्या लक्ष्मीला विचारून कृतकृत्य करतील. खर तर अशा मंडळीनी जाऊच नये असे वाटते. तोवर संध्याकाळ झाली तर दही भात खायचा आग्रहही होतो. गृहलक्ष्मी कौतुकात न्हाऊन निघते .जाताना पाहुण्यांना आवडलेला पदार्थ डब्यातून आठवणीने देते.

       चहा  खरतर ब्रिटिशांनी आपल्याकडे आणलेलं हे पेय, कानामागून येऊन आपल्या आयुष्याची जणू  लांबलचक सावली बनलेला.सावली एकवेळ  चकमा देईल पण चहाची लत लग गयी मात्र सोडणे अवघडच. उठल्यावर चहा, राती जागायला चहा , तरतरीत वाटण्यासाठी चहा, पाऊसात भिजल्यावर परत आल्याचा चहाच!मित्र मैत्रिणी बरोबर घोटघोट चहा. दमून आल्यावर चहा. कधी एकट्याने प्यायचा चहा तर कधी मोठ्ठा सोहळा बनणार चहाच! होस्टेलवरचा मैत्रीणींनी केलेला पातेल भर चहा त्यातला माझा खास डचकाभर वेगळा काढलेला ! दुसरा लक्षात राहिलेला चहा म्हणजे रेल्वेतला.पूर्वी रेल्वे  वेटींगरूममधे स्पेशल चहा मागविला की खास चहा यायचा. जाड पांढ-याधोप काचेचे उभे कप, गुबगुबीत टीकोझी खाली लपवलेली तशीच  पांढरी बसकी गोलमटोल  किटली, अल्लाउद्दीनच्या दिव्यासारख्या आकाराच्या पांढ-या काचेच्या भांड्यात दुध आणि सर्वात  जास्त  आकर्षण वाटायचे ते साखरेच्या क्यूबचे. त्या दिवशी राज्ञीपद मिळाल्यासारखा आनंद मिळायचा. नंतर रेल्वेत पेपरकपमधून, कुल्हडमधून मातीच्या गंधाचा , मस्स्sssला चाय इत्यादी  अनेक चहा रिचवले पण तो वेटींग रूममधला चहा विसरणे अशक्यच.या सगळ्या मर्मबंधातल्या ठेवी आहेत.

         गंमत म्हणजे मदीरे पाठोपाठ सर्वात जास्त या चहावर काव्यही रचली आहेत. चहाची तल्लफ आल्यावर माफक साखरेचा दाट दुधाचा आणि पुसटत्या आल्याच्या वासाचा चहा यावा आणि नेमकं  त्याच वेळी भणाणणा-या माशीने  त्या प्याल्यात हाराकारी करावी मग त्यावर सुंदर काव्य व्हावं हे भाग्य मदिरेचा खालोखाल मिळते ते फक्त चहालाच.

           सकाळचा चहा जरा गडबडीचा पण ताज्या दुधाचा. उकळतानाच ते मिश्रण सारे स्वयंपाकघर सुगंधी करते. वेळेबरोबर जर रस्सीखेच नसली तर चहा आणि हातातल्या पेपरमधल्या बातम्या अगदी ब्रम्हानंदी टाळी लागलीच पाहिजे. किंवा गच्चीत वा गॅलरीत बसून घोट घोट चहा घेताना ती ऊब मुरवत पुरवत , पक्षांचे आवाज ऐकत आणि एकही मनुष्यप्राणी  निर्मित आवाज नाही अशा पहाटेच्या वेळी अशी भन्नाट तंद्री लागते की बस! येणारी वा-याची झुळूक  आणि सूर्यादेवाचा पहिला किरणही चहा पिण्यासाठी घाईघाईने आल्यासारखा जाणवतो.

कधी कधी कामाच्या ठिकाणी एखादा कप चहा होतो पण त्या पुळचटआणि पाणचट दोन घोटात तळ गाठणा-या काळसर पाण्याला चहा म्हणणे जीवावर येते. घरी आल्यावर जर तुमचे ग्रह उच्चकोटीचे असतील तर चला चहा तयार आहेचा हाकारा 

होतो आणि गरमागरम चहाचा कप हातात येतो. दुपारचा चहा म्हणजे त्याबरोबर चटकमटक हवेच.कोण कोणाची रंगत वाढवते ते सांगणं अवघडच.

          जपान मधील  चहापानाची नजाकत एकदम शाही. आधी तीन तीन वेळा कमरेत वाकवाकून अभिवादन आणि नंतर खास चहासाठी  राखीव खोलीत बैठ्या  टेबलवर नजाकतीने दिलेला चहा तो पण अतिशय देखण्या कान नसलेल्या कपांतून. त्यात हे बाऊल जितके जुने तितके तुम्ही अधिक महत्वाचे. एखाद्या रागदारीसारखा चार पाच तास रंगत जाणारा सोहळा आहे तो.चहा मात्र ग्रीन टी!

         ब्रिटिशही त्यांच्या त्या खास व्हिक्टोरीयन गुलाबी फुलांची नाजूक नक्षी असलेल्या चमकदार तलम कपातून चहाचा सोहळा  साजरा करतील पण बरोबर केक कुकीज सारखे पदार्थ  अनिवार्य.  टर्कीश मंडळी  आपल्यासारखीच चहाबाज.  अग्निहोत्र चालू असल्यासारखे सतत चहाच्या  किटलीत पाणी उकळत असत त्यामुळे लागेल तेव्हा हा चाय  दिमतीला हजर! त्याचे कपही खास  पारदर्शक काचेचे,कमनीय बांध्याचे  ! त्यात ते सोनेरी काळसर अमृत. हव तर साखर घाला वा तसेच घोट घोट प्या. क्षणात तरतरीत!

           लहानपणी घरी दुधशुभ्र पातळ काचेचे , सोनेरी कडांचे पसरट आकाराचे छानसे कप होते. आईचे भारी आवडते. कुणी चहापानाला यायचे तेव्हाच आई ते कप काढायची. स्वतः धुवायची पुसायची . एकदा आलेल्या पाहुण्यांना त्या कपात चहा ओतून माझ्या हातात तिने ट्रे दिला. ती मला सावकाश  जा असे सांगतेय तोच-------हाय रे दैया मी अडखळले आणि----- पुढचे रामायण सांगायलाच हवे कां? चार पैकी दोन कप बशा पूर्णतः धारातिर्थी पडल्या होत्या. सहाकपांचा तो सेट आता आपसुक  चार वर आला होता. तो चहापानाचा कार्यक्रम विसरणे अशक्यच.

         हल्ली व्यवसायानिमित्त दुपारी मोकळा वेळच नसतो . डिनरची आमंत्रणे असतात पण पूर्वीसारखे "चहाला या नं" हे आमंत्रण कित्येक वर्षात मिळालेले नाही.मुले घरी नसल्याने घर आवरणे हा कार्यक्रम पण आवर्जून करावा लागत नाही.त्यामुळे  ते चहापानाचे आमंत्रण, ते घर आवरणे, त्यापाहुण्यांबरोबर रंगलेल्या गप्पा. आईने केलेले चविष्ट पदार्थ आणि मृत्यूमुखी पडलेले कप सारेच खूप मिस करतेय.पण जेवणही तेवढ्याच श्रध्देनी आणि आवडीने एनजाॅय करते हेही तितकेच खरे!.

         



 माझे इतर लेख वाचायचे असल्यास खालील लिंक वापरावी. 

      https://drkiranshrikant.pasaara.com 

         

४ टिप्पण्या: